सरिता! (निशिगंधा निकस)

सरिता! (निशिगंधा निकस)

''काहून न्हाय व्हनार? सरितावयनीला काय वाटंल याचा इच्यार करून पाह्य जरा... आन सांग मला.''
''व्हय रं बाळा, तिच्यासाटीच तं करून राह्यलो येवढं...पर लोक ऐकून नाही राह्यले, त्याला आपन काय कराव? जाऊं दे, हुईल ते हुईल. आपन दोघं मिळून करूत ज्येवढं करता येईन त्येवढं.'' 


सरिता. माधवराव पाटलांची तिसऱ्या नंबरची मुलगी. अभ्यासात आणि शाळेत जेमतेम हुशार; पण घरातल्या आणि शेतातल्या कामांचं आव्हान अगदी लीलया पेलून धरायची. माधवरावांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. पाच एकर शेती आणि एक किराणादुकान...उत्पन्नाच्या या दोन साधनांमधून त्यांचा प्रपंच चालायचा. सरिताला दोन थोरल्या बहिणी होत्या. लग्नं होऊन त्या संसारात स्थिरावल्या होत्या. सरिताचा धाकटा भाऊ संजय आठवीत होता. सरितानं नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. ग्रामीण भागात राहत असल्यामुळं 'दहावी किंवा बारावीनंतर लग्न' या 'रिवाजा'नुसार माधवराव सरिताच्या लग्नाच्या खटपटीत होते. 

''ऐकतीस का गं?'' माधवरावांनी सरिताच्या आईला हाक मारली. 

''हां, बोला... काय म्हन्ता?'' 

''आपल्या सरूला बघाया पावनं येनार हायेत बोरवाडीहून.'' 

''काय सांगता? कोन हाय पोरगा? काय काम करतो? घरदार कसं हाय? शेतीवाडी हाय का?'' 

सरिताच्या आईनं प्रश्‍नांचा भडिमार केला. 

''आगं, आगं... दम धर की वाईच. सांगतो, समदं सांगतो. तर पोरगा बीयस्सी हाय अन्‌ घरी स्वोताचं कृषिकेंद्र हाय. धा एकर वावर, गुरं-ढोरं बक्कळ हायेत,'' माधवराव. 

''बाई... ह्ये तं लय चांगलं झालं म्हनायचं. पर त्यांनी पोरीला पसंत तं कराय पाह्यजे.'' 

या सगळ्या गोष्टी पलीकडच्या खोलीतून सरिता ऐकत होती आणि ऐकल्यावर ती तिची मैत्रीण चंद्राच्या घरी गेली. 

''चंद्रे, आगं ऐ चंद्रे, कुटं आहेस माय?'' 

''आल्ये, आल्ये.'' 

''आगं, उंद्या ना मला बघाय बोरवाडीचा मुलगा येनार हाय.'' 

''वा, वा. काय करतो त्यो? किती शिकलाया? शेती? मेन म्हंजी, दिसाया कसाय?'' 

''दिसतो कसा ते नाय म्हाईत मला; पर बीयस्सी झालाया, कृषिकेंद्र चालवितो आन्‌ 10 एकर वावर.'' 

''मगं तं आता मज्जा हाय एका पोरीची. कृषिकेंद्राची मालकीन होनार हायेस.'' 

''ऐ चंद्रे, आत्ताशी कुटं बघाया येनार हायेत. पसंत तं करूं दे आधी. '' 

''का न्हाय करायच्ये? दिसाया सुंदर हायेस तू. घरातली समदी कामं बी करतीस, वावरातबी जातीस. मंग आजूक काय पाह्यजे त्या हीरोला?'' 

''बघूत...कसं काय होतंय ते.'' 

सरिता घरी आली. तिची आई तिच्याकडं पाहत होती. ती गोड लाजली आणि आतल्या खोलीत पळाली. 

दुसऱ्या दिवशी ठरल्यानुसार मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला. अनिलला सरिता फार आवडली. अनिलच्या घरची माणसं चांगली असल्यामुळं माधवरावांनी लग्नाला होकार दिला. हुंड्याचा प्रश्‍नच नव्हता. कारण, अनिल हुंडा घेण्याच्या ठाम विरोधात होता. 15 दिवसांत सरिता आणि अनिल यांचा साखरपुडा झाला. आता सगळेजण लग्नाची वाट पाहत होते. साखरपुड्यानंतर दोन महिन्यांनी लग्नाची तारीख ठरवण्यात आली. लग्नाची तयारी जोरात चालली होती. सुखी संसाराची स्वप्नं रंगवण्यात सरिता मग्न झाली. पाहता पाहता लग्नाचा दिवस उजाडला. अनिल आणि सरिता यांच्या मनाच्या गाठी बांधल्या गेल्या. सरिता आता बोरवाडीची सून झाली होती. 

घरातली सगळी कामं करताना पाण्याचा प्रश्‍न सरिताला फार सतावत असे. रणरणतं ऊन्ह पार तापत होतं. नेहमीप्रमाणे या वर्षीही बोरवाडीत पिण्याच्या व वापराच्या पाण्याची समस्या दार ठोठावत होतीच. पिण्याच्या पाण्याचं एकमेव साधन म्हणजे 'कुंभारी' विहीर. आणि गावाबाहेरच्या तलावातून वापरण्याचं पाणी आणलं जाई. सरकारी नळयोजनेचं घोडं तर अजून कागदावरच नाचत होतं. बोरवाडीला दोन दिवसांतून एकदा टॅंकरनं पाणीपुरवठा होत असे. त्या पाण्यानं बोरवाडीची तहान भागत असे. सरिताच्या घरातली बोअरवेल आटून गेली होती. एकूणच पाण्याची परिस्थिती फार भयाण होती. 

''अवो, ऐकलंत का?'' सरिता. 

''हां, बोल गं, काय झालं?'' अनिल. 

''मला जरा गाडीवरून कुंभाऱ्या व्हिरीवरून पानी आनू लागता का? पिन्याचं पानी संपून राह्यलं.'' 

''आनलं असतं; पर आज मी घाईत हाय जरा.'' 

''बरं, बरं. राहूं द्या... आनते मीच.'' 

सरिता विहिरीवर गेली आणि पाणी काढताना तिचा तोल गेला. डोक्‍याला जबर मार लागला. सरिताचा जागीच मृत्यू झाला होता. 

या दुर्घटनेनं आख्खी बोरवाडी सुन्न झाली. अनिलला तर फार मोठा धक्का बसला होता. त्याचं रडणंच आटलं होतं. तो फक्त शून्यात एकटक पाहत राही. आपण जर सरिताबरोबर गेलो असतो तर हे घडलंच नसतं...आपण जायला हवं होतं...त्याचं मन त्याला खाऊ लागलं... दिवसांमागून दिवस जात होते. बऱ्याच जणांनी त्याला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला. अनिलनं त्याला साफ नकार दिला. सरिताची आठवण त्याला शांत बसू देत नव्हती. 

एके दिवशी तो कृषिकेंद्रात बसलेला होता. 

''ओ मालक, जरा एका चांगल्या खताची बॅग द्या बरं मले,'' रामराव. रामरावांनी दोन-तीन वेळा अनिलला हाका मारल्या तरी तो त्याच्याच विचारांत गुंग होता. 
''ओ मालक, मालक.'' 
''हां, बोला'' अनिल. 

''आवो मालक, कुटं हायेत तुमी? कवापास्नं खताची बॅग मागून राह्यलो. तुमी कन्त्या दुनियेत फिरून राह्यले?'' 

अनिलनं रामरावांना खताची बॅग दिली. दुकान बंद करून तो थेट घरी आला. 

''आरे अनिल, यवढा वेळ आसतो का जेवनासाठी? कव्हापासून वाट पाहून राह्यले मी. चल, ताट वाढते. घे जिऊन,'' अनिलची आई. 

आई काय बोलतेय याकडं अनिलचं बिलकूलच लक्ष नव्हतं. तो तडक त्याच्या खोलीत निघून गेला. अनिलची आई आश्‍चर्यचकित झाली. आपल्या मुलाचं खाण्या-पिण्यातही लक्ष नाहीये हे पाहून तिचा जीव पार कासावीस होत होता. सरिताच्या आठवणींनी तिचं मन दाटून आलं आणि डोळे अश्रूंनी! अनिल त्याच्या खोलीतल्या सरिताच्या फोटोकडं पाहून म्हणाला ः ''सात जलम सतत माझ्यासोबत राह्याचं वचन दिल्तंस तू मला. मंग इतक्‍या लवकर मला एकट्याला असं वाऱ्यावर सोडून का गेलीस? तुला एक सांगून राह्यलो, तू दिलेलं हे बलिदान मी बिलकूल वाया जाऊ द्यायाचो न्हाय. याम्होरं या गावात पान्यामुळं कुनाचाच जीव जानार न्हाय आन्‌ कोनत्याच बाईला वनवन फिरून पानी आनावं लागायचं न्हाय इथून म्होरं. या बोरवाडीची समस्या आता मी सोडविनार!'' 

जलसंधारणासाठी काय काय उपाययोजना करता येतील, याचा अनिलनं लगेच शोध सुरू केला. पाणी जास्तीत जास्त कसं अडवता येईल? जमिनीतला पाणीसाठा कसा वाढवता येईल? बोअरवेलचे पाणी जास्त दिवस कसं टिकवता येईल याची माहिती त्यानं मिळवायला सुरवात केली. तो गावाला पाणीटंचाईमुक्त करणार होता. पाणी वाचवण्याची सुरवात आपल्या घरापासून करण्याचं त्यानं ठरवलं आणि हळूहळू लोकसहभागातून पाणी अडवण्याची सुरवात तो करणार होता. 

एके दिवशी ठरल्यानुसार, गावात ग्रामसभा होती. अनिल तिथं होताच. आपल्या डोक्‍यात पिंगा घालणाऱ्या कल्पना कधी एकदा गावाकऱ्यांसमोर मांडतोय असं त्याला झालं होतं. त्यानं बोलायला सुरवात केली ः 

''गावकऱ्यांनो, आपल्या गावातली पान्याची समस्या दिसोदिस गंभीर होऊन राह्यली, आसं तुमाला न्हाय का वाटत?'' अनिल. 

''व्हय रं भाऊ, पर करावं काय?'' अशोक. 
''आरं बाबा, दरसालचं झालंय ह्ये, आसंच होऊन राह्यलंय. पानी पडो ना पडो. आपल्या तलावात पानी राहून नाही राह्यलं अन्‌ व्हिरीतबी,'' म्हातारे दामूअण्णा. 

''पर आपन वेगवेगळ्या उपायांनी जिमिनीतली पान्याची पातळी वाढवून पाहू. त्येच्यासाठी पावसाचं पानी जिमिनीत मुरवू. मंग पान्याचा प्रश्‍न सुटंल, आसं मला वाटून राह्यलं.'' 
''आता उपाय कोन्ते करायचे रे, अनिल,'' वनीताताई. 

''ह्ये बघा, आपन सुरवात आपल्या घरापासून करायची. पान्याचा कमीत कमी वापर करायचा. पानी कमी सांडायचं,'' अनिल. 

''त्ये बरोबर, पन यवढुशा गोष्टीनं प्रश्‍न सुटंल आसं तुला वाटून राह्यलं काय?'' मिलिंद 

''आरे, आपन समदे मिळून आपल्या तलावातला गाळ काढू शकतो, बोअरवेलच्या पान्याचं फेरभरन करू शकतो, कुंभाऱ्या व्हिरीची खोली वाढवू शकतो, माळावरच्या टेकडीवर छोटे अरुंद खड्डे खांदून पावसाचं पानी त्येंच्यात साठवू शकतो...'' अनिल अतिशय उत्साहात बोलत होता. 

''आरं, तुला या गोष्टी लय सोप्या वाटून राह्यल्या काय, भाऊ?'' विजय. 

''आरे, सोप्या नसल्या तरी आपन सोप्या करू नं सगळे मिळून'' अनिल. 

''ते काय शक्‍य नाही, भाऊ,'' विजय. 

ग्रामसभेत या मुद्द्यावरून बराच गोंधळ झाला. बरेच लोक विजयच्या मताशी सहमत होते. अनिल सांगतोय त्यानुसार काहीच होऊ शकत नाही, असं म्हणून सगळे लोक निघून गेले. 

सुधीर फक्त एकटाच तिथं बसून होता. सुधीर अकरावीत शिकणारा एक मुलगा. मागच्याच वर्षी सततची नापिकी, कर्ज, दुष्काळ यांना कंटाळून त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. शेतातली कामं आणि घर चालवण्यासाठी त्याच्या आईची फार ओढाताण होत असे; पण तो तरी काय करणार? होईल तेवढी मदत सुधीर आईला करायचा. कदाचित, अनिलदादाच्या कल्पनांमुळं गावातली पाणीटंचाई संपून गावावरचं दुष्काळाचं सावट दूर होण्यास मदत होईल आणि दुष्काळ व पाणी यामुळं होणारे मृत्यू थांबतील...सुधीरच्या मनात असे विचार येत होते. 

''अनिलदादा, काय करायचं त्येवढं सांग फकस्त. मी हाय तुझ्याबरूबर.'' सुधीर. 

''कसं रे होनार बापा आपल्या दोघांकडून,'' अनिलचा निश्‍चय ढासळत होता. 

''काहून नाही व्हनार? सरितावयनीला काय वाटंल याचा इच्यार करून पाह्य जरा...आन सांग मला.'' 

''व्हय रं बाळा, तिच्यासाटीच तं करून राह्यलो येवढं...पर लोक ऐकून नाही राह्यले नं, त्याला आपन काय कराव? जाऊं दे, हुईल ते हुईल. आपन दोघं मिळून करूत ज्येवढं करता येईन त्येवढं.'' 

''पर सुरवात कुटून करायची, अनिलदादा,'' सुधीर. 

''आपन सगळ्यात अगुदर आपल्या तळ्यातला गाळ काढू. लागतील त्येवढे दिस लागूं दे.'' सुधीरनं होकारार्थी मान डोलावली. 

''पर दादा, किती येळ करायचं हे काम? माझं कॉलेज असतं सकाळून 11 ते संध्याकाळचे चार वाजेपत्तोर.'' 

''आपन सकाळून सात ते 10 पत्तोर आन्‌ संध्याकाळून पाच ते सात आसे रोज पाच घंटे गाळ काढायचं काम करत जाऊ.'' 

''चालते. मी उद्या सकाळ सात वाजता तुला तलावाजवळ येऊन भेटतो.'' 

अनिल खूश तर झाला; पण त्याला एकच चिंता भेडसावत होती. दोघं जण मिळून एवढं मोठं काम कसं शक्‍य होईल? पण आता मागं हटायचं नाही, असं त्यानं ठरवलं होतं. 

दुसऱ्या दिवशी ठरल्यानुसार सकाळी फावडी, टिकाव, टोपली घेऊन अनिल तलावाजवळ आला. सुधीर आधीच आलेला होता. दोघांनी कामाला सुरवात केली. अनिलचं मन सरिताच्या आठवणींनी दाटून आलं होतं. सरिता आज जरी या जगात नसली तरी ती नेहमी आपल्यासोबतच आहे, असा त्याला विश्‍वास वाटत होता. अनिल आणि सुधीर गाळ काढण्याचं काम करत होते. गावात जाणारे-येणारे लोक त्यांच्याकडं पाहत होते. कारण, तलाव गावात जाण्याच्या रस्त्याजवळच होता. सुधीरचं आणि अनिलचं लक्ष नव्हतं. ते त्यांचं काम करण्यात व्यग्र होते. 

सुजाताकाकूंनी अनिलला आणि सुधीरला पाहिलं. त्यांच्या मनात खूप विचार पिंगा घालत होते. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी काय काय करता येईल, हे सगळं अनिलनं सांगितलंच होतं. सगळ्या बायकांची वणवण थांबलीच पाहिजे, यासाठी त्यांनी सगळ्या बायकांची सहमती घ्यायची असं ठरवलं. खूप समजूत घातल्यावर अनिलला मदत करायला सगळ्या बायका तयार झाल्या. बायका मदतीला येत असल्याचं कळल्यावर गावातली पुरुषमंडळीदेखील जलसंधारणाच्या कामात मदत करू लागली. तलावाचं काम पूर्ण झाल्यावर टेकडीवर खड्डे खणण्यास सुरवात केली. लोकांच्या अथक परिश्रमांतून टेकडीचं कामही पूर्ण झालं. 

आता पुढचा प्रश्‍न होता कुंभाऱ्या विहिरीच्या सखोलीकरणाच! पण त्यासाठी लागणारा पैसा कुठून उभा करायचा हा तर त्याहूनही मोठा प्रश्‍न होता. लोकवर्गणीतून पैसे गोळा करण्याचं अनिलनं ठरवलं. दोन-तीन दिवसांतच निधी उभा राहिला. बोरवाडीच्या लोकांनी त्यांची उदारता दाखवून दिली होती. विहिरीच्या सखोलीकरणासाठी लागणारी मशिनरी गावात आणली गेली आणि विहिरीचं सखोलीकरण झालं. वैयक्तिक पातळीवर काही लोकांनी त्यांच्या बोअरवेलचं पुनर्भरण केलं. काही लोकांना शेततळ्यासाठी सरकारकडून अनुदान मिळालं. 

बोरवाडीतली जलसंधारणाचा ओहोळ आता सगळ्यांच्या प्रयत्नांमुळं सगळीकडं पाझरत चालला होता. जेव्हा पाऊस पडला तेव्हा तलावात, विहिरीत आणि टेकडीवरच्या खड्ड्यांत फार मोठा पाणीसाठा जमा झाला होता. बोअरवेलमधली पाण्याची पातळी वाढली होती. शेततळ्यांत साचलेलं पाणी शेतीतल्या पिकांसाठी उपयोगी पडत होतं. या सगळ्या कामांचा परिणाम उन्हाळ्यात दिसून आला. पाणीटंचाई कमी झाली. बोरवाडी टॅंकरमुक्त गाव झालं होतं. 

सरिताच्या फोटोपुढं अनिल उभा राहिला आणि म्हणाला ः ''बघितलंस! तुझं बलिदान व्यर्थ नाही गेलं. नदीच्या पान्यासारखी तू गावातून वाहात हायेस. हरेक थेंबाथेंबात तू हायेस. माझ्या समिंद्राला येऊन मिळनारी तू सरिता हायेस...!'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com