मातीचं सोनं करणारी माणसं

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि अतोनात मेहनत करत जालना जिल्ह्यातले काही शेतकरी शेतीचं नंदनवन करू पाहत आहेत. ही किमया घडत आहे दुष्काळग्रस्त मराठवाड्यात. या जिल्ह्यातल्या जिरडगावच्या जिगरबाज शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीनं गटशेतीला आकार दिला असून, पाणीटंचाईवर मात करून शेती फुलवता येते, याचं कृतिशील दर्शन त्यांनी घडवलं आहे. त्यांचा हा प्रयोग परिसरातल्या इतरही शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहे. 

ही गोष्ट आहे 1986 ची. मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यात गटशेतीची कल्पना पुढं आली. सरकारी नोकरीत अर्थातच कृषी खात्यात महत्त्वाच्या पदांवर काम केलेल्या डॉ. भगवानराव कापसे यांनी गटशेतीची मुहूर्तमेढ रोवली. सुरवातीला त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जिवाचं रान आणि रक्ताचं पाणी केलं तरी शेती फायद्याची होत नाही, असा सगळ्यांचाच अनुभव. हा अनुभव असताना गटशेतीतून काय होणार, हा नकारात्मक प्रश्‍न हेच होतं मोठं आव्हान. पाहता पाहता तीन-चार वर्षं उलटली. गटशेतीचा नांगर आहे तिथंच रुतून बसला. पुढं 2000 मध्ये एक आशा निर्माण झाली.

जालना जिल्ह्यातल्या जिरडगावच्या जिगरबाज शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीनं गटशेतीला आकार दिला. ऊस, कापूस, मका, गहू या वर्तुळातल्या शेतीचा परीघ बदलण्याचं काम या शेतकऱ्यांनी केलं. जिरडगावच्या शेतकऱ्यांनी साडेचारशे एकर केसर आंब्याची आणि साडेसहाशे एकर मोसंबीची लागवड करून सगळ्यांनाच चकित केलं आणि भुरळ पाडली. पुढं पावसाच्या दगाफटक्‍यानं अर्ध्याहून अधिक बागा जळून गेल्या. या प्रयोगातून जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद, बदनापूर, भोकरदन तालुक्‍यातल्या शेतकऱ्यांना नव्या प्रयोगांचं बळ मिळालं. बागा वाळल्या तरी शेतकरी हतबल झाले नाहीत. उलट हातात हात घेऊन गटशेती केली तर फायदा होतो, हा मंत्र जिरडगावनं या परिसराला दिला. जिरडगावच्याच वाटेनं अकोलादेव इथलेही शेतकरी गेले. अकोलादेव आणि तपोवनच्या शेतकऱ्यांनी अडीचशे एकरांवर मोसंबीच्या बागा फुलवल्या. गटशेतीच्या संस्कारातून जातीपातीच्या भिंती पडू लागल्या. "शेतकरी हीच आपली जात' या भावनेनं लोक एकत्र येऊ लागले. बांधाला बांध असूनही भांडणांचा, वादांचा इतिहास अनेक गावांना असतो; मात्र गटशेती करणाऱ्या जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हा इतिहास मान्य नाही. खांद्याला खांदा लावून, विचारविनिमयानं आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करून शेती करण्याचा विडाच या शेतकऱ्यांनी उचलला. पाहता पाहता गटशेतीत आजूबाजूची गावं सहभागी होऊ लागली.

गटशेती म्हणजे काय, असा प्रश्‍न पडलेल्यांना उत्तर दिसू लागलं ते त्यांच्याच शिवारात. आपल्या शेतात जे पिकतं, तेच पीक गटशेती करणाऱ्यांच्या शेतात पिकतं. फक्त ते दुपटीनं किंवा अडीच पटींनी पिकतं, हे प्रत्यक्ष दिसू लागले. अल्पभूधारक शेतकरी आणि मोठे शेतकरी हा भेद बाजूला पडला. जितकी आहे तितकीच शेती करायची; पण दमदारपणे, हा बाणा गटशेतीतल्या शेतकऱ्यांमध्ये भिनला. एकीकडं दुष्काळ, नापिकीमुळं आत्महत्या करणारा हाच प्रदेश दुसरीकडं नवं काही करू पाहतोय, नवं काही देऊ पाहतोय, हे चित्र प्रेरणादायी आणि दिशादर्शक आहे. आता तर "गटशेती हीच कृषिसंस्कृती आहे,' अशी या परिसरातल्या शेतकऱ्यांची धारणा बनली आहे. 

गटशेतीतल्या शेतकऱ्यांचे हे प्रयोग वाखाणण्यासारखे आहेत. सगळ्यांनीच प्रयोग केलेत. एकच प्रयोग सगळ्यांनी करण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून वेगवेगळ्या पिकांचं क्षेत्र निवडण्याची खुबी या परिसरात दिसते. कापसाचं सहा-सात क्विंटल एकरी उत्पादन असलेल्या या भागात शेतकऱ्यांनी एकरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन केलं. सहा-सात क्विंटल तूर पिकवणाऱ्यांनी 18 क्विंटलपर्यंत मजल मारली. गहू, सोयाबीन या पिकांचं उत्पादनही अडीच पट वाढलं. पारंपरिक पिकांसोबत फळबागांमध्येही शेतकऱ्यांनी जणू काही क्रांतीच केली. मोसंबीचं उत्पादन तीन ते साडेतीन पटींनी वाढवून एक आदर्श घालून देण्यात आला. डाळिंबाचं उत्पादनही अडीच पट वाढलं. मागच्या हंगामापासून या परिसरातले शेतकरी द्राक्षबागांकडं वळू लागले आहेत. मराठवाड्यात द्राक्षबागांना पोषक वातावरण नाही, असा समज असलेल्यांना त्यांनी "गैरसमज करून घेऊ नका,' असा संदेश प्रत्यक्ष कामातून दिला.

शेतकरी आता द्राक्षबागांमध्ये "सुपर सोनाका' वाणाचं पीक घेण्याकडं वळत आहेत. तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि अतोनात मेहनत करत जालना जिल्ह्यातला हा परिसर शेतीचं नंदनवन करू पाहतोय. पाणीटंचाईवर मात करून शेती फुलवता येते, ही जिद्द इथल्या शेतकऱ्यांमध्ये दिसते. आठ एकरांमध्ये 200 क्विंटल कापूस उत्पादित करणारे देळेगव्हाणचे भगवानराव कापसे असोत की एकरी तब्बल 225 क्विंटल ओली हळद करणारे दरेकर. आल्याचं एका एकरात 180 क्विंटल उत्पादन घेणारे खामखेडा इथले सोमनाथ नागवे हे असंच एक कर्तबगार नाव. गावातल्या गटातटांतून बाहेर पडून गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकजूट राखली. हाताची पाच बोटं एकत्र येऊनच मूठ बनते, हा साधा नियम त्यांनी नेमका हेरला. एकादशीला उपवास करून गटशेती करणारे शेतकरी एकत्र द्वादशी साजरी करतात. आपापल्या घरून आणलेल्या शेतीमालाचा, दुधाचा वापर करून भोजन तयार होतं. पंगत देणं इतकाच हेतू नसतो. मागच्या महिनाभरातले अनुभव एकमेकांना सांगणं, पुढच्या महिन्याचं नियोजन करणं आणि सतत नवनव्या गोष्टी शिकत राहणं हा द्वादशीचा बेत असतो. शिवाराशिवारात शेतकऱ्यांची एकजूट करणारी ही द्वादशी म्हणजे विठ्ठलाचीच पूजा, असं हे शेतकरी मानतात. द्राक्षाची आणि आंब्याची निर्यात करण्याची तयारी या शेतकऱ्यांनी केली आहे. शास्त्रीय माहिती आणि प्रयोगांविषयी फार काही लिहिणं म्हणजे कागदावर योजना आखल्यासारखंच असतं. हे सगळं समजून घ्यायचं असेल तर त्या मातीत जाऊनच समजून घ्यावं लागेल...अनेक यशोकथा आहेत. अनेक नावं आहेत. मातीत राबून मातीचं सोनं करणाऱ्या या माणसांना सलाम ठोकलाच पाहिजे. 

गटशेतीचे प्रणेते! 
डॉ. भगवानराव कापसे हे गटशेतीचे प्रणेते आहेत. त्यांच्या पुढाकारातून सुरवातीला एका गावात सुरू झालेले हे प्रयोग पुढं 18 गावांत पोचले. सुमारे बाराशे शेतकरी आधुनिक पद्धतीनं शेती करू लागले. दीड हजार एकरावर कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी मराठवाड्यातल्या या दुष्काळग्रस्त परिसरात धवलक्रांती केली. सव्वाशे एकरांवरच्या डाळिंबाच्या बागा आणि कांदा, नेटशेडमधले भाजीपाल्याचे प्रकल्प पाहून पाहणाऱ्याचं मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com