वाचकांना गुंतवून ठेवणारी मांडणी

Saptarang Book Review
Saptarang Book Review

माणसांच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना-प्रसंगांचे खोलवर पडसाद त्याच्या मनावर उमटत असतात. त्यातून माणसांची विचारचक्रं गतिमान होत असतात. मनातल्या मनात अनेक गोष्टींची अकारण संगती लावून माणसं स्वत:ला हवा तसा निष्कर्ष काढतात. अनेकदा त्यात तथ्य नसतं; पण तो विचार मनाला इतका पोखरून काढतो, की त्या विचाराभोवती त्या माणसाचं जीवन फिरू लागतं. त्याचा परिणाम माणसाच्या वागण्या-बोलण्यावर होतो. त्याच त्या विचाराच्या गुंत्यात अडकल्यामुळे सहवासात येणाऱ्या माणसांकडे पाहण्याची दृष्टी बदलते. त्यातून सर्वांना एकाच तराजूत मोजण्याची मानसिकता तयार होते. यामुळे नातेसंबंधात कारण नसताना ताण निर्माण होतो. संशयाचं धुकं दाटायला लागतं. हे सारे मनाचे खेळ असतात; पण अनेकदा या खेळामुळे जीवनात लाटालहरी निर्माण होतात.

भीतीचं मळभ पसरू लागतं. जगणं नावाची गोष्ट क्‍लेशयात्रा वाटायला लागते. सावली ही खरं तर माणसाला दिलासा देणारी गोष्ट; तिच्यामुळेच उन्हाची दाहकता कमी होते; पण मनातल्या अशुभ विचारांच्या सावल्या जेव्हा दाट होत जातात, तेव्हा आयुष्य कसं खरखरीत होतं, याचं चित्रण प्रियांका कर्णिक यांच्या "सावल्या' या कादंबरीत आहे. चाकोरीबाहेरचा विषय धीटपणे हाताळणारी आणि वाचकांना गुंतवून ठेवणारी ही कादंबरी आहे. 

उर्वी ही या कादंबरीची नायिका. ती कलासक्त आहे. लहानपणीच तिचं मातृछत्र हरपल्यानंतर वडिलांनी तिचा जबाबदारीनं सांभाळ केला. आपल्या आईच्या मृत्यूला आपले वडीलच जबाबदार आहेत, या विचारानं तिच्या मनात कल्लोळ निर्माण होतो. त्याचा संबंध ती वडिलांच्या कामवासनेशी जोडू लागते. वडिलांमधला तो कामवासनेचा पशू सावल्यांच्या रूपात तिला सर्वत्र दिसायला लागतो. वसतिगृहात राहणाऱ्या उमलत्या वयाच्या मुला-मुलींमध्ये भावनिक बंध निर्माण होतात. त्याकडे पाहण्याची तिची दृष्टी कलुषित होते. मित्र-मैत्रिणींच्या नात्यातल्या प्रत्येक मित्रही तिला त्या सावल्यांमधल्या पशूसारखा वाटायला लागतो. हा सारा मनातल्या विचारांच्या सावल्यांचा खेळ असतो. एक प्रकारचा भ्रमच असतो. यामुळे तिच्या जीवनात जी भावनिक आंदोलनं निर्माण होतात, त्याचं अतिशय प्रभावी आणि प्रत्ययकारी चित्रण या कादंबरीत आहे. या कादंबरीत मुख्य कथानकाला पुढे नेणारी अनेक छोटी कथानकं आहेत. या साऱ्यांची उत्तम सांधेजोड लेखिकेने केली आहे. त्यामुळे कादंबरीचा प्रवाहीपणा शेवटपर्यंत टिकून राहिला आहे. 

कादंबरीत अनेक व्यक्तिरेखा आहेत. त्या उपऱ्या किंवा परक्‍या वाटत नाहीत. त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे त्या वाचकांच्या मनात घर करून राहतात. स्त्री-पुरुष नातेसंबंधातली गूढता सनातन आहे. प्रत्येक वेळी त्याचा संबंध लैंगिक भावनांशीच निगडित असतो असं नाही. भावनिक पातळीवरच्या संवादातून परस्परांना जगण्याचं बळही मिळते. असं असलं, तरी आपल्या जवळची माणसं आपल्याला न उमगणं हीच मानवी जीवनाची शोकांतिका आहे. मित्र-मैत्रीण, बाप-मुलगी, प्रयकर-प्रेयसी या नात्यातले बंध उलगडताना या नात्यातली गुंतागुंत कसी असते, याचंही दर्शन लेखिकेनं या कादंबरीत घडवलं आहे. कलेशी विशेषत: चित्रकलेशी निगडीत संदर्भ वाचकांना समृद्ध करणारे आहेत. लेखिकेनं रेखाटलेलं आजच्या तरुणाईचं भावविश्‍व, त्यांची मोकळेपणानं जगण्याची आणि विचार करण्याची वृत्ती, त्यांची भाषा, त्यांचा संवाद साधण्याची पद्धत यामुळे आजच्या तरुणाईला जवळची वाटेल अशी ही कादंबरी आहे. 

असं म्हणतात, मृत्यू एकदाच माणसाचे प्राण घेतो; पण "भीती' प्रत्येक क्षणी माणसाच्या मृत्यूचा अनुभव देत असते. हा आशय या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. भाव-भावनांमुळे माणसांच्या नात्यात ओलावा निश्‍चित निर्माण होतो; पण कोणत्याही एका भावनेचा अतिरेक झाला, की आयुष्य कसं चक्रव्यूहात सापडतं यावर ही कादंबरी प्रकाश टाकते. वेगळा विषय समर्थपणे हाताळणारी ही कादंबरी वाचकांना आवडेलच. 

  • पुस्तकाचं नाव : सावल्या
  • लेखिका : प्रियांका कर्णिक 
  • प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन, पुणे (020-25537958) 
  • पृष्ठं : 252 / मूल्य : 250 रुपये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com