'शून्यवादा'चं आधुनिक उच्चारण (संतोष शेणई)

book review
book review

नव्वदीनंतरच्या कवींमधील महत्त्वाचे असलेले पी. विठ्ठल यांचा "शून्य एक मी' हा कवितासंग्रह आसपासच्या सुन्न करणाऱ्या शून्य वास्तवाची जाणीव करून देतो. जागतिकीकरणानं एकूणच समाजात, माणसामाणसांत, नातेसंबंधांत, नोकरी- व्यवसायांत, आपल्या मूल्यव्यवस्थेत आणि एकूणच भोवतीच्या पर्यावरणात "न भूतो' असे बदल होत गेले. माणसालाच क्रयवस्तू बनवणाऱ्या या काळात माणसाच्या वाट्याला येणारी शून्यावस्था कवी आपल्यासमोर मांडतो. त्याचवेळी माणसाचे अस्तित्व जपण्याची एक आश्वासक जाणीव देतो.

ही कविता अनेक अर्थानं, विविध अंगांनी मला महत्त्वाची वाटते. तरीही त्यातील भाषेसंदर्भातील जाणीव मला अधिक महत्त्वाची वाटते. भाषा ही संस्कृतीवाहक असते आणि माणसाच्या अस्तित्वभानाची खूणही असते. भाषा सतेज असते, तोवर माणूस फणारून असतो आणि निस्तेज भाषेच्या काळात माणूस गुहेतला अंधार शोधू लागतो. भाषा आणि जीवन एकमेकांना ऊर्जा देत असतात, म्हणून कवीच्या लेखी भाषेला महत्त्व खूप असते. जागतिक पातळीवरच समकालीन कवितेत भाषेच्या अस्तित्वाबद्दलचे, तिच्या तंत्रशरणतेचे, एसएमएसच्या निमित्तानं विक्षिप्तशा संक्षिप्तपणाचे प्रश्न उमटत आहेत. पी. विठ्ठलांची कविताही त्याला अपवाद नाही.
"शिवीपुरती का होईना
जिवंत राहिली पाहिजे
माणसांची भाषा
निदान त्यामुळे
माणूस नावाचा प्राणी
बोलू शकत होता
एवढे तरी सिद्ध
होईल'

भाषेच्याच तण्डणात भाषा लोप पावेल, भाषा ओवी विसरेलच; पण कदाचित शिवीतही ती उरणार नाही, हा भयसंकेत केवळ भाषेविषयीचा नाही, तर माणूसपणाच्या, मानवी संस्कृतीच्या अस्तित्वाविषयीची आत्यंतिक भयकारी शंका आहे. भाषेला सतेज ठेवण्याची जबाबदारी कवीचीच असते. ही जाणीव कवीला असल्यानंच तो स्वत:लाच आव्हानात्मक प्रश्न विचारतो : "प्रतिमांची सावली पांघरून कवितेनं झोपी जावं, इतकी निष्क्रियता कशी परवडेल माणसाला?'
भाषेइतकाच महत्त्वाचा असतो आवाज. कवीचा आवाज. या आवाजात झोपलेल्यांना जागं करण्याची, जागं असणाऱ्यांना उठवून बसवण्याची आणि बसलेल्यांना चालवण्याची ताकद असते. कवीच्या या आवाजालाच सर्व सत्ता घाबरत असतात. हा आवाज दाबण्याचा सतत प्रयत्न चालत आलेला आहे.
"भीती वाटतेय याचीही की आपण हळूहळू मॉडर्न बनत
आहोत की काय? मेंदूवर धूळ साचत जाईल हळूहळू
आणि प्रश्नांचा टाइमबॉंब फुटेल की काय?
आणि भीती याचीही वाटते-
कोणत्याही क्षणी आपल्या आवाजाचे एन्काउंटर
होईल काय?'
हे एन्काउंटर होईल, तेव्हा आपणच जबाबदार असू. कारण आधुनिकीकरणानं लादलेल्या गतिमान आयुष्याला चिकटून आलेलं सक्तीचं फॅशनेबल राहणीमान आपण स्वीकारलेलं आहे. या अंधाधुंद स्पर्धेतील ताणतणाव, त्यासाठीचे बेगडी शिष्टाचार आणि विसंगती ही आपल्या जगण्याचा भाग बनली आहे. मग प्रगतीच्या पोकळ फुगवट्यात सतत अपडेट करण्याचा छंद आपण जोपासतो. हे सारंच संवेदनशील कवीला अस्वस्थ करणारं आहे.

पी. विठ्ठल यांच्या कवितेत मानवी आवाक्‍यातील बीजांची रुजवण आहे. त्यात माणसांच्या जगण्याला आव्हान देणारे भयसंकेत आहेत, तशाच जगण्याला आवाहन करणाऱ्या, नव्या संकटांसाठी सज्ज करणाऱ्या प्रार्थनाही आहेत. या कवितेतील रोजच्या जगण्याची धग बाजारसन्मुख सुखाच्या आनंदानं भरलेली आहे आणि कृषिप्रधान वास्तवातून आलेलं मध्यमवर्गीय संवेदनही आहे. माणसाच्या मनातील स्वप्नशील कोवळीक आहे आणि सुरक्षित कोपऱ्याएवढा उपरा त्या स्वप्नांचा आकार आहे. मनात आणि बाहेरही चालणारा संस्कृतीसंघर्ष आहे. विशिष्ट मूल्यांसाठी त्याचं जगणं सुरू आहे आणि त्या जगण्याला या बाजारव्यवस्थेनं नादान करून सोडलं आहे. त्याची नैतिकता, त्याची भाषा, त्याची संस्कृती "गॅजेट्‌स'बरोबर हातातून निसटत चालली आहेत. एक प्रकारचं परावलंबी जगणं इथल्या स्वावलंबी म्हणवणाऱ्या माणसाच्या नशिबी आहे. ही पराधीनता आध्यात्मिक नाही. ज्या इहवादासाठी आयुष्यभर झटत आला, त्या इहवादाच्या आत्यंतिक टोकातून ही पराधीनता पदरी आली आहे. हे जसं आकळत गेलं, तशी ही कविता सहज लयीतून माणसाच्या जगण्याच्या अधिकाधिक जवळ गेलेली दिसते. तेच या कवितेचं शक्तीस्थान आहे.
"गतकातरता' या भावनेची प्रचिती या कवितेत सतत येते. गतकाळातील रम्य क्षणांची उजळणी नव्या उगवणाऱ्या दिवसांकडून होत नाही आणि त्यामुळे झालेले बदल भ्रमनिराशेच्या गर्तेत ढकलून देतात. धर्माच्या, जातीच्या अवकाशातून होणारं विघटन भयंकर स्वरूपात आपली ओळख देतं आणि आस्था, आपुलकी विरत गेलेली दिसते. कोणत्याही भावनेची बीजं आता उगवू शकत नाहीत, ही तीव्र जाणीव होते. माणसं दु:खाच्या निराकारणाची स्वप्नं पोथ्यांमध्ये शोधताना दिसतात, तेव्हा प्रगतीचा पोकळपणा अधिक भकास करून सोडतो. त्यातच "जगण्याच्या सुखजन्य वाटांचा पासवर्ड सापडलाय लोकांना' असं समजण्यात मानवी उत्थानाचं कोणतंही अस्तर आपल्या हाती लागलेलं नाही, याची खोल दु:खजाणीवही आहे.
मग ही कविता नव्या भाकितांचं सूचन करत जाते. अर्थात त्यातून पुढे येणारा निरर्थवाद हा या कवितेचं सूत्र बनला आहे. सांख्यानं मांडलेल्या "शून्यवादा'चं हे आधुनिक उच्चारण आहे.

पुस्तकाचं नाव : शून्य एक मी
कवी : पी. विठ्ठल
प्रकाशक : कॉन्टिनेन्ट प्रकाशन, पुणे (020-24337982)
पृष्ठं : 128/ मूल्य : 150 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com