आमचे लालाजी गेले...

lalaji
lalaji

ऐन तारुण्यात सशस्त्र स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय असलेले लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल हे परिचितांमध्ये 'लालाजी' या टोपणनावाने प्रसिद्ध. मृदुभाषी पण करारी, अशी त्यांची ओळख होती. रझाकारांच्या जुलमाचा प्रतिकार करण्यासाठी स्थापन झालेल्या सशस्त्र दलांत त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

गावोगाव जाऊन तरुणांना बंदुका चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम लालाजींनी सवंगड्यांच्या मदतीने केले. आमच्या लाडसावंगी, दुधड, करमाड, टाकळी भागात त्यांनी कॅम्प चालवले. हरसूल कारागृहात बंदी असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना भेटणे, डबे पुरवण्याच्या निमित्ताने सुटकेची योजना आखणे, अशी कामे त्यांनी केली. कारागृह फोडून पळालेल्या श्रीनिवास खोत, शंकरराव पटेल, नागोराव पाठक या स्वातंत्र्य सैनिकांना जीपमधून सुरक्षित निजामी सीमेपार घालवण्याची वरिष्ठांनी सोपवलेली कामगिरी त्यांनी चोख पार पाडली होती. तुरुंगाच्या खिडक्यांचे गज वितळवून तोडण्यासाठी त्यांनी ऍसिड पुरवले. त्या जागी लावण्यासाठी मेणाचे गज बनवून दिले. हा प्रताप उघड झाल्यावर त्यांच्या विरोधात वॉरंट निघाले. तेव्हा ते फुलंब्रीजवळच्या कोलते टाकळी कॅम्पमध्ये सामील होऊन भूमिगत झाले. हा किस्सा त्यांच्या तोंडून ऐकताना अंगावर सर्रकन काटा यायचा.

निजामाच्या ताब्यात असलेल्या दौलताबाद किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याचे धाडसी काम त्यांनी साथीदार भाऊराव खैरे यांच्यासह यशस्वी केले. शर्टाच्या आत पोटाला गुंडाळून नेलेला तिरंगा तिथल्याच एका बांबूत खुपसून त्यांनी किल्ल्याच्या टोकावर असलेल्या दुर्गा तोफेजवळ फडकवल्यानंतर तिथे तैनात असलेल्या मोजक्या निजामी सैनिकांचीही भंबेरी उडाली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किल्ल्याच्या जामा मशिदीत भारतमातेची मूर्ती बसवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांत ते अग्रेसर होते. पिंपळगाव येथे रझाकारांशी झालेल्या चकमकीत ते सहभागी होते.

स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, आशाताई व आनंद कृष्ण वाघमारे, माणिकचंद पहाडे, प्रतिभाताई व भाऊसाहेब वैशंपायन, अनंत भालेराव, राजकुंवर व विजयेंद्र काबरा, चंदाबेन व रतीलाल जरीवाला, देवीसिंग चौहान यांच्यासह लालाजींनी काम केले. महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर त्यांची श्रद्धा होती. मुख्य म्हणजे आम्हा उद्योगी पोरांबद्दल त्यांना फार कौतुक होतं. केव्हाही, कुठेही भेटले, की ते सगळ्यांची विचारपूस करत. नव्वदीतला हा करारी माणूस अजूनही सुझुकीला किक मारून गावभर फिरतो, हेच आमच्यासाठी तेव्हा मोठं आकर्षण होतं.

बारा वर्षांपूर्वी लालाजींच्या सहस्त्रचंद्रदर्शनानिमित्त तुकडोजी महाराज साहित्य संमेलन शहरात घेण्यात आलं होतं. तेव्हा मी हिय्या करून त्यांच्याशी ओळख करून घेतली होती. त्यानंतर एकदा प्रभाकरदादा पुराणिकांना घेऊन ते आमच्या घरीही आले. फार पूर्वी आमच्या आजोबांनी बायजीपुऱ्यात विठ्ठल मंदिर उभारलं, तेव्हा त्यांच्या आमच्या घरी भेटीगाठी होत. जवळच्याच किराडपुरा इथल्या श्रीराम मंदिराला रझाकारांनी त्रास दिला. पुजाऱ्याला जीव मुठीत धरून राहावे लागे. त्यावेळी यांनी पुढाकार घेऊन ट्रस्ट स्थापन केला. त्याचे ते अध्यक्षही होते. त्याशिवाय सीमंत अनाथ वसतिगृह, समर्थ व्यायामशाळा, सीमंत मंगल कार्यालय, बालाजी ट्रस्ट, महाराष्ट्र गांधी स्मारक ट्रस्ट अशा संस्थांची उभारणी त्यांनी केली. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे ते सचिव, तर औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अनेक वर्षे संचालक होते. आमच्या सावरकरप्रेमी मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते आवर्जून येत. प्रत्येक वेळी कार्यक्रमांचा आर्थिक भार उचलण्याची त्यांची तयारी असे. 

एका प्रजासत्ताक दिनी अभिनव निर्माण प्रतिष्ठानतर्फे देवगिरी किल्ल्यात त्यांचा सत्कार आणि अनुभव कथनाचा कार्यक्रम आम्ही घेतला. हमीनुद्दीन पाशा, सुधाकर आजेगांवकर यांना घेऊन ते आले. सर्वांनी स्वातंत्र्यलढ्यातले त्यांचे अनुभव सांगितले. लालाजींनी आम्हा शंभरेक मुलांना दौलताबादच्या दत्त मंदिरात पिठलंभाकरीचे जेवण सांगितले होते. वयोवृद्ध असले, तरी तरुणांनाही लाजवणारा उत्साह त्यांच्या अंगी होता. 

कुंभारवाड्यात लांबलचक माडीवर राहणाऱ्या लालांचा हात देताना कधी आखडला नाही. अनेक गरजूंना, समाजोपयोगी कार्यक्रमांना त्यांनी सढळ हाताने मदत केली. खादीच्या बंडीच्या खिशातून नोटा काढण्याची, शांतपणे मोजण्याची त्यांची स्टाईल अजूनही आठवते. वयाच्या 91 व्या वर्षात पदार्पण करताना त्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 25 हजार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वृद्धाश्रमाला 25 हजार, उदयपूरच्या एका सेवाभावी संस्थेला 31 हजारांची देणगी दिली होती.

कुठे काही विशेष कार्यक्रम असेल, तर ते आवर्जून तिथे घेऊन जात. "हमारा क्या, हमारा जमाना गया। आगे चलके ये सब तुम्हे पता होना चाहिये।" असं म्हणत त्यांनी अनेकांशी ओळखी करून दिल्या. रतीलाल जरीवाला 94 वर्षांचे झाले, तेव्हा त्यांच्या घरी एक छोटासा कार्यक्रम झाला. शहागंजमध्ये महापालिकेच्या विरोधात एका उपोषणाची त्यावेळी चर्चा झाली. लालाजी मला आणि मित्र आदित्यला घेऊन गेले होते. आम्हीही उत्साहाने उपोषणात सहभागी होऊ, असं म्हटलं. नव्वद वर्षांच्या चंदाबाई म्हणाल्या, "ए लाला, उपोषण करणं आपलं म्हाताऱ्यांचं काम आहे. या पोरांनी खाऊन पिऊन उद्योग करायचे. आंदोलने, तुरुंगवास, उपोषण केल्याने आम्हाला फरक पडत नाही. यांचं शिक्षण वगैरे व्हायचंय. त्यांना आणत जाऊ नकोस." "अय पोरांनो, तुम्ही आत्ताच यात पडायचं काम नाही," असं म्हणून त्या दिवशी दालबट्टीवर भरपूर तूप घालून आग्रहाने जेवू घालणाऱ्या चंदाबाई लालांमुळे पाहायला मिळाल्या.

गेल्या महिन्यात आमच्या एका प्रकल्पात ते असावेत, म्हणून भेटीसाठी फोन केला. पण ते रुग्णशय्येवर होते. त्यामुळे भेटही घ्यायचं राहून गेलं. आपलं काहीही नवं, चांगलं चाललेलं पटकन जाऊन सांगावं, असे लालाजी आज दुपारी अनंतात विलीन होतील. अशी एकेक हिरा माणसं या शहरातून दुर्मिळ होत चाललेली...

पुढच्यांना पहायलाही मिळणार नाहीत.

-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com