Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

नामुष्कीची अक्षरे...(प्रवीण टोकेकर)

'थ्री बिलबोर्डस आउटसाइड एबिंग, मिसूरी.' डोक्‍याला कम्प्लीट शॉट देणारा हा ब्लॅक कॉमेडी म्हणावा तसा सिनेमा आहे! उद्या - सोमवारी पहाटे टीव्हीवर ऑस्करसोहळ्याचं थेट प्रक्षेपण होईल, तेव्हा त्या सोहळ्यात हा 'थ्री बिलबोर्डस...' धमाल करताना दिसेल. या चित्रपटाला तब्बल सात नामांकनं आहेत. हा चित्रपट थोर अशासाठी आहे, की प्रचलित चित्रपट-कथाकथनाचे अनेक नियम या चित्रपटानं सहजी मोडले आहेत. 

आताशा आपण अक्षरं फार बेदरकारपणानं वापरतो. हा वांडपणा बरा नव्हे. त्यानं भाषेचीच नासधूस होते. त्याचं ठळक उदाहरण म्हणजे गावगन्ना दिसणारी होर्डिंगबाजी! अमुक अमुक अण्णासाहेबांना किंवा तमुक तमुक दादासाहेबांना 'कोटी कोटी दंडवत,' 'शत शत प्रणाम' वगैरे. काल-परवापर्यंत शेंबूड धड न पुसता येणारं पुढाऱ्याचं पोर 'बंटीभाऊ' 'कैलासदादा' आदी नामाभिधानानिशी होर्डिंगावर टेचात उभं दिसतं. 'होऊ दे खर्च' किंवा 'चर्चा तर होणारच' या टॅगलाइनसह भलभलती विनोदी होर्डिंगंही लागतात. 'फेसबुक', 'व्हॉट्‌सऍप'पासून गावातल्या चौकापर्यंत ती कुठंही दिसतात. अर्थात ही थिल्लर उदाहरणं झाली. सगळीच होर्डिंगं भंकस असतात असं नाही. होर्डिंगानिशी सुरू झालेला एका खवट स्त्रीचा लढा सांगणारा नवाकोरा चित्रपट आहे ः 'थ्री बिलबोर्डस आउटसाइड एबिंग, मिसूरी.' 

मिसूरी हे अमेरिकेच्या मध्यपश्‍चिमेकडचं एक राज्य हे अनेकांना माहीत असतं; पण एबिंग नावाचं गाव शोधायला नकाशात बघू नका. सापडणार नाही! कारण ते अस्तित्वातच नाही; पण सिनेमा घडतो तिथंच...त्या काल्पनिक गावात. 

डोक्‍याला कम्प्लीट शॉट देणारा हा ब्लॅक कॉमेडी म्हणावा तसा सिनेमा आहे. उद्या - सोमवारी पहाटे टीव्हीवर ऑस्कर सोहळ्याचं थेट प्रक्षेपण होईल, तेव्हा त्या सोहळ्यात हा 'थ्री बिलबोर्डस' धमाल करताना दिसेल. या चित्रपटाला तब्बल सात नामांकनं आहेत. हा चित्रपट थोर अशासाठी आहे, की प्रचलित चित्रपट-कथाकथनाचे अनेक नियम या चित्रपटानं सहजी मोडले आहेत. अप्रतिम अभिनय, तंत्र, कथालेखन या बाबी तर आहेतच; पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चित्रपटाचा क्‍लायमॅक्‍स चक्‍क प्रेक्षक ठरवतो. जितके प्रेक्षक तितके क्‍लायमॅक्‍स! ही मुभा आपल्याला त्याच तिकिटाच्या रेटमध्ये मिळते. 

आपल्या भारतीय मानसिकतेला हा चित्रपट अर्धवट वाटू शकेलही. कारण, रेडीमेड गोष्टींना सवकलेले आपले पिंड आहेत; पण 'थ्री बिलबोर्डस'मधली सगळ्यात महत्त्वाची व्यक्‍तिरेखा आहे ती म्हणजे तुमची-आमची विवेकबुद्धी हीच! कथाकथनाच्या क्षेत्रातलं हे एक आक्रितच म्हणायला हवं. 

* * * 

एबिंगमध्ये जन्म काढलेली मिल्ड्रेड हायेस ही साठीला आलेली नाठ्या बुद्धीची बाई आहे. नवरा परागंदा होऊन दुसऱ्याच नटव्या पोरीबरोबर राहतो आहे. धाकलं पोरगं, रॉबी आत्ता कुठं वयात येतंय. एक भेटवस्तूंचं दुकान आहे तिचं. रुटूखुटू चालवते. सात महिन्यांपूर्वी तिच्या पोटच्या मुलीचा, अँजेलाचा निर्घृण खून झाला. नुसता खून नाही, बलात्कारही. एबिंगसारख्या शांत, आळसट गावात ही घटना भयानकच होती. एबिंगच्या पोलिस ठाण्यातून चौकशीची चक्रं फिरली. तपासबिपास झाला. स्थानिक टीव्ही चॅनलवर मरेस्तोवर चर्वण झालं. वर्तमानपत्रात रकाने भरभरून लेख आले. मग सगळं थंड होत गेलं. 

सात महिने झाले...आपल्या मुलीचा खुनी सापडू नये? हे पोलिस माश्‍या मारतायत का? वस्तुस्थिती अगदीच वेगळी नव्हती. आफ्रिकन-अमेरिकन पोरट्यांना पकडून बेदम हाणायचं हा पोलिसांचा एककलमी कार्यक्रम होता. पोलिसप्रमुख विल्यम विलोबी आणि त्याचा डेप्युटी जेसन डिक्‍सन ही जोडी तर कृष्णवर्णीयांमध्ये बदनाम झाली होती. हे असले जातीय धंदे सुचणारे पोलिस बलात्काराच्या केसेस कशाला सोडवत बसतील? मिल्ड्रेडचं डोकं पार फिरलं ते यामुळं. ही बाई पहिल्यापासून तशी थोडीशी कजागच आहे. नाजूकपणा, समंजसपणा नावालाही नाही. 

गावाबाहेर उत्तरेला माळरान होतं. इथून ड्रिंकवॉटर रस्ता जातो. रस्त्याला फार वर्दळही नसते; पण तिथं तीन जुने बिलबोर्ड आहेत. म्हणजे होर्डिंगच्या जागा. चांगल्या भल्यामोठ्या वीस बाय पंधरा फूट तर सहज असतील. तिन्ही बोर्डांमध्ये जेमतेम दोनशे मीटरचं अंतर असेल-नसेल. सन 1986 मध्ये तिथं शेवटचं होर्डिंग लागलं होतं. नंतर कुणी ते बिलबोर्ड भाड्यानं घेतलेच नाहीत. 

रेड वेल्बी नावाचा एक तरुण ते बिलबोर्ड भाड्यानं देत असे. मिल्ड्रेडनं त्याला पाच हजार डॉलर्सचं पुडकं दिलं. ''हे आगाऊ भाड्यापोटी. मजकूर मी लावीन!'' तिनं त्याला बजावलं. रातोरात तिथं तीन होर्डिंग लागली. तिन्ही होर्डिंगांवर मिळून मोजके नऊ शब्द... 

एकावर लिहिलं होतं : मरतानाही बलात्कार... 
दुसऱ्या बोर्डावर शब्द होते : तरीही अटक नाही... 
तिसऱ्यावरची अक्षरं : असं का? चीफ विलोबी? 

...मिल्ड्रेडच्या या होर्डिंगबाजीनं एबिंगचं जीवनमान अक्षरश: ढवळून निघालं. सायकल-स्टॅंडवरच्या एकेका सायकलीला धक्‍का लागावा आणि रांगेनं शेकडो सायकली धराशायी व्हाव्यात, तसं काहीसं झालं. घटनांची मालिका सुरू झाली. 

* * * 

एबिंगचा पोलिसप्रमुख बिल विलोबी ही काही कच्ची असामी नव्हती. त्याचा वचक होता. मिल्ड्रेड म्हातारीचा आचरट उद्योग विलोबीच्या कानावर आला. म्हणजे डिक्‍सननंच तो घातला. विलोबीचं पित्त खवळलं. ताबडतोब त्या म्हातारीला 'अंदर' करण्याचं त्याच्या मनात आलं; पण एकाही होर्डिंगवर अब्रुनुकसानीकारक शब्दही नव्हता. अटक करणार कशी? 

एबिंगचे गावकरी बलात्काराच्या केससंदर्भात मिल्ड्रेडच्या बाजूनंच होते. तिच्या पोटची पोर अशी भयानक मौतीनं मेली. सहानुभूती तर असणारच; पण होर्डिंगबाजीचा तमाशा बघून मात्र त्यांनी नापसंती दर्शवली. म्हणाले, म्हातारीचा आटा ढिला झालाय...सरळ करा! 

एबिंगच्या चर्चचे फादर मॉंटगोमेरीसुद्धा मिल्ड्रेडला समजावून गेले. 'सगळं गाव तुझ्या विरोधात जातंय, कशाला करतेस ही नाटकं?' ते म्हणाले. मिल्ड्रेडनं त्यांनाही चार शेलक्‍या शिव्या दिल्या. ती कुणाचंही ऐकत नव्हती. शेवटी विलोबीनं स्वत: तिला घरी जाऊन दम द्यायचा ठरवलं. तसा तो गेलाही. 

''काही काही केसेसमध्ये असं होतं मिल्ड्रेड...नाही लागत गुन्हेगाराचा छडा. मी किती जंग जंग पछाडतोय तुला कल्पना नाही. तुझं दु:ख मी समजू शकतो; पण हे होर्डिंगवर माझ्याबद्दल वाईटसाईट लिहिणं मात्र बरोबर नाही. काढून टाक ते...'' विलोबीनं समजुतीनं घेतलं. 

''नाही काढणार...त्यानंच तुमच्या पोलिसयंत्रणेला जाग आली ना?'' मिल्ड्रेडचा बिनतोड सवाल. 

'' मिल्ड्रेड, मला कॅन्सर आहे...'' विलोबी कळवळून म्हणाला. 

'' माहितीये मला...'' मिल्ड्रेड. 

''तरीही?'' विलोबी थोडा दुखावलाच. 

'' तू मेल्यानंतर होर्डिंग लावून काय फायदा?'' मिल्ड्रेड थंड आवाजात म्हणाली. म्हातारी कामातून गेली होती...खरंच. 

* * * 

विलोबी आणि डिक्‍सननं होर्डिंगांचा मालक रेड वेल्बीला पकडून कानफटला. मिल्ड्रेडचा नवरा एक दिवस घरात घुसला आणि 'ही होर्डिंगं लावून घराची नाचक्‍की का आरंभलीयेस?' असा सवाल त्यानं केला. गळाबिळा दाबून रीतसर दम भरला. मिल्ड्रेडच्या दुकानात डेनिस नावाची एक पोरगी कामाला होती. तिच्याकडं दोन मारिवानाच्या सिगारेटी सापडल्या म्हणून तिलाही धरून नेण्यात आलं. डिक्‍सन तर उघड आफ्रिकन-अमेरिकनांचा द्वेष करायचा. कायम दारूच्या नशेत असलेला हा जमादार विलोबीनं का एवढा पाळला होता कुणास ठाऊक. डिक्‍सन प्यायचाच, त्याची म्हातारी आईसुद्धा कायम टाइट असायची. मम्मा हे मात्र त्याचं दैवत होतं. 

गावातल्या एका डेंटिस्टानं मिल्ड्रेडविरुद्ध तक्रार केली होती. तिनं त्याच्याच क्‍लिनिकमध्ये जाऊन दात कोरण्याच्या यंत्राची धारदार पिन त्याच्याच अंगठ्यात खुपसून 'गप्प बस रे, जाड्या' असं सुनावलं. मग मात्र विलोबीनं तिला अटक करायचं ठरवलं; पण चौकशी करतानाच त्याच्या तोंडातून रक्‍त आलं. तो थेट इस्पितळातच गेला. 

...एक दिवस मिल्ड्रेडच्या दुकानात एक अपरिचित माणूस शिरला. ती एकटीच होती. थोडीफार मोडतोड करून त्यानं तिला दम भरला. 'तू कोण आहेस?' तिनं विचारलं. 'कुणीही असेन. तुझ्या नवऱ्याचा मित्र किंवा विलोबीचा मित्र किंवा...तुझ्या त्या तथाकथित रेपिस्टाचाही...'' तो म्हणाला. 

मिल्ड्रेडचं आयुष्य खडतर होत चाललं होतं; पण ती जाम बधली नाही. जेम्स नावाचा एक बुटका गॅरेजवाला मात्र तिचा सहानुभूतिदार होता. आश्‍चर्य म्हणजे, अवघा गाव विरोधात असताना मिल्ड्रेडच्या वादग्रस्त बिलबोर्डांचं पुढल्या महिन्याचं भाडं मात्र कुणी अज्ञातानं आगाऊच भरून टाकलं होतं. 

पुढं घडलेल्या घटना अतर्क्‍य होत्या. पोलिसप्रमुख बिल विलोबीनं डोक्‍यात गोळी झाडून घेतली आणि कॅन्सरवर निर्णायक विजय मिळवला. मरण्यापूर्वी त्यानं दोन पत्रं लिहिली. एक मिल्ड्रेडला. दुसरं जेसन डिक्‍सनला. 

डिअर मिल्ड्रेड, डेड मॅन विलोबी हिअर...तुझ्या मुलीबद्दल मला खरोखर सहानुभूती वाटते. सॉरी, तिच्या गुन्हेगाराला मी पकडू शकलो नाही; पण तुझा लढा चालू ठेव. आज ना उद्या तो सापडेलच. मी बिलबोर्डचं भाडं आधीच भरून ठेवलं आहे. अर्थात या झगड्यात तुझी लागायची ती वाट लागणारच आहे. आय विल प्रे फॉर यू. - बिल. 

...त्याच रात्री मिल्ड्रेडनं पाहिलं की तिची तिन्ही होर्डिंगं धडाधडा पेटलेली आहेत. 

*** 

विलोबीच्या जागी आलेला पोलिसप्रमुख ऍबरकॉम्बीनं आल्या आल्या बेवड्या जेसन डिक्‍सनला काढून टाकलं. डिक्‍सनही नाक मुरडत गेला. नाहीतरी हा ऍबरकॉम्बी काळाच होता. विलोबीनं लिहिलेलं पत्र त्यालाही मिळालं; पण रात्री उशीरा पोलिस ठाण्यात येऊन वाचून जा, असं त्याला त्याच्या माजी सहकाऱ्यानं सांगितलं होतं. तो रात्री गेला. 

डिअर जेसन, विलोबी हिअर. आय ऍम डेड नाऊ. सॉरी अबाऊट दॅट...तू मनानं चांगला आहेस; पण बिघडलेला आहेस. खरं तर तू चांगला डिटेक्‍टिव्ह होऊ शकतोस. त्यासाठीच पोलिस खात्यात आला होतास तू...पण चांगला डिटेक्‍टिव्ह होण्यासाठी इतका पराकोटीचा द्वेष आणि त्वेष बरा नाही रे. सोड हा राग...सहवेदना फार महत्त्वाची असते...ती मिळव. बेस्ट लक. - तुझा विलोबी. 

...डिक्‍सन हे पत्र वाचत असतानाच, संतापानं बेभान झालेल्या मिल्ड्रेडनं पेट्रोलबॉम्ब फेकून आख्खं एबिंग पोलिस ठाणं पेटवून दिलं होतं. त्या आगीत डिक्‍सन मरता मरता वाचला; पण चांगलाच भाजून निघाला. 

* * * 

निलंबित पोलिस जेसन डिक्‍सन बेकारच होता. भाजल्याच्या खुणा वागवत तो काही दिवसांत बरा झाला. विलोबीचं पत्र वाचून गडी भलताच निवळला होता. एका संध्याकाळी बारमध्ये बसलेला असताना तिथं मिल्ड्रेडला दुकानात येऊन धमकावणारा तो तरुण दाखल झाला. नऊ-दहा महिन्यांपूर्वी मी इथंच एका पोरीला भोगून तिला मारलं होतं, अशा गमजा तो दारूच्या नशेत मारत होता. डिक्‍सनचे 'डिटेक्‍टिव्ह' कान टवकारले गेले. त्यानं त्याच्याशी भांडण काढून त्याला ओरबाडलं. डीएनएचा नमुना मिळवला. आपली मर्दुमकी मिल्ड्रेडच्या कानावर घातली. 

त्यानं दिलेला डीएनएचा नमुना पोलिसप्रमुख ऍबरकॉम्बीनं तपासणीसाठी पाठवला; पण त्याचा निष्कर्ष धक्‍कादायक होता. सदर संशयित इसम हा सैनिक असून आठ-दहा महिन्यांपूर्वी मिसूरीतच नव्हता, तो लष्करी कामगिरीवर होता, असं कळलं. डीएनए साहजिकच जुळला नाही. 

तरीही मिल्ड्रेडनं आणि डिक्‍सननं ठरवलं की त्याला गाठून ठोकायचंच. कुठं ना कुठं तरी त्यानं बलात्कार केलाय ना, तेवढं पुरेसं आहे. त्याला उडवलंच पाहिजे. त्यांच्या नव्या प्रवासाची सुरवात झाली. 

त्यांनी गुन्हेगाराला गाठलं? त्याला उडवलं? मुळात त्यांनी अशा संशयिताला कायदा हातात घेऊन उडवावं का? बस्स. इतकंच. 

* * * 

'थ्री बिलबोर्डस आऊटसाइड एबिंग, मिसूरी' हा चित्रपट एका सत्यकहाणीवर आधारित आहे. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक मार्टिन मॅक्‍डोना फ्लोरिडामध्ये जॉर्जियाच्या आसपास फिरत असताना अशा प्रकारचा एक बिलबोर्ड त्यांना दिसला. त्याभोवती त्यांनी ही कहाणी रचली. विशेष म्हणजे हा चित्रपट गेल्या वर्षभरात अनेक चळवळींचं प्रेरणास्थान ठरला आहे. अशी होर्डिंगं लावून प्रशासनाचा आणि पोलिसांचा निषेध करणारे किमान तीसेक प्रकार अमेरिकेत घडले आहेत. फ्रान्सेस मक्‍डोर्मंड या ज्येष्ठ अभिनेत्रीनं हा चित्रपट अशा काही ताकदीनं उभा केला आहे की सगळं काही वास्तवाच्या पातळीवर आपल्या डोळ्यांदेखत घडत आहे, असं वाटत राहतं. 'फार्गो' या गाजलेल्या चित्रपटातही फ्रान्सेसनं आपली जबरदस्त चमक दाखवलेली अनेक चित्ररसिकांना आठवत असेल. वूडी हारेलसन हा तर हॉलिवूडचा हरहुन्नरी कलाकार. 'द पीपल व्हर्सेस लॅरी फ्लिंट', 'नाऊ यू सी मी'मध्येही तो होताच. सॅम रॉकवेलनं साकारलेला जेसन डिक्‍सनही भाव खाऊन जातो. 

चित्रपट पाहताना ध्यानात येतं, मिल्ड्रेड काय, विलोबी काय, डिक्‍सन काय...तिघंही व्यक्‍तिरेखा नाहीतच. ती आहेत निव्वळ होर्डिंगं. कुणीतरी, कुठल्यातरी मोहिमेसाठी रंगवलेली. त्यांना काही संदेश तेवढा द्यायचाय. 

शब्दांचा एखादा समुच्चय जाळासारखा हिंस्र असतो, तर दुसरी एखादी शब्दमाळ शांततेचा मंत्र जागवत येते. तिसरी डोळ्यात टचकन पाणी आणते, तर आणखी एखादी शब्दलवंगी ठहाकेदार हशा पिकवते... 

हे सगळं खरंच; पण तेराव्या शतकात होऊन गेलेला विख्यात पर्शियन कवी जलालुद्दीन रूमी मात्र अक्षरांचा हा श्रम वृथा ठरवतो. तो म्हणतो : 'मौन हीच ईश्‍वराची भाषा असते...बाकी सगळी अक्षरं हे त्याचे चुकलेले अनुवाद असतात.' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com