तिकिटांवरची तारीख नीट न पाहिल्यानं...! (मनीषा सावंत)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

ही गोष्ट आहे 2003 ची. माझे यजमान लष्करात असल्यानं दर तीन वर्षांनी बदली ठरलेलीच. तेव्हा आम्ही श्रीनगरमध्ये होतो. त्या वेळी रेल्वे जम्मूपर्यंतच होती. जम्मू ते श्रीनगर लष्करी बसनंच यावं-जावं लागे. ता. 20 सप्टेंबर 2003 ला एक महिन्याची सुट्टी यजमानांना मिळाली. श्रीनगरमध्ये आल्यापासूनची दीड वर्षानंतरची ही पहिलीच सुट्टी होती. मी तर आनंदात होतेच; पण आमची पाच वर्षांची मुलगी आणि अडीच वर्षांचा मुलगाही अतिशय खूश होता. काय काय घ्यायचं, त्याची यादी आम्ही लगेच तयार केली. काश्‍मीरच्या वस्तूंचं साहजिकच खूप आकर्षण होतं. तिथली कलाकुसर लाकडावर, कपड्यांवर खूप छान वाटते. प्रत्येक पत्रातून घरच्यांच्या काही ना काही "फर्माइशी' असायच्या म्हणून विचार केला, की आता गावी निघालोच आहोत तर सगळ्यांसाठी काही ना काही घेऊन जाऊ या. मग सुरू झाली खरेदी. बहिणीसाठी, नणंदांसाठी सुंदर कलाकुसर असलेले ड्रेस, स्वेटर, शाली असं बरंच काही. रोज आठवेल तसं आम्ही घेऊन येत होतो आणि बॅगा भरत होतो. 

मात्र, काही कारणांमुळं यजमानांची 20 सप्टेंबरची सुट्टी रद्द होऊन ती 19 ऑक्‍टोबरला मिळणार असल्याचं कळलं. मग यजमानांनी आधीचं आरक्षण रद्द करून 19 ऑक्‍टोबरसाठीचं आरक्षण केलं. त्यांनी घरी येऊन माझ्या हाती तिकिटं दिली आणि म्हणाले : ""आता बरोबर एका महिन्यानंतर आपण जायचं. एसीचं आरक्षण आहे म्हणजे बेड न्यायची काही गरज नाही. चला आणखी तयारीला लागा.'' 

आधीचं आरक्षण 20 सप्टेंबर होतं आणि त्यानंतर बरोबर एक महिना म्हणजे 20 ऑक्‍टोबरचं आरक्षण मिळालं आहे, असं समजून तिकिटांवर एक नजरही न टाकता मी तिकिटं कपाटात ठेवून दिली. 

खरेदीसाठी आणखी वेळ मिळाला! विसरलेल्या-न विसरलेल्याही वस्तूंची खरेदी झाली. बॅगा फुल्ल झाल्या. जम्मूमधून झेलम एक्‍स्प्रेस 20 ऑक्‍टोबरला रात्री साडेनऊ वाजता (हा समज), त्यानुसार आमचा कार्यक्रम ठरला. ता. 19 ला जम्मूमध्ये पोचून वैष्णोदेवीचं दर्शन घेऊ या आणि जेवण आटोपून 20 तारखेची रात्रीची रेल्वेगाडी पकडू या...वातानुकूलित डब्यात बसण्याच्या कल्पनेनंच मनाला आल्हाद वाटला...शिवाय अंथरूण-पांघरूण काही घ्यावं लागणार नव्हतं म्हणून भारही आणखी कमी झाला होता...पण त्याऐवजी खरेदी केलेल्या वस्तूंच्या बॅगा वाढल्या होत्या, ही गोष्ट वेगळी. 

ता. 19 ला श्रीनगरहून सकाळी सात वाजता निघालो. रात्री आठ वाजता जम्मूत पोचलो. तिथून लगेच वैष्णोदेवीचं दर्शन घेण्यासाठी निघालो. वैष्णोदेवीच्या पायथ्याशी पोचलो. खूप जोरात पाऊस सुरू होता. तिथं एक भंडारा नेहमीच सुरू असतो. आम्हालाही भूक लागली होतीच. आम्ही तिथं जेवलो. 

दरम्यान, पावसाचा जोर आणखीच वाढला. रात्रीची वेळ, लहान मुलांना घेऊन डोंगर कसे चढायचे? वेळही खूप कमी होता. दुसऱ्या दिवशी रेल्वेगाडीच्या वेळेपर्यंत पोचणं अशक्‍य वाटू लागलं म्हणून दर्शन न घेताच आम्ही जम्मूला परत आलो. लष्कराच्या आरामगृहात थांबलो. देवीचा डोंगर चढलो नाही, तरीही शरीर थकलं होतं. कधी झोप लागली ते कळलंच नाही. सकाळी जरा निवांतच उठलो. दुपारचे जेवण उरकून यजमान आराम करत होते. सहज त्यांच्या मनात आलं की तिकिटं पाहू या! 

तिकिटं पाहताच यजमानांनी डोक्‍यावर हातच मारला. काय झालं मलाही समजेना. 

मुलांनाही कळेना. मुलंही भीतीनं वडिलांकडं पाहू लागली. आज तारीख किती? 

- मी म्हटलं : ""20 ऑक्‍टोबर.'' ""अरे, आपलं तिकीट तर 19 ऑक्‍टोबरचं आहे. आपली रेल्वेगाडी तर रात्रीच निघाली. बहुतेक आता दिल्लीच्या पुढं गेली असेल,'' यजमान म्हणाले. 

मला क्षणभर काहीच समजेना. तिकीट बारकाईनं पाहिलं तेव्हा कुठं उलगडा झाला. आता काय करायचं? क्षणभर काहीच सुचेना. पुढं काय होणार याचा अंदाज बहुतेक यजमानांना असावा म्हणूनच त्यांनी गावी न जाता परत श्रीनगरला जाण्याचा निर्णय केला. मात्र, मला हे पटलं नाही. गावी जाण्याचा आनंद विरणार होता आणि घरची मंडळी आमची आतुरतेनं वाट पाहत होती. 

मग आठ वाजता आलो जम्मू स्टेशनवर. यजमानांनी जनरल डब्याचं तिकीट घेतलं खरं; पण 

त्यांच्याही मनात तणाव असणारच. मुलांबरोबर, बायकोबरोबर हा लांबचा प्रवास जनरल डब्यातून कसा करायचा? आणि भरीत भर म्हणून तिकिटंही हरवली. नवं संकट उभं राहिलं. शेवटी, विनातिकीट लष्करासाठीच्या डब्यातून प्रवास सुरू झाला. एकतर आमच्याकडं खरेदी केलेलं भरपूर सामान होतं. एसीचा डबा असणार म्हणून अंथरूण-पांघरूण काहीच घेतलेलं नव्हतं. घरच्यांसाठी शाली, स्वेटर विकत घेतलेले होते; पण ते काढणार कसे? डब्यात इतकी गर्दी की बॅग उघडणार कशी? 

मुलांसाठी थोडीशी जागा करून खाली वर्तमानपत्रं अंथरली. वरच्या बॅगेत टॉवेल होते तेच बाहेर काढून त्यांचीच पांघरुणं केली! आमची अडचण पाहिल्यानंतर लष्करातल्या जवानांनी आम्हाला खूप मदत केली. पाऊस, ताण-तणाव, दगदग या सगळ्याला सामोरं जावं लागल्यानं मुलगी तापानं फणफणत होती. आम्ही अगदीच अगतिक होतो. 

बेचाळीस तासांच्या त्या अतिबिकट आणि विनातिकीट प्रवासानंतर आम्ही कसेबसे पुणे स्टेशनवर पोचलो. मिरज स्टेशनचं तिकीट घेतलं. दुसऱ्या रेल्वेगाडीला अवकाश होता. स्टेशनजवळच्या औषधांच्या एका दुकानातून मुलीसाठी औषधं घेतली. खिडकीतून झाडं मागं जाताना दिसत होती...तशा त्या दोन दिवसांच्या कटू आठवणीही मागं सोडत आमची रेल्वेगाडी पुढं निघाली...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com