आनंदतरंग (डॉ. श्रुती पानसे)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

लहान वयात अगदी सहज उपलब्ध असलेला मुक्त वेळ, स्वातंत्र्य आणि त्यातून मिळणारं समाधान किंवा असमाधान या गोष्टी आपण बाहेरून पुरवू शकत नाही. स्पर्धा जेवढी उशिरा सुरू होईल, तेवढा मुलांना कलांचा, खेळांचा आनंद मनमुराद लुटता येईल आणि त्यातून स्वत:च्या मनाशी संवाद साधता येईल. मुलांना त्यांचं बालपण जगू देणं म्हणजे दुसरं काय असतं? त्यांना या सर्वांचा आस्वाद घेऊ देणं. मेंदूशास्त्रावरच्या एका पुस्तकाचं नाव 'सेलिब्रेशन ऑफ न्यूरॉन्स' असं आहे. मुलांना त्यांच्या गोष्टी 'सेलिब्रेट' तर करू द्या! 

कोणी काही म्हणा किंवा कितीही प्रयत्न करा... मनात वेगवेगळे तरंग आपले उठतच असतात... हे तरंग केवळ आपल्याच मनात उठत नाहीत हो पालकहो! - आपल्या मुलांच्या मनातही ते उठत असतात. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर हे तरंग त्यांना दिशा देत असतात; पण हे आनंदतरंग आहेत की 'अस्वस्थतरंग' आहेत, हे ओळखायला हवं. 

मुलांचं वाढतं वय आपल्याला दिसतं. दरवर्षी वर जाणारी त्यांची इयत्ता दिसते. नवनव्या कला आणि कौशल्यांचा पाठपुरावा ते करताहेत हे दिसतं. त्यांच्या मागण्या, त्यांचे हट्ट दिसतात; पण त्यांचं वाढतं मन त्यातली अस्वस्थता आपल्याला फारशी दिसत नाही. ती कधीकधी जाणवत राहते इतकंच. अस्वस्थता हा शब्द नेहमी नकारात्मक असतो असं नाही. अस्वस्थता ही एक प्रक्रिया आहे आणि ती कधीकधी सुंदरही असू शकते. या अस्वस्थतेतूनच नव्या कल्पनांचा, सर्जनशीलतेचा उगम होत असतो, तर कधी या अस्वस्थतेतून ताण वाढत असतो. 

खरं तर जन्मापासूनच मुलांचं मन कार्यरत असतं. साधारण एक वर्षांच्या आसपास त्यांचा स्वभाव हळूहळू कळायला लागतो. हातातलं खेळणं दुसऱ्याला दिल्यासारखं दाखवायचं; पण आपल्याच हातात ठेवायचं. लहानपणीचा हा अगदी आवडता, मजेचा खेळ; पण स्वभाव घडवत जाणारा. एखादा खेळ, एखादं पुस्तक, एखादी वस्तू आवडली, की तीच पुनःपुन्हा हवी असते हे खरं; मात्र त्यासाठी केला जाणारा हट्ट, व्यक्त केलेला राग, प्रसंगी भिंतीवर डोकं आपटून घेऊन दाखवलेला संताप या सगळ्यातून स्वभाव हळूहळू घडत जातो. अव्यक्त मन आपल्याला जाणवायला लागतं. 

त्यातून आजच्या तथाकथित स्पर्धात्मक जगात मुलांना लहानपणापासून वेगवेगळ्या स्पर्धांना घातलं जातं. त्यांच्या मनात स्पर्धेची नैसर्गिक जाणीव निर्माण व्हायच्या आधीच साध्यासाध्या स्पर्धा सुरू होतात. पळण्याची स्पर्धा, लंगडीची स्पर्धा यातून आपलं मूल पहिलं कसं येईल याची स्पर्धा आधी पालकांच्या प्रौढ मनात सुरू होते आणि मग ती बालमनापर्यंत पोचते. 

हे बालमन असंच आपल्या नकळत मोठं होत जातं. त्यात दिवसागणिक कित्येक गोष्टींची भर पडत जाते. 'मी सगळ्यात टॉपला' अशी ऊर्मी मनात असणं वेगळं, त्यासाठी जिवापाड मेहनत करणं वेगळं आणि 'माझं अपयश सहन करता येत नाही' हे वेगळं. अनेकदा ही स्पर्धा मुलांचं मन पोखरते. त्यांना साध्यासाध्या गोष्टीतला निर्भेळ आनंद घेऊ देत नाही. एखादी गोष्ट फक्त आपल्या आनंदासाठी करायची आहे, हे लक्षात येत नाही. उदाहरणार्थ, मला आत्ता चित्र काढावंसं वाटतं आहे, म्हणून मी मला हवं तसं छान चित्र काढणं, त्यात बुडून जाणं हे व्हायला हवं. चित्र आवडलं, तर मी ते सगळ्यांना दाखवेन, नाही आवडलं तर बाजूला ठेवेन आणि नवं चित्र काढायला घेईन- मला नको असेल, तर नवं चित्र काढायला कदाचित घेणारही नाही- हा निर्णय पहिली- दुसरीतल्या मुलांनाही घेऊ द्यायला हवा. यातून त्यांच्या मनात जे काही उमटेल, तो त्यांनी स्वत:चा घेतलेला शोध असेल. 

आत्ताच्या वयात अगदी सहज उपलब्ध असलेला हा मुक्त मोकळा वेळ, स्वातंत्र्य आणि त्यातून मिळणारं समाधान किंवा असमाधान हे आपण बाहेरून पुरवू शकत नाही. कितीही पैसे ओतले तरी! ही मनाची सूक्ष्म प्रक्रिया आहे. याचा अनुभव ज्याचा त्यानंच घ्यायचा आहे. आपण मुलांना तो घेऊ द्यायला हवा. आपल्याला माहिती आहेच, की पुढं अपुरा पडत जाणारा वेळ काहीही आगळं आणि वेगळं करू देत नाही. थोडक्‍यात काय तर, स्पर्धा जेवढी उशिरा सुरू होईल, तेवढा मुलांना कलांचा, खेळांचा आनंद मनमुराद लुटता येईल आणि त्यातून स्वत:च्या मनाशी संवाद साधता येईल. हा संवाद साधणं एका सक्षम मनासाठी- मेंदूसाठी फार आवश्‍यक. नव्या भाषेत बोलायचं, तर 'इमोशनल इंटेलिजन्स'साठी आवश्‍यक. मुलांना त्यांचं बालपण जगू देणं म्हणजे दुसरं काय असतं? त्यांना या सर्वांचा आस्वाद घेऊ देणं. वयाच्या या टप्प्यावर त्यांच्या 'आकलनाच्या सुंदर कक्षे'त काय मस्त उलथापालथ चालू असते... आपल्याला काय माहीत! मेंदूशास्त्रावरच्या एका पुस्तकाचं नाव 'सेलिब्रेशन ऑफ न्यूरॉन्स' असं आहे. मुलांना त्यांचं त्यांना 'सेलिब्रेट' तर करू द्या! आपण सर्वच जण बालवाडी- तिसरी, चौथीपर्यंत जेवढी गाणी म्हणतो, चित्र काढतो, खेळतो, बडबड करतो, तेवढं नंतर कधीही करत नाही- याला अपवाद व्यावसायिक चित्रकार, नर्तक, खेळाडू अशांचा. त्यामुळं त्या त्या वयातलं मेंदूतलं सेलिब्रेशन फार आनंदाचं. खेळीमेळीचं. 

जे पालक मुलांना असं काही करू देत नाहीत, या क्‍लासमधून त्या क्‍लासला पळवतात, त्यापैकी बऱ्याच मुलांच्या मनात सतत कसरत सुरू होते. मग ती परीक्षा असो, स्पर्धा असो किंवा वाढदिवसाला घेतलेला एखादा नवीन ड्रेस. 'मीच भारी असायला हवं' आणि 'मीच भारी दिसायला हवं' ही जाणीव अंतर्मनाला धडका देत असते. या धडकांना मागून जोर देणारे आपण खूप जण असतो. त्यात पालक असतात, कधी शिक्षक असतात. टीव्हीवरच्या जाहिराती असतात. सिनेमातली गाणी असतात. सोशल मीडिया असतो. त्यातले लाइक्‍स असतात. स्टेटस अपडेट करताना 'एक्‍सनं अमुक केलं, तर मीही करून दाखवायला पाहिजे,' ही भाषा असते. त्यातून अस्वस्थता व्यक्त होते. ही सगळी मनातली अस्वस्थता दरवेळी इतरांना कळतेच असं नाही. मुलांशी मोकळेपणानं गप्पा मारल्या, तर आपल्याला हे सहज समजू शकतं. खरं सांगायचं, तर जर पाचवी-सहावीच्या पुढची मुलं मनातले आनंदतरंग किंवा अस्वस्थतरंग बोलून दाखवत असतील, तर समजा, की आपल्या त्यांच्याशी गप्पा-संवाद योग्य रीतीनं चालल्या आहेत. तसं नसेल तर गप्पांना रुळावर आणावं लागेल. 

आता थोडं अवघड टप्प्याबद्दल. साधारण आठवी-नववीनंतर मुलं स्वत:ला जास्त तीव्रतेने शोधत राहतात... 

'मी कोण?', 'मी कशी/मी कसा?', 'माझं म्हणता येईल, असं कोण आहे?', 'मी खरंच अशी आहे का मी तशी आहे?', 'मी कसं वागलं तर मला प्रेम मिळेल?', 'माझ्या आसपास जो काही समवयीन मित्रमैत्रिणींचा समाज आहे, त्यात माझं स्थान काय आहे?' ते स्थान वरचं असेल, (माझे मार्क्‍स, माझी हुशारी, माझं दिसणं, माझ्या आईबाबांची आर्थिक प्रतिष्ठा यावर अवलंबून असलेलं) तर इतरांच्या डोळ्यात मला ते दिसतं. मला बरं वाटतं आणि स्वस्थही वाटतं. 

मात्र, माझं स्थान मलाच 'सापडलं 'नसेल, 'सापडत' नसेल, मला ते इतरांच्या नजरेत दिसत नसेल, तर जोवर ते सापडत नाही तोपर्यंत माझी अस्वस्थता कायम राहते. मी इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत नसेल तर त्याचं ओझं होतं. हे ओझं असह्य होऊन 'मी मलाच नकोशी होते'. स्वत:च्या किंवा इतरांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसेल, तर तो ताण असह्य होतो. त्याचं हृदयावर ओझं होतं. 

असं व्हायच्या आधीच मुलांना ओळखा. गप्पा मारा. त्यांच्याबरोबर मनसोक्त फिरा. खेळा. अभ्यासाच्या ओझ्यात त्यांच्या विरुद्ध पार्टीत जाऊ नका... आणि....ओळखा त्यांना...! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com