जिंदगी के बाद भी... (प्रवीण टोकेकर)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

'घोस्ट' ही 'आपल्या माणसा'च्या भुताची गोष्ट आहे. हा शुद्ध पिशाच्चपट असूनही तो भयपट नाही. ही चक्‍क एक प्रेमकहाणी आहे. आपलं माणूस आपली काळजी गेल्यानंतरही कशी वाहतं, आपल्यावर दिलोजानसे कसं प्रेम करत राहतं, त्याची ही कथा. सुमारे 28 वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या या चित्रपटानं पडद्यावरच्या भुतांबद्दलची भीती बरीचशी कमी केली होती. 

तुम्ही भुताला घाबरता? नका घाबरू. सगळीच भुतं भीतिदायक नसतात. त्यातही आपलं माणूस भूत होऊन समोर आलं तर घाबरण्याचं मुळीच कारण नाही. आपल्या माणसाचं भूतही आपलंच असतं. सुमारे 28 वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या 'घोस्ट' नावाच्या गाजलेल्या चित्रपटात अशीच एका 'आपल्या माणसा'च्या भुताची गोष्ट होती. धमाल चित्रपट होता. भूतबीत असूनही हॉरर नव्हता. ती चक्‍क एक प्रेमकहाणी होती. आपलं माणूस आपली काळजी गेल्यानंतरही वाहतं. दिलोजानसे प्रेम करत राहतं. घाबरण्यासारखं त्याच्यात काही उरतच नाही मुळी...असं सांगणारा हा चित्रपट. तेव्हा, ऐंशी-नव्वदीच्या दशकात 'लाइफ आफ्टर डेथ' या विषयावर चिक्‍कार चर्वितचर्वण व्हायचं. मृत माणसांचे अनुभव, मृत्यूचं दर्शन घेऊन परत आलेल्यांचे अनुभव, पुनर्जन्म यांचं पेव फुटलं होतं जणू. त्या काळात 'घोस्ट' आला आणि कायमचा लक्षात राहिला. कारण, शुद्ध पिशाच्चपट असूनही तो भयपट नव्हता. या चित्रपटानं पडद्यावरच्या भुतांबद्दलची भीती बरीचशी कमी केली होती. 
* * * 

बॅंकेत वरिष्ठ पदावर नोकरी असलेल्या सॅम व्हीटचं आयुष्य कसं रेखीव होतं. झकास नोकरी. बरा पगार. नवं घर. तेही न्यूयॉर्कमधलं. मॉली जेन्सन नावाची एक छानशी गोडुली बायको. तीही नवी. प्रेमाची. हळवी. कलावंत मनाची. जिवाला जीव देणारे मित्रही होते. दृष्ट लागेल असं आयुष्य होतं. 

एक दिवस बॅंकेतले हिशेब तपासत असताना काही अकाउंट्‌सच्या आकड्यांमध्ये घोटाळा आहे, असं सॅमला दिसलं. 

''कार्ल...इथं काहीतरी गडबड दिसतेय, यार...कुछ तो लोच्या है,'' शेजारच्या टेबलावरल्या कार्ल ब्रुनरला उद्देशून सॅम म्हणाला. कार्लनं तातडीनं लक्ष घातलं. त्यानंही कपाळाला आठ्या घातल्या. 

''हं...घोटाळा दिसतोय खरा. मी बघतो काय ते...तू जा. मॉली वाट पाहत असेल. मैं संभाल लूँगा'' कार्ल म्हणाला. तो त्याचा जुना दोस्त होता; पण तपासाचं काम आपणच करायचं, असं सॅमच्या मनानं घेतलं. 

...मॉलीबरोबर थिएटरातून बाहेर पडताना रात्री उशिरा ते घडलं. सॅम आणि मॉली गाडीनं घराकडं निघाले होते. सिग्नलपर्यंत गाडी पोचत नाही, तोवर कुठून तरी दैत्यासारखा एक काळा इसम आला, त्यानं सॅमवर हल्लाच केला. जोरदार 'हाथापायी' झाली. त्या काळ्या माणसानं फाड फाड फाड गोळ्या झाडल्या. गोळ्यांची आख्खी फैर शरीरात घुसून सॅम व्हीट खाली कोसळला. सॅमनं 'दम तोडलाय' हे बघून तो गुंड सटकला. हे सगळं मॉलीच्या डोळ्यांदेखत झालं. 

धडपडत उठलेल्या सॅमनं हादरलेल्या मॉलीकडं पाहिलं. तो तिच्याकडं धावला. मागं वळून बघितलं तर तिथं त्याचंच कलेवर पडलेलं. मॉलीचा चेहरा विदीर्ण. हे काय? मी...मी...मी मेलोय? मेलोय मी? ओह गॉड. सगळं संपलं आहे, सगळं. तो पुन्हा कोसळला. 

...सॅमचा चेहरा अक्षरश: भूत बघितल्यासारखा झाला. त्यानं खरंच भूत बघितलं होतं...स्वत:चंच. 

* * * 

अदृश्‍य, हवालदिल, दुर्बळ सॅमनं त्या मारेकऱ्याचा पाठलाग केला. तो विली लोपेझ नावाचा सुपारीबाज गुंड होता. सुपारी देणाऱ्यानं सॅमला उडवायला सांगितलं होतं. त्याच्या घरचा पत्ताही मारेकऱ्याकडं होता. आपण मेलो असलो तरी मॉलीचा जीव अजूनही धोक्‍यात आहे, हे सॅमला कळलं. आपल्या हत्येमागं कोण आहे हे कळल्यावर तर सॅम पेटूनच उठला. 

ओडा मे ब्राऊन नावाची एक तंत्र-मंत्रवाली बाई सॅमला सापडली. जारण-मारण, वशीकरणवाल्या बंगालीबाबा टाइपची ही बाई. प्लॅंचेट करणं, मृत्यू पावलेल्या आत्म्यांना पाचारण करून त्यांच्याशी संवाद साधून देणं अशी काळी विद्या तिला अवगत होती म्हणे. कुठून कुठून लोक तिच्याकडं यायचे. 'माझ्या गेलेल्या नवऱ्याशी बोलणं करून देशील का?', 'माझा मुलगा आत्ता कुठं आहे?' वगैरे प्रश्‍न तिला विचारले जायचे. मग डोळेबिळे फिरवून ओडा 'कॉंटॅक्‍ट' करायची. सटासट उत्तरं फेकायची. लोक डोळे पुसत तिला पैसे देऊन समाधानानं परतायचे. ओडा ही भोंदू बाई होती. तद्दन नौटंकी! आपल्याला हे असलं काहीही अवगत नाही, हे तिला माहीत होतं; पण नाटक करून घरबसल्या बरे पैसे मिळत होते. कशाला सोडा? असा मामला होता. 

पण देव कुठली गाठ कुठं आणि कशी मारून ठेवेल, गॅरंटी नसते. सॅमचं बोलणं ओडाला मात्र ऐकू येत होतं! सॅमच्या हे लक्षात आलं. त्यानं तिलाच पहिल्यांदा जाम टरकवली! रिकाम्या खोलीत उमटणारा त्याचा आवाज ऐकून तिची गाळण उडाली; पण सॅमनं हळू हळू तिला ताळ्यावर आणलं. 

मी मेलोय; पण माझ्या अजूनही जिवंत असलेल्या बायकोचा जीव धोक्‍यात आहे. मी अपघातात मेलो नाहीए, माझा खून झालाय...हे जसंच्या तसं मॉलीला सांगण्याची गळ त्यानं ओडा मे ब्राऊनला घातली. ती माझं कशाला ऐकेल? असा ओडानं वाद घातला; पण भुताशी वाद घालण्यात पॉइंट नसतो. तिला जावंच लागलं. ओडा मे म्हणत होती तसंच घडलं. मॉलीनं तिला भीक घातली नाही. उलट पोलिसांत तक्रार केली. अधूनमधून सांत्वनाच्या भेटी देणाऱ्या कार्लला तिनं ओडा मे हिचा किस्सा सांगितला. ती एक नंबरची भोंदू बाई आहे, असल्या नादाला आपण लागू नये, असा सुशिक्षित सल्ला त्यानं तिला दिला. 
* * * 

कार्ल ब्रुनर एक दिवस मॉलीच्या घरी आला. रात्रीचा. टायची गाठ सैल करून विसावला. ग्लास भरून घेतला. अघळपघळ बोलू लागला. 'हे बघ मॉली, सॅमचं तुझ्यावर किती प्रेम होतं, मला माहितीये. तुलाही त्याचं अचानक जाणं जड जातंय. साहजिकच आहे. माझा तर जानी दोस्त गेला आहे...पण लाइफ इज लाइफ, हनी. यू हॅव टू मूव्ह ऑन. तुझ्याकडं बघून माझं आतडं किती तुटतं माहितीये?...'' कार्लचा आवाज घोगरा होत गेला. सहानुभूतीचे चार शब्द ऐकून हललेल्या मॉलीनं त्याच्या खांद्यावर नकळत डोकं टेकवलं. ती मुसमुसू लागली. त्यानं अंगातला शर्टही काढून टाकला. ''नको हे असं'' असं म्हणून मॉलीनं डोळे पुसले. 

हे सगळं सॅम बघत होता. चडफडत होता. त्याला काहीही करता येत नव्हतं. त्याचा स्पर्शच होऊ शकत नव्हता कशाला. 'मॉली, त्याच्या ढोंगाला फसू नकोस. तोच *** या सगळ्याच्या पाठीमागं आहे. यानंच सुपारी दिली आहे. भ्रष्ट, खोटारडा...' पण सगळं माहीत असूनही त्याला काहीही सांगता आलं नाही. उद्वेगानं त्यानं मॉलीच्या आणि त्याच्या एका तसबिरीवर फटका मारला. आणि आश्‍चर्य! ती तसबीर जमिनीवर पडून फुटली. खळ्ळकन्‌ फुटलेल्या तसबिरीकडं बघून मॉली चटकन्‌ उठली आणि तिनं विनवण्या करत कार्लला जवळजवळ घराबाहेर काढलं. सॅम विचारात पडला : पिशाच्चयोनीत असूनही भौतिक जगातली वस्तू आपण कशी फोडू शकलो? 

* * * 
सिटी सब वे रेल्वे स्टेशनात राहणाऱ्या एका पिशाच्चाला भौतिक चीजवस्तू हलवता येण्याचा इल्लम होता. ते सॅमनं पाहून ठेवलं होतं. त्यानं त्या भुताला गाठलं. ''तू आता भूत आहेस, भूत. तुला शरीर नाही. तुझ्याकडं आहे ती फक्‍त मन:शक्‍ती- मेंटल पॉवर. तिच्या जोरावर हे साध्य होतं. त्याला खूप प्रॅक्‍टिस आणि एकाग्रता लागते...'' त्या भुतानं सांगितलं. 'कडी मेहनत के बाद' सॅमनं स्टेशनातलं घड्याळ फोडण्यात यश मिळवलं. 

कार्ल ब्रुनर हाच दोस्ताच्या वेशातला दुश्‍मन निघाला. सॅमचे सिक्‍युरिटी कोड्‌स हवे होते म्हणून त्यानं विली लोपेझ या सुपारीबाजाला कामाला लावलं होतं. त्याचा मॉलीवरही डोळा होताच. बॅंकेत बरीच वर्षं हेराफेरी करून त्यानं एक बेनामी अकाउंट उघडून चाळीसेक लाख डॉलर्स जमा केले होते. सॅम व्हीटच्या भुतानं मग आयडिया केली. ओडा मे हिला भरीला घालून त्यानं तिला बॅंकेत नेलं. पासवर्ड वगैरे तिच्या कानात सांगून सगळी रक्‍कम लंपास केली. ओडानं ती नंतर दानधर्मात वाटून टाकली. कार्ल ब्रुनर चडफडला. ओडा मे हिनं हे उद्योग केल्याचं त्याला कळलं होतं. तो हात धुऊन तिच्या मागं लागला. 

दुसऱ्या आघाडीवर ओडा मे ब्राऊनच्या बोलण्याकडं हळू हळू मॉली ओढली गेली. ओडा मे हिच्या घरात मॉली आली, तेव्हा सॅमनं परकायाप्रवेश करून ओडाच्या देहात शिरकाव केला. मॉलीला बाहुपाशात घेतलं. तिचा स्पर्श अनुभवला. अश्रूंनी तिला भिजवलं. स्वत:ही भिजला. तिच्याशी गुफ्तगू केलं. 

''मॉली, इथं एक अलौकिक प्रकाश आहे. इट्‌स अमेझिंग, मॉली...हा प्रकाश प्रेमाचा आहे. तो आतून येतो. जगात आपण शरीर सोडून येतो. इथं फक्‍त प्रेम घेऊन येता येतं, मॉली...'' सॅम म्हणाला. मॉलीच्या डोळ्यांना खळ उरला नाही. 

...कार्लसारखा दोस्त जन्माचा दावेदार निघावा आणि ओडा मे ब्राऊनसारखी भोंदू बगळी देवमाणूस निघावी, हा नियतीचा कुठला खेळ असावा? ओडा आणि मॉलीच्या साथीनं सॅम व्हीटनं अखेर कार्ल ब्रुनरचा काटा काढला. कसा? ते चित्रपटातच बघावं. 

* * * 

पॅट्रिक स्वेझ या देखण्या आणि उमद्या नायकानं सॅम व्हीटची भूमिका साकारली आहे. पॅट्रिक स्वेझ हा खरा निष्णात नर्तक. त्याच्या आईकडूनच त्याला उत्कृष्ट बॅलेनृत्याचे धडे मिळाले होते. 'डर्टी डान्सिंग' या ऐंशीच्या दशकातच आलेल्या भन्नाट चित्रपटामुळं तो प्रकाशात आला. नव्वदीच्या प्रारंभी 'पीपल' मासिकानं त्याला 'सेक्‍सीएस्ट मॅन अलाइव्ह' असा किताब बहाल केला होता. उंचापुरा, देखणा, मर्दानी खूबसूरती म्हणतात तसा. 'बडी' या नावानं त्याला तरुणाई ओळखत असे. त्याच्या हिपहॉप आल्बम्सचं वेड लागलं होतं लोकांना; पण पुढं त्याला हॉलिवूडमध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही. मोजके काही चित्रपट गाजले इतकंच. 'घोस्ट'मधली त्याची भूमिका मात्र वादातीत ग्रेट होती. त्याच्यासोबत डेमी मूरनं साकारलेली मॉली कमालीची रसरशीत आहे. अर्थात या चित्रपटात सर्वाधिक भाव खाऊन गेली ती व्हूपी गोल्डबर्ग. ओडा मे ब्राऊनच्या भूमिकेत तिनं अशी काही कमाल केली आहे की बस...देखते रहो. व्हूपी गोल्डबर्गला या भूमिकेसाठी 1990 चं ऑस्करही मिळालं. विनोदी, सहृदय, कजाग, घाबरट अशा मिश्रणाची तिनं साकारलेली ओडा मे कमालीची लोभस आहे. 

दिग्दर्शक जेरी झुकरला चित्रपटाच्या एकाही चौकटीत भय ही भावना नको होती. त्यामुळं हा चित्रपट बघताना आपण पिशाच्चपट बघत आहोत हे जाणवतही नाही, 'घोस्ट' असं स्वच्छ नाव असूनही. जेरी यांचा हा आग्रह पटकथालेखक ब्रुस जोएल रुबिन यांनी कागदावर अचूक उतरवला. सर्वोत्कृष्ट पटकथेसाठीचं ऑस्करही त्यांना मिळालं. ज्या चित्रपटाची मुख्य व्यक्‍तिरेखा पहिल्याच दृश्‍यात पिशाच्चयोनीत जाते, असा हा जगावेगळा सिनेमा. तो रसिकांनी अक्षरश: डोक्‍यावर घेतला. 

पॅट स्वेझ ऊर्फ बडी 2009 मध्ये वयाच्या 57 व्या वर्षी अचानक वारला. स्वादुपिंडाच्या कर्करोगानं त्याला ग्रासलं होतं. तो गेल्याची बातमी समजल्यावर डेमी मूरनं दु:खभिजल्या शब्दात लिहिलं होतं : पॅट्रिक, तुझ्यावर आम्ही आयुष्यभर इतकं प्रेम केलंय...तुझ्या प्रेमाचा प्रकाश आमच्यावर अखंड झरत राहील...'' 

म्हटलं ना, सगळीच भुतं भीतिदायक नसतात. भुतांचेही प्रकार असतात. म्हणजे असावेत. काही भुतं भीतीची असतात, तर काही प्रीतीची.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com