चित्रणक्रांतीचा जादूगार!

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

ऑस्करच्या शर्यतीमध्ये भारतातील कोणता चित्रपट आहे, याची चर्चा दरवर्षीच रंगते. यंदा मुख्य पुरस्कार वितरण सोहळ्याआधी दिल्या जाणाऱ्या विज्ञान-तंत्रज्ञान ऑस्कर पुरस्कारांमधल्या एका नावानं भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं. हे नाव आहे भारतीय सॉफ्टवेअर अभियंता विकास साठ्ये या मराठमोळ्या तरुणाचं. चित्रपटविश्‍वाशी कोणताही थेट संबंध नसताना त्यांनी विकसित केलेल्या शॉटओव्हर कॅमेरा सिस्टिमसाठी (के 1) त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. शालेय जीवनात अत्यंत सर्वसामान्य विद्यार्थी असूनही, तंत्रज्ञानाची आवड, त्यात कौशल्य मिळविण्यासाठी कष्ट आणि संघर्ष करण्याची तयारी, तंत्रज्ञान सोप्या पद्धतीनं मांडण्याची हातोटी यांच्या जोरावर या मराठी तरुणानं हॉलिवूडमधील बिगबजेट सिनेमांच्या चित्रणामध्ये क्रांती घडवून आणत ऑस्कर पुरस्काराला गवसणी घातली. त्यांचा हा प्रवास अनेक चढ-उतारांनी व नाट्यपूर्ण घटनांना भरलेला आहे. विकास साठ्ये नुकतेच पुण्यात आले होते. त्या निमित्तानं त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. 

पुण्यातल्या घरामध्ये साठ्ये घरगुती वेशात आणि अत्यंत मानाच्या (आणि वजनदार) ऑस्कर ट्रॉफीसह सामोरे आले. अत्यंत मितभाषी आणि मोजून-मापून बोलणाऱ्या विकास यांनी पुण्या-मुंबईतलं बालपण, शिक्षण आणि तिथून थेट ऑस्करपर्यंतच्या आपल्या प्रवासाबद्दल सांगण्यास सुरवात केली. चित्रपट जगताशी आपला कधीच संबंध आला नसल्याचं स्पष्ट करून त्यांनी तंत्रज्ञानाच्या लागलेल्या गोडीबद्दल बोलताना सांगितलं. ''मी शाळेमध्ये अगदी सर्वसामान्य विद्यार्थी होतो, शेवटच्या तिघांत माझा क्रमांक असायचा. गणित, विज्ञान सोडल्यास इतर विषयांबद्दल मला अजिबात रस नव्हता. मात्र, खेळणी तोडून ती पुन्हा जोडणं, गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या तंत्रांचा उपयोग करून आरास करणं या गोष्टींत मला गती होती. त्यासाठी घरच्यांनीही कायमच पाठिंबा दिला. दहावीनंतर मात्र चित्र बदललं. मी ठाण्यात विद्या प्रसारक मंडळामध्ये इन्स्ट्रुमेंटेशन शाखेत डिप्लोमासाठी प्रवेश घेतला आणि आता माझा क्रमांक पहिल्या दोघांत यायला सुरवात झाली. पेट्रोकेमिकल, स्टील प्लॅंट आदींचं ऑटोमेशन करणारी उपकरणं बनवण्यास मी त्या काळात शिकलो. माझा इलेक्‍ट्रॉनिक्‍स विषयातील पाया पक्का झाला आणि डिप्लोमानंतर मी पुण्यातील विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूटमध्ये इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला,'' विकास साठ्ये सांगत होते. 

इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर विकास यांच्या मनातही स्वतःची एखादी कंपनी सुरू करण्याचा विचार होता; मात्र त्या संदर्भातला कोणताही अनुभव गाठीशी नसल्यानं प्रयत्न करूनही त्यांना त्यात जम बसवता आला नाही. त्यांनी इन्स्ट्रिूमेंटेशन या विषयातला व्याख्याता म्हणून काम करण्याचं ठरवलं आणि व्हीआयटी व कमिन्स कॉलेजमध्ये जम बसवला. याच काळात त्यांनी बंगळूरमधून एम-टेकचं शिक्षणही पूर्ण केलं. या दरम्यान 'फियाट' या मोटार बनवणाऱ्या कंपनीनं त्यांना कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी आमंत्रित केलं आणि विकास यांना इटलीमध्ये जाऊन ऑटोमेशन तंत्राची ओळख करून घेण्याची संधी मिळाली. सॉफ्टवेअरच्या मदतीनं मोठमोठी अभियांत्रिकी कामं सहजसाध्य करणाऱ्या संगणक क्षेत्रामुळं (एम्बेडेड टेक्‍नॉलॉजी) प्रभावित होऊन त्यांनी भविष्यात याच क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. टाटा हनीवेल या कंपनीमध्ये ते 1999मध्ये दाखल झाले आणि याच क्षेत्रात काम केलं. मात्र, त्यांना व्याख्याता किंवा प्रशिक्षक म्हणूनच काम करावं लागत होतं, थेट उत्पादनामध्ये त्यांचा सहभाग नव्हता. भारतात क्षेत्र बदलणं सहज शक्‍य नसतं आणि त्यामुळंच आपण परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगत विकास म्हणाले ः ''न्यूझीलंडमध्ये एम्बेडेड टेक्‍नॉलॉजी मूळ धरत होती. तिथं तंत्रज्ञांची गरज असल्याचं समजल्यावर मी डिसेंबर 2002मध्ये तिथं दाखल झालो. सुरवातीचे काही महिने कोणतंही काम मिळालं नाही, त्यामुळं 'बर्गर किंग' या कंपनीमध्ये किरकोळ कामं करत दिवस काढले. जवळचे सर्व पैसे संपले. काही महिन्यांनंतर मला एका कंपनीमध्ये नोकरी मिळाली आणि मी तिथं तीन अत्याधुनिक उत्पादनं विकसित केली. ही 'टेलरमेड' उत्पादनं विकसित केल्यानं माझ्यात मोठा आत्मविश्‍वास निर्माण झाला होता. अनेक उपकरणांचा एकमेकांशी 'संवाद' साधणाऱ्या कंट्रोलर एरिया नेटवर्क (कॅन) बस या तंत्राचा उपयोग मी इथं शिकलो आणि त्याचा भविष्यात माझ्या यशात मोठा वाटा असणार होता...'' 

आयुष्याला कलाटणी 
विकास यांच्या नशिबानं इथं पुन्हा एकदा मोठी कलाटणी घेतली. न्यूझीलंडमधल्या अनुभवाचा उपयोग करण्यासाठी भारतात परतण्याचा निर्णय त्यांनी 2008मध्ये घेतला. मात्र, या काळात जागतिक मंदीचा तडाखा बसला आणि त्यांना पुन्हा एकदा कफल्लक व्हावं लागलं. किरकोळ पगारावर काम करण्याची नामुष्की आली. त्याचदरम्यान न्यूझीलंडमधला त्यांचा एक सहकारी शेन बेकहॅमचा फोन आला आणि त्यानं एका कंपनीला हवाई चित्रीकरणासाठी एक उपकरण बनवायचं असून, त्याचं सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी विकास यांची गरज असल्याचं कळवलं. विकास 2009मध्ये पुन्हा न्यूझीलंडला रवाना झाले. 

'शॉटओव्हर कॅमेरा सिस्टिम'ची निर्मिती 
जॉन कोएल यांनी अमेरिकेमध्ये हवाई चित्रण करण्यासाठीचा एक कॅमेरा विकसित केला होता, मात्र आता त्यांनी शॉटओव्हर या कंपनीच्या माध्यमातून नव्यानं हवाई 'टू डी' आणि 'थ्री डी' चित्रण करणारे अत्याधुनिक कॅमेरे विकसित करण्याचं ठरवलं. त्यासाठी जॉनबरोबर ब्रॅड हर्नडिल, शेन बेकहॅम व विकास साठ्ये या चौघांची टीम तयार झाली. जॉन आणि ब्रॅड कॅमेराचं मेकॅनिकल आणि शेन आणि विकास सॉफ्टवेअरचं काम पाहणार होते. आधीच्या वायरिंगच्या जंजाळानं भरलेल्या कॅमेराच्या बदल्यात त्यांना एक हायटेक कॅमेरा विकसित करायचा होता.

याबद्दल विकास सांगतात ः ''मी जॉनचा जुना कॅमेरा पाहिला. अत्याधुनिक कॅमेरा बनविण्यासाठी त्यात महत्त्वाचे बदल करणं गरजेचं होतं. 2009 मध्ये आम्ही काम सुरू केलं. प्रथम सिंगल ऍक्‍सिस कॅमेरा तयार करून चाचण्या घेतल्या. त्या समाधानकारक होत्या. थोड्याच कालावधीत सहा ऍक्‍सिस असलेला आमचा कॅमेरा तयार झाला आणि त्याची चाचणी 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' या प्रसिद्ध हॉलिवूडपटाच्या सेटवर करण्याचं निश्‍चित झालं. हा कॅमेरा निर्मात्यांना एवढा आवडला, की तो त्यांनी थेट चित्रणासाठीच वापरण्यास सुरवात केली. आम्हाला त्यात आणखी आवश्‍यक बदल करण्याची संधीही मिळाली नाही! जॉननं लगेचच 'थ्री डी' कॅमेरा विकसित करण्यास सांगितलं. हे काम आणखी कठीण होतं, कारण त्यात दोन कॅमेरे लागणार होते आणि वजन दुप्पट होणार होतं. हे कामही आम्ही केवळ सहा महिन्यांत पूर्ण केलं. 'वॉकिंग विथ डायनॉसोर' या चित्रपटामध्ये हा 'थ्री डी' कॅमेरा सर्वप्रथम वापरला गेला. तब्बल दहा लाख डॉलर किंमत असलेले तीन 'थ्री डी' कॅमेरे आणि दोन 'टू डी' कॅमेरे आम्ही तयार केले. 'स्पायडरमॅन', 'डन्कर्क', 'ज्युरासिक वर्ल्ड' आदी बारा ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ते मोठ्या प्रमाणावर वापरले गेले. यामध्ये कॅमेरा हेलिकॉप्टरमध्ये बसवून जॉयस्टिकच्या मदतीनं तो नियंत्रित करणं शक्‍य असल्यानं चित्रण अतिशय नेटकं व कोणताही 'नॉईज' न येता होतं. त्याचा लूक डाऊन मोड (हेलिकॉप्टरच्या खाली जोडलेल्या कॅमेराच्या मदतीनं थेट खालील बाजूस असलेलं चित्रण) अत्यंत छान काम करत होता. हॉलिवूडचे अनेक निष्णात कॅमेरामन याच कॅमेऱ्याची मागणी करू लागले व आमची कंपनी वेगानं दौडू लागली....'' 

न्यूझीलंडच्या दुर्गम भागात ही कंपनी असल्यानं कुटुंबाच्या सोयीसाठी 2012मध्ये विकास यांनी नोकरीचा राजीनामा दिला व ते ऑस्ट्रेलियामध्ये गेले. तिथं 'आरएफ' इंडस्ट्रीमध्ये ते पोलिसांच्या वाहनांसाठी आणि रुग्णवाहिकांसाठी लागणारी उपकरणं विकसित करण्याचं काम करतात. इकडं जॉन कोएलनं ही कंपनी विकून टाकली व दुसरा व्यवसाय सुरू केला. कंपनीच्या नव्या मालकानं 2017मध्ये या कॅमेऱ्याची एंट्री सायन्स आणि तंत्रज्ञान ऑस्करसाठी दिली. ऑस्कर पुरस्कारांच्या टीमनं मूळ कॅमेरा विकसित केलेल्यांनाच पुरस्कार देणार असल्याचं सांगत विकास यांच्यासह ब्रॅड, जॉन व शेनची मुलाखत घेतली आणि या चौघांच्या 2011मध्ये केलेल्या कामाचं बक्षीस म्हणून त्यांना ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला... 

'लो व्हॉल्यूम, हाय कॉस्ट' काम! 
फारसे चित्रपट पाहत नसून आणि या क्षेत्राशी थेट संबंध नसतानाही ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानं विकास खूप आनंदी आहेत. ते म्हणतात ः ''मी भारतीय चित्रपट फारसे पाहत नसल्यानं तिथं चित्रीकरणाच्या दृष्टीनं काय बदल व्हावेत, याबद्दल मी मत देऊ शकणार नाही; मात्र, हॉलिवूडचे निर्माते आणि कॅमेरा तंत्रज्ञांची कोणतीही तडजोड न करता काम करण्याची पद्धत मी पाहिली आहे. अत्यंत सोप्या भाषेतला सॉफ्टवेअर प्रोग्रॅम लिहायला आणि 'लो व्हॉल्यूम व हाय कॉस्ट' काम करायला मला आवडतं. त्यामुळं चित्रपट अधिक सफाईदार होण्यासाठी माझी मदत लागल्यास मी हॉलिवूडमध्ये काम करण्यास उत्सुक आहे...'' 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com