एका दुर्दैवी देशाची कहाणी

Saptarang Book Review
Saptarang Book Review

जागतिक राजकारणाचे धागेदोरे फार किचकट असतात; मात्र या राजकारणात अनेक देश अक्षरश: होरपळून निघतात. आपला फायदा असलेल्या देशांना जणू अंकित केलं जातं. आर्थिक-लष्करी किंवा अन्य मार्गांनी या देशांना आपल्या कच्छपी लावण्याचा उद्योग केला जातो. असाच एक होरपळणारा देश म्हणजे अफगाणिस्तान. महासत्तांच्या कात्रीत सापडलेला हा देश गेली कित्येक वर्षं यादवी युद्धानं भाजून निघतोय. तत्कालीन सोव्हिएत महासंघानं या देशात घुसखोरी केल्यावर सुरू झालेलं नष्टचर्य तीस वर्षांनंतरही संपलेलं नाही. सोव्हिएत महासंघाविरुद्ध प्रदीर्घ लढा देऊन त्यांना माघार घ्यायला लावल्यावर तरी शांतता प्रस्थापित होईल अशी आशा होती; पण यादवी युद्धानं ती फोल ठरवली. या युद्धातून 'तालिबान'चा उदय झाला. त्यांनी सुमारे सहा वर्षं अफगाणिस्तानवर राज्य केलं; पण अमेरिकेच्या हल्ल्यापुढं त्यांना माघार घ्यावी लागली. मात्र, ते अद्याप पूर्ण संपले नाहीत. 

'तालिबान'विषयी सगळ्या जगालाच कुतूहल आहे. त्यांची कार्यपद्धती, त्यांचे नेते, त्यांची राजवट याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. काही पाश्‍चात्य लेखकांनी अफगाणिस्तानला भेटी देऊन केलेलं लेखन हाच काय तो माहिती मिळवण्याचा मार्ग; पण कोवळ्या वयापासूनच जिहादी लढवय्या (मुजाहिदीन) झालेला, अनेक कारवायांत भाग घेतलेला आणि नंतर त्यांचे सरकार आल्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या मुल्ला अब्दुल सलाम झैफ याचं 'माझे तालिबानी दिवस' हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलं आहे. मुल्ला अब्दुल सलाम झैफ यानं 'तालिबान'चा पाकिस्तानातला वकील म्हणून काम केलं. नंतर तो कुख्यात ग्वांटानामो बे इथल्या तुरुंगातही होता. भरपूर छळानंतर पुढे त्याची सुटका झाली. मुल्ला झैफ सध्या काबूलमध्ये राहतो आणि विद्यमान सरकारचा कडवा टीकाकार म्हणून तो प्रसिद्ध आहे. My Life With Taliban या मूळ इंग्लिश पुस्तकाचं संपादन अलेक्‍स स्ट्रिक व्हान लिन्शोटेन आणि फेलिक्‍स क्‍यून यांनी केलं असून, डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी त्याचा सरस अनुवाद केला आहे. 

सोव्हिएत महासंघाची घुसखोरी होण्यापूर्वी अफगाणिस्तानातली स्थिती बरीच चांगली होती; पण 1978 मध्ये झालेल्या क्रांतीनंतर साम्यवादी राजवट आली आणि तिच्या नावाखाली सोव्हिएत महासंघानं 1979 मध्ये अफगाणिस्तानात रणगाडे घुसवले. त्यानंतर सुरू झाला संघर्ष. अफगाणिस्तान हा टोळीसत्ताक देश असल्यानं विविध भागांत वेगवेगळ्या गटांनी सोव्हिएत महासंघाविरुद्ध संघर्ष सुरू केला. त्याचे परिणाम, देशात 'तालिबान'ची सत्ता येणं, त्यांची कार्यपद्धती या सगळ्याची कहाणी या पुस्तकात आहे. मात्र, 'तालिबान' राजवटीतल्या वादग्रस्त निर्णयांबाबत, त्यांच्या कार्यपद्धतीबाबत मुल्ला झैफ काही बोलत नाही. पुस्तकाच्या पहिल्या भागात तो आपलं बालपण आणि देशातल्या परिस्थितीबाबत माहिती देतो. मुल्ला झैफचा जन्म 1968 मधला. त्याचे वडील अभ्यासक होते. लहानपणापासूनच झैफनं कायम गरिबीच बघितली; पण तो त्याची तक्रार करत नाही. गरीब असले, तरी वडिलांनी मुलांच्या शिक्षणात अडथळे येऊ दिले नाहीत. स्वत: झैफही शिक्षणात रमणारा होता आणि आजही आहे. हलाखीत दिवस जात असताना 1978 मध्ये साम्यवादी क्रांती झाली आणि देशाचं चित्र बदलू लागलं. सोव्हिएत महासंघाच्या घुसखोरीनंतर संघर्षाला प्रारंभ झाला. याच काळात झैफनं पाकिस्तानात पलायन केलं. मात्र, त्यानं शिक्षणात खंड पडू दिला नाही. हे सुरू असताना 1983 मध्ये झैफ प्रथम जिहादमध्ये सहभागी झाला. नंतर त्याचं पाकिस्तान-अफगाणिस्तान असं येणं-जाणं सुरू राहिलं. अफगाणिस्तानात लढताना दमछाक झालेल्या सोव्हिएत महासंघानं 1989 मध्ये सैन्य माघारी घेतलं; पण त्यांची जागा विविध टोळ्यांच्या नेत्यांनी घेतली आणि रक्तपात सुरूच राहिला. 1994 मध्ये 'तालिबान'नं कंदाहार शहराचा ताबा घेत राजवट सुरू केली. राजधानी काबूल असली, तरी या सरकारचे सर्व महत्त्वाचे निर्णय कंदाहारमधूनच होत असत. कंदाहारमध्ये झैफनं तालिबानच्या न्यायालयात कामाला सुरवात केली. पुढे त्याच्यावर विविध जबाबदाऱ्या येत गेल्या. त्यात सरकारी कार्यालयांतल्या कामांचाही समावेश होता. पाश्‍चात्य देश समजतात तसं 'तालिबान' नव्हतं. त्यांची एक कार्यपद्धती होती, असा दावा तो करतो. मुल्ला झैफ यानं स्वत: सरकारी कार्यालयांत काम करून तिथं शिस्त आणली. मात्र, आर्थिक तंगीमुळे आणि जागतिक निर्बंधांमुळे सुधारणा किंवा प्रगतीला मर्यादा पडल्याचं तो मान्य करतो. मुल्ला झैफ याच्यावरची सर्वांत मोठी जबादारी म्हणजे पाकिस्तानमध्ये वकील म्हणून काम करणं. 'तालिबान'च्या राजवटीला सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि पाकिस्तान या तीनच देशांची मान्यता होती. त्यातही पाकिस्तान हा शेजारी असल्यामुळं तिथं वकील म्हणून काम करणं ही जबाबदारी फार नाजूक होती. या काळातल्या पाकिस्तानातल्या मुशर्रफ राजवटीचं झैफनं वर्णन केलं आहे. अमेरिकेच्या भूमिकेवरही तो संताप व्यक्त करतो. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर (9/11) ओसामा बिन लादेनवर प्रकाशझोत वळला. या सगळ्या काळात तो विविध देशांच्या राजदूतांच्या संपर्कातही होता. स्थिती बिघडत असताना आणि 'आयएसआय'च्या कचाट्यातून पळून जाण्याची संधी असतानाही झैफ पाकिस्तानातच राहिला आणि त्याची परिणती ग्वांटानामो बे तुरुंगात जाण्यात झाली. 'आजचा अफगाणिस्तान' या शेवटच्या प्रकरणात एकूण सगळ्या घटनांचा उहापोह असून, झैफ त्याच्या देशाचं भवितव्यही सांगतो. 

अफगाण संघर्षात केवळ स्थानिक नागरिकच गुंतले नव्हते, तर पाकिस्तानपासून मध्य आशियापर्यंत आणि पार युरोप-अमेरिकेपर्यंतच्या नेत्यांचा त्यात संबंध असल्यानं या पुस्तकाचा आवाका मोठा आहे. अफगाणिस्तानवर प्रभाव टाकणाऱ्या नेत्यांबरोबर जागतिक नेत्यांचाही त्यात समावेश आहे. संबंधित प्रकरणांत डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी तळटीपा दिल्या आहेत, त्यामुळं संदर्भ लगेच समजतात. अफगाणिस्तानबाबत आणखी काही वाचू इच्छिणाऱ्यांसाठी शेवटी आणखी काही संदर्भही दिले आहेत. अफगाणिस्तानविषयी कुतूहल असणाऱ्यांसाठी हे पुस्तक फार उपयुक्त ठरणारं आहे यात शंका नाही. 

  • पुस्तकाचं नाव : माझे तालिबानी दिवस
  • मूळ लेखक : अब्दुल सलाम झैफ. 
  • अनुवाद : डॉ. प्रमोद जोगळेकर 
  • प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे (020-24476924) 
  • पृष्ठं : 302/ मूल्य : 360 रुपये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com