विमा म्हणजे काय? (दिलीप बार्शीकर)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

विविध विमा कंपन्यांच्या जाहिराती आपण बघत असतो, त्याच्यावरची मतंही वाचत असतो; मात्र विमा म्हणजे नक्की काय, हा प्रश्‍न उरतोच. लाइफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स यांच्यात काय फरक असतो, भरपाईचं तत्त्व काय असतं, त्यांची मुदत कशी गृहीत धरली जाते आदी प्रश्‍नांची उत्तरं. 

'आयुर्विम्याला पर्याय नाही,' हे घोषवाक्‍य आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. विविध विमा कंपन्यांच्या वेगवेगळ्या विमा योजनांच्या जाहिरातीही आपण वाचत असतो; पण हा विमा म्हणजे नेमकं असतं काय, याविषयी थोडीशी माहिती आपण घेऊ या. 

विमा म्हणजे विमा कंपनी आणि विमेदार यांच्यातला एक करार असतो, ज्यानुसार विशिष्ट दुर्घटना घडून विमेदाराचं आर्थिक नुकसान झाल्यास विमा कंपनी विमेदाराला नुकसान भरपाई देते. जाहिरात वाचून वा एजंटाकडून माहिती घेऊन एखादा इच्छुक विमेदार प्रपोजल फॉर्म (प्रीमियमच्या रकमेसह) विमा कंपनीकडं दाखल करतो. प्रपोजल फॉर्मचा अभ्यास करून विमा कंपनी विमा मंजूर करण्याविषयी, विम्याच्या शर्तीविषयी निर्णय घेतं आणि तो इच्छुक विमेदाराला कळवला जातो. विम्याच्या सर्व अटी, शर्ती याची सविस्तर माहिती असलेला पॉलिसी बॉंडही पाठवला जातो. अशा प्रकारे या कराराला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होतं. विम्याच्या कालावधीत करारात नमूद केलेल्या दुर्घटनांपैकी कोणती दुर्घटना घडली, तर झालेल्या नुकसानीची भरपाई विमेदाराला मिळते. 

आता एखादं उदाहरण पाहू. समजा मी कारखानदार आहे अन्‌ माझ्या कारखान्यात पाच कोटी रुपये किंमतीची यंत्रसामग्री आहे. अर्थात ही माझी मालमत्ता (ऍसेट) झाली. समजा आकस्मिकपणे शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत या यंत्रसामग्रीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि जर या यंत्रांचा मी विमा घेतला नसेल, तर मी उद्‌ध्वस्तच होईन. मात्र, विमा असेल तर मला विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळेल आणि माझा कारखाना पूर्वपदावर येऊ शकेल. हा झाला सर्वसाधारण विमा किंवा जनरल इन्शुरन्स. 

दुसरं एक उदाहरण पाहू. अविनाश हा 35 वर्षांचा तरुण एका कंपनीत डेप्युटी मॅनेजर आहे. त्याचा मासिक पगार 80 हजार रुपये असून, पत्नी आणि दोन मुलं त्याच्यावर अवलंबून (डिपेंडंट) आहेत. समजा, दुर्दैवानं अविनाशचं अपघातात वा अचानक उद्‌भवलेल्या आजारानं निधन झालं. अशा वेळी त्या कुटुंबाचं अपार भावनिक नुकसान तर होईलच; पण त्याचबरोबर जी मोठी आर्थिक पोकळी निर्माण होईल, ती कशी भरून काढणार? रोजचे खर्च कसे भागणार? मुलांची शिक्षणं, गृहकर्जाचे हप्ते... एक ना अनेक समस्या त्या कुटुंबासमोर उभ्या राहतील. मात्र, समजा अविनाशनं पूर्वीच पन्नास लाखाची (म्हणजे पन्नास लाख 'सम ऍश्‍युअर्ड') विमा पॉलिसी घेतली आहे आणि त्याचा प्रीमियम नियमितपणे भरलला आहे, तर अशा वेळी त्याच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयांच्या क्‍लेमची रक्कम मिळेल. ज्यातून त्या कुटुंबाची आर्थिक घडी नीट बसविण्यासाठी नक्कीच मोलाची मदत होईल... हा झाला आयुर्विमा किंवा लाइफ इन्शुरन्स. 

इन्शुरन्सच्या या दोन मुख्य शाखा आहेत. एक लाइफ इन्शुरन्स - जिथं फक्त मानवी जीवनाला विमा संरक्षण दिलं जातं. दुसरी जनरल इन्शुरन्स - जिथं लाइफ इन्शुरन्स सोडून इतर सर्व मालमत्तांचा विमा होतो; म्हणूनच याला 'नॉन-लाइफ इन्शुरन्स' असंही म्हणतात. 

जनरल इन्शुरन्सचे करार एक वर्षाचे असतात. या काळात मालमत्तेचं नुकसान झाल्यास नुकसानीची मोजदाद करून जेवढं नुकसान झालं असेल, तेवढीच भरपाई दिली जाते. लाइफ इन्शुरन्सचे करार मात्र दीर्घकालीन असतात. विमेदाराचा मृत्यू झाल्यास वारसांना विमा रक्कम (सम ऍशुअर्ड) दिली जाते. कारण एखादी मानवी व्यक्ती मरण पावल्यास झालेलं नुकसान पैशांत मोजणं शक्‍य नसतं आणि अशा नुकसानीची 'भरपाई' करणं तर अशक्‍यच असतं. 

'व्यक्तीच्या आकस्मिक निधनामुळं झालेलं आर्थिक नुकसान समाजानं वाटून घेऊन त्या कुटुंबाला आर्थिक साह्य करायचं,' या अर्थानं विमा ही संकल्पना खूपच पुरातन आहे; पण त्याची शास्त्रशुद्ध सुरवात साधारण तीनशे वर्षांपूर्वी युरोपमध्ये झाली. भारतात 1818 मध्ये 'ओरिएंटल' ही पहिली विमा कंपनी सुरू झाली. 1955 पर्यंत भारतात अनेक देशी/ परकी खासगी कंपन्या विमा क्षेत्रात कार्यरत होत्या. 1956 मध्ये आयुर्विमा व्यवसायाचं आणि 1972 मध्ये जनरल इन्शुरन्सचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं. त्यामुळं आयुर्विमा क्षेत्रात फक्त 'एलआयसी' आणि जनरलमध्ये नॅशनल, ओरिएंटल, युनायटेड इंडिया आणि न्यू इंडिया या चार कंपन्या काम करू लागल्या. 1990 च्या दशकात आपल्या देशात खुल्या आर्थिक धोरणाचे वारे वहायला सुरवात झाली आणि आयआरडीए ऍक्‍ट 1999 नुसार विमा क्षेत्र पुनश्‍च खासगी कंपन्यांना खुलं करण्यात आलं. आज आयुर्विमा क्षेत्रात 23, तर जनरल इन्शुरन्समध्ये 29 खासगी कंपन्या कार्यरत आहेत. या संपूर्ण विमा क्षेत्रावर भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचं (आयआरडीए)चं कडक नियंत्रण असतं. 

आयुर्विम्याप्रमाणंच 'आरोग्य विमा'ही आज काळाची गरज बनली आहे. आजकाल वैद्यकीय खर्च गगनाला भिडले आहेत. एखादी व्यक्ती केवळ चार-पाच दिवसांसाठी रुग्णालयात दाखल झाली, तरी हा वैद्यकीय खर्च लाखांच्या घरात जातो, असा अनुभव आहे. हे सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेरचं आहे. अशा वेळी आरोग्य विम्याची पॉलिसी असेल, तर हा वैद्यकीय खर्च विमा कंपनीकडून परत मिळू शकतो. हा विमा आता लाइफ आणि जनरल या दोन्ही प्रकारच्या कंपन्यांत उपलब्ध असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com