चारशे बळींचा राजा (सुनंदन लेले)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

'माही' या नावानं चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या महेंद्रसिंह धोनी अजूनही पाय रोवून उभा आहे. 'विकेटकीपर' म्हणून तब्बल चारशे बळी घेतलेला धोनी एकदिवसीय क्रिकेटमधल्या दहा हजार धावांच्या उंबरठ्यावर आहे. धोनी क्षेत्ररक्षणाच्या या क्षेत्राकडं कसं बघतो, त्यानं कोणतं तंत्र विकसित केलं, कोणत्या गोष्टीमुळं त्याला फायदा झाला अशा सर्व प्रश्‍नांवर त्याच्याशी साधलेला संवाद. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलो, तेव्हा महेंद्रसिंह धोनी याच्याशी लगेचच भेट झाली. तेव्हा नुकताच त्याला पद्मभूषण सन्मान जाहीर झाला होता. त्या दिवशी जोहान्सबर्गच्या सॅंडटन मॉलमध्ये जेवायला एकत्र भेटल्यावर धोनीचं मनापासून अभिनंदन केलं, तेव्हा ''लेले साब क्‍या आपके लिये मै पहलेसे 'भूषण' नहीं था, जो अभी मुझे बधाई दे रहे हो?'' असं म्हणत त्यानं हसत सहजी कौतुकाचा विषय टाळला. 
धोनीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चारशे बळींचा विक्रम पार केला आणि एकदिवसीय क्रिकेटमध्येच दहा हजार धावांच्या उंबरठ्यावर तो असताना त्याच्याशी संवाद साधायचा विचार पत्रकाराच्या डोक्‍यात आला नाही तर नवलच. खूप 'फिल्डिंग' लावल्यावर धोनी पोर्ट एलिझाबेथला भेटला, तेव्हा ''इतना सारा क्रिकेट खेलता हूं लेले साब, तो थोडे नंबर्स तो जमा होंगेही ना! उसमे इतना बडा क्‍या है... बोलो आप?'' असं म्हणत त्यानं मलाच गुगली टाकला. 

भारतीय संघाचं कर्णधारपद सोडल्यापासून धोनी एकदाही संघाच्या किंवा आयपीएलच्या पत्रकार परिषदेला आलेला नाही. पत्रकारांशी तो फटकून वागत नाही; मात्र तसं सख्यही अजिबात नाही. 'आपण बरं आपलं काम बरं' हाच धोनीचा सरळ साधा विचार असतो. प्रसिद्धीपासून लांब राहणं त्याला पसंत आहे. याच कारणानं धोनीला भेटणं आणि त्याच्याशी बोलून लेख करणं फार कठीण किंवा अशक्‍य असतं. पोर्ट एलिझाबेथ गावी पाचव्या एकदिवसीय सामन्याअगोदर धोनी सरावाला आला होता. सराव पर्यायी असल्यानं सगळे खेळाडू आले नव्हते. अर्थात त्यामुळं सुरक्षा जरा कमी होती. तीच संधी साधून सराव संपल्यानंतर थेट सेंट जॉर्जेस पार्क मैदानातच मी धोनीला पकडलं आणि बोलायला राजी केलं. धोनीशी झालेला हा छोटा; परंतु मार्मिक संवाद. 

चारशे बळींचा मनसबदार झालास तू माही... काय वाटतं? 
महेंद्रसिंह धोनी : मस्त वाटतंय... पण खरं सांगतो- सगळं श्रेय गोलंदाजांचं आहे. त्यांनी चांगली गोलंदाजी केली नसती, तर मला झेल पकडायला किंवा स्टपिंग करायला संधीच मिळाली नसती. काय वाटतं- त्यात अजून एक भावना आहे ती अशी, की जेव्हा दुसऱ्याच्या यशात आपण वाटा उचलू शकतो आणि आपल्या सहकाऱ्याच्या यशात आनंदात खऱ्या अर्थानं सहभागी होतो, त्याचं समाधान मोठं असतं. कॅच पकडल्यावर किंवा स्टंपिंग केल्यावर गोलंदाजाच्या डोळ्यांत दिसणारं प्रेम मला खूप समाधान देऊन जातं. विकेटकीपरचा तो 'ऑक्‍सिजन' म्हणा हवा तर. 

विकेटकीपर म्हणून इतका यशस्वी होशील, याची कल्पना नव्हती कोणाला! 
धोनी : अजिबात नाही. तुम्हाला सांगतो, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागलो, तर बरेच जाणकार म्हणाले, हा 'विकेटकीपर' नाही. 'गोलकीपर' आहे. तसं खरं आहे म्हणा, कारण माझी 'गोलकीपिंग' बघूनच शाळेतल्या सरांनी मला विकेटकीपर बनवलं होतं. मी जास्त दिवस टिकणार नाही, असाच बऱ्याच जणांचा अंदाज होता. बाकीचे लोक फक्त टीका करत असताना एकच माणूस असा होता, ज्यानं मला मार्गदर्शन केलं. माजी विकेटकीपर किरण मोरे त्यांचं नाव. किरण मोरे यांनी मला मनापासून मदत केली. विकेटकीपिंगचे बारकावे समजावले आणि तंत्रात काय चुका आहेत आणि त्या दुरुस्त कशा करायच्या, याचं मार्गदर्शन केलं. गंमतीची गोष्ट म्हणजे किरण मोरे यांनी हे सर्व मार्गदर्शन निवड समितीमध्ये असताना केलं, याच अर्थ त्यांना माझ्या क्षमतेत दम दिसत होता. म्हणून मी किरण मोरे सरांना खूप मानतो. 

विकेटकीपिंगमधले बदल कसे आणलेस? 
धोनी : फार काही वेगळं केलं नाही. सराव कमी; पण जास्त लक्ष देऊन करत गेलो. सर्वांत मोठा फरक मला वाटतं- गरज निर्माण झाल्यानं पडला. उदाहरण देतो. सुरवातीला कसोटी क्रिकेटबरोबर एकदिवसीय क्रिकेट खेळत गेलो. एकदिवसीय क्रिकेटमधला वेग वाढत गेला. त्याचबरोबर अचानक टी-20 क्रिकेट खेळले जायला लागले, त्यात वेग अजून वाढला. पूर्वी बघा टीव्ही रिप्ले नसायचा. मैदानावरचे पंच अंदाज घेऊन निर्णय द्यायचे. जमाना बदलत गेला, तसं मिलिसेकंदाला महत्त्व प्राप्त झालं. फलंदाज स्टंपिंगच्या वेळी किंवा रन आऊटच्या वेळी बाद आहे का नाही याचा टीव्ही रिप्लेमध्ये बघून पंच निर्णय द्यायला लागल्यावर फुटाची जागा सेंटिमीटरनं आणि सेंटिमीटरची जागा मिलिमीटरनं घेतली.

थोडक्‍यात सांगायचं, तर फलंदाज बाद करताना हालचालींच्या चपळाईमध्ये लक्षणीय बदल करणं भाग पडलं. प्रत्येक वाचवलेला मिलिसेकंद कामाला कसा येईल, हे कळून चुकलं. त्यातूनच मला वाटतं, मी फेकलेला चेंडू पकडून स्टंपला लावण्याऐवजी नुसती दिशा बदलून स्टंपला कसा लागेल याचा प्रयत्न करू लागलो. स्टंपिंग करताना स्टंपच्या जवळ हात कसे राहतील आणि चेंडू पकडून लगेच तत्क्षणी स्टंपवरच्या बेल्स कशा पाडता येतील, याचा प्रयत्न करू लागलो. उसेन बोल्ट धावताना त्याची स्पर्धा दुसऱ्या कोणाशी नसून स्वत:शी असायची. त्याच्याबरोबर पळणाऱ्या प्रत्येक धावपटूचा शंभर मीटर वेळ दहा सेकंदाच्या आतलीच असायची. मग मिलिसेकंद कोण वेगानं पुढं सरकतो, त्यावर शर्यतीचा निकाल ठरायचा. उसेन बोल्ट सतत तो मिलिसेकंद कसा कमी करता येईल, याकरता झटताना दिसायचा. मी त्यातूनच प्रेरणा घेतली. विकेटकीपर म्हणून चपळाई आणून मिलिसेकंद कसा कमी करता येईल, याचा विचार करून कृती करायला लागतो. 

कोणत्या क्रिकेटमध्ये विकेटकीपिंग करणं कठीण आहे? 
धोनी : प्रत्येक क्रिकेटचं आव्हान वेगळं असतं. कसोटी क्रिकेटमध्ये विकेटकीपिंग करताना दीर्घ काळ एकाग्रता राखावी लागते. एकदिवसीय सामन्यात विकेटकीपिंगबरोबर गोलंदाजाला आणि कर्णधाराला क्षेत्ररक्षणातले बदल सुचवावे लागतात. तसंच जेव्हा झेल उडतो, त्यावेळी सतर्क राहून तुमची प्रतिसाद देण्याची क्षमता सतत सर्वोच्च असावी लागते. 

'टी-20' क्रिकेटमध्ये विकेटकीपरकडं चेंडू कमी येतो, कारण फलंदाज चेंडू मागं जाऊनच देत नाही. फक्त टी-20 खेळात वेळ वाचवायला फिल्डर शक्‍य त्या वेगानं चेंडू फेकतात. मग त्यात कधी टप्पा, तर कधी दिशा चुकते. विकेटकीपरला अशा वेळी चुकीचा फेकलेला चेंडू अडवताना दुखापती सर्वांत जास्त होतात. म्हणून मला वाटतं, प्रत्येक क्रिकेटच्या खेळात विकेटकीपरकरता वेगळी आव्हानं आहेत. 

चारशे बळींबरोबर एकदिवसीय क्रिकेटमधल्या दहा हजार धावांच्या उंबरठ्यावर उभा आहेस तू. 
धोनी : उंबरठ्यावर आहे... आत नाही गेलेलो... मला भूतकाळात मागं वळून बघायला आवडत नाही; तसंच भविष्यकाळात डोकावून बघायला अजिबात आवडत नाही... मला फक्त वर्तमानात जगायला आवडतं. तेव्हा दहा हजार धावा आणि त्या विक्रमाबद्दल नंतरच बोलूयात. 

...असं म्हणत हसतहसत धोनी निघून गेला. कित्येक खेळाडूंशी तासभर बोलले, तरी ज्या कामाच्या चार मोलाच्या गोष्टी समजत नाहीत, त्या धोनीशी दहा मिनिटं बातचित केली तरी समजतात. 

'धोनी परिपूर्ण विकेटकीपर' 
धोनी भारतीय संघात आला, तेव्हा निवड समितीनं त्याच्यातली गुणवत्ता हेरली होती. काही खेळाडू क्रिकेट खेळताना एकदम शैलीदार दिसतात- ज्याला आपण 'स्टायलिश' म्हणतो. महेंद्रसिंह धोनी तसा नव्हता. तो गावातल्या मातीतून आपोआप घडलेला खेळाडू होता. खूप सहजी मोठे फटके मारणारा तो फलंदाज होता, तसंच दिसायला 'परफेक्‍ट' नसला, तरी 'इफेक्‍टिव्ह' विकेटकीपर होता. त्याच्या विकेटकीपिंगमध्ये काही दोष होते, जे मला दिसले. मी त्याला काही सूचना दिल्या, दोष सुधारायला ज्या त्यानं आपल्या पद्धतीनं राबवल्या. 

चांगल्या फलंदाजाला झकास खेळी उभारताना बघितलं, की काही गोष्टी नजरेत येतात. फलंदाजी करतानाचा संपूर्ण लक्ष बॉलवर बरोबर असतं आणि मनाची अवस्था द्विधा नसते. मला वाटतं, चांगल्या विकेटकीपरकरताही हेच गुण तंतोतंत लागू होतात. धोनीला विकेटकीपिंग करताना नीट बघ. त्याचा स्टान्स सहज आहे, ज्यानं त्याच्या शरीरावर कमीत कमी ताण येतो. चेंडू पकडताना तो हात मारत नाही, तर कोमल हातानं तो पकडतो. ज्यानं चेंडू कमीत कमी वेळा हातातून उडतो. फिरकीला कीपिंग करताना त्याचे हात एकदम स्टंपजवळ असतात, ज्यानं स्टपिंग करायची संधी मिळाली, तर तो मिलिसेकंद वाचवतो. एकदिवसीय क्रिकेटमधला चारशे बळींचा टप्पा धोनीनं पार केला, याचा आनंद होतो. सर्वांत लक्षणीय बाब अशी, की धोनी त्यानं क्रिकेटमध्ये साध्य केलेल्या गोष्टींची कधी वाच्यता करत नाही. म्हणून म्हणतो, की धोनी मला आवडायची बरीच कारणं आहेत. 
- किरण मोरे 

'विकेटकीपरची भूमिका मोलाची' 
बाहेरून समजणार नाही; पण विकेटकीपरची संघातली भूमिका खूप जास्त मोलाची असते. विकेटकीपरला खेळपट्टीचा खरा अंदाज येत असतो. फलंदाजाच्या हालचाली दिसत असतात. तो कुठं चेंडू मारायची शक्‍यता आहे याचा अंदाज येत असतो. मग क्षेत्ररक्षक कुठं असायला पाहिजे- जेणेकरून मारल्या फटक्‍याला अडवता येईल, याचा विचार विकेटकीपर सतत करत असतो. नक्की कुठं मारा करायला पाहिजे याचं मार्गदर्शन गोलंदाजाला करत असतो. कोणता गोलंदाज जोर लावून मारा करतोय, कोण गोलंदाज थकत चालला आहे, हे चेंडू ग्लोव्ह्‌जमध्ये काय प्रकारे येऊन धडकत आहे, हे विकेटकीपर जाणत असतो. दोन फलंदाजांच्यात भागीदारी रंगू लागली, की फिल्डिंग करताना उत्साह कमी व्हायला लागल्यावर विकेटकीपर बोलून चिथावून संघाला जागं करतो. या सगळ्याचा नीट विचार कर, म्हणजे विकेटकीपरची संघातली भूमिका खूप जास्त मोलाची असते, हे म्हणण्यामागचा उद्देश तुला समजेल. धोनी या सगळ्याचं प्रतीक आहे. 

काही विकेटकीपर खूप सुंदर स्टाइलमध्ये विकेटकीपिंग करतात. दिवसभर मस्त चेंडू पकडतात. दोनच चेंडू सोडतात, ज्यावर फलंदाजाच्या बॅटची कड लागलेली असते. धोनीचं उलटं असतं. तो कधी चेंडू हॉकी गोलकीपरसारखा पॅडनं अडवेल, कधी चेंडू खाली पडेल; पण बॅटची कड घेतलेला चेंडू बरोबर पकडेल. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं, तर धोनी स्टायलिश नव्हे, तर 'स्ट्रीट स्मार्ट' विकेटकीपर आहे. म्हणून धोनी माझा लाडका विकेटकीपर असायचा. 
- सचिन तेंडुलकर 
 
'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com