केरोनाना आणि ब्रिटिश सरकार!

माणूस मानाने गेला, त्याला शेवटचं वंदन केलं, आपलं कर्तव्य संपलं, ही आपली नेहेमीची समाजधारणा. केरोनानांच्या नंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक परिस्थितीचा फारसा कोणी विचारच केला नाही.
Paper
PaperSakal
Summary

माणूस मानाने गेला, त्याला शेवटचं वंदन केलं, आपलं कर्तव्य संपलं, ही आपली नेहेमीची समाजधारणा. केरोनानांच्या नंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक परिस्थितीचा फारसा कोणी विचारच केला नाही.

या सदरात मागे एका लेखात आपण विनायक लक्ष्मण उपाख्य केरोनाना छत्रे यांचा जीवनपट बघितला. केरोनानांनी आयुष्यात बरेच चढ-उतार बघितले. कारकीर्दीच्या सुरुवातीला अवघे ५ रुपये महिना पगार असणारा हा माणूस डेक्कन कॉलेजच्या प्राध्यापकपदावरून १८७९ मध्ये निवृत्त झाला, तेव्हा त्याचा पगार महिना १५०० रुपये होता. गणित, भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र यात त्यांची देशभर ख्याती होती. १८६८ मध्ये ते कॅप्टन हेग आणि कॅप्टन टॅनरसोबत विजापूरला खास सूर्यग्रहण पाहायला गेले होते. त्यांनी लिहिलेला ग्रहणाचा रिपोर्ट त्यावेळी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. १८६८ मध्ये टिळक १२ वर्षांचे होते आणि महात्मा गांधींजींचा जन्म व्हायचा होता, त्या वेळी केरोनानांचं नाव भारताबाहेर गेलेलं होतं. महाराणी व्हिक्टोरियाचा मुलगा, इंग्लंडचा राजपुत्र प्रिन्स वॉफ वेल्सने १८७७ मध्ये जेव्हा दिल्ली दरबार भरवला होता, तेव्हा तिथंही केरोनानांना मानाचं आमंत्रण होतं.

असे हे केरोनाना त्यांच्या राहत्या घरी पुण्यातच १८८४ मध्ये १९ मार्चला दुपारी तीनच्या सुमारास वारले. ही बातमी पुण्यात वेगाने पसरली. नानांचा लोकसंपर्क जबरदस्त होता. त्यांनी मदत केलेले लोक अगणित होते. त्यांच्या घरी लोकांची गर्दी वाढू लागली. लोक काम सोडून त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घ्यायला जमू लागले. रस्ते भरून गेले. पुण्यातली सरकारी कार्यालयं, शाळा-कॉलेजं आणि बाजारही बंद झाले. नानांचं पार्थिव नदीकिनारी नेण्यात आलं. हजारोंचा जनसमुदाय होता. तिथं महादेव मोरेश्वर कुंटे ह्यांचं भाषण झालं आणि नानांच्या पार्थिवास अग्नी देण्यात आला. (हे सगळं वर्णन २० मार्च १८८४ च्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये आहे!)

माणूस मानाने गेला, त्याला शेवटचं वंदन केलं, आपलं कर्तव्य संपलं, ही आपली नेहेमीची समाजधारणा. केरोनानांच्या नंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक परिस्थितीचा फारसा कोणी विचारच केला नाही. निवृत्तीनंतर १८७९ पासून नानांना पेन्शन सुरू होती; पण ती आता थांबली होती. नानांना ६ मुली आणि ३ मुलगे. त्या काळी मुली नोकऱ्या करत नसत. तीन मुलांपैकी दोघे कॉलेजात शिकत होते. मोठा मुलगा महिना अवघ्या ८० रुपये पगारावर असिस्टंट मास्तरच्या नोकरीवर होता. त्यातून काहीच भागणार नव्हतं. नानांनी आयुष्यात पैसे असे साठवलेच नाहीत. सतत सढळ हाताने लोकांना आणि संस्थांना मदत करत राहिले. कुटुंबासाठी ठेवलेली बचत अशी काही नाहीच.

पुणेकरांनी जरी काही मदत केली नाही, तरी नानांच्या कुटुंबाची आबाळ मुंबई इलाख्याच्या शिक्षणखात्याचा प्रमुख सचिव जे. बी. रिचीच्या नजरेतून सुटली नाही. त्यावेळच्या मुंबईच्या गव्हर्नरशी - सर जेम्स फर्ग्युसनशी वारंवार पत्रव्यवहार करून, विनंत्या केल्या की, नानांच्या मागे त्यांच्या कुटुंबाला महिना शंभर रुपयांची पेन्शन सुरू करावी. त्यासाठी त्याने नानांच्या कामांची यादी लिहिली. सोबत इंग्लंडमधल्या अशा खास केसेसची नावंही दिली आहेत की, त्यांच्या विधवांना सरकारने खास पेन्शन सुरू केली होती. रिचीच्या अनेक खटपटींनंतर ही पेन्शन शेवटी एकदाची सुरू झाली.

या बाबतीतली सगळी कागदपत्रं वाचनीय आहेत आणि आजही ब्रिटिश लायब्ररीत जपून ठेवलेली आहेत. सगळ्यांचे फोटो मी काही इथं देणार नाहीये; पण हे कागद मी अभ्यासत असताना एका कागदात मला एक ओळ आढळली आणि जी वाचून मी बराच अस्वस्थ झालो. त्या वाक्याचा काही अंश सोबत देतोय : “...His Excellency the Governor in Council is of opinion that it would be discreditable to British Administration to allow the family of so very exceptional a man to suffer from poverty...”

भावार्थ : '... गव्हर्नर कौन्सिलचं असं मत आहे की. अशा अतुलनीय माणसाच्या (केरोनानांच्या) कुटुंबाला गरिबीत खितपत ठेवणं हे ब्रिटिश सरकारसाठी लांछनास्पद आहे...'

आता आठवा आपली सरकारं - गुणिजनांच्या आणि प्रतिभावंतांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची काळजी वगैरे घेणं तर सोडाच; पण त्यांना त्यांच्या जिवंतपणीच सरकारदरबारी खेटे घालायला लावणारी - आणि इथं लोकनियुक्त नसणारं ब्रिटिश सरकार केरोनानांच्या कुटुंबाला १८८४ मध्ये पेन्शन देतंय - का? तर ती न देणं सरकारसाठी लांछनास्पद आहे - किती हा विरोधाभास!

काय गरज होती त्यांना हे करायची? कोण कुठला केरोनाना छत्रे - सरकारी नोकर - पगार घेतला - निवृत्त झाला - पेन्शन घेतली - निधन झालं - त्यातून तो इंग्रज नाही - मग आता कसली आलीय त्याच्या गरीब कुटुंबाची जबाबदारी वगैरे? बरं आणि हे इंग्रज सरकारदरबारी कागदी घोडे नाचवतोय एक इंग्रजच, तोही शिक्षण खात्यातला सरकारी नोकर, ते पण एका मृत भारतीयाच्या कुटुंबासाठी. हे सगळंच विलक्षण आहे ! काय चांगलं, काय वाईट हे आपल्या सगळ्यांनाच कळतं. ह्यातून काय बोध घ्यायचा हे मी वेगळं सांगायची गरज नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com