दिवसभर घराबाहेर! (श्रीनिवास गडकरी)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

मनोहर यांनी अगदी सावकाशपणे प्रदर्शन पाहिलं आणि ते हॉलच्या बाहेर पडले. घड्याळाचा काटा आता साडेआठच्या पुढं सरकला होता. रात्र गडद झाली होती. दिवसभर नुसतं इकडून तिकडं आणि तिकडून इकडं भटकून मनोहर यांना प्रचंड शीण आला होता. त्यांचं विचारचक्र सुरू झालं ः आज रविवार...म्हणजे मौजमजेसाठी संध्याकाळी फिरायला गेलेला मुलगा, सून, नातवंडं अजून घरी परतलेली नसावीत...आणि समजा परतलीही असली तरी बारा-साडेबारापर्यंत त्यांची झोपाझोपही होणार नाही. आपण इतक्‍यातच घरी गेलो तर आपल्याला तरी लगेचच कुठला आराम मिळायला? 

मनोहर घाईघाईनं कार्यक्रमस्थळी पोचले तेव्हा सव्वादहा वाजून गेले होते. कार्यक्रम दहाचा होता. त्यामुळं उशीर झाला की काय असाच प्रश्‍न सुरवातीला त्यांना पडला; पण हॉलच्या आत गेल्यावर तो दूर झाला. कार्यक्रमाचे संयोजक, परीक्षक आणि तुरळक स्पर्धक यांच्याशिवाय तिथं अद्याप कुणीच पोचलेलं नव्हतं. खुर्च्या मांडणं, माईकची व्यवस्था करणं असंच सगळं सुरू होतं. मनोहर यांनी भिंतीजवळची मागच्या रांगेतली जागा पकडली. कुणी आपल्या ओळखीचं दिसतंय का हे ते पाहू लागले. 

आज शहरातल्या एका साहित्यविषयक संस्थेतर्फे खुली काव्यवाचन स्पर्धा इथं आयोजिण्यात आली होती. मनोहर यांनी दोन-तीन दिवसांपूर्वीच्या वृत्तपत्रात ते वाचून इथं येण्याचं तेव्हाच ठरवलं होतं. तसे ते जातातच नेहमी अशा कार्यक्रमांना. सुटीच्या दिवशी तर नक्कीच! हळूहळू माणसं जमा होऊ लागली. बहुतेक सगळे स्पर्धकच होते. सगळ्या वयोगटातले. तरुण मुली व प्रौढ स्त्रियाही होत्या. काही चेहरे ओळखीचे दिसत होते. अशा प्रकारच्या एक-दोन कार्यक्रमांत मनोहर यांनी या सगळ्यांना यापूर्वी पाहिलेलंही होतं. मात्र, मनोहर यांना स्वतःच्या वयाचा आणि त्यांच्याशी बोलायला उत्सुक असणारा कुणी हवा होता. तेवढ्यात सावर्डे त्यांना दिसले. ''नमस्कार'' मनोहर त्यांच्या जवळ जात म्हणाले. मात्र, सावर्डे यांनी फारशी उत्सुकता दाखवली नाही. तरुणांनाही लाजवतील असे झकपक कपडे घालून आज सावर्डे आले होते. पायात उंची बूट, नव्या फॅशनप्रमाणे कापलेले केस, ते काळे केलेले. मात्र, त्यामुळं ते आणखी तरुण वाटण्याऐवजी ओंगळवाणेच वाटत होते! इथं आलेले जवळपास सगळेच जण वय लपवण्याचा प्रयत्न करणारे दिसत होते. 

एक-दोन कार्यक्रमांत यापूर्वी भेट झाल्यानं मनोहर आणि सावर्डे यांची तोंडओळख होती; पण सावर्डे यांचा निरुत्साह पाहून मनोहर यांनी त्यांचा नाद सोडला व ते आपल्या जागेवर येऊन बसले. आता हॉल हळूहळू भरू लागला होता. दूरदूरचे कवी आपली प्रतिभा दाखवायला जमा झाले होते! सूत्रसंचालकानं माइक ताब्यात घेऊन निवेदनाला सुरवात केली होती. मनोहर जांभया देत जागेवर बसून होते. शेवटी दहा वाजताचा कार्यक्रम सव्वाअकराच्या पुढं सुरू झाला. सुरवातीचे हार-तुरे, प्रस्तावना सुरू झाल्यावर एकेकाला मंचावर कविता वाचण्यासाठी बोलावलं जात होतं...'कवितेविषयीची प्रस्तावना करू नका...कविता छोटीच असू द्या...ती गाऊन सादर करू नका...' अशा सूचना पुनःपुन्हा मिळूनही उत्साही कविमंडळी त्या धाब्यावर बसवत होती. यथातथा कवितांनाही 'व्वा-व्वा' अशी दाद ओरडून ओरडून दिली जात होती. शिवाय, आपापली कविता वाचून झाल्यावर कवी व त्यांचं मित्रमंडळ उठून जात होतं. थोडक्‍यात, हॉलमध्ये गोंधळाचं वातावरण तयार झालं होतं. 

मनोहर जागेवरच बसून होते. तशा त्या गोंधळाच्या वातावरणातही ते आपला जीव गुंतवायचा प्रयत्न करत होते. आता साडेबाराच्या पुढं काटा सरकत होता. अजून बरेच कवी व्हायचे होते. पुढं निमंत्रितांचं कविसंमेलन. बराच वेळ बाकी होता. मनोहर यांना आता पोटातल्या भुकेची आठवण झाली. सकाळी निघताना त्यांनी केवळ चहा घेतला होता. आज रविवार असल्यानं घरात कुणाची नीट उठाऊठही सकाळी झाली नव्हती. मात्र, इथं येताना मनोहर यांनी कोपऱ्यावरच्या टपरीवरून वडापाव बॅगेत आणलेला होता. त्यांनी तो बॅगेतून काढला व फारसं कुणाच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारे तो खाऊन टाकला व ते बाटलीतलं पाणी प्यायले. आता त्यांना खूप बरं वाटलं. मंचावर कवितांचा रतीब सुरूच होता. मनोहर यांनी शेजारच्या भिंतीवर डोकं टेकलं व काही वेळातच ते घोरूही लागले. त्यांच्या घोरण्याचा आवाज आसपासच्या काही लोकांपर्यंत लगेच पोचला. खसखस पिकली. मग एकानं त्यांना ढोसून जागं केलं. 

काय झालं ते मनोहर यांच्या लगेच लक्षात आलं. ते ओशाळून हॉलबाहेर आले. वॉशरूममध्ये जाऊन तोंड धुऊन ते बाहेर आले. एक चहा घेतला. अजून काही कवी शिल्लक होतेच; पण निमंत्रितांच्या कविसंमेलनाची वाट लागलेली दिसत होती. कारण, आता संयोजकांनी फोन केल्यावर 'आपल्याला काही कारणामुळं येता येणं शक्‍य नाही,' असं नामवंत कवींनी कळवलं होतं. आता इथं थांबण्याचा मनोहर यांनाही कंटाळा आला होता. 
*** 

आता काय करावं बरं, असा विचार करताना आज सकाळीच वृत्तपत्रात एका चर्चासत्राविषयी वाचल्याचं त्यांना आठवलं. हुंडाविरोधी चळवळीविषयीचं ते चर्चासत्र दुपारी एके ठिकाणी होतं. कार्यक्रमस्थळ काहीसं लांब होतं; पण काय हरकत आहे जायला, असा विचार करून मनोहर तिकडं जाणाऱ्या बसच्या रांगेत उभे राहिले. कडक उन्हापासून बचावासाठी त्यांनी डोक्‍यावर रुमाल घेतला. 

कार्यक्रमस्थळी पोचेपर्यंत चर्चासत्र सुरू झालं होतं. चळवळीतली एक महिला बोलत होती. हुंडाप्रथा किती चुकीची, अमानवी व बेकायदा आहे हे सांगून झाल्यावर 'कुठं अशी लग्नं हुंडा घेऊन करताना आम्हाला दिसून आली तर ती आम्ही उधळून लावू,' असं तिनं सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यासंबंधीच्या कायद्याची माहिती एका वकील-स्त्रीनं दिली आणि कुणी हुंडा घेतल्यास शिक्षेची कोणती तरतूद आहे, याची माहिती तिनं दिली. हुंडाप्रथा कशी चुकीची आहे, हे उपस्थित सगळ्यांनाच कळून आलं होतं. भाषणं सुरूच होती. 

मनोहर हे सगळं मागच्या रांगेत बसून ऐकत होते. हुंडाप्रथेविरुद्ध अशा सभांमध्ये प्रकट होणारी मानसिकता प्रत्यक्षात समाजात का दिसत नाही, असा प्रश्‍न त्यांना बसल्या जागी पडला. शिवाय, आजकाल कायद्याच्या भीतीनं कुणी थेट हुंडा घेत नसलं तरीसुद्धा सोनं, लग्नखर्च, भेटवस्तू अशा प्रकारे 'छुपा हुंडा' घेणं मात्र सर्रास चालूच असतं, असंही त्यांच्या मनात आलं. 'आम्ही हुंडा घेणाऱ्यांशी लग्नच करणार नाही,' अशी प्रतिज्ञा करणाऱ्या आजच्या काळातल्या काही उच्चविद्याभूषित व भरभक्कम पगाराच्या मुलीही या छुप्या हुंड्यासमोर गुपचूप मान तुकवताना दिसतात...मनोहर यांचं विचारचक्र सुरूच होतं. मनात आलेलं हे सगळं या कार्यक्रमात मांडावं, असं मनोहर यांना खूप वाटत होतं. नियोजित वक्‍त्यांची भाषणं झाल्यावर 'कुणाला काही बोलायचंय का?' अशी विचारणाही संयोजकांकडून झाली. माइक हातात घ्यायची प्रबळ ऊर्मीही मनोहर यांच्या मनात दाटून आली; पण त्यांचं धाडस झालं नाही. कधी जाहीर सभेत चार शब्द बोललेच नव्हते ते आजवर. त्यांना तशी सवयच नव्हती. ओठात आलेले शब्द व विचार त्यांनी रोखूनच ठेवले. शेवटी स्थापन झालेल्या कृती समितीत तरी आपलं नाव असावं, असंही त्यांना एका क्षणी वाटलं; पण तसंही काही झालं नाही. कार्यक्रम संपला. *** 

आता संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. दिवस मोठा असल्यानं रस्त्यावर अद्याप करकरीत ऊन्ह होतं. आता काय करावं? मनोहर यांना प्रश्‍न पडला. भाची स्मिता इथं जवळच राहते. जावं का तिच्याकडं? दोन तास सहज आनंदात जातील...ती तशी चांगली आहे. नेहमी बोलावत असते आपल्याला. जावं का...? नको. मागच्या वेळी आपण तिच्याकडं गेलो होतो त्याला अजून महिनाही झालेला नाही. नको असं सारखं सारखं जायला. शिवाय, तिची दोन्ही तरुण मुलं आपल्याशी नीट बोलतही नाहीत. रविवार असल्यानं आज तिच्या नवऱ्यानंही पत्ते कुटायला मित्रांना घरी बोलावलेलं असेल...नकोच. मनोहर यांनी बॅगेतून आजचं वृत्तपत्र काढलं. दैनंदिनी पाहिली. उपनगरात एके ठिकाणी ओरिगामीचं प्रदर्शन भरलेलं होतं. जावं तिकडंच. शिवाय, तिथून आपलं घरही तसं जवळच आहे. प्रदर्शनात निवांत वेळ घालवल्यानंतर तसंच घरी जाता येईल. मनोहर यांनी रिक्षा केली. 

प्रदर्शनाला भरपूर गर्दी होती. रविवार संध्याकाळची सातची वेळ म्हणजे सगळ्यांनाच सोईची! प्रदर्शनही खूप चांगलं होतं. विविध ओरिगामी कलाकारांनी आपापल्या सुंदर व एकाहून एक सरस कलाकृती तिथं मांडलेल्या होत्या. एके ठिकाणी ओरिगामीचं प्रात्यक्षिकही सुरू होतं. एक जण ओरिगामीतून मुलांना भूमिती शिकवत होते. मुलं, मोठी माणसं त्यात रंगून गेली होती. मनोहर प्रदर्शन पाहत असताना अचानक एके ठिकाणी थबकले. साक्षात सावर्डे समोर उभे होते; पण आता त्यांचा सकाळचा झकपकपणा उरला नव्हता. तेही थकल्यासारखे आणि मलूल दिसत होते. आता त्यांनीच मनोहर यांच्याकडं पाहून हसण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनोहर यांनी विशेष रस दाखवला नाही. प्रदर्शनाच्या ठिकाणी पुस्तकविक्रीही सुरू होती. मनोहर तिकडं डोकावले; पण त्यांनी कुठलंच पुस्तक विकत घेतलं नाही. 

घड्याळाचा काटा आता साडेआठच्या पुढं सरकला होता. 

दिवसभर नुसतं इकडून तिकडं आणि तिकडून इकडं भटकून मनोहर यांना आता प्रचंड शीण आला होता. 

आज रविवार म्हणजे घराबाहेर फिरायला गेलेला मुलगा, सून, नातवंडं अजून परतही आलेली नसतील... आली तरी बारा-साडेबारापर्यंत त्यांची झोपाझोपही होणार नाही. तोपर्यंत आपल्याला काही आराम नाही. कदाचित ते सगळे बाहेरूनच जेवून येतील. आपण चोरट्यासारखं बसून राहायचं. स्वयंपाकाच्या ओट्यावर काढून ठेवलेलं गारढोण अन्न गिळून घ्यायचं. कधी कधी तर तेही नसतं. वर 'मला वाटलं, तुम्ही बाहेरूनच जेवून आलेले असणार' असं सून म्हणणार. घरी जाणं नकोसं वाटतं अगदी! 

मनोहर यांना आता सुमतीची तीव्रतेनं आठवण आली. तिला जाऊन तीन वर्षं झाली आता. तेव्हापासून आपली ही अशी परवड चाललीय. मन कुठंही रमत नाही. दिवसभर आपण हे असं इकडं-तिकडं फिरत राहतो. भटकत राहतो. एखाद्या कार्यक्रमाची आवड असो किंवा नसो, वेळ काढत राहतो...पण एकटेपणा काही आपला पाठलाग सोडत नाही. घरी-दारी कुठंही आपल्याला स्थान नाही. सुमती गेली; पण आपलं उरलेलं आयुष्यही ती बरोबर घेऊन गेली! कशी होणार आपली सुटका यातून? 

हा विचार मनात येताच ते शहारले. पाय ओढत चाललेली त्यांची चाल थांबली. 

एका अंधाऱ्या ठिकाणी रस्त्याच्या कडेच्या बाकावर ते टेकले आणि त्यांनी पुढच्या बाजूला शरीर झुकवलं...गात्रांतलं त्राण गळून गेल्यासारखं. ते तसेही शिणलेले होतेच. हातांची ओंजळ करून त्यांनी थकलेला चेहरा पुसला. ओंजळ चेहऱ्यावर तशीच ठेवून ते झुकलेल्या अवस्थेत विकल मनानं बसून राहिले...आणि डोळ्यांच्या कडा त्यांनी झरू दिल्या...ओंजळीतल्या ओंजळीत...किती तरी वेळ...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com