तुम्हारे पास क्‍या है? (भाग्यश्री भोसेकर- बीडकर)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

'नयनताराज नेकलेस' ही शॉर्टफिल्म 'तुलना' या संकल्पनेवर अतिशय नेमकं भाष्य करते. मुलांच्या शाळा आणि खेळानिमित्त ओळख झालेल्या आणि त्या ओळखीचं मैत्रीत रूपांतर झालेल्या अलका आणि नयनतारा या दोन मैत्रिणींची ही गोष्ट. एक टिपिकल मध्यमवर्गीय, तर दुसरी उच्चवर्गीय. एकेक प्रसंगांतून कथा पुढं नेत ही शॉर्टफिल्म शेवटी आपल्या डोळ्यांत अंजन घालते. 

कधीकधी आपण आपल्या आयुष्याची तुलना इतरांच्या आयुष्यासोबत करतो का? 'याची नोकरी चांगली आहे', 'त्याचा पगार चांगला आहे', 'ती काय मस्त बंगल्यात राहते आहे, गाडीतून फिरते आहे', 'हा बघा सारखा ट्रॅव्हल करत असतो. मज्जा आहे नाही...!!' वगैरे वगैरे!....तपासून पाहा ही वाक्‍यं. आपल्या मनातलीच तर नाहीत ना? 'नयनताराज नेकलेस' ही वीस मिनिटांची शॉर्टफिल्म 'तुलना' याच संकल्पनेवर अतिशय नेमकं भाष्य करते. 

एकाच सोसायटीत राहणाऱ्या, मुलांच्या शाळा आणि खेळानिमित्त ओळख झालेल्या आणि त्या ओळखीचं मैत्रीत रूपांतर झालेल्या दोन मैत्रिणी. एक टिपिकल मध्यमवर्गीय असणारी अलका, तर दुसरी उच्चवर्गीय नयनतारा. अलका स्वभावानं फार साधी- त्याहीपेक्षा बावळट आहे, पक्की काकूबाई आहे; पण नयनतारा? नयनतारा इज अ बेब! नयनताराला मध्यमवर्गीय वातावरण फार टोचतं, तिला घृणा आहे या वातावरणाची. हॉटेलमध्ये गेल्यावर फ्रेश लाइम सोडा मागवण्यापलीकडं अलकाची धाव अजून गेलेली नाही, तर नयनतारा कायम पंचतारांकित हॉटेल्समध्येच जेवते, राहते.नयनतारा अलकाला वाइनचा 'शाडने' नावाचा प्रकार उच्चारासहित कसा मागवायचा हे शिकवते. नयनतारा अलकाला वाइनची मजा कशी घ्यायची हे शिकवत असताना दोघींमधल्या आर्थिक आणि कौटुंबिक वातावरणातील फरक लगेच जाणवतो. आपल्या पतीव्यतिरिक्त इतर पुरुषासोबत वाइन पिणं हे अलकाच्या मते 'बाप रे!!' आहे, तर नयनताराच्या मते त्यात थ्रिल आहे. दोघींच्या किटी पार्टी ते रोमान्सपर्यंतच्या सगळ्या संकल्पना खूप वेगवेगळ्या आहेत, त्या दोघींच्या विचारांत कमालीचा फरक आहे. या मैत्रीच्या प्रवासात एकीकडं अलका मनात कुठं तरी स्वत:ची तुलना नयनतारासोबत करते आहे. तिला नयनतारासारखं वागायचंय, चालायचंय, बोलायचंय, तिलाही श्रीमंतीचा कैफ अनुभवायचाय. दुसरीकडं अलकाच्या मनात काय सुरू आहे, हे नयनतारा मनातून जाणून आहे... तिलाही अलकाला स्वत:सारखं वागायला शिकवताना मजा येते आहे. 

नयनतारा अलकाच्या घरी येऊन गप्पा मारून गेल्यावर, अलकानं तिच्यासारखं वावरण, तिच्यासारखं कप धरून चहा पिण्याची ऍक्‍टिंग करणं या सीन्समध्ये अलकाची भूमिका करणारी अभिनेत्री ती व्यक्तिरेखा अक्षरश: जगली आहे. वास्तविक पाहता नयनतारा आणि अलका दोघींनाही माहीत आहे, की आपण एकमेकींशी भन्नाट खोटं बोलतो, मुखवटे घालून वावरतो; पण या जगण्यात त्यांना गंमतही वाटते आहे. 

शाळेतल्या मित्राला भेटण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये जाणाऱ्या अलकाचं 'भाबडी अलका ते बेगडी अलका' हे ट्रान्स्फॉर्मेशन प्रेक्षकांना चकित करून टाकतं. इथं स्वत:ची खरी परिस्थिती मित्राला कळू नये म्हणून धडपडणारी खरी अलका आणि त्याच वेळी नसलेल्या आर्थिक श्रीमंतीविषयी वाक्‍यं रेटणारी खोटी अलका अशी अलकाची दोन रूपं या प्रसंगात पाहायला मिळतात. या प्रसंगात काही वाक्‍य फार सुंदर आणि लक्षात राहण्याजोगी आहेत. अलकाचा मित्र तिला म्हणतो : 'बऱ्याचदा मला पंचतारांकित हॉटेल्समध्ये घुसमटायला होतं. असं वाटतं, की छोटंसं घर असावं. मुलं खेळतायत, घरात कुकरच्या शिट्ट्या ऐकायला याव्यात... इतकं साधं हवंय मला सगळं!' यावर मित्राच्या बोलण्याकडं साफ दुर्लक्ष करून अलका आपलं बेगडीपणाचं नाटक रेटत राहते. एकीकडे अशा दिखावेपणाला कंटाळलेला अलकाचा मित्र आणि दुसरीकडं त्याच दिखाव्याच्या दुनियेत रमू पाहणारी अलका. फार सुंदर प्रसंग आहे हा. प्रेक्षकाला खूप काही शिकवून जाणारा. 

अनेक चांगले, हिट चित्रपट दिग्दर्शित केलेल्या जयदीप सरकारचं या शॉर्टफिल्मसाठीचं दिग्दर्शन फार सुंदर आहे. छोट्याछोट्या गोष्टींतून बारकावे टिपण्याचा प्रयत्न दाद देण्यासारखा. अनेक चित्रपटांमधून उत्तम अभिनय करणाऱ्या कंकणा सेन-शर्माविषयी वेगळं काय बोलावं? नयनताराची भूमिका करणाऱ्या कंकणाचे डोळे आणि चेहऱ्यावरचे हावभाव प्रचंड बोलके आहेत. 'हंटर'सारख्या अनेक मेनस्ट्रीम सिनेमांमधून काम केलेला गुणी अभिनेता गुलशन देवीया या शॉर्टफिल्ममध्ये अलकाच्या मित्राची भूमिका करतोय. इथं त्याची भूमिका छोटी असली, तरी तो आपल्या उत्तम अभिनयानं वाहवा मिळवून जातो. कंकणा आणि गुलशनसारखे अनुभवी कलाकार सोबत असताना अलकाची भूमिका करणारी तिलोत्तमा शोम नक्कीच जास्त भाव खाऊन जाते. आधीची भोळी अलका आणि नंतर नयनताराच्या सहवासात राहून बदललेली अलका तिलोत्तमानं फार ताकदीनं सादर केली आहे. या कथेतल्या प्रसंगांना साजेसं संगीत दिलंय सोमेश साह यांनी. ही कथा ज्यांच्या लेखणीतून उतरली आहे ती मंडळी आहेत अपर्णा चतुर्वेदी, अंकुर खन्ना, जयदीप सरकार. 

कथेचा शेवट हे खणखणीत वाजणारं नाणं आहे. हा शेवट अलकाच्या- पर्यायानं आपल्यादेखील डोळ्यांत झणझणीत अंजन घालतो. त्यामुळं शेवट चुकवू नये असाच. 'नयनताराज नेकलेस' ही शॉर्टफिल्म पाहावी अशीच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com