भविष्य आपल्या 'हाती' (डॉ. श्रुती पानसे)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

वाढत्या वयातल्या मुलांच्या हातात स्मार्ट फोन खूप वेळा दिसतो, त्याच्याबद्दल चिंता व्यक्त होते. मात्र, हा फोन काय देतो आणि काय घेतो, हे जाणून घेणं गरजेचं आहे. मोबाईलचा वापर योग्य होतो आहे का आणि मुलं त्यामुळं वाहवून जात आहेत का, हे पालकांनी नक्कीच बघायला हवं. 

वाढत्या वयातल्या मुलामुलींच्या हातात खूप वेळ मोबाईल फोन दिसला, की चिंता व्यक्त होते; पण मुलांना स्मार्ट फोन काय देतो आणि काय त्यांच्याकडून काढून घेतो, याचा शास्त्रीय विचार करायला हवा. असं काय आहे या नव्या खेळण्यात की मुलं इतकी गुंगतात आणि गुंततात? याची कारणं काय? त्यांना यातून नक्की काय काय मिळणार असतं? 

स्मार्ट फोन काय देतो? 

  • ऑनलाईन असताना आपण खूप वेगात असतो. एकाच वेळेला अनेक गोष्टी हाताळता येतात. 
  • स्मार्ट फोनमुळे एकाच वेळी विविध ऍप्स, फेसबुक प्रकारातला सोशल मीडिया, कॅल्क्‍युलेटर, अलार्म, बॅंक अशा बाबींशी संबंधित गोष्टी वेगात होऊ शकतात. तेही बसल्या जागी! मात्र मेंदूशास्त्रज्ञांच्या मते, मेंदू एका वेळी एकच काम चांगल्या पद्धतीनं करू शकतो. हा मल्टी-टास्किंगचा जमाना आहे तरीही! स्मार्ट फोनमुळं आपण आपल्यालाच म्हणूनच खूप जास्त कामाला लावतो; पण त्याला यामुळं थकवा येतो. हा थकवा आलेला कळतो कशामुळं? तर आपली अचानक चिडचिड वाढते त्यातून! अर्थात मेंदूला खूप थकवणारा असला तरीही आपण स्मार्ट फोन काही सोडत नाही. 
  • स्मार्ट फोनची ओळख करून घेताना 'डोपामाइन' या रसायनाची ओळखही करून घ्यायला हवी. वाढत्या वयातली मुलं गेम्सना चिकटून बसतात याचं कारण हेच रसायन आहे. बक्षीस मिळाल्याची भावना हे रसायन करून देतं. मात्र मनातल्या भावभावना, ताण-तणाव, अतिरेकी लैंगिक उद्दिपन, सतत गेम खेळण्यामुळं मिळणारी बक्षीसं, एकूणच मेंदूला सतत दक्ष ठेवण्याची परिस्थिती हा स्मार्ट फोन तयार करतो. 

या सगळ्यात वाईट भाग असा आहे, की आसपासच्या वातावरणाचा परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, 

  • परीक्षेत मिळालेले कमी गुण, 
  • आलेलं अपयश, 
  • आई-बाबांनी विविध कारणांवरून रागावणं. 
  • मित्र- मैत्रिणींबरोबर मैत्रीपूर्ण संबंध नसणं, 
  • एक प्रकारे असं म्हणू शकू, की प्रेमाला पारखं होणं 
  • अभ्यासाचा किंवा नेमून दिलेल्या कोणत्याही कामाचा आत्यंतिक कंटाळा आणि काहीही करावसं न वाटणं, 
  • घरात किंवा आसपासच्या वातावरणात भांडण, रुसवाफुगवा, नैराश्‍य, नकारात्मकता असणं ही कारणं असतात. 

याशिवाय घरात माणसं नसणं, त्यामुळं आलेला एकटेपणा, आईबाबांनी टीव्ही बघून दिला नाही, आळस, एका क्‍लासमधून दुसऱ्या क्‍लासमध्ये धावणं, सतत लेखन करायला लावणं, पाठांतराचं ओझं डोक्‍यावर असणं, अभ्यास- गृहपाठ यात खूपच व्यग्र दिनक्रम असणं.... असा बराच काळ गेला असेल, तर थोडासा जरी मोकळा वेळ मिळाला तरी मुलं लगेच मोबाईलकडं वळतात. हेच काय ते एकमेव मनोरंजन, असं त्यांना वाटायला लागतं. 

थोडक्‍यात काय, तर आजूबाजूच्या घटनांमधला, माणसांमधला रस कमी झाला, कोणत्याही गोष्टीबद्दल छान वाटेनासं झालं, की मुलं या स्वस्त मनोरंजनाकडं वळतात. या माध्यमातून त्यांना सतत काही तरी मिळत राहतं. काही गोष्टींपासून लांब जाण्यासाठी जसा व्यसनांचा सहारा घेतला जातो, तसं हे एक प्रकारचं व्यसनच आहे. मोबाईलचा वापर करताकरता त्यात इतके गुरफटून जातात, की हे योग्यच आहे, इथंच तर सगळी मजा आहे असं त्यांना वाटायला लागतं. 

स्मार्ट फोन काय घेतो? 
मेंदूतला ग्रे मॅटर म्हणजेच विचार करणारा भाग. कायम व्यसनात अडकलेल्या माणसांच्या मेंदूतल्या ग्रे मॅटरवर परिणाम होत असतो. तोच प्रकार इथंही आढळून आला आहे. ग्रे मॅटरचा भाग संकुचित होत असलेला संशोधकांना आढळलं आहे. 'सायकॉलॉजी टुडे' या नावाच्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, मेंदूत घडलेल्या बदलांची चित्रं न्युरो इमेजिंग तंत्रानुसार पाहिली आणि असं दिसलं, की मेंदूतल्या ग्रे मॅटरवर बराच परिणाम होतो. जी लहान किंवा तरुण वयातली मुलं सात तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ गॅजेट्‌स वापरतात त्यांच्या निर्णयक्षमतेवर, भावनिक नियंत्रणावर परिणाम होतो. 

याचा थेट परिणाम माणसाच्या भावनांवर आणि संवेदनांवर होत असतो. ही गोष्ट भावनिक बुद्धिमत्तेसाठी योग्य नाही. याचा परिणाम त्या माणसाच्या एकूण भावनिक आरोग्यावर होतो. त्यातूनच पुढं शारीरिक आरोग्यावरही होऊ शकतो. इंटरनेट ऍडिक्‍शन डिसऑर्डर (आयएडी) हा आजार आता लोकांना होतो आहे. त्याकडे गंभीर लक्ष दयायला हवं. 

काही मुलांना/ मोठ्या माणसांना सायबर रिलेशनशिप ऍडिक्‍शन या नावाचा आजार होतो. अशी मुलं सर्व वेळ आभासी मित्र-मैत्रिणींशी बोलत असतात, नवनवे आभासी मित्र-मैत्रिणी गोळा करत असतात, की त्यांना खरोखरच्या मित्र-मैत्रिणींमध्ये फारसा रस उरत नाही. अशी मुलं प्रत्यक्ष गप्पा मारताना अस्वस्थ असतात. मोबाईल हातात घेऊन एकमेकांना त्यातलं काही दाखवत गप्पा मारणं हे नेहमी दिसणारं दृश्‍य आहे; पण त्यात अस्वस्थता नसते, फक्त मजा असते. काही वेळा प्रत्यक्ष माणसांना टाळून नेटवर गप्पा मारत बसतात, तेव्हा नक्कीच धोका आहे. 

मात्र, आजकाल आपल्याला घराघरांमध्ये हेच चित्र दिसतं. लहान मुलंच नाही, तर मोठी माणसंही या छोट्याशा खेळण्याला चिकटून बसलेली असतात. 

त्यामुळं असं म्हणावंसं वाटतं, की 'फ्री वायफाय' ही जशी एक प्रकारे गरज समजली जात आहे, तसंच 'नो मोबाईल झोन' हादेखील बौद्धिक विकासासाठी भविष्यात गरजेचा ठरेल. 

मुलांच्या बाबतीत बोलायचं तर खूप लहानपणापासून या गोष्टी मोठ्या प्रमाणात हाताळायला दिल्या, तर मेंदूतले पॅटर्न्स बदलू शकतात. म्हणूनच त्यांच्या हातात गेम खेळण्यासाठी सारखा स्मार्ट फोन नको. यापुढच्या काळात मोबाईलसारखी गॅजेट्‌स महत्त्वाची आहेत असं मानून ती हाताळण्याचं योग्य प्रशिक्षण मात्र मिळायला हवं. पूर्वी 'विज्ञान शाप की वरदान' असा एक निबंध मुलांना लिहायला असायचा. 'विज्ञान कुणाच्या हातात आहे त्यावरून ते शाप ठरणार की वरदान ठरणार हे अवलंबून असतं' हे जसं त्या प्रश्‍नाचं उत्तर, त्याप्रमाणं स्मार्ट फोन कुणाच्या हातात आहे आणि त्याचा कशा प्रकारे आणि किती वेळासाठी वापर होतो आहे यावरूनच तो शाप की वरदान ठरणार आहे. 

त्याचा योग्य वापर शिकवला जातो आहे ना, याची पालककट्ट्यावर चर्चा व्हायला हवी. आपण त्यात वाहवत जातोय का, हेही बघायला हवं...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com