शुजात बुखारी : चार मिनिटांची ओळख...

shujaat bukhari
shujaat bukhari

शुजात बुखारी यांची हत्या झाल्याची बातमी टीव्हीवर पाहिली आणि धक्का बसला. गेल्याच महिन्यात त्यांच्याशी बोलणं झालं होतं. त्याला आज (ता.18) महिना झाला. त्यांची आणि माझी ओळख नव्हती. केंद्र सरकारने रमजाननिमित्ताने सरकारने जम्मू काश्मीरमधे लष्करी कारवायांना विराम दिला होता. त्यावर टीकाही खूप झाली. केवळ फुटीरतावादी संघटनाच नाही, तर निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनीही टीका केली होती. त्यावर काश्मीरमधील माध्यमांना काय वाटतं, याचं कुतूहल मनात होतं. त्यावर बातमीही करायची होती. कुणाशी बोलावं याचा विचार करीत होतो. दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी शुजात यांचा मोबाइल नंबर पाठविला. त्यानंतर अठरा मे रोजी बुखारी यांच्याशी झालेलं बोलणं हे पहिलं आणि शेवटचं ठरलं. 

शुजात आणि मी चार मिनिटे बोललो. ते अगदी स्पष्टपणे बोलत होते. सरकारच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केलं. इससे शांती की उम्मीद बढ सकती है, असं ते म्हणाले होते. सरकारनं शस्रसंधी पुरतं (सीजफायर) मर्यादित राहू नये. कारण काश्मीरचा प्रश्न हा राजकीय आहे, तो सोडविण्यासाठी उपाय योजले जावेत, असं मत त्यांनी ठामपणे माडलं होतं. सरकारने हा निर्णय घेताना दहशतवादी संघटनांना देखील संदेश द्यायला हवा. मध्यस्थांमार्फत चर्चा करून शस्रसंधी केली असती, तर त्यांनी हा निर्णय नाकारला नसता. तरीही सरकारचा चांगला निर्णय आहे. कारण इथं लष्कराकडून चकमकी होतात, त्यात सामान्य नागरिक मारले जातात. त्यांचा गोळीबार थांबणार असल्यानं सामान्यांचे बळी जाणार नाहीत, म्हणून मी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करतो...

ही चार मिनिटे आणि एवढाच संवाद. नंतर बातमी आली ती त्यांच्या हत्येचीच. बुखारी हे बेधडक पत्रकारितेसाठी ओळखले जात. अशांत नंदनवनात शांतता नांदावी, यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. अशा पत्रकाराची हत्या करण्यात आली. गोळीबार थांबला की सामान्य नागरिकांचे बळी जाणार नाही असं जे म्हणाले, त्यांनाच गोळ्या झेलाव्या लागल्या. जीव गमवावा लागला, याला काय म्हणावे? शुजात यांनी पंतप्रधान मोदी यांच्या काश्मीर भेटीनंतर एक लेख लिहिला होता. त्यातही त्यांची मतं परखड होती. विकास हाच काश्मीर प्रश्नावरील उपाय आहे, हे पंतप्रधानांचं व्यक्तव्य त्यांनी खोडून काढलं होतं. तुम्ही 80 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केलंय. फारुख अब्दुल्ला यांनी पण विकासाच्या नावाखाली शाळा, दवाखाने उभारण्याचं काम सुरू केलं होतं. पण ते वादाची परिस्थिती बदलू शकले नाहीत. नंतरही विकासाची स्वप्ने दाखविली गेली. पण प्रश्न सुटला कुठे? काश्मीर प्रश्न हा राजकीय आहे. त्याच पद्धतीनं तो सोडवला गेला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं होतं... त्यांची मतं पक्की होती.

आता शुजात यांची हत्या का आणि कुणी केली, हा प्रश्न मागे उरलाय. श्रीनगरमधे सुरक्षित मानल्या जाणाऱ्या प्रेस कॉलनी परिसरात त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. शस्रसंधीमुळं तेथील सुरक्षा सैल झाली असावी आणि दहशतवाद्यांनी डाव साधला असावा, हे समजण्यास वाव आहे. त्यांच्या हत्येनंतर पाकिस्तान सरकार, तेथील माध्यमे आणि अगदी दहशतवादी संघटनांनी देखील त्यांच्या हत्येचा निषेध नोंदविला, तर भारताने हत्येमागे आयएसआय असल्याचा आरोप केलाय. दोन्ही देश एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले, यातच हत्येचं मूळ दडलेलं असावं. काही ऑनलाइन न्यूज पोर्टलच्या म्हणण्यानुसार, शुजात यांच्या हत्येपूर्वी काही महिने पाकिस्तानच्या काही वृत्तपत्रांमधून ते भारताला मदत करीत असल्याच्या बातम्या पसरवल्या गेल्या होत्या. याचा अर्थ त्यांच्या हालचालींवर नजर बराचकाळ ठेवली गेली आणि रमजानच्या महिन्यात त्यांना संपविण्यात आलं. ज्या सशर्त शस्रसंधीचं त्यांनी स्वागत केलं, त्याकाळात त्यांची हत्या व्हावी, याचे वेगवेगळे अर्थ आहेत. त्यांची हत्या ही राजकीयच समजावी लागेल. ती कुणी केली, याचा तपासही होईल. परंतु हत्येमागील कारणांचा उलगडा होईलच, याची खात्री मात्र वाटत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com