माध्यमभान...आपलं, मुलांचं!

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

त्या दिवशी शाळेच्या गेटबाहेर काही पालक मुलांची वाट पाहत थांबले होते. कोणतेही चार पालक, विशेषत: आया, एकत्र आल्या की अपरिहार्यपणे मुलांवर चर्चा घसरते, तशीच ती घसरली. एक म्हणाली ः ''आपल्या मुलांचं लहानपण किती स्ट्रेसफुल आहे ना आपल्यापेक्षा? मला कधीकधी फार दया येते त्यांची.'' दोषाची सुई अर्थातच वळली इंटरनेट आणि मोबाईलवर. सर्व समस्यांचं मूळ हेच आहे यावर सगळ्याचं एकमत झालं. रोग तर सापडला; पण त्यावर औषध काय? 

लिखित आणि दृश्‍य माध्यमांचं आजच्या जमान्यातलं महत्त्व वादातीत आहे. वर्तमानपत्रं, पुस्तकं, मासिकं अशांपासून ते रेडिओ, टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल फोन अशा तंत्रज्ञानापर्यंत सगळ्याचा यात समावेश होतो. 

असून अडचण नसून खोळंबा! 
एकीकडं माध्यमांच्याशिवाय आपलं पान हलत नाही, तर दुसरीकडे त्यांच्यापासून सुटका हवी असंही वाटतं. आपण त्यांच्या फार कह्यात चाललो आहोत अशी चुटपूट लागून राहते. विशेषत: त्यात दाखवली जाणारी आत्यंतिक हिंसा, ढळढळीत लिंगभेद, मुलांच्या वयाला न शोभणाऱ्या लैंगिक अभिव्यक्ती, सायबर गुन्हे, इंटरनेट वापरून होणारे अत्याचार, दादागिरी, गुंडगिरी या गोष्टी आपल्याला नकोशा वाटतात. आपल्या मुलांना या सर्व बाबींपासून वाचवावं, सुरक्षित ठेवावं असं आपल्याला वाटतं. नको त्या गोष्टी मुलांपर्यंत पोचू नयेत म्हणून काही उपाय आपण करतोही; पण बहुधा मुलं याबाबतीत आपल्याही पुढं गेलेली असतात. शिवाय यातले बरेचसे उपाय मोबाईल वापराच्या बाबतीत निरुपयोगी ठरतात आणि माध्यमं इतकी सर्वव्यापी आहेत, की त्यांना बायपास करणंही शक्‍य नाही. म्हणूनच, त्यांना स्वीकारायला हवं, त्यांची भाषा शिकून साक्षर व्हायला हवं आणि त्यासाठी आपण काय वाचतो किंवा पाहतो किंवा ऐकतो ते डोळसपणे समजून घ्यायला हवं. 'एखाद्या कार्यक्रमाची निर्मिती कुणी केलीय? कुणासाठी केलीय? त्यासाठी कुठली भाषा वापरलीय? त्यामागं निर्मात्यांचा हेतू काय?' यासारखे प्रश्न विचारायला हवेत. हे सगळं करणं म्हणजे माध्यमसाक्षरता. ती शिकवण्याचा हेतू हा, की यातल्या बऱ्या-वाईट गोष्टी ओळखण्याचं आणि त्या सजगपणे हाताळण्याचं मूलभूत ज्ञान मुलांना देणं, त्याबाबतच्या सवयी आणि पद्धतींचे योग्य पर्याय वापरायला शिकवणं. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल; पण माध्यमसाक्षरतेमुळं व्यसनं, मुलांमधला लठ्ठपणा, हिंसा, लिंगभेद, शरीरप्रतिमा, नैराश्‍य अशा विविध आघाड्यांवर फायदे दिसून आलेत. 

जन्मापासून आपल्याला आजूबाजूच्या वातावरणातून अनेक प्रकारचे संदेश मिळत असतात. त्यातून आपण शिकत जातो; पण प्रत्येक वयात, मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करून ती आत्मसात करण्याची मेंदूची क्षमता वेगळी असते. अपरिपक्व मेंदूवर नको ती माहिती आदळत राहिली, तर त्याचे दुष्परिणाम होतात, त्याला वास्तव आणि काल्पनिक जग यातला फरक समजत नाही. काही दशकांपूर्वी आलेली 'शक्तिमान' ही मालिका आठवतेय? ती पाहिल्यावर कित्येक मुलांनी उंचावरून उड्या मारल्या होत्या, स्वत:ला शक्तिमान समजून! 

घरच्या दिवाणखान्यात मालिका, जाहिराती, स्पर्धा, सनसनाटी बातम्या अशी कार्यक्रमांची भेळ चालू असते. आजीआजोबा, आई बाबा, शाळेत जाणारी- न जाणारी मुलं असं सगळेच ती पाहतात. यातला प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार या माहितीचा अर्थ काढत असतो. कुठलाही करमणुकीचा कार्यक्रम बनवताना तो जास्तीत जास्त मसालेदार, नाट्यपूर्ण कसा होईल हे पाहतात. साहजिकच आहे, आपण प्रत्यक्षात जगत असलेलंच जिणं त्यात दाखवलं, तर कुणी ते बघेल तरी का? त्यामुळे त्यातली नाती, भावना, हिंसा आणि प्रतिक्रिया, सगळंच अतितीव्र दाखवलेलं असतं. चित्रपट, कार्टून्स, व्हिडिओ गेम्समधे भरपूर मारामारी असते. सततचा हिंसाचार पाहून नजर मरते, मन बोथट होतं. उलटा परिणाम व्हायला लागतो. हिंसा म्हणजेच शूरपणा असं वाटायला लागतं. ती आकर्षक वाटू लागते, न्याय्य वाटू लागते. अशीच टोकाची अतिरंजितता अश्‍लील व्हिडिओजमध्ये, पोर्नोग्राफीमधेही दिसते. अनेकदा हायस्कूलमध्ये जायला लागेपर्यंत जवळजवळ सगळ्या मुलांनी कळत किंवा नकळतपणे या क्‍लिप्स पाहिलेल्या असतात. (एका किशोरवयीन मुलीनं सांगितलेलं आठवतंय, की शाळेच्या कॉम्प्युटर लॅबमध्ये शिक्षकांची नजर चुकवून सगळ्या वर्गानं अशी एक व्हिडिओ फिल्म पहिली होती.) या बीभत्स कार्यक्रमांमध्ये दाखवलेल्या क्रिया आणि शरीरं अत्यंत अनैसर्गिक आणि अविश्वसनीय असतात. त्यामुळे लैंगिक संबंधांविषयी, जोडीदाराविषयी मुलांच्या मनात अवाजवी कल्पना तर तयार होतातच, शिवाय स्वत:चं शरीरही उगीचच बेढब आणि कुरूप वाटू लागतं. 

लैंगिकता आणि हिंसाचाराचा हा अतिरेक फक्त दृश्‍य माध्यमांमध्येच नव्हे, तर लिखित माध्यमांत, म्हणजे वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं यांच्यामध्येही दिसून येतो. घटना तीच; पण वेगवेगळ्या वर्तमानपत्रांत त्या बातमीची जागा, लांबी-रुंदी, त्यातले शब्द आणि फोटो मात्र वेगळे असंही दिसतं! म्हणजे एकाच घटनेची किती वेगवेगळी रूपं! 

चिकित्सक विचार 
आपण काय खावं-प्यावं, काय ल्यावं, प्रेम कसं करावं, सण कसे साजरे करावेत हे सगळं आज माध्यमं शिकवतात. याशिवाय अनेक व्याख्याही त्यांच्यावरूनच ठरतात. उदाहरणार्थ, चांगली आई, सुंदर स्त्री, खरा पुरुष, सुखी माणूस वगैरे. प्रत्येक बातमी, जाहिरात, चित्रपट काढण्यामागे कुणाचा ना कुणाचा काहीतरी हेतू असतो, कधी छुपा तर कधी उघड-उघड. जाहिरातींचा मुख्य उद्देश असतो अतिशय बिनमहत्त्वाच्या गोष्टी आकर्षकपणे मांडून पाहणाऱ्याला त्या घ्याव्याशा वाटायला लावणं, त्यांच्या उत्पादनांची विक्री करणं. उदाहरणार्थ, फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीत त्वचेच्या उजळपणावर भर दिलेला असतो. प्रत्यक्षात त्वचेचं काम असतं अंतर्गत अवयवांचं रक्षण आणि तापमान-नियंत्रण. रंगामुळे त्यात काही फरक पडत नाही. अशा गोष्टी मुलांच्या लक्षात आणून दिल्या, तर ती उगीचच्या उगीच हुरळून न जाता चिकित्सकपणे जाहिराती पाहू शकतात. 

अनेक कार्यक्रमांतून 'काय करावं' हे शिकता येत नसेल; पण 'काय करू नये' हे मात्र नक्की शिकता येतं. मुलांच्याबरोबर एकत्र बसून हे कार्यक्रम पहिले आणि त्यावर गप्पा मारल्या तर मुलं दोन्ही बाजूंचा सारासार विचार करायला शिकतात. उदाहरणार्थ, अती आनंद झाला, की शॅम्पेनची बाटली उघडायची, दु:ख झालं की सिगारेट शिलगवायची, पार्टी म्हणजे मद्य पीत धुंद होणारी माणसं अशा सेलिब्रेशनच्या ठराविक प्रतिमा माध्यमांत दिसतात. आनंद व्यक्त करण्याचा आणि ताणावर ताबा ठेवण्याचा 'नशा' हा रामबाण उपाय आहे असंच वाटणार की मुलांना यावरून!

कधी समोर पडद्यावर खूप मारामारी चालू असते किंवा कुणी कायदा हातात घेत असतो किंवा कुणी कुणाला छेडत असतं. अशा वेळी मुलांबरोबर चर्चा करता येते. 'ती करतेय ते बरोबर वाटतंय का रे? दुसरं काय बरं करता आलं असतं?', 'तो मुलगा तिच्या मागे लागलाय, एखाद्या मुलीला ते आवडेल की राग येईल?', 'नशा न करता आनंद कसा व्यक्त करता येईल?', 'आपण जेव्हा आपले हक्क बजावतो तेव्हा आपली जबाबदारी आणि दुसऱ्यांचे हक्क, दोन्ही लक्षात ठेवायचे म्हणजे जरा अवघडच आहे ना,' अशा चर्चा नक्कीच करता येतील. कधीतरी टीव्ही बघत असताना अचानक निरोधची किंवा सॅनिटरी नॅपकिन्सची जाहिरात लागते. आपण अर्थातच कानकोंडे होतो; पण हे क्षण या अवघड विषयांवरची चर्चा सुरू करायला सत्कारणी लावता येतात. फक्त, आपणच पटकन चूक-बरोबर अशी लेबलं लावून मोकळं होण्यापेक्षा मुलांना विचार करू द्यायला हवा. एवीतेवी आपली ही मतं मुलं एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडूनच देणार असतात. त्यापेक्षा त्यांना स्वत:ची मतं बनवायला मदत करता येईल का आपल्याला? 

वेळ-काळ 
डोळ्यांसमोर खूप वेळ चमकदार स्क्रीन असला, की मेंदूमधली विविध केंद्रं गोंधळून जातात. संप्रेरकं, निद्रा-जागेपणाचं चक्र, एकाग्रता, स्मरणशक्ती, अशा सगळ्या कार्यांवर त्याचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे वापराचे काही नियम तयार करून ते मुलांपर्यंत पोचवले पाहिजेत. तेही कॉम्प्युटर, मोबाईलसारखं कुठलंही इलेक्‍ट्रॉनिक माध्यम मुलांच्या हाती देण्याआधी! त्यामध्ये 'टेक्‍नॉलॉजी फ्री' वेळा (जेवताना, बाहेर फिरायला गेलं असताना, झोपण्याआधी काही वेळ वगैरे), आणि 'टेक्‍नॉलॉजी फ्री' जागा (जेवणाचं टेबल, झोपायची खोली इत्यादी) अशा गोष्टींचा समावेश असेल. आणि हो, केलेले नियम काही अपवादात्मक परिस्थिती वगळता सगळ्या कुटुंबासाठी बंधनकारक असतील! त्याचबरोबर टेक्‍नॉलॉजीला वाचन, बैठे किंवा मैदानी खेळ, छंद, गप्पा असे पर्याय द्यायला हवेत. मग या वापराला आपोआपच आळा बसतो, हे सिद्ध झालंय. माध्यमसाक्षरतेविषयी बोलताना सायबर सुरक्षा, समाजमाध्यमं अशाही काही क्षेत्रांविषयी आपल्याला बोलायला हवंय; पण ते पुन्हा केव्हातरी. 

मला वाटतं सगळ्यांना हे मान्य होईल, की या विचारपद्धतीची गरज मोठ्यांनाही आहे. माध्यमांमधून मिळणाऱ्या संकेतांकडे आपण स्वत: किती सजगपणे पाहतो? किती संवेदनाशीलतेनं याबाबत चर्चा करतो? ती वापरताना आपला आपल्यावर किती ताबा असतो? नाही ना? म्हणजे आपल्यालाही माध्यमसाक्षरतेचं गमभन शिकायला हवंच की! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com