भाग्य कोणते या रेषांचे...? (हेमंत जोशी)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

आकाशात उंचावरून अंधूकसं दिसणारं एक विमान धुराची चमकणारी रेष उमटवत जाताना दिसलं. त्या आकाशाच्या कॅनव्हासवर प्रचंड ताकदीनिशी उमटणारी; पण धूसर होत जाणारी रेष. स्वातंत्र्यदिनानिमित्त, प्रजासत्ताकदिनानिमित्त होणाऱ्या 'स्पेस शोज्‌'मध्ये प्रचंड वेगानं जाणाऱ्या जेट्‌समधून अनेक रंगांच्या धूम्ररेषांमधून निर्माण होणारं निरनिराळ्या रचनांचं सौंदर्य पाहणाऱ्याला थक्क करून टाकतं. हे थरकाप उडवणारे; पण नयनमनोहर आविष्कार 'पेन, पेन्सिल किंवा ब्रशनंच रेष काढता येते,' या माझ्या जुन्या विचाराला तडाखा देऊन गेले. 

कविवर्य ग. दि. माडगूळकर यांच्या एका गाण्याची ओळ सहजच मनात तरळून गेली : 
झुक झुक झुक झुक आगिनगाडी 
धुरांच्या रेषा हवेत काढी... 

कविवर्यांनी अनेक वर्षांपूर्वी शब्दबद्ध केलेला हा धूम्ररेषेचा अनुभव. 

त्या दिवसापासून रेषेचे दृश्‍यानुभव शोधू लागलो. दिवसागणिक रेषेचं अस्तित्व असलेल्या अनेक जागा 

डोळ्यांत साठवू लागलो. आकाशात धूसर होत जाणाऱ्या त्या रेषेच्या निमित्तानं विचारांचं आकाश मात्र स्पष्ट होत गेलं... 

चित्रनिर्मिती जेव्हा केव्हा सुरू झाली असेल, तेव्हापासून बिंदूनंतरचं दुसरं अपत्य रेष हेच असावं. 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' ही म्हण सार्थ ठरवत रेषेनं अनेक गोष्टी 'प्रमाणित' केल्या. संवादासाठी हावभाव, बोलीभाषा यांची मर्यादा ओलांडली गेली आणि व्यक्त होण्यासाठी रेषेची गरज प्रकर्षानं जाणवू लागली असावी. या प्रक्रियेत ती ज्या पृष्ठावर ओढली गेली किंवा चितारली गेली म्हणू या, ते 'पृष्ठ' म्हणजे माती, दगड, झाडाचं खोड... काहीही असेल; पण रेषा हे अभिव्यक्तीचं साधन बनली. 

याचा प्रत्यय आपल्याला आदिमानवाच्या किंवा प्राचीन काळातल्या गुहाचित्रांमधून येतो. 

ही चित्रं त्यांनी बहुतकरून रेषारूपातच गुहांच्या भिंतींवर चितारलेली दिसतात. त्या काळातही जगण्याच्या कसोशीतून त्यांना रेषाचित्रातून व्यक्त व्हावंसं वाटलं हे महत्त्वाचं! त्यांच्या या अभिव्यक्तीमुळं त्या त्या काळातली जीवनपद्धती आणि अनेक गोष्टींचे धागेदोरे आपल्याला गवसले. 

आज आपण जेव्हा वारली पेंटिग्ज पाहतो तेव्हा ती गुहाचित्रांची.-'मॉडिफाईड व्हर्जन्स' असल्यासारखी भासतात. ठळक पांढऱ्या रेषेतून तयार झालेल्या या रेखाचित्रांचं स्वतःचं असं खास अस्तित्व कलाजगतात प्रतिष्ठा पावलं आहे. माझ्या मते, हा रेखाचित्रांचा नितांतसुंदर ठेवा आहे. त्याचबरोबर सृजनशीलता आणि संवादाची एक ठळक रेष तो (आदिमानव) उमटवून गेला आहे. 

संवादाच्या गरजेतून रेषेचा जन्म झाला असं जरी मानलं तरी रेषेनं आजपर्यंत कला, गणित, तंत्रज्ञान ते आजचं संगणकयुग... अशा अनेक अवकाशांमध्ये लीलया भ्रमण केलं आहे. या सगळ्या क्षेत्रांतला रेषेचा संचार, कलात्मक अनुभवांतून पाहताना उमटणाऱ्या जाणिवा इथं शब्दांतून, चित्रांतून काही भागांतून क्रमशः मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ही दृश्‍यरूपं तुम्हीसुद्धा अनेकदा पाहिली असतील. आज अनुभवू या! 

जगात अनेक चेहरे, शरीरयष्टी, आवाज, विचार... असं बरंच काही तंतोतंत जुळणारी माणसं तुम्ही पहिली असतील. मात्र, निसर्गानं प्रत्येक माणसाच्या अंगठ्यावर अशा काही रेषा कोरून ठेवल्या आहेत की ज्यांच्यामुळं प्रत्येकाला एक स्वतंत्र ओळख मिळाली आहे. आपल्या अंगठ्यावरच्या रेषेची रचना म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञानानंदेखील मान्य केलेलं 'सेल्फ पोर्ट्रेट'च नव्हे काय? 

तळहातावर ओढल्या गेलेल्या रेषांचं महत्त्व हस्तसामुद्रिकांनी अभ्यासपूर्वक मांडलं आणि त्याचं एक स्वतंत्र शास्त्र निर्माण झालं. यासंदर्भात हस्तरेषांवर अभ्यास करणाऱ्या माझ्या मित्रानं तर सांगितलं, की या हस्तरेषांवरून एखाद्याचा जीवनपटही उलगडता येतो! 

जीवनाचं भविष्य सांगणाऱ्या रेषेत मला काही वेगळं प्रतीत झालं. जीवनातली हिरवळ सुकून जात असलेल्या कष्टकऱ्यांच्या हातावर मग कुठल्या रेषा असतात? माझ्या कलाकाराच्या दृष्टीत मला एका चित्राची शक्‍यता दिसली. ज्यांच्यावर आकाश रुसलंय...ढग वाहत आहेत; पण कोरडेच...कोरड पडून जमीन भेगाळून गेलीय...कष्ट करणाऱ्यांचं भविष्य पडीक रानमाळासारखं भकास झालंय...ते कष्टकऱ्यांचे तडा गेलेले हात आता विधात्याकडं आर्जव करत आहेत ः 'आमची भाग्यरेषा फुलव... आमच्या कष्टाच्या घामाचे थेंब त्यासाठी अपुरे आहेत!' 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com