जोतिराव आणि सावित्रीबाई (डॉ. सदानंद मोरे)

जोतिराव आणि सावित्रीबाई (डॉ. सदानंद मोरे)

जोतिराव फुले यांनी अर्थार्जनासाठी अनेक प्रयोग केले, त्यात खूप पैसे कमावले; पण ते सार्वजनिक कार्यात खर्च केले. त्यांना सतत सावित्रीबाईंची साथ होती. त्यांची राहणीही जोतिरावांसारखीच साधी होती. जोतिरावांचे सहकारी गोविंदराव काळे यांनी सावित्रीबाईंबद्दल लिहिताना म्हटलंय : ‘‘तिचे वर्णन कोठवर लिहावे? ती तात्यांचे घरात एक देवीच होती.’’

शरीर हे धर्मसाधन असल्याचं सांगितलं गेलं. ते अर्थ आणि काम यांचं साधन असल्याबद्दल कोणाला शंका घ्यायचं कारण नाही. धर्माबद्दल कदाचित शंका येऊ शकेल म्हणून धर्माचा विशेष उल्लेख केला असावा. धर्म, अर्थ आणि काम यांना परंपरेत त्रिवर्ग पुरुषार्थ मानले गेले. पुरुषार्थाची कल्पना ही खास भारतीय कल्पना आहे. वैदिकांप्रमाणे ती अवैदिकांनाही मान्य होती.

त्रिवर्ग पुरुषार्थांच्या बरोबरीनं जेव्हा चौथ्या म्हणजे मोक्ष पुरुषार्थाचा विचार होतो तेव्हाही असेच म्हणता येईल का? मोक्ष हा ज्ञानानं मिळतो याबाबत बहुतेकांचं एकमत आहे. या पुरुषार्थाशी शरीर आरोग्यसंपन्न व सुदृढ असल्याचा संबंध आहे का, असा प्रश्‍न कोणालाही पडू शकेल. त्याचं उत्तर होकारार्थी येऊ शकते. पण त्यासाठी ज्ञान (ब्रह्मज्ञान) घेण्याचं जे इंद्रिय किंवा यंत्रणा असते त्याला शरीराचाच भाग मानावा लागेल. (मग त्याला मन म्हणा, बुद्धी म्हणा, चित्त म्हणा किंवा अंतःकरण म्हणा) तो मानावा का याबाबतीत मतभेद होऊ शकेल.

पण इथंही एक सवलत घेऊन मोक्षप्रांतातही शरीराचं महत्त्व अधोरेखित करणं शक्‍य आहे. निदान अद्वैत वेदान्ताच्या मते तरी जीवाला आपण ब्रह्मच मानत असल्याचं म्हणजेच जीवब्रह्मैक्‍याचं ज्ञान होणं म्हणजेच मोक्ष.

या जीवब्रह्मैक्‍याचं दुसरं एक साधन उपलब्ध असल्याचा दावा काही पंडित करू शकतील. ते म्हणजे योग. योगमार्गाचा अवलंब करून समाधी लावता येते. समाधीची अत्युच्च अवस्था म्हणजे आत्म्याला परब्रह्मात विलीन करणं. योगाची साधना शरीराच्या माध्यमातूनच शक्‍य होत असल्यानं इथंही शरीराचं महत्त्व स्पष्ट होतं. योगाचेही राजयोग, हठयोग असे प्रकार आहेत. स्वामी विवेकानंदांची राजयोगावरची व्याख्यानमाला प्रसिद्ध आहे. मोक्ष मिळाला म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते, हे गृहीत धरून ज्ञानेश्‍वर त्याचा शरीराशी असलेला संबंध स्पष्ट करतात. ‘‘येणेचि शरीरे। शरीरा येणे सरे। किंबहुना येरझारे। चिरा पडे।।’’ ज्ञानेश्‍वरीच्या सहाव्या अध्यायात ज्ञानेश्‍वरांनी योगाच्या प्रक्रियेचं सविस्तर वर्णन केलं आहे.

धर्म, मोक्ष अशी अगडबंब खाती बाजूला ठेवून सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याच्या गोष्टींपुरता विचार केला तरी शरीर, त्याचं आरोग्य व सुदृढता यांचे महत्त्व लक्षात आल्यावाचून राहत नाही. मग असंही वाटतं की लोकमान्य टिळकांप्रमाणे गोपाळराव आगारकरांनीही एका वर्षाचा ‘गॅप’ घेऊन शरीर कमावलं असतं, तर त्यांचा अकाली मृत्यू झाला नसता व मग त्यांचा आणि टिळकांचा सामना अधिक रंगतदार झाला असता!

टिळकांच्या बरोबरीनं महात्मा जोतिराव फुले यांचाही विचार करायला हरकत नाही. ब्रिटिश सरकारला पालथं घालण्याच्या उद्देशानं शरीर कमवावं म्हणून तेव्हाचे सुप्रसिद्ध उस्ताद लहुजी राऊत यांच्या आखाड्यात जाऊन कसरत करीत असत. या लहुजी वस्तादांचा मुलगा धोंडिबा जोतिरावांनी काढलेल्या शाळेत शिकला. जोतिराव ज्या गोष्टी लहुजीबाबांकडून शिकले त्या गोष्टी म्हणजे दांडपट्टा, कुस्ती, नेमबाजी आदी. धोंडिबा जोतिरावांच्या शाळेतल्या मुलांना शिकवीत. लहुजींच्या पश्‍चात त्यांचा आखाडा धोंडिबानं चालवला. जोतिरावांनी काढलेल्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या व्यायामाची काळजी घ्यायचं काम जोतिरावांनी आपला दत्तक पुत्र यशवंतकडं सोपवलं होतं. यशवंत मुलांना पहाटे चार वाजताच उठवून त्यांच्याकडून आखाड्यातील खेळ करून घेई.

उतारवयात जोतिरावांची स्वतःची मेहनत सुटली असली, तरी ते इतरांना मार्गदर्शन करायचे. बोथाटी कशी फिरवावी, दांडपट्टे कसे खेळावे, पट्टा कसा फेकावा, बंदूक कशी धरावी, शिस्त व नेम धरावे वगैरे मर्दुमकीचे खेळ त्यांना लहुजींनी शिकवले, असं त्यांनी स्वतः तुकाराम हनुमंत पिंजण यांना सांगितलं होतं. लहुजींची तालीम पुण्यातल्या जानाईच्या मळ्यात होती. सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम यशवंत परांजपे, मोरो विठ्ठल वाळवेकर हे समवयस्क या तालमीत येऊन पट्टा फिरवायला शिकत. या तिघांचं सहकार्य आणि सौहार्द जोतिरावांना अखेरपर्यंत लाभलं.

सांगायचा मुद्दा हा की, जोतिरावांची सार्वजनिक कार्याची पायाभरणी अशा प्रकारे व्यायाम करून देहयष्टी बळकट करण्यापासूनच झाली. जोतिरावांचा बांधा सुदृढ आणि डोळे पाणीदार - तेजस्वी होते. ते नुसतेच रुबाबदार नसून देखणेही असल्याचा विशेष उल्लेख मामा परमानंद यांनी केला आहे.
शारीरिक बळ ही बाब झाली. ती महत्त्वाची आहेच. परंतु शस्त्रबळाच्या जोरावर दुबळा माणूस सुद्धा बलवानावर मात करू शकतो. कोणता प्रसंग केव्हा येईल याची खात्री देता येत नसल्यामुळं बलवानाने सुद्धा शस्त्रसज्ज असणं शहाणपणाचे ठरते. जोतिरावांचे चुलत नातू गजाननराव यांच्या सांगण्याप्रमाणे जोतिरावांच्या घरी दोन बंदुका असत. शिवाय एक गुप्तीही होती.

जोतिरावांच्या मातोश्री त्यांच्या लहानपणीच वारल्या. त्यामुळं त्यांचे वडील गोविंदराव यांनी दुसरा विवाह केला. जोतिरावांच्या सावत्र आईचा जोतिरावांवर जीव होता व जोतिरावांनाही त्यांचा चांगलाच लळा होता. या चिमाबाई वारल्या तेव्हा जोतिरावांना इतका शोक झाला की, त्यांना समजावण्याची कोणाचीच हिंमत होईना इतका! या आपल्या सावत्र आईचं दहन जोतिरावांनी लालबागेत चमेलीच्या सुवासिक लाकडात केले. तेराव्या दिवशी गरिबांच्या व अस्पृश्‍यांच्या मुला-मुलींना अन्न, कपडे व पुस्तके वाटली. जोतिरावांबद्दल या चिमाबाई जे सांगत त्यातील काही गोष्टी गजाननरावांनी उधृत केल्या आहेत. त्यानुसार ‘‘जोतिराव साहेब लोकांचा फारच राग करीत असे. मी एकदा राजाराम व जोतिबा या दोघांना घेऊन स्वारगेटजवळून आमच्या बागेच्या शेतात जात असताना तेथे दहा-बारा गोरे सोल्जर उभे होते. त्यातील एक जण माझ्याजवळ असलेल्या भाकरीच्या टोपलीला शिवला म्हणून जोतिरावानं उसानं सोल्जरास मारलं. त्या वेळी सोल्जर पळून गेले.’’

जोतिराव पहाटे ४ वाजताच उठत. ५ वाजता हातात मोठी लांब काठी घेऊन फिरावयास जात असत. बाजरीची शिळी भाकरी दुधात कुस्करली की त्यांची न्याहरी होई. एखादे वेळी त्यांचे सकाळचे फिरणे घोड्यावरून होई. जोतिरावांची राहणी साधी असे. ते कधी लांब पायघोळ अंगरखा तर कधी लांब कोट घालीत. पूर्ववयात ते तांबड्या रंगाचं पागोटे बांधीत. प्रौढ वयात ते पांढऱ्या रंगाचं पागोटं बांधू लागले.

सावित्रीबाई जोतिरावांचा उल्लेख ‘शेटजी’ असा करीत. इतर लोक त्यांना तात्या किंवा तात्यासाहेब म्हणत. त्या काळी शिक्षकाला तात्या- पंतोजी असे म्हणण्याची पद्धत होती. जोतिरावांनी शाळेत शिक्षकाचे काम केल्यामुळं त्यांना ‘तात्या’ हे संबोधन कायमचंच चिकटलं.
जोतिरावांचे लग्न झाले तेव्हा त्या काळच्या प्रथेला अनुसरून त्यांचं स्वतःचं वय अकरा आणि सावित्रीबाईंचं वय सात होतं. सावित्रीबाईंचे वडील श्रीमंत होते. त्यांनी वधू-वरांची वरात काढण्यासाठी चक्क एक हत्ती आणला होता. जोतिरावांची आर्थिक परिस्थिती पिढीजातपणे खाऊन-पिऊन (अर्थात कष्टाने) सुखी म्हणता यावी अशीच होती. खालच्या जातीच्या लोकांत मिसळतो, त्यांच्या मुलांना शिकवतो म्हणून वडिलांच्या नाराजीनं त्यांना घर सोडावं लागले व शिक्षकाची नोकरी वगैरे करावी लागली तरी ते कल्पक, हुनरबाज व उपक्रमशील असल्यामुळं त्यांनी त्यांच्या आयुष्यात अर्थाजनासाठी अनेक प्रयोग केले. त्यात खूप पैसे कमावले; पण ते सार्वजनिक कार्यात खर्च केले. त्यामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर झाली.

सावत्र आई चिमाबाईंजवळील पैसे जोतिरावांनाच मिळाले तो पैसा जोतिरावांनी मांजरी इथं उसाचं शेत व पुण्यातच घराजवळ मुशीचं दुकान घेण्यात गुंतवला. शिवाय ते बांधकामाची व बांधकाम साहित्याची लहान-मोठी कंत्राटेही घेऊ लागले. साहजिकच त्यांच्याकडं पैशाची आवक वाढली. घर, शेती, भाजीपाल्याचं दुकान यात पंधरा-वीस नोकरचाकर ठेवण्याइतकी ऐपत त्यांच्या अंगी आली.

मागास विद्यार्थ्यांसाठी जोतिरावांनी जे वसतिगृह चालवले होते त्यातील पंधरा विद्यार्थ्यांचा खर्च ते स्वतः करीत. गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे हा त्यांचा जणू छंदच होता. त्याचे घर म्हणजे विद्यादानाचे सत्र होते असे त्यांचे लेखनिक गोविंदराव काळे सांगतात. ‘‘विद्यार्थ्यांना पाटी, पेन्सिल, पुस्तके वाटणे, त्यांची फी भरणे, त्यांना खाऊ देणे यात त्यांचा बराच पैसा खर्च झाला. घरात सहकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा राबता भरपूर असे. या लोकांना खाऊपिऊ घातल्याशिवाय जाऊ न देणे हे सावित्रीबाईंचं जणू व्रतच असल्यामुळं त्यासाठी होणारा खर्च वेगळाच. गोविंदराव सांगतात, ‘‘त्या माउलीचं एखाद्या लेखकानं स्वतंत्रच चरित्र लिहिले पाहिजे. जोतिराव जे एवढ्या मोठ्या योग्यतेस चढले त्याचे बरेच मोठे श्रेय सुपत्नीस दिले पाहिजे. राग म्हणून काय चीज आहे ती या बाईंच्या गावीच नव्हती. ती नेहमी हसतमुख असे. तिचे हसू गालावर जेवढे दिसून येईल इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईला सर्व लोक ‘काकू’ असे संबोधत. जोतिराव सावित्रीबाईस मोठा मान देत असत. तिला ते बोलताना ‘आहो काहो’ या बहुमानार्थ शब्दांनी हाक मारीत असत. सावित्रीबाईंनी नको म्हटलेले काम तात्या कधी करीत नसत. ती फार सुविचारी व दूरदृष्टीची होती.’’

विशेष म्हणजे जोतिरावांचे जे नातेवाईक, भाऊबंद त्यांच्याशी वाकुडपणा धरून होते त्यांचाही सावित्रीबाई चांगला पाहुणाचार करत. ‘‘सावित्रीबाईंचा पोशाख तात्यांप्रमाणे अगदी साधा असे. तिच्या अंगावर अलंकार नसत. तिच्या गळ्यात एक पोत आणि एक मंगळसूत्र असे आणि कपाळावर भले मोठे कुंकू लावलेले असे. ही रोज सकाळी सूर्योदयापूर्वी शौचमुखमार्जन करून सडासंमार्जन उरकून घेई. तिचे घर स्वच्छ असे. सावित्रीबाईंच्या हाताखाली घरातील कामासाठी एक बाई व एक गडी नेहमी असे. स्वयंपाक स्वतः करीत असत.

इतक्‍या तत्पर असत की काही कामानिमित्त तात्यांनी हाक मारली आणि त्या वेळी जेवत असल्या तरी हात धुवून तिकडे जात असत. ही गोष्ट जर तात्यांच्या लक्षात आली तर त्यांना वाईट वाटून म्हणाले, की तुम्हाला जेवण सोडून कोणी यावयास सांगितले? मला काय माहीत तुम्ही जेवत होता? काकूनं उत्तर द्यावं, की     तुम्ही बोलावलं म्हणून मी आले. तात्यांच्या खाण्याची व प्रकृतीची ती फार काळजी घेत असे. तात्या सन १८८८ च्या सुमारास जेव्हा पक्षाघातानं आजारी पडले तेव्हा त्या माउलीनं त्यांची अत्यंत मोठी सेवा केली. तिच्या कष्टामुळेच ते त्या आजारातून जगू शकले, असे म्हणणे मोठ्या धारिष्टाचे होणार नाही.’’

१८७७ मध्ये भयंकर दुष्काळ पडला तेव्हा जोतिरावांनी धनकवडीत एक कॅम्प किंवा छावणी उघडली. त्या ठिकाणी आंधळे, पांगळे व लहान मुले यांना रोज एक हजार भाकरी फुकट देत असत. या कॅम्पवर गोविंदराव काळे यांची आई व इतरही काही महिला स्वयंपाकासाठी असत. या कॅम्पची व्यवस्था सावित्रीबाईंकडे सोपविली होती. कॅम्पचा खर्च स्वतः जोतिराव, रामशेठ उरवणे व डॉ. शिवप्पा हे तिघे करीत.

गोविंदरावांनी सावित्रीबाईंसंबंधी आणखीही काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ‘‘ती अतिसज्जन बाई होती. तिचे अंतःकरण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी व अन्नदान करी. ती फारच उदार होती. ती कोणासही जेवू घाली व गरीब बायांनी अंगावरची फाटकी लुगडी पाहून ती त्यांना आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळं तात्यांचा फार खर्च होत असे. एखादे वेळी इतका खर्च करू नये असे तात्या तिला म्हणाले म्हणजे त्या शांतपणे बारीक हसत असे व ‘बरोबर काय न्यावयाचे आहे?’ असे तात्यांना म्हणत असे. त्यावर तात्या शांत मुद्रेने थोडा वेळ गप्प बसत.’’

गोविंदरावांनी सावित्रीबाईंचे बरेच गुणगान केले आहे. शेवटी त्यांची लेखणी बहुधा थकली असावी म्हणून ते म्हणतात - ‘‘तिचे वर्णन कोठवर लिहावे? ती तात्यांचे घरात एक देवीच होती.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com