डिझाईन क्षेत्रातली स्फूर्तिस्थानं... (आश्विनी देशपांडे)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

'व्यावसायिक डिझाईन' हा प्रकार भारतात जेमतेम 40 वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. त्यामुळं प्रेरणास्थान बनू शकतील असे उदयोन्मुख डिझायनर्स भारतात संख्येनं अतिशय कमी आढळतात. मात्र, विकसित देशांमध्ये डिझाईन हा व्यवसाय वेगवेगळ्या स्वरूपात सुमारे 100 वर्षांपासून सुरू आहे. मी ज्यांच्याकडं स्फूर्तिस्थानं म्हणून पाहते अशा जागतिक पातळीवरच्या काही महिला डिझायनर्सबद्दल या आठवड्यात येणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त... 

'आपण स्त्रीवादी आहोत की समानमतवादी', 'स्त्रीवाद म्हणजेच समानता का', 'संपूर्ण वर्षात एकच महिलादिन कशासाठी...त्यानं काय साध्य होतं...'असे प्रश्न जागतिक महिलादिनाच्या आसपास उपस्थित केले जातात. याशिवाय, या दिवसाच्या निमित्तानं काही प्रेरणादायी महिलांचा सन्मानही केला जातो आणि आणि काही महिलांचं विशेष स्मरणही केलं जातं. 

मुळात व्यावसायिक डिझाईन हा प्रकार भारतात जेमतेम 40 वर्षांपूर्वीच अस्तित्वात आल्यामुळं आणि या शाखेचा अभ्यासक्रम मोजक्‍याच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळं प्रेरणास्थान बनू शकतील असे उदयोन्मुख डिझायनर्स भारतात अतिशय कमी संख्येनं आढळतात. मात्र, विकसित देशांमध्ये डिझाईन हा व्यवसाय वेगवेगळ्या स्वरूपात सुमारे 100 वर्षांपासून सुरू आहे. 

मी ज्यांच्याकडं स्फूर्तिस्थानं म्हणून पाहते अशा जागतिक पातळीवर सुप्रसिद्ध असलेल्या काही महिला डिझायनर्सबद्दल मी आज थोडंसं सांगणार आहे... 
*** 

ज्यांच्या नावावर तब्बल 100 हून अधिक पेटंट आहेत, अशा जॉय मानगॅनो या महिलेची कथा असामान्य आहे. अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून जॉय यांनी हे यश मिळवलेलं आहे. 

लहानपणापासूनच कल्पनांच्या जगात वावरणाऱ्या जॉय यांचा जन्म 1956 मध्ये न्यूयॉर्क इथं झाला. शिक्षण, लग्न आणि नंतर तीन मुलांना एकटीनं वाढवताना जॉय मेटाकुटीला आल्या असल्या तरीही त्यांनी त्यांची कल्पनाशक्ती कधी कोमेजू दिली नाही. 

फुटलेल्या ग्लासचे तुकडे हातांना इजा न होऊ देता कोणत्याही ओल्या पुसणीनं साफ करणं अशक्‍य आहे, हे वारंवार अनुभवल्यावर एके दिवशी अतिशय साध्या यंत्रणेवर चालणाऱ्या, हात न लावता पिळल्या जाऊ शकणाऱ्या आणि चक्क वॉशिंग मशिनमध्ये धुऊन काढता येईल अशा 'मिरॅकल मॉप'चं डिझाईन जॉय यांनी तयार केलं.

वडिलांच्या वर्कशॉपमध्ये ही अद्वितीय पुसणी स्वतः तयार करून पुढं जॉय यांनी केवळ या एका संशोधनावर प्रचंड मोठा व्यवसाय उभा केला. तो आजतागायत विस्तारतच चाललेला आहे. रोजच्या आयुष्यात येणाऱ्या छोट्या छोट्या समस्या सोडवण्यासाठी जॉय यांनी कित्येक साध्या-सोप्या कल्पनांवर संशोधन करून त्या प्रत्यक्षात आणल्या आहेत. उदाहरणार्थ ः ज्यांच्यावरून कपडे निसटणार नाहीत असे वेल्वेट-कोटिंग असलेले हॅंगर, सुटसुटीतपणे पॅकिंग करण्यासाठी कप्पे असलेल्या बॅग्ज्‌, घसरणार नाहीत असे रबरी उंच टाचांचे बूट आदी. हे सगळं त्यांना कसं सुचतं...? जॉय यांच्याच शब्दात सांगायचं तर ''मी एक बाई आहे, आई आहे, मी तुमच्यासारखी सामान्यच आहे. मीही घर आवरते, साफसफाई करते. फरक असेल तर एवढाच, की अडचण आल्यावर मी ती कायमस्वरूपी सोडवायच्या मागं लागते.'' 
*** 

सन 1934 ध्ये इटलीत जन्मलेल्या लेला व्हिनेली यांची गोष्ट जरा वेगळी आहे. आर्किटेक्‍ट्‌सच्या कुटुंबात मोठ्या झालेल्या लेला यांनी साहजिकच स्वतः आर्किटेक्‍ट होऊन आपल्या व्यावसायिक जीवनाला अमेरिकेत सुरवात केली. तिथं त्यांची भेट डिझायनर मासिमो व्हिनेली यांच्याशी झाली. 

सन 1960 मध्ये सुरू झालेलं हे अत्यंत प्रतिभाशाली साहचर्य त्यांनी जन्मभर निभावलं. फॉन्ट, लोगो, पॅकेजिंग, फर्निचर, इंटेरिअर, इमारती, ज्वेलरी...असं जे जे काम मिळेल त्याचं त्याचं लेला आणि मासिमो या दांपत्यानं सोनंच केलं. 

त्या दोघांनी डिझाईन केलेला अमेरिकन एअरलाईनचा लोगो असो किंवा लक्‍झरी हॉटेल...प्रत्येक गोष्टीवर आधुनिक विचारांचा एक ठाम ठसा बघायला मिळतो. सन 1979 मध्ये डिझाईन केलेल्या काट्याचमच्यांच्या सेटबद्दल लेला म्हणतात ः ''नवे अनुभव निर्माण करायचे तर जुने अनुभव जरा बाजूला करावेच लागतात. डौलदार, सुबक आणि मुख्य म्हणजे वापरताना आनंद देणारी वस्तू असेल तर त्यात वायफळ नक्षीकामाची गरजच नाही.'' 
*** 

पॉला शेर या 1948 मध्ये जन्मलेल्या अमेरिकन ग्राफिक डिझायनरनं जगातल्या कित्येक सुप्रसिद्ध लोगोंचं डिझाईन केलेलं आहे. सुमारे 50 वर्षांच्या कारकीर्दीत लोगो, आर्टवर्क्‍स, पॅकेजिंग, पोस्टर्स, मॅप्स, सार्वजनिक उद्यानं, संग्रहालयं, स्टेडियम अशा अनेकानेक आणि अतिशय यशस्वी व लोकप्रिय गोष्टींना पॉला यांच्या कल्पनाशक्तीचा जादूई स्पर्श झालेला आढळतो. त्यांच्या मते, ''यशस्वी डिझायनर होण्यासाठी दोन गोष्टी अत्यंत आवश्‍यक आहेत. एक म्हणजे, एखाद्या थोर डिझायनरच्या हाताखाली चार-पाच वर्षं उमेदवारी करायला हवी. दुसरी म्हणजे, स्वतःच्या कल्पनांचं समर्थन करण्याचं बळ आणि आत्मविश्वास आपल्या ठायी आपणच निर्माण केला पाहिजे.'' 
*** 
माझं चौथं स्फूर्तिस्थान आहेत रे इम्स. सन 1912 मध्ये जन्मलेल्या रे यांनी पती चार्ल्स इम्स यांच्यासोबत आर्किटेक्‍चर, इंडस्ट्रिअल डिझाईन, फर्निचर डिझाईन, फिल्म मेकिंग अशा अनेक क्षेत्रांत - त्या काळी क्रांतिकारी म्हणता येईल अशा - आधुनिक विचारसरणीचा प्रारंभ केला. निसर्गाबद्दलचं कुतूहल आणि वेगवेगळ्या मटेरिअल्सच्या परंपरागत स्वरूपाला आव्हान देण्याची तीव्र इच्छा या दोन्हींचा संगम होऊन इम्स दाम्पत्यानं आपली खास शैली निर्माण केली होती. दोघांनी केलेल्या प्रत्येक 
कामाचं श्रेय दोघांनाही बरोबरीनं दिलं जातं. मात्र, चार्ल्स म्हणत असत ''-मी जे काही करू शकतो, अगदी काहीही, तेच रे माझ्यापेक्षा नक्कीच जास्त चांगलं करू शकते.'' 
रे इम्स यांची डिझाईनक्षेत्राला खास देणगी म्हणजे 'अनुभवातून शिक्षण' ही विचारसरणी. 
*** 
आपल्या देशात डिझाईनचा अभ्यासक्रम कशा प्रकारचा असावा, याबाबत सल्ला घेण्यासाठी भारत सरकारनं सन 1957 मध्ये इम्स दांपत्याला भारतभेटीचं आमंत्रण दिलं होतं. रे आणि चार्ल्स इम्स यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करून संस्कृती, हस्तकला, भाषा आणि हवामान यांचा अभ्यास करून सन 1958 मध्ये 'इंडिया रिपोर्ट' सादर केला. या रिपोर्टमधल्या सल्ल्यानुसार, 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन'ची स्थापना करण्यात आली. आज भारतात डिझाइनचं शिक्षण देणाऱ्या अनेक नामांकित संस्था आहेत; पण त्यांचा भक्कम पाया रे इम्स यांनी घातला होता हे विसरता येणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com