मेरी आवाजही पहचान है..! (सायली क्षीरसागर)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

स्मार्ट फोन वापरण्यासाठी फक्त कीबोर्डचीच गरज असते असं नाही. तुमच्या नुसत्या आवाजाचा वापर करून तुम्ही अनेक कामं करू शकता. त्यासाठी उपयोगी पडणाऱ्या अशाच काही ऍप्सची माहिती. 

कामाच्या व्यापात कधीकधी स्मार्ट फोन वापरायचा अगदी कंटाळा येतो; पण याच स्मार्ट फोननं आपल्यासाठी अनेक गोष्टी सुकर करून ठेवल्या आहेत, याची बऱ्याचदा आपल्यालाही जाणीव नसते. स्मार्ट फोनचा बारकाईनं वापर केल्यास कळतं, की एक मोठं उपयुक्त असं भांडार त्या एका स्मार्ट फोनमध्ये दडलेलं असतं. तंत्रज्ञानानं आपल्यासाठी काही गोष्टी अत्यंत सोयीच्या करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, व्हॉईस रेकग्निशन ऍप्स. 

फिंगरप्रिंट सेन्सर, फेस रेकग्निशन, व्हॉईस रेकग्निशन (आवाज ओळख) या सुविधांमुळं स्मार्ट फोनचा वापर अगदी सहज झाला आहे. कीबोर्डचा वापर न करतासुद्धा स्मार्ट फोन वापरता येऊ शकतो, याची कल्पना आपल्यापैकी अनेकांना नसेल. व्हॉईस रेकग्निशन ही अशी सुविधा आहे, ज्यात काहीही टाईप न करता तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता, तीदेखील आवाजाच्या माध्यमातून. हे तंत्रज्ञान स्मार्ट फोनपुरतं मर्यादित नसून, त्याचा वापर उद्योग, संरक्षण, आरोग्य, दूरसंचार अशा अनेक क्षेत्रांत होत आहे. आवाजाचं महत्त्व जाणून व तशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अशी ऍप्स बनवली गेली, जी सर्च इंजिनची कामं अधिक सुकर करतात. प्ले-स्टोअरवर ऑपरेटिंग सिस्टीमनुसार व्हॉईस रेकग्निशनची अनेक ऍप्स उपलब्ध आहेत. त्यापैकी काही ऍप्सची माहिती आपण बघू या. 

गूगल असिस्टंट (Google Assistant) : 
गूगल असिस्टंट हे गूगलनं विकसित केलेलं व्हॉईस रेकग्निशन ऍप आहे. यात स्मार्ट फोन समोर धरून आवाजाच्या माध्यमातून तुम्ही हवी ती माहिती विचारू शकता आणि तुम्हाला ही माहिती या ऍपकडून आवाजाच्याच माध्यमातून मिळू शकते. हे ऍप गूगलचं असल्यानं स्मार्ट फोनच्या युजर्समध्ये विशेष लोकप्रिय आहे. वापरायला अत्यंत सोपं असं हे ऍप प्ले-स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध आहे. 
प्लॅटफॉर्म : अँड्रॉइड, ब्लॅकबेरी, आयओएस 
ऍप साइझ : 757 केबी, ऍप रेटिंग : 4.2
 

सिरी (Siri) : 
आयफोन व ऍपल युजर्ससाठी 'सिरी' म्हणजे 'ऑल इन वन' फिचर! अगदी झोपेतून उठवण्यापासून ते कोणालाही कॉल लावण्यासाठी 'सिरी' सज्ज असते. कोणत्याही ठिकाणाची माहिती मिळवणं, तिकीट बुकिंग, टॅक्‍सी बुकिंग इत्यादी अनेक कामं 'सिरी'मार्फत आपल्या एका आवाजावर होऊ शकतात. एखाद्या कृत्रिम व्यक्तीसोबत बोलतोय, असं तंत्र ऍपलनं या ऍपमध्ये विकसित केलं आहे. हे फिचर आयफोनमध्ये इनबिल्ट आहे, यासाठी कोणत्याही इतर ऍपची गरज नाही. 
प्लॅटफॉर्म : आयओएस 

ऍमेझॉन ऍलेक्‍सा (Amazon Alexa) : 
ऍमेझॉन ऍलेक्‍सा हे ऍप ऍमेझॉन या प्रसिद्ध कंपनीनं विकसित केलं आहे. या व्हॉईस रेकग्निशन ऍपचं वैशिष्ट्य म्हणजे, या ऍपद्वारे तुम्ही इतर स्मार्ट डिव्हाइसही होम ऑटोमेशन सिस्टिमच्या साह्यानं नियंत्रित करू शकता. त्याशिवाय म्युझिक प्लेबॅक, अलार्म, ऑडिओ बुक, कामांची यादी, ट्रॅफिक आणि हवामानाच्या सद्यस्थितीची माहिती या ऍपद्वारे, हातांना आराम देऊन तुमच्या आवाजानं अगदी सहज मिळवू शकता. 
प्लॅटफॉर्म : अँड्रॉइड, आयओएस 
ऍप साईज : 45 एमबी, ऍप रेटिंग : 3.5
 

कॉर्टाना (Cortana) : 
कॉर्टाना हे व्हॉईस रेकग्निशन / स्पीच रेकग्निशन ऍप ही मायक्रोसॉफ्टची कंपनीची अनोखी निर्मिती आहे. मायक्रोसॉफ्टनं हे ऍप प्रामुख्यानं विंडोज युजर्ससाठी तयार केलं. टू-वे कम्युनिकेशनसाठी कॉर्टाना उत्तम ऍप आहे. यात तुम्ही कीबोर्ड न वापरता रिमांइंडर लावू शकता, कोणतीही माहिती मिळवू शकता. हे ऍप तुमचा नैसर्गिक आवाज ओळखू शकतं, त्याचप्रमाणं एखाद्या कृत्रिम सहायकाप्रमाणं तुमची मदत करू शकतं. 
प्लॅटफॉर्म : विंडोज, अँड्रॉइड, आयओएस 
ऍप साइझ : 38 एमबी, ऍप रेटिंग : 4.3
 

व्लिंगो (Vlingo) :
व्लिंगो हे व्हॉईस रेकग्निशन ऍप 'स्पीच टू टेक्‍स्ट' या धर्तीवर माइक फिलिप्स यानं तयार केलं. मुख्यत्वे कीबोर्डचा वापर न करता ऍपद्वारे एखाद्या ठिकाणाचा पत्ता शोधणं (नॅव्हिगेटर), विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं आवाजाच्या माध्यमातून देणं; तसंच त्यासाठी अनेक पर्याय सुचवणं इत्यादी कामं व्लिंगो म्हणजेच तुमचा कृत्रिम इंटेलिजंट पर्सनल असिस्टंट उत्तमरित्या करतो. 
प्लॅटफॉर्म : ब्लॅकबेरी, विंडोज्‌, अँड्रॉईड, आयओएस 
ऍप साइझ : 2.7 एमबी, ऍप रेटिंग : 4.5

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com