भ्रमंतीतली शिदोरी

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

'ईश्वर'लाल होता म्हणून...! 
ही 1984 च्या जूनमधली गोष्ट आहे. त्या वेळी मी प्रमोशन मिळून मी नुकताच कर्नल झालो होतो आणि आमची रेजिमेंट बिहार प्रांतातल्या कटिहारला होती. तीन वर्षांचा कालावधी संपल्यावर जम्मूतल्या एका रेजिमेंटचा अधिकारी म्हणून माझी बदली झाली होती. नवीन बदलीच्या ठिकाणी रुजू व्हायला अद्याप सहा दिवस असल्यामुळं आमचं सगळं सामान आम्ही आधीच जम्मूला पाठवून दिलं. माझा धाकटा भाऊही कर्नल होता व त्या वेळी तो अंबाल्याला राहत असे. आम्ही पती-पत्नींनं या मधल्या काळात त्याच्याकडं जायचं ठरवलं. चार-पाच तासांच्या या प्रवासात केवळ एक हॅंडबॅग आम्ही बरोबर घेतली. कटिहारहून आसाम मेलनं दिल्लीला पोचेपर्यत अंबाल्याला जाणारी झेलम एक्‍सप्रेस सुटलेली होती. आम्ही दोघं आणि आमचा सहाय्यक (ऑर्डर्ली) ईश्‍वरलाल धावत-पळत शेवटच्या डब्याच्या (हा अनारक्षित डबा दुसऱ्या वर्गाचा होता) शेवटच्या दरवाजातून कसेबसे आत चढलो. (अशा सुपरफास्ट रेल्वेगाडीला वेगळा गार्डचा डबा नसतो). पुढच्या स्टेशनला पहिल्या वर्गाच्या डब्यात जागा आहे का ते बघायचं आम्ही ठरवलं. त्यानुसार, पुढच्या स्टेशनवर तीन-चार डबे पुढे असलेल्या पहिल्या वर्गाच्या डब्यात जागा आहे, अशी माहिती ईश्‍वरलाल घेऊन आला व तिकडं बसायला जाण्याचा आग्रह त्यानं आम्हाला दोघांना केला. त्यानुसार आम्ही दोघं त्या डब्यात जाऊन बसलो आणि ईश्‍वरलाल आमच्या हॅंडबॅगसह पुन्हा त्या शेवटच्या अनारक्षित डब्यातच जाऊन बसला. दोन-तीन स्टेशनांनंतर, एका लहान स्टेशनावर - पुढचा सिग्नल न मिळाल्यामुळं - गाडी थांबली आणि थोड्या वेळानं एक जोराचा धक्का गाडीला बसला व मागोमाग प्रचंड आरडाओरडा ऐकू आला म्हणून मी खाली उतरलो. थोडा वेळ कुणालाच काही कळलं नाही; पण नंतर कळलं, की शेवटच्या ज्या डब्यात ईश्‍वरलाल बसला होता, त्या डब्याला मालगाडीचं इंजिन धडकल्यामुळं खूप मोठा अपघात झाला होता व अनेक जण जखमी होऊन काहीजण मृत्युमुखीही पडले होते. आम्हाला ईश्‍वरलालची काळजी वाटायला लागली. मी त्या डब्याजवळ जायचा प्रयत्न केला; पण त्या गर्दीत मला ईश्‍वरलाल कुठंच दिसला नाही. थोड्या वेळानं ईश्‍वरलालला शोधण्याचा पुन्हा प्रयत्न करावा म्हणून मी आमच्या डब्याजवळ आलो. तेवढ्यात ईश्‍वरलाल आमच्या पहिल्या वर्गाच्या डब्यात हॅंडबॅग घेऊन चढताना दिसला. त्याला बघून खूप हायसं वाटलं. त्याला विचारलं ः ''अरे, तू ज्या डब्यात बसला होतास त्या डब्याला अपघात झाला आहे, हे तुला कळलं का?'' 

त्यावर तो म्हणाला : ''साहब, मैं अभी सब देखकर आ रहा हूँ। बहुत बडी दुर्घटना घटी है। कई लोगों की जानें गई है और बहुत लोग जख्मी अवस्था में है। जिस सीटपर हमलोग बैठे थे ना वो सीट तो खून से लथपथ है । वो पूरा सीट तहसनहस हो गया है। उस सीटपर बैठा एक भी आदमी नही बचा। आज आप की इस हैंडबैग की वजह से मैं बालंबाल बच गया। जब ट्रेन सिग्नल पे रुकी तो मैंने सोचा की मेमसाब को ठंड लग रही होगी, क्‍यूँ न हैंडबैग में का स्वेटर उन को दे आऊँ? भगवाननेही मुझे ऐसा करनो को कहा...शायद।'' आपल्या साहेबांनी दुसऱ्या वर्गाच्या डब्यातून प्रवास करावा, हे ईश्वरलालच्या मनाला पटलं नाही व म्हणून त्यानं आमच्यासाठी पहिल्या वर्गातल्या डब्यात जागा शोधली. त्यानं तसं केलं नसतं तर शेवटच्या डब्यातल्या त्या दुर्घटनाग्रस्त आसनांवर आम्ही आधी बसलेले होतो व त्यामुळं आम्ही त्या अपघातातून नक्कीच वाचलो नसतो. केवळ ईश्‍वरलालच्या आग्रहाखातर आम्ही पहिल्या वर्गाच्या डब्यात बसलो आणि कदाचित नियतीनंच ईश्‍वरलालच्या रूपानं आम्हाला वाचवलं. त्यामुळं आज आम्ही जे जिवंत आहोत ते केवळ 'त्यानं' अजून बोलावलं नव्हतं म्हणूनच! 
- कर्नल (निवृत्त) अरविंद जोगळेकर पुणे. 

इंधनासाठी दाही दिशा... 
तीन वर्षांपूर्वी कानडी मुलखात विजापूर, बदामी या ठिकाणी जाण्याचं नियोजन केलं होतं. घरातले लहान-मोठे असे 14-15 सदस्य झाल्यानं दोन गाड्यांतून जायचं ठरलं. नियोजित कार्यक्रमानुसार, विजापूर इथला गोल घुमट, मुलुखमैदान तोफ, तसंच चालुक्‍य साम्राज्याची राजधानी असलेल्या बदामी इथली वेगवेगळी लेणी, किल्ले व बनशंकरी देवीचं दर्शन घेतलं आणि मुक्काम बदामी शहरात केला. 

दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरू झाला. एका गाडीत 90 किलोमीटर प्रवास होऊ शकेल इतकं डिझेल शिल्लक असल्याचं मीटरवर दिसत होतं. त्यामुळं बदामीतून बाहेर पडताना डिझेलची टाकी पुरेपूर भरून घ्यायची असं ठरवून बाहेर पडलो. रस्त्यावर असणाऱ्या एका पेट्रोलपंपावर गेलो, तर न समजणाऱ्या कानडी भाषेतल्या मजकुरानं व 'डिझेल नो स्टॉक' या इंग्लिश फलकानं आमचं स्वागत झालं. तिथून बाहेर पडून पुन्हा पुढच्या पंपाकडं मोर्चा वळवला; पण जागोजागी 'डिझेल नो स्टॉक' हाच फलक! परतीचा प्रवास 300-400 किलोमीटरचा असल्यानं आता आमची चिंता वाढू लागली. डिझेलच्या या शोधमोहिमेत 15 किलोमीटरचा प्रवास एव्हाना झाला होता व आता उर्वरित साठ्याच्या आधारे 75 किलोमीटरच प्रवास करणं शक्‍य होतं. पुढच्या गावी एका चौकात याबाबत चौकशी केली असता, 'बेळगावमधून डिझेलचा अपुरा पुरवठा होतो व त्यामुळं अशी वेळ येते,' ही माहिती कळली. मात्र, 'पुढच्या शहरात एका पंपावर डिझेल मिळत आहे, तिथं जा,' असंही सांगण्यात आलं. त्यानुसार आम्ही त्या पंपावर पोचलो. त्या ठिकाणी वाहनांची भली मोठी रांग होती. गाडी पंपाजवळ नेण्यासाठीसुद्धा जागा नव्हती. वाहनातून उतरून पंपमालकाला परिस्थितीची कल्पना दिली. त्यावर तो म्हणाला ः ''आम्ही पाच-10 लिटर डिझेल गरजेपुरतं देत आहोत. मात्र, तुम्हाला रांगेतूनच यावं लागेल. रांग मोडून डिझेल दिल्यास भडका उडेल.'' पाच-10 लिटरसाठी चार-पाच तास वेळ घालवणं शक्‍य नव्हतं. दरम्यान, गाडीत उरलेलं डिझेल व कापलं जाणारं अंतर यांची स्थिती 'मर्यादित षटकांत कमी चेंडूत जास्त धावा' अशी झाली होती. या सगळ्या प्रकारात 10 किलोमीटर गाडी जाणं शक्‍य होतं; त्यामुळं आता जास्त जोखीम घेता येणं शक्‍यच नव्हतं. सुदैवानं आमच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या वाहनाच्या टाकीत तुलनेनं जास्त डिझेल होतं. महाराष्ट्राची हद्द अद्याप 35 किलोमीटर दूर होती. 'महाराष्ट्रात डिझेलपुरवठा सुरळीत असतो व आम्हीसुद्धा शेजारच्या सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ शहरातून डिझेल आणत असतो,' अशी उपयुक्त माहिती एका स्थानिकानं दिली. लगेचच इंधन नसणारी गाडी व काहीजण यांना एका गजबजलेल्या चौकात थांबवून आम्ही अन्य काहीजणांनी 'म्हैसाळ'कडं कूच केलं. दुष्काळी भागात जसे टॅंकरमधून पाण्याचे कॅन भरून आणले जातात, त्याप्रमाणे कानडी लोक गाड्यांवरून डिझेल नेतानाचं दृश्‍य जागजागी दिसत होतं. शेवटी, महाराष्ट्राच्या हद्दीत म्हैसाळ शहरात आम्ही प्रवेशलो. प्रथम 20 लिटरचं कॅन खरेदी केलं. इथं कॅनचा मोठ्या प्रमाणात खप होतो, असं समजलं. 

पेट्रोपंपावर डिझेल-पेट्रोल मुबलक प्रमाणात दिलं जात होतं यावर - दिवसभर सतत नन्नाचा पाढा ऐकावा लागल्यानं - विश्‍वास बसत नव्हता. डिझेल व सोबत 20 लिटरचं कॅन भरून घेतलं. बाटलीतून अपवादानंच दिलं जाणारं पेट्रोल कॅनमधून सर्रास दिलं जात होतं. ज्या गाडीतून या पंपावर आलो होतो, त्या गाडीची टाकी डिझेलनं पूर्ण भरून घेतली व तिकडं चौकात उभ्या केलेल्या गाडीसाठीही सोबत डिझेल घेतलं व सुटकेचा निःश्‍वास टाकला. पुन्हा मूळ ठिकाणी परतलो. चालक व आम्ही डिझेलचं 20 लिटरचं कॅन घेऊन गाडीतून उतरत असताना जणू काही आम्ही एखादा विजयी करंडकच घेऊन आलो आहोत, अशीच आमची भावना झाली होती! आता दोन्ही वाहनांमध्ये पुरेसं इंधन असल्यानं निश्‍चिंत मनानं परतीच्या मार्गाला लागलो. आता कुठंही नव्या 'मुलुखगिरी'साठी जायचं असेल, तर आधीच्या या प्रवासात मिळालेली 'भ्रमंतीतली ही अनुभवाची शिदोरी' सोबत घेऊनच बाहेर पडतो. 
- जयंत पाणबुडे, सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) 

वाट चुकलेला जावई! 
माझा चुलतभाऊ दिलीप शहा यांचे व्याही सुभाष मेहता हे पुण्याचे. मूळ गाव वाफगाव. पुतणीच्या लग्नात त्यांची व माझी ओळख झाली. त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळं आमची मैत्री जमली. आम्ही सहलींना बरोबर जाऊ लागलो. अशाच एका सहलीत त्यांनी स्वतःबाबतचा मला सांगितलेला हा किस्सा. 

सुभाषभाई यांचं लग्न 1977 मध्ये झालं. त्यांची पत्नी पुण्याची. लग्न झाल्यावर दोनच महिन्यांत नवदाम्पत्याला पत्नीच्या मावशीचा फोन आला. 'तुम्ही आमच्याकडं अकोल्याला या,' असं निमंत्रण मावशीनं फोनवरून दिलं. तीन-चार दिवसांनी जाण्याचं ठरलं. शिवाजीनगर एसटी स्थानकावरून अकोल्यासाठीची गाडी दुपारी दोन वाजता सुटणार होती. पावणेदोन वाजता गाडी फलाटाला लागली. मेहता पती-पत्नी गाडीत बसले. सुभाषभाईंची पत्नी खूप दिवसांनी मावशीकडं निघाली होत्या. गाडी नगरमार्गे निघाली तसा त्यांच्या पत्नीला रस्ता काहीसा वेगळा वाटला. शंका आल्यानं त्यांनी कंडक्‍टरला विचारलं ः ''ही गाडी अकोल्यालाच चालली आहे ना?'' 

कंडक्‍टर म्हणाला ः ''होय. अकोल्यालाच चालली आहे. काही काळजी करू नका.'' गाडी रात्री अकोल्याला पोचली. सुभाषभाईंच्या पत्नीला गाव वेगळं वाटू लागलं. ओळखीचं वाटलं नाही. त्यांनी पुण्याहून निघताना ''आम्ही तुमच्याकडं यायला निघालो आहोत,'' असं फोनवरून मावशीला कळवलं होतं. त्यानुसार मावशी आणि इतर कुटुंबीय मेहता पती-पत्नीची संध्याकाळी वाट पाहत बसले होते. सुभाषभाईंनी अकोला गावातून मावशीला लोकल कॉल लावला. 

'कोण बोलतंय?' असं त्या बाजूकडून विचारलं गेल्यावर सुभाषभाई म्हणाले ः ''मी सुभाष बोलतोय. आम्ही अकोल्यात पोचलो आहोत. आम्हाला न्यायला स्टॅंडवर या.'' 

तिकडच्या व्यक्तीला काही कळेना. ती व्यक्ती म्हणाली ः ''मी दिलीप देशमुख बोलतोय. तुम्हाला कोण पाहिजे?'' सुभाषभाईंनी मावशीचं नाव सांगितलं व जेवढा माहीत होता तेवढा पत्ताही सांगितला. त्यावर देशमुख म्हणाले ः '' अहो, हा पत्ता इथला नाही व या नावाची व्यक्तीदेखील इथं राहत नाही.'' देशमुख हे तिथले मोठे सनदी अधिकारी असल्यानं त्यांना अकोला आणि परिसरातली माहिती बारकाईनं होती. देशमुख यांना शंका आल्यावर त्यांनी सुभाषभाईंना विचारलं ः ''तुम्हाला कोणत्या अकोल्याला जायचंय? हे बाळापूर अकोला आहे.'' कोणतं अकोला हेही सुभाषभाईंना माहीत नव्हतं. त्यांनी पत्नीला विचारलं ः ''अगं, कोणतं अकोला?'' पत्नी म्हणाली ः ''नगर जिल्ह्यातलं. संगमनेरजवळचं अकोला. मलाही माहीत नव्हतं, की एकाच नावाची दोन गावं आहेत ते. म्हणून तर मी शंका आल्यामुळं कंडक्‍टरला विचारलं होतं.'' (खरंतर नगर जिल्ह्यातल्या गावाचा उच्चार 'अकोला' असा नसून 'अकोले' असा आहे...पण 'तुम्ही आमच्याकडं अकोल्याला या' या वाक्‍यातल्या 'अकोल्याला' या उच्चारानंही घोळ केला असावा). आता मात्र सुभाषभाईंना घाम फुटला. आपण भलतीकडंच आलो आहोत, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी देशमुखांना सांगितलं ः ''आम्हाला संगमनेरजवळच्या अकोल्याला जायचयं.'' त्यांनी कस जायचं ते सांगितलं. एव्हाना रात्र खूप झाली होती. आता पुन्हा प्रवास करण सोपं नव्हतं. पती-पत्नीनं रात्री बाळापूर अकोल्याला एका लॉजवर मुक्काम केला. सकाळी नाशिक बसनं ते संगमनेरकडं निघाले. 

इकडं, पाहुणे अद्याप का आले नाहीत म्हणून त्यांनी पुण्याला फोन केला. पुण्यातल्या घरच्या इतर मंडळींनी सांगितलं ः ''ते तर दुपारीच तुमच्याकडं जायला निघाले आहेत.'' आता सगळ्यांना काळजी वाटू लागली. दुसऱ्या दिवशी दुपार टळून गेल्यानंतर सुभाषभाई व त्यांची पत्नी संगमनेरजवळच्या अकोल्याला पोचली. त्यांनी गावातून कुठून तरी मावशीकडच्यांना फोन केला. 

त्यानुसार, मावशीकडचे स्टॅंडवर आले आणि मेहता पती-पत्नीला घरी घेऊन गेले. सुभाषभाईंनी घडलेला सगळा किस्सा मावशीच्या घरच्यांना सांगितल्यावर उशीर होण्याविषयीचा उलगडा झाला. नंतर दोन दिवस पाहुणचार घेऊन नवदाम्पत्य आपल्या घरी परतलं. 

मात्र, 'बाळापूर अकोला' म्हटलं की सुभाषभाईंना आजही ती सगळी फसगंमत आठवते! 
- कीर्तिकुमार शहा, चाकण (पुणे) 
 
'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com