महामार्ग 'आनंदमार्ग' व्हावा... (डी. एस. कुलकर्णी)

d s kulkarni
शुक्रवार, 17 जून 2016

अपघात रोखण्यासाठी चालक प्रशिक्षित हवा. त्यासाठी आम्ही त्यांना सखोल प्रशिक्षण देणारे केंद्र सुरू करत आहोत. सरकार काही गोष्टी करेलही. मात्र, आपण सगळ्यांनीच अपघात रोखण्यासाठी काही पावलं उचलली पाहिजेत.

अपघात रोखण्यासाठी चालक प्रशिक्षित हवा. त्यासाठी आम्ही त्यांना सखोल प्रशिक्षण देणारे केंद्र सुरू करत आहोत. सरकार काही गोष्टी करेलही. मात्र, आपण सगळ्यांनीच अपघात रोखण्यासाठी काही पावलं उचलली पाहिजेत.

मुं बईहून पुण्याला येताना मला जो अपघात झाला, त्यातून सुखरूप बाहेर पडलो आणि आता थोड्याच दिवसांत पुन्हा कामावर रुजू होईन; परंतु त्याआधी मला या द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघातांच्या बाबतीत कटाक्षानं काही गोष्टी इथं नमूद कराव्याशा वाटतात या अपघातात मला झालेल्या दुखापतीपेक्षाही मी माझा अत्यंत जवळचा सहकारी त्यात गमावला. हे दुःख इतकं मोठं होतं, की त्यापुढं मी माझ्या वेदना पूर्ण विसरून गेलो. या अपघातात माझा सहकारी नीरजचा बळी गेला. हो बळीच... कारण हा अपघात मानवनिर्मित आहे. याचं कारण असं, की या द्रुतगती मार्गाची बांधणी, लेनचा रस्ता, दुभाजकांची मांडणी, दरडी कोसळण्याचं प्रमाण आणि त्यामुळे होणारे अपघात, या सगळ्या रस्त्याच्या नियोजनातील चुका आहेत. म्हणून मी त्याला मानवनिर्मित असं म्हणतो. असे अपघात रोखायचे असतील तर सामान्य नागरिकांचीही तितकीच जबाबदारी आहे. याबाबतीत मी अनेक मुद्दे सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहेत.
द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातांचा विचार करताना मला सर्वांत एक महत्त्वाची बाब जाणवली, ती म्हणजे सर्व गाड्यांच्या टायरची रचना त्या त्या कंपन्यांना सांगून आपल्याला बदलावी लागेल. सध्याच्या वाहनांचे टायर, वाहन ८० किलोमीटर वेगाने चालेल अशा पद्धतीनं बनवलेले असतात. त्यामुळं वाहनांचा वेग वाढल्यावरही टायर फुटू शकतात. त्यामुळं अपघाताचा धोका वाढतो. त्याचबरोबर टायर अगदी गुळगुळीत होईपर्यंत वापरता कामा नये. योग्य वेळी टायर बदलणं अत्यंत आवश्‍यक आहे.

अपघातातून इतरांचे जीव वाचवण्याची जबाबदारी आपलीच आहे, त्यासाठी आम्ही पहिलं पाऊल उचललं आहे. नीरजच्या नावानं एक ट्रेनिंग स्कूल आणि फाउंडेशन सुरू करतो आहे, ज्यायोगे सगळ्या चालकांना गाडीचे टायर बदलण्यापासून द्रुतगती महामार्गावर गाडी चालवण्यासाठी गाडीची आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची याचे सखोल मार्गदर्शन केले जाईल आणि ते ट्रेनिंग पूर्ण केल्यावर त्यांना प्रशस्तीपत्रकेही दिली जातील. यात चारचाकी वाहनांबरोबरच मोठमोठाले ट्रक, कंटेनर यांच्याही चालकांना त्यांच्या जागेवर जाऊन ट्रेनिंग देण्याचा आमचा मानस आहे. या सध्याच्या मृत्यूच्या सापळ्याला आपण आनंदाचा रस्ता बनवूयात.

Web Title: saptarang, expressway, d s kulkarni