छोटे छोटे शहरों की बडी बडी बातें... (संतोष भिंगार्डे)

छोटे छोटे शहरों की बडी बडी बातें... (संतोष भिंगार्डे)

भारतातल्या काही छोट्या छोट्या शहरांतली संस्कृती, तिथल्या परंपरा, रीती-रिवाज, तिथलं पर्यावरण, तिथलं राहणीमान, तिथला भोवताल हिंदी चित्रपटांमध्ये मांडण्याची एक वेगळीच वाट नव्या दमाचे काही दिग्दर्शक सध्या चोखाळताना दिसून येत आहेत. ‘मेरी प्यारी बिंदू’, ‘राब्ता’, ‘हिंदी मीडियम, ‘टॉयलेट ः एक प्रेमकथा’, ‘शुभमंगल सावधान’, ‘बरेली की बर्फी’ हे याच वाटेवरचे काही चित्रपट...हिंदी चित्रपटातल्या या नव्या वाटेविषयी...

स  ध्या हिंदी चित्रपटसृष्टीत विविध विषय हाताळले जात आहेत. बिग बजेट चित्रपटांबरोबरच स्मॉल बजेटचेही चित्रपट येत आहेत. दिग्दर्शकांची नवीन फळी उदयाला येत आहे. त्यांच्या कल्पना आणि त्यांचा एकूणच चित्रपटांकडं बघण्याचा दृष्टिकोन निराळा आहे. ही पिढी अत्यंत हुशार आणि जाणकार असली तरी तांत्रिक बाबींचंही त्यांना पुरेपूर ज्ञान आहे. बिग बजेट चित्रपटांपेक्षा स्मॉल बजेटचे चित्रपट काढून बॉक्‍स ऑफिसवर बक्कळ कमाई कशी करायची, हे ते व्यवस्थितपणे जाणून असतात. महत्त्वाचं म्हणजे केवळ परदेशातली संस्कृती आणि तिथल्या परंपरा मांडण्यापेक्षा भारतातल्या काही छोट्या छोट्या शहरांतल्या संस्कृती आणि तिथल्या परंपरा आपल्या चित्रपटांमध्ये मांडून प्रेक्षकांचं लक्ष ही मंडळी वेधून घेत आहेत. भारतातल्या गाव-शहरांमधली संस्कृती याआधीही चित्रपटांमधून आली नव्हती असं नाही; पण आता बदललेल्या काळानुसार तरुणांना आकर्षित करून घेता येईल या पद्धतीनं, त्याचप्रमाणे नवनवीन कलाकारांना, तंत्रज्ञांना संधी देऊन त्यांच्यातलं टॅलेंट शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. एखादा सेट उभारून चित्रपट बनवण्यापेक्षा थेट अर्थात कथा जिथं घडते, तिथल्या शहरात किंवा गावात जाऊन चित्रीकरण केलं जात आहे. त्यामुळं त्या त्या गावाला आणि शहराला आगळंवेगळं महत्त्व प्राप्त होत असून सकस चित्रपटांची निर्मिती आहे. केवळ मनोरंजनाचाच हेतू ठेवला जात नसून, काही चित्रपटांद्वारे समाजप्रबोधनही केलं जात आहे. चित्रपटाचा विषय, त्याची मांडणी, संगीत, लोकेशन, तिथलं राहणीमान, तिथली खाद्यसंस्कृती, तिथल्या चाली-रीती, तिथलं लोकसंगीत व आचार-विचार यांचा अधिक विचार केला जात आहे. यापूर्वी चित्रपटांमध्ये असे विषय हाताळले गेले असले तरी आणि प्रेक्षकांनी त्यांचं चांगलं स्वागत केलं असलं तरी अलीकडच्या तीनेक महिन्यांतल्या चित्रपटांवर नुसती नजर टाकली, तरी काहीसं निराळंच चित्र दिसेल. निराळं म्हणजे भारतातल्याच छोट्या छोट्या शहरांमध्ये चित्रपटाची कथा फिरताना दिसत आहे. तिथली जीवनशैली आणि तिथलं एकूणच जीवनमान यांचं यथार्थ चित्रण या चित्रपटांमधून केलं जात आहे.
अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं, तर ‘मेरी प्यारी बिंदू’, ‘राब्ता’, हिंदी मीडियम, ‘टॉयलेट ः एक प्रेमकथा’, ‘शुभमंगल सावधान’, ‘बरेली की बर्फी’ अशा काही चित्रपटांचं देता येईल. ‘राब्ता’ हा दिनेश विजनचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट. या चित्रपटात त्यानं पुनर्जन्माची कहाणी मांडली आहे. खरं तर हा पॅटर्न हिंदी चित्रपटसृष्टीसाठी नवीन अजिबातच नाही. यापूर्वीही असे काही चित्रपट आलेले आहेत. ‘ओम्‌ शांती ओम्‌’ किंवा ‘करण-अर्जुन’ ही उदाहरणं त्यासंदर्भात देता येतील. मात्र, दिग्दर्शक म्हणून पदार्पण करताना दिनेशनं ही कथा निवडली. (दिनेश वीजननं यापूर्वी काही चित्रपटांची निर्मिती केलेली आहे). सुशांतसिंह राजपूत व क्रिती सेनॉन ही जोडी त्यानं घेतली. या चित्रपटाची सुरवातच मुळात पंजाबमधून होते. आता यापूर्वीही पंजाब अनेक चित्रपटांमध्ये दिसलेला असला, तरी त्यानं काहीसा वेगळा बाज मांडला आणि त्यानंतरची कथा बुडापेस्ट इथं घडवून आणली.

दिग्दर्शक श्रीनारायणसिंहच्या ‘टॉयलेट ः एक प्रेमकथा...’ची कथा मेरठसारख्या छोट्या शहरात घडते. ही कथा पडद्यावर मांडताना दिग्दर्शकानं अगदी बारीकसारीक गोष्टींचा विचार केलेला दिसून येतो. आज भारतात कित्येक गावांमध्ये-शहरांमध्येही टॉयलेट ही एक मोठी समस्या आहे. कित्येक ठिकाणी आजही ही अत्यावश्‍यक सुविधा नसते. दिग्दर्शकानं या चित्रपटात लव्हस्टोरी मांडताना या गोष्टीचा बारकाईनं विचार केला आहे आणि अगदी मार्मिकपणे या गोष्टीवर त्यानं या चित्रपटात भाष्य केलं आहे व केवळ मनोरंजनच न करता सामाजिक संदेशही दिला आहे. या चित्रपटात मेरठ आणि आजूबाजूच्या परिसरातली बोलीभाषा, तिथल्या लोकांचं राहणीमान, तसंच संस्कृती व परंपरा प्रभावी पद्धतीनं पडद्यावर रेखाटण्यात आली आहे. छोट्या छोट्या शहरांतली घरं, तिथल्या लोकांवर असलेला परंपरांचा पगडा वगैरे वगैरे गोष्टी दिग्दर्शकानं छान मांडलेल्या आहेत. ‘बरेली की बर्फी’ या नावावरूनच या चित्रपटाची कथा बरेली या शहरात घडणार हे स्पष्ट होतं. दिग्दर्शक अश्‍विनी अय्यर तिवारी यानं बरेलीतलं वातावरण आणि तिथली संस्कृती या चित्रपटात दाखवली आहे. हीदेखील एक लव्हस्टोरी असली तरी तीमध्येही तिथली खाद्यसंस्कृती आणि तिथली घरं यांचं यथासांग दर्शन घडतं.


 ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटातही जुन्या दिल्लीची सवारी दिग्दर्शकानं घडवली आहे. दिल्लीतलं मध्यमवर्गीय कुटुबं... त्याच्यासमोर येणारे विविध प्रश्‍न सुरेख टिपलेले आहेत.  आज चित्रपट हे माध्यम मोठं झालेलं आहे; त्यामुळं छोट्या गावातल्या आणि शहरांतल्या लोकांना या माध्यमाकडं आकर्षित करणं गरजेचं आहे. मनोरंजनाच्या कक्षा रुंदावत चाललेल्या आहेत. मनोरंजनाची विविध साधनं उपलब्ध आहेत. छोट्या पडद्याची स्पर्धा मोठ्या पडद्याशी आहे. विशेष म्हणजे, मोठा पडदा अधिक आक्रमक झाला आहे. त्यामुळं छोट्या शहरांना, गावांना, तिथल्या संस्कृतीला ग्लॅमरस रूप देऊन तिथल्या प्रेक्षकांनाही या चित्रपटांकडं खेचण्याचा प्रयत्न यामधून केला जात आहे किंवा नकळतपणे होत आहे, असंही म्हणता येईल. काही आगामी चित्रपटांमध्येही हे चित्र असल्याचं दिसून येईल. त्यामध्ये राजकुमार रावच्या ‘न्यूटन’ या चित्रपटात छत्तीसगडमधल्या दुर्गम भागाचं चित्रीकरण आहे. तिथले आदिवासी, त्यांची संस्कृती, राहणीमान सगळंच या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. लखनौ शहर हे आजपर्यंत बऱ्याच चित्रपटांत व मालिकांमध्ये दाखवण्यात आलं असलं, तरी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लखनौ सेंट्रल’ या चित्रपटात लखनौ शहराचं निराळंच दर्शन घडतं. या चित्रपटाची कथा जास्तकरून जेलभोवतीच फिरणारी आहे. अक्षयकुमारच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचं चित्रीकरणही मध्य प्रदेशातल्या खरगोन जिल्ह्यातल्या महेश्‍वरमध्ये आणि इंदूरमध्ये झालं आहे. दिग्दर्शक सात्विक मोहंतीच्या ‘रांची डायरीज्‌’ या चित्रपटामध्ये रांचीतील दऱ्या-डोंगर दाखवण्यात आले आहेत. आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’मध्ये बडोदा शहर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. बडोदा हे शहर जरी मोठं असलं तरी तिथला आजपर्यंत न दाखवला गेलेला भाग या चित्रपटात दाखवला जाणार आहे. बडोदा शहरातलं विमानतळ, बागा, आइस्क्रीम पार्लर, छोट्या छोट्या गल्ल्या यांचं दर्शन दिग्दर्शक अद्वैत चंदन या चित्रपटातून घडवणार आहेत. त्यामुळं संपूर्ण बडोदा शहराचं चित्रंच प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभे राहील. हे सगळं पाहिल्यानंतर ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ या चित्रपटातला शाहरुख खानचा तो प्रसिद्ध डायलॉग आठवतो...
‘बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है...’
मात्र, त्यात काहीसा बदल करून ‘छोटे छोटे शहरों में बडी बडी बातें होती रहती है’ असं म्हणायला काहीच हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com