आतल्या प्रकाशाची प्रार्थना!

Diwali
Diwali

नरकचतुर्दशीच्या पहाटे अंगणात तुळशीपुढे कारीट चिरडून मालवणी माणसाची दिवाळी सुरू होते. मालवणी मुलखात दिवाळीचे कोडकौतुक असे नाहीच, इथला सगळा आनंदोत्सव गणपती या चार अक्षरात सामावलेला असतो. तरीही दिवाळी आली की, आपोआप प्रसन्नताही येतेच. माझ्या लहानपणी कोकणात विजेचा लखलखाट नव्हता. शंभर वॅटचा दिवाही मिणमिणते अस्तित्व दाखवायचा. त्यावेळी नरकचतुर्दशीचा अंधार कसला दाट असायचा! घराच्या मागच्या-पुढच्या खळ्यात उजळलेली एक-एक पणती हा अंधार अजून गूढ करायची. 

थंडीची सुलूस घेऊन दिवाळी आलेली असायची. यंदा पाऊस अजून माघारी परतलेला नाही. त्याचाच ओलावा हवेच्या भिंतीला. पिकायला आलेली भातशेती वाकायला लागली आहे. त्याचे सावट दिवाळीवर. औनुच्या दिवाळेक काय मज्या नाय, म्हणता म्हणता दिवाळीचे फॉव (पोहे) खायला मालवणी मुलूख सज्ज झाला आहे. वसुबारस व धनत्रयोदशी या दिवशी गावातील दोन-चार प्रतिष्ठितांच्या दारात दीप उजळतात तेवढेच. शहरातून धनत्रयोदशीला हे धणे आणि गूळ यांनी अलंकारपूजन केले जाते.

समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने बाहेर पडली त्यांची ही पूजा. प्रतिकात्मक स्वरुपात एखादा सोन्याचा दागिना, तसेच हिरा, पाचू, माणिक आदी रत्ने यांचे पूजन केले जाते. का म्हणाल? तर धन हे रत्न नि अलंकार स्वरूपातील असलेली मालमत्ता असून, तिने आपल्याला प्रतिष्ठा आणि सुबत्ता प्राप्त होते. ती वर्धिष्णू व्हावी, यासाठी तिचे पूजन केले जाते. धनत्रयोदशीचे आणखी एक महत्त्व असे की, त्याचदिवशी समुद्रमंथनातून धन्वंतरी देवता हातात अमृत कुंभ घेऊन वर आली. त्यामुळे ती आरोग्यदेवता आहे.

आयुर्वेदाचा उपचार करणारे वैद्य यादिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. आपल्याला कोणताही आनंद अनुभवावयाचा असेल तर आपली प्रकृती चांगली हवी. म्हणून आरोग्य देवता असलेल्या धन्वंतरीचे पूजन आणि स्मरण करणे हे सर्वांच्याच कल्याणाचे मानले आहे. त्याचदिवशी यमदीपदान केले जाते. यम ही मृत्यूदेवता आहे. जन्म आणि मृत्यु या दोन स्थिती प्रत्येक जीवमात्राला असून, त्या अटळ आहेत. त्यामुळे आपल्याला अपघाती, दु:ख, क्लेशदायी असा मृत्यू न येता शांतपणे मरण यावे, अशी प्रार्थना यमराजाला या दिवशी केली जाते. यमाची दिशाही दक्षिण दिशा असल्याने एरव्ही अशुभ समजल्या जाणार्‍या या दिशेलाच दीप लावला जातो. यमराजाने प्रार्थना ऐकावी आणि आपणास सुखद, शांतरूपी सहजपणे मरण यावे, यासाठी ही यमपूजा आहे. दीप हा प्रकाशरूप आहे, तसा तो मंगलदायी देखील आहे. अर्थात हे सगळे कोकणाला पूर्वी ठावे नसावे. आताही मालवणी मुलखात गावातील एखाद्या दुसऱ्या घरी दीप तेवण्यापलीकडे या दिवशी काही नसते.

या मुलखाची खरी दिवाळी नरकचतुर्दशीपासून. पाडवा, भाऊबीज व तुळशीचे लग्न हे दिवस येथील माणूस केवळ साजरे करत नाही, तर अक्षरशः जगत असतो. या दिवसात दिव्यांनी गाव उजळून निघतो. आता वीज आली. आकाशकंदिलात विजेचा दिवा असतो. पण तरीही शहरी भगभगाट कोकणातल्या दिवाळीत नसतो. पूर्वी तेलाचे शांत दिवे जळायचे, आता अंगणात तुळशी वृंदावनापुढे तेलाचा दिवा असतो आणि बाकी घरदार मेणाच्या पणत्यांनी प्रकाशते. 

घरांना नुकताच गणपतीच्या आधी रंग दिलेला असतो. ज्यांना त्यावेळी घर रंगवता आलेले नसते, ते आता रंगवून घेतात. दिवाळीच्या आदल्या दिवशी घर-अंगण सारवून घेतले जाते. गणपतीनंतर पुन्हा कोपऱ्यात धरलेले कोळीष्टक, जळमट काढले जाते. न्हाणीघरातला पाणी तापवण्याचा हंडा घासून पुसून चकचकीत केला जातो. गंध-कुंकवाची बोटे त्यावर ओढली जातात. झेंडूच्या फुलमाळेत कारिटे ओवली जातात आणि त्या माळेचे वेढे हंड्याला दिले जातात. दाराच्या चौकटीवरही आंब्याच्या पानांबरोबर या माळा लागतात. कारीट या रानफळाची आठवण दिवाळीत होते. बुटुकल्या काकडीसारख्या दिसणाऱ्या या लंबगोल फळाला गुरेही तोंड लावत नाहीत. इतके निरूपयोगी असलेले हे फळ आता न्हाणीघरातल्या हंड्याच्या गळ्यात, घराच्या दाराच्या चौकटीवर शोभा वाढवत असते. पहाटे उजळवण्यासाठी मातीच्या पणत्या धुवून सुकवलेल्या असतात. डौलदार चालीने दीपावली दारात आलेली असायची.
..आणि नरकचतुर्दशीची पहाट कोंबड्याने बांग देण्याआधीच जागी व्हायची. भरपूर खोबरेल तेलाने अंगमालीश व्हायचे. मग गरमधोम पाण्याने आंघोळ. अंगणात तुळशीपुढे सारवलेल्या तुकड्यावर कारीट ठेवायचे आणि `गोविंदा गोविंsदा` म्हणत डाव्या पायाच्या अंगठ्याने कारीट चिरडायचे. आपण गावात पहिल्यांदा नरकासूर चिरडायचा असे दरवर्षी ठरवायचो मी, पण सगळी तयारी होऊन पायऱ्या उतरत असतानाच कोणी तरी गोविंदाचे मोठ्याने स्मरण करताना कानी पडायचे. मग मी पडेल आवाजातच गोविंदाला हाका मारत कारीट चिरडत असे. चिरडलेल्या कारीटाच्या कडू रसाचे बोट जिभेला टेकवायचे. त्याच्या बिया मस्तकी धारण करायच्या आणि नरकासुराचा वध केल्याच्या आविर्भावात गावमंदिराची वाट चालू लागायची. आज ही वाटही वेगळी वाटू लागायची.

या वाटेवरून रोजच मी जात असे. शाळेत जायची, खेळायला मंदिरालगतच्या रिकाम्या कुणग्यांकडे जायची हीच वाट असे. पण या पहाटे दोन्ही बाजुला पिकायला आलेली भातशेती वेगळीच काही सळसळायची. झाडांची पाने, खोडे, आकाशाचे रंग, पाखरांची किलबिल, सारे चराचरच वेगळेच भासायचे. नरकासूर चिरडून निघालेला मी एक वेगळेच स्वप्न जगत आहोत असे त्या पोरवयात वाटायचे. 

आज इतक्या वर्षांनी त्याच स्वप्नात मी पुन्हा जगतो आहे. दीपावलीने हळूवार केले आहे. आतला अंधार दूर करीत आत उजेड जागवला आहे. आसपास केवळ स्नेही आहेत, काळाने आणलेली कटुता दूर झाली आहे. पणतीत स्वतः जळून हा अंधार दूर करणाऱ्या तेलातुपाला म्हणूनच स्नेह म्हणत असावेत का?  मी प्रसन्न मनाने देऊळवाट सोडतो. पहाटवारा पाठीवर घेऊन निघालेल्या रस्त्याने चालू लागतो. आंब्याफणसांच्या झाडांमधून, चिंचेखालून निघालेल्या वाटेने चालतो आहे. अंतःकरण भरून यावे तसे आभाळ डोक्यावर. लांब रानातून येणाऱ्या पाऊलवाटा या रस्त्याला मिळत चाललेल्या. मी दूरवर भटकून परत येतो. आसपासचा अंधाराचा पडदा दूर सारीत, कुठेही नरकासूर उरलेला नाही याची खात्री करीत परतलो. यादिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला असा पौराणिक संबंध आहे. असुरवधाचे स्मरण म्हणजे अशुभाची हकालपट्टी करून मांगल्याची प्रकाशरूपे पाहात राहणे होय. या मांगल्याच्या दीपतेजात कपाळाला कुंकू लावत औक्षण करीत आई माझ्यातील कृष्णरूपाच्या शौर्याचे कौतुक करीत आहे. 
समोर केळीचे पान, पानाभोवती रांगोळी, पानात वेगवेगळ्या प्रकारचे पोहे. हो पोहेच. गुळाचे, नारळाच्या रसातले पोहे सगळ्यांकडेच असायचे. पण काहींकडे ताकाचे, फोडणीचे, कढीचे, साखरेचे, हळदपान घालून केलेले दुधाचे, तिखट असे कितीतरी प्रकारचे पोहे असायचे. केळ्यांचे पंचामृतही असायचे. आता एवढे सारे करणे आईला जमत नाही. ती लवंगाची फोडणी देत साखरपोहे करते. गावात सगळ्यांकडेच असतात पोहे, तरीही एकमेकांना आग्रहाने बोलावून फॉव खायला घातले जातात. 

आजच्या दिवसासाठी पोहे तयार करण्याची लगबग गेल्या आठवड्यातच सुरू झालेली असते. बेळ्याचे नाहीतर कड्डीचे भात पोह्यांसाठी चांगले. बहुतेक घरात मुसळाखाली पोहे तयार व्हायचे. काही ठिकाणी लाठेखाली पोहे कांडले जायचे. एका बाजूला जमिनीत लाकडी उखळ पुरलेले असायचे. आठ-दहा फूट लांबीचे चौकोनी लाकूड तीन-साडेतीन फूट उंचीच्या दुसऱ्या लाकडात घट्ट बसवलेले असायचे. खाली वर होणारे. घसरगुंडीगत. उखळाकडच्या बाजूला सोंडेसारख्या आकारात खाली लोखंडी घण बसवलेला. दुसऱ्या बाजूला एका छोट्या दगडावर उभे राहून आधारासाठी छताला बांधलेली दोरी पकडून एक गडी उभा असायचा. ही लाठ मागच्या बाजूने पायाने नेटाने दाबायचा. पुढच्या वजनाने लाठ जोरात खाली यायची. त्या वजनाखाली पोहे कांडले जात. एका लयीत लाठीची घुमघुम आसमंतात घुमायची. 

पोहे खालीवर फिरवायला, भात भाजायला आणखी दोन बायका असायच्या. आधी भात उकडून घेतलेले असायचे. कांडायच्या आधी ते कुळण्यात (मातीच्या खापरात) भाजायचे. भात पसरू नये म्हणून मोठी हिरोणी (केर काढायची ती केरसुणी, भात भाजायला वापरायची ती हिरोणी. माडाच्या झावळातील हिरांची जुडी.) असायची. उखळातून वर येणारे भात खाली ढकलण्यासाठी विशिष्ट गवती काड्यांची मुठीत मावेल अशी पिसोंडीही असे. पोहे फिरवण्यासाठी लाकडी मुठीची लोखंडी थापी असे. थापीची खट्खट् आणि लाठीची घुमघुम एकमेकात मिसळत एक छानशी नाद-लय तयार व्हायची. उकडून भाजलेल्या भाताचा, पोह्यांचा गंध पसरू लागायचा की समजायचे दिवाळी आली.  

लक्ष्मीपूजनाचा सोहळा गावातल्या दुकानात, उद्योगव्यवसायांच्या ठिकाणी असायचा. घरात नाहीच. हिशेबाच्या वह्या, दौत, पैशाची पेटी यांची पूजा. प्रसादाला शिरणी आणि बत्ताशे. साखर लावलेल्या खोबऱ्याच्या तुकड्यांची शिरणी फार आवडायची मला. पैशाच्या स्वरुपातील संपत्ती चल आहे, ती चंचल नाही. माणूस चंचल आहे. म्हणून चल संपत्ती घरी नांदावी यासाठी लक्ष्मीपूजनादिवशी पैसे व दागिने या दोन्हीचे पूजन केले जाते. कोकणातल्या अनेक पिढ्या मुंबईतून येणाऱ्या मनीऑर्डरवर वाढल्या. गाठीला पैसा नसायचा. त्यामुळे नसलेल्या लक्ष्मीला स्थिर व्हायला सांगायचे कसे, हा त्याच्यापुढचा प्रश्न असेल. त्यामुळे लक्ष्मीपूजनाचा सोहळा दुकानदारांपुरताच मर्यादेत असायचा. त्याच्याकडेच सारा गाव तीर्थप्रसादाला लोटायचा.

पण आणखी एक समजूत मनात पक्की आहे. लक्ष्मीची पूजा न करणारा गाववाला अलक्ष्मीचा कधी अवमान करीत नाही. समुद्रमंथनातून अलक्ष्मी देखील आल्याने तिची पूजा लक्ष्मीपूजनादिवशी घराबाहेर केली जाते. केरसुणी ही अलक्ष्मी आहे, पण तिलाही या मुलखात लक्ष्मी समजली जाते. तिला कधी पाय लावत नाही. ती नेहमी कोपर्‍यात उभी करुन ठेवलेली असते. ती ओलांडून कोणी पुढे जात नाही. 

या मुलखाला पाडव्याचे महत्त्व अधिक. पण तेही शहरी नाही. पतीला ओवाळायचे आणि घसघशीत ओवाळणी मिळवायची, ही शहरी रीत झाली. अलीकडे ही प्रथा मालवणी घरानीही स्वीकारली खरी, पण मुळातला मालवणी मुलखाचा पाडवा गुरांच्या गोठ्यात रंगतो. `गोरवां पाडवो` असेच म्हणतात याला. 

पती-पत्नीच्या नात्यांत गोडवा निर्माण करणारा पाडवा मालवणी मुलखात का नव्हता, हा प्रश्न मला सतावतो. ही प्रथा सुरू होण्याच्या कथेतच त्याचे उत्तर दडलेले असावे. हा दिवस बलिप्रतिपदेचा. बलिराजा हा सत्यप्रिय, दानशूर, पराक्रमी होता. तरीही त्याला इंद्रपद मिळवायचे होते. त्यामुळे विष्णूने वामनावतार घेतला व त्याच्याकडे दान मागितले. बलिराजा म्हणाला, काय देऊ? त्यावर वामनाने तीन पाऊले जमीन मागितली. त्याने होकार दिल्यावर वामनाने एका पावलात पृथ्वी व्यापली, दुसर्‍या पावलाने आकाश व्यापले, तिसरे कुठे ठेवू? असे वामनाने विचारताच बलिराजा म्हणाला, ठेव माझ्या डोक्यावर! त्यासरशी, वामनाने त्याला पाताळात गाडले व तेथील राज्य त्याला दिले. त्याच्या दानशूरतेवर खुष होऊन वामन त्याच्या दारी द्वारपाल झाला. तिसरे पाऊल मस्तकावर ठेवण्यापूर्वी बलिराजाची पत्नी विंध्यावली हिने वामनास सौभाग्य रक्षण करण्याची विनंती केली. ती ऐकून वामनाने त्याच्या मस्तकावर पाय न देता त्याला पाताळाचे राज्य दिले, असेही पुराणकथेत म्हटले गेले आहे. बलिराजाच्या दानशूरतेची आठवण म्हणून यादिवशी दीप लावून वस्त्रे दान केली जातात. ज्यावेळी विष्णूने बलिराजाचे हरण करून ते वैकुंठाला गेले, तेव्हा लक्ष्मीने त्यांना औक्षण करून ओवाळले. त्यावेळी विष्णूने तिला दागिने दिले. तेव्हापासून घरोघरी पत्नी आपल्या पतीला ओवाळते व पती तिला अलंकार, पैसे वा वस्त्रे देऊन ओवाळणी घालतात. बलिराजाला सावरण्यासाठी त्याची पत्नी विंध्यावलीने विष्णूला प्रार्थना करून प्राण वाचविल्याने बलिराजानेही तिचा आदर केला. विष्णू आणि लक्ष्मी काय, किंवा बलिराजा आणि विंध्यावली काय, शेवटी नाते पती-पत्नीचे असल्याने तो आदर्श मानून पत्नीने ओवाळायचे आणि पतीने तिला ओवाळणी घालून तिचा आदर करायचा, अशी प्रथा सुरू झाली.

एका गोष्टीकडे मी लक्ष वेधू इच्छितो. मालवणी मुलूख सूर्यरुपातील विष्णूची उपासना करणारा असला, तरी तो प्राधान्याने शैव आहे. त्यामुळे त्याने विष्णू-लक्ष्मी यांची ओवाळणीची कथा स्वीकारली नसेल. कोकणाचा उल्लेख काही ठिकाणी पाताळभूमी म्हणून आला आहे. तरीही या भूमीचा राजा बली होता, असा इतिहास नाही. या भूमीत `बळी` हे नाव कित्येकांचे असते. पण हा `बळी` बलिराजातील नाही, तर `बळरामा`तील आहे. त्यामुळेही मालवणी मुलखाने ही कथा नाकारली असेल. 

या मुलखाला कृष्णकथेची ओढ आहे. साहजिकच या दिवसाला लगटलेली दुसरी कथा या मुलखाने स्वीकारली आहे. विराटाच्या पळवून नेलेल्या गायी पांडवांनी सोडवल्या व दिवाळी पाडव्यास परत आणल्या. कृष्णाचा त्यांना आशीर्वाद होता. याच दिवशी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गवळ्यांचे गायींसह रक्षण केले होते. या कथांचे स्मरण करणारा `गोरवां पाडवो` या मुलखात साजरा केला जातो. या दिवशी गवळीवाड्यात अन्नकूट केले जाते. गुरांचे खेळ केले जातात. बाकीचे शेतकरीही गुरांना रंगवतात. झेंडूच्या माळा गुरांच्या गळ्यात घालतात. त्यांच्या अंगावर रंगाचे छाप उमटवतात. शिंगे रंगवतात. त्यांना तांदूळ उडीद वाटून तव्यावर तळलेले जाड घावन खायला घालतात. गोठ्यात शेणाची नगरी तयार केली जाते. औरसचौरस गोकुळ उभारले जाते. कारीटांना चुडतांच्या हिरांचे पाय टोचून गुरे केली जातात. शेणाचेच गुराखी करून त्यांना खोळी घातल्या जातात. शेणाच्याच गवळणी दूध घेऊन येतात. शेणाचे पांच पांडव या गोकुळाचे रक्षण करण्यासाठी उभे असतात, त्यांचे पूजन केले जाते.

जग व्यवहाराने ग्रासलेले असताना आणि पैसा हा परवलीचा शब्द बनला असतानाही भाऊबिजेचा ओलावा अजून तगून आहे. अजून भाऊ बहिणीच्या घरी पोहोचतात. बहिणींना भाऊ आपल्या मगदुराप्रमाणे, पण प्रेमाने ओवाळणी घालतात. घरी भाऊ आला या आनंदात बहीण असते. 

आता मालवणी मुलखात खरी धामधूम असते ती तुळशीच्या लग्नाची. इथल्या लोकजीवनातली ही थोरली दिवाळी. खळ्यातले मातीचे तुळशीवृंदावन लिंपून घेतलेले असते. काही ठिकाणी चिऱ्यांचे, सिमेंटच्या गिलाव्याचेही वृंदावन दिसेल. देवतांच्या मूर्ती चारी बाजूंना असलेले वृंदावन कुंभाराने आणून दिलेले असते. त्यातील माती बदलून तुळशीचे रोप नीट वाढेल याची काळजी घेतलेली असते. वृंदावन रंगवलेले असते. तुळशीच्या लग्नाची तयारीही खूप. वृंदावनाच्या चारही बाजूंना अर्धचंद्राकार वाकवलेले बांबू पुरले जातात. त्यावर भेल्ड्या (भिल्ल) माडाच्या झावळ्यां बांधल्या जातात. रंगवलेल्या काठीला तोरण बांधले जाते. कागदी पताकांचा मांडव तयार होतो. परसातला ऊस वृंदावनात रोवला जातो. तुळशीला तेलहळद लावली जाते. आवळे, चिंचा वृंदावनात टाकल्या जातात. यापुढे आवळे, चिंचा खाण्याची परवानगी मिळेल. त्याआधी खाल्ले तर `आवळ्यात ढॉर, चिचेत प्वॉर` असते आणि ते पोटात गेले तर त्याचा त्रास होतो. 

सायंकाळी गोरज मुहूर्तावर तुळशीचे लग्न लागते. गंध, फुले, अक्षता, दूध, गूळखोबऱ्यातील पोहे, चुरमुरे, साळीच्या लाह्या, बत्ताशे असे साहित्य असते. लग्न लावायला भटजी येतात. घरातलाच एखादा छोटा मुलगा कृष्ण होवून हातात तुळशीमाळ घेऊन  अंतरपाटाच्या अलीकडे उभा राहतो. मंगलाष्टका संपतात. कृष्ण तुळशीमाळ तुळशीच्या गळ्यात घालतो. `गोविंदा`च्या गजरात चुरमुरे आणि लाह्या तीन वेळा आकाशाच्या दिशेने फेकल्या जातात. घरातील स्त्री तुळशीची ओटी भरतात. हा सगळाच सोहळा अनुभवण्याचा असतो. 
तेलातुपाचा म्हणजेच स्नेहाचा दिवा तुळशीपुढे उजळतो. दारात, ओट्यावर, खळ्याच्या मेरेवर दिवे उजळत जातात. एकनाथमहाराजांनी म्हटले तसे, 
`सहस्त्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा। 
उजळल्या दाही दिशा गगना आलीसे शोभा।।`
केवळ बाहेरच्या दिशा उजळून दिवाळीचा आनंद थांबणार नाही. बाहेरचा प्रकाश वैभवाचा, समृद्धी-संपत्तीचा असतो: तर अंतरीचा दीप प्रेमाचा अन् ज्ञानाचा असतो. म्हणून आतही स्नेहाचा दीप उजळायला हवा. आतल्या प्रकाशाची प्रार्थना करूया! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com