बाप रडला ढसाढसा... (उत्तम कांबळे)

बाप रडला ढसाढसा... (उत्तम कांबळे)

पाल्यांनी परीक्षेत यश मिळवल्याचा पालकांनी आनंद मानायचा की ते मिळालेलं यश गुणांच्या परिभाषेत अपुरं-अधुरं आहे म्हणून दुःख करत बसायचं, असा मोठाच प्रश्‍न सध्याच्या स्पर्धात्मक शिक्षणपद्धतीनं उभा केला आहे. बेताचं यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पालकांवर अशा ‘संमिश्र भावना’ व्यक्त करण्याची वेळ का आली, ती कुणी आणली या प्रश्नांचा विचार कुठल्याच पातळीवर होताना दिसत नाही...अशी वेळ येऊ नये म्हणून स्पर्धात्मक शिक्षणपद्धतीऐवजी विकासात्मक शिक्षणपद्धती आपण कधी विकसित करणार आहोत की नाही?

महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला तेव्हा मी प्रवासात होतो. अनेक ठिकाणी आजही फोनची रेंज मिळत नाहीच. खेड्यात तर अडचणीच अडचणी आहेत. कुणी दोन कार्डं घेतं, तर कोणी कृषिकार्ड घेतं... ‘कर लो दुनिया मुठ्ठी मे’पासून ‘व्हॉट ॲन आयडिया’पर्यंत अनेक कार्डं अशा ठिकाणी मुकी होतात. बिल पाठवण्यात तत्परता दाखवणारी आणि सेकंदासेकंदाचा हिशेब ठेवणारी कार्डं मुकी होतात...रेंज मिळाली की ‘कर लो अपलोड’ म्हणत स्कीमच्या स्कीम टाकत असतात... अशाच परिस्थितीत मला माझ्या शालेय जीवनातल्या एका मित्राचा फोन येत होता. मुंबईतल्या एका गजबजलेल्या झोपडपट्टीत तो राहतोय. दोन लेकरांचा बाप; पण बेरोजगार. त्याच्याकडं तर तीन कार्डं आहेत; पण तो कधीच सक्‍सेस कॉल करत नाही; मिस्ड्‌ कॉल करतो... सक्‍सेस कॉल अजून तरी त्याच्या अर्थकारणात बसत नाही...आता साऱ्या मित्रांना याची सवय झालीय. काही विचारवंत आणि शिक्षणक्षेत्रातले काही मोठे दांडगे गुरुजीही मिस्ड्‌ कॉल करतात. का हे त्यांनाच ठाऊक आणि त्याविषयी त्यांना काही वाटायचंही बंद झालंय. त्यांच्या मिस्ड्‌ कॉलनंतर आपण सक्‍सेस कॉल करणं, हे आता त्यांच्या हक्कात रूपांतरित झालंय... मोठी माणसं आहेत... सारं फुकट मिळालं की मोठं होता येतं...असो !...तर या मित्राचा फोन काही घेता येत नव्हता. ‘हॅलो’ म्हटलं, की कट व्हायचा... १०-१५ किलोमीटर अंतर कापल्यावर स्क्रीनवर रेंजच्या काड्या दिसू लागल्या. मीच त्याला फोन केला. ‘हॅलो’ म्हणतानाच त्याला हुंदके फुटले... एक, दोन बरेच...तो ओक्‍साबोक्‍शी रडू लागला. मी इकडून फक्त ‘हॅलो हॅलो’ करत होतो. ‘रडू नको, काय ते नीट सांग...न रडता सांग,’ अशी विनंती करत होतो; पण तो ऐकायला तयार नव्हता. कुणी जवळचं दगावल्यावर जसा माणूस रडतो तसा तो रडत होता. काय करावं कळत नव्हतं. शेवटी एकदाचं रडू थांबलं आणी एक दीर्घ श्‍वास घेत तो म्हणाला ः ‘‘काय सांगू मित्रा, माझी मुलगी दहावी पास झाली...’’

उत्तर ऐकून चक्रावलो. माणसं आनंदातही रडतात, हे सर्वांनाच ठाऊक आहे; पण पोरगी पास झाल्याचा त्याला खूपच आनंद झाला असावा. त्यातही झोपडपट्टीत, गटारीच्या काठावर राहून पोरीनं यश मिळवलं, याचा त्याला आनंद झाला असावा. विशेष म्हणजे, चार-पाच वेळा प्रयत्न करूनही हा स्वतः कधी दहावी पास होऊ शकला नाही, हेही मला ठाऊक होतं...कोणत्या कोणत्या कारणांनी त्याला आनंद झाला असावा, याचा विचार मी करत होतो. त्यानं रडू थांबवावं म्हणून मीच बोलायचं ठरवलं.

म्हणालो ः ‘‘बाबा रे, सर्वप्रथम तुझ्या पोरीला अभिनंदन सांग. खूप मोठं यश मिळवलंय तिनं. लक्षात ठेव, काही काही बापांचे पांग पोरीच फेडतात. खूप छान बातमी सांगितलीस... कधीतरी तिला घेऊन नाशिकला ये...’’

मला थांबवत तो पुन्हा रडू लागला तशी मी पुन्हा विनंती करू लागलो ः ‘‘थांब ना भाऊ रडायचं... रडूनच आनंद व्यक्त करता येतो, असं नाहीय.’’ त्यानं सर्व बळ एकवटलं आणि थेटच म्हणाला ः ‘‘अरे, ती पास झाली म्हणून मी रडत नाहीय. तिला फक्त ५० टक्के मिळाले म्हणून आमचं सगळं घरदार रडतंय निकाल हातात आल्यापासून...आता काय करायचं...? नापास झाली असती... ड्रॉप घेतला असता, तर चाललं असतं; पण हे काय? या ५० टक्‍क्‍यांचं करायचं काय? हे फडतूस मार्क घेऊन फिरायचं कुठं ? मित्रा, कोणतंही चांगलं कॉलेज ॲडमिशन देणार नाही आणि डोनेशन देऊन ॲडमिशन घ्यावी म्हटलं, तर दातावर मारायलाही पैसा नाही... पोरीनं काही नीट केलं नाही बघ... कसले पांग फेडणार कुणाला ठाऊक...?’’

त्याच्या रडण्याचं नेमकं कारण कळलं आणि पुन्हा एक धक्का बसला. कमी मार्कांनी पास होणं निरर्थक, स्वतःचं आणि कुटुंबाचं नुकसान करण्यासारखं असतं...मित्रानं खूप मोठी स्वप्नं पाहिली होती; पण त्याच्या विरुद्ध घडलं होतं... मी त्याची समजूत काढू लागलो. तो ऐकायला तयार नव्हता. उलट म्हणाला ः ‘‘ज्यांचं जळतं त्यालाच कळतं. तुझं काय, तुझ्या पोरांनी ८०-९० मार्कांचा गेम केलाय. आता या पोरीला चांगलं कॉलेज कुठून आणायचं...?’’
मी त्याला खूप धीर देत होतो; पण तो काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता...फोन बंद झाला... काही का असेना; पण यश मिळवूनही दुःखाचा डोंगर कोसळला म्हणणारे अनेक जण आहेत...समाजातल्या चांगल्या आणि गुणवत्तेची टिकली चिकटवून शायनिंग मारणाऱ्या संस्था विद्यार्थ्यांच्या मार्कांशी जोडल्या आहेत; विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी नव्हे...बघता बघता एका सामाजिक स्वरूपात आणि म्हटलं तर एका बाजारात या निकालाचं रूपांतर झालंय...आता नुसतंच खालून वर जाऊन चालत नाही. नुसतंच पास होऊन चालत नाही, तर निकालाचं रूपांतर शेअर बाजारात करावं लागतं आणि तसं केलं तरच ‘खुल जा सिम सिम’ म्हणत यशाला हाक मारता येते. इथं यश म्हणजे क्वालिटी... अशाच मुलांना प्रवेश देऊन क्‍वालिटी बनलेल्या महाविद्यालयात पाय ठेवणं म्हणजे यश असतं...तळागाळासाठी एक कॉलेज आणि शिखरांसाठी दुसरं असतं...

दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आलेलं महायुद्धाचं, महास्पर्धेचं स्वरूप चक्रावून टाकतं...आपण शिक्षणव्यवस्थेत आहोत की ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’च्या फायटिंगमध्ये, तेच कळेनासं होतंय... दिल्लीत मध्यंतरी पाच जागांसाठी शंभर टक्के गुण मिळवणारे सहा जण आले. कुणाला नाकारायचं आणि कोणत्या कारणावरून, असा प्रश्‍न निर्माण झाला. प्रश्‍न कोर्टात गेला आणि शेवटी नशीब होऊन चिठ्ठीत गेला...!

गेल्या काही वर्षांपासून बहुतेक जण ७५ टक्‍क्‍यांच्या पुढंच गुण मिळवून पास होतात, तरी त्यांना प्रवेशाची लढाई लढावीच लागते. या लढाया काही आभाळातून पडलेल्या नाहीत, तर नव्या व्यवस्थेनं लादलेल्या आहेत... परीक्षांचा वापर आता बरं-वाईट ठरवण्यासाठी, गुणवत्ता मोजण्यासाठी होत नाही... डिलिट करण्यासाठी होतो... डिलिट फोल्डरमध्ये आपण जाऊ नये, यासाठी असंख्य पोरं जीव काढत असतात. स्पर्धेचा शेवट काय असतो हे कळलंय, असा दावा अजून तरी कुणी करत नाही. गुणवत्तायादीत झळकलेले काही जण सिलिकॉन व्हॅलीत गेले, हे जसं खरं, तसं काही जण टपरीवर काम करतात, हेही खरंच....

मित्राच्या मुलीचा विषय विस्मरणात जाण्यापूर्वी एक बातमी थडकली. निकालाच्या भीतीनं तीन-चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे हे उत्तीर्ण झाले होते, हे निकालानंतर कळलं. ही निकालाची भीती कुठून येते, कोण निर्माण करतं, हे कधीतरी तपासणार की नाही? बळी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, याचा वेध घेतला जाणार की नाही...? की असंच पाहत बसणार? कोवळ्या कळ्या आणि कोवळी फुलं करपून जाताना हा प्रश्‍न आहे. कुणी या प्रश्‍नाला हात घालू शकत नाहीय. सैराट बनलेल्या स्पर्धेला कुणी रोखू शकत नाही...ती साऱ्यांनाच पेलणारी आहे का? आणि स्पर्धेत धावण्याची पात्रता सगळ्यांकडंच आहे का, हे प्रश्‍न तर फणा काढताहेत...

काही वर्षांपूर्वी मैत्रीण नापास झाली म्हणून एकीनं आत्महत्या केली आणि तिनं आत्महत्या केली म्हणून मैत्रिणीनंही आत्महत्या केली...
उदाहरणं तर असंख्य आहेत; पण आख्खं आयुष्यच जबड्यात घेऊ पाहणारी आणि यश-अपयश याशिवाय सगळेच मार्ग बंद करू पाहणारी स्पर्धा खरंच किती काळ समाजाच्या अंगा-खांद्यावर खेळवायची आहे? हे मार्कांचं पीक कुठून येतंय, हेही बऱ्याच प्रमाणात एक उघड सत्य आहे. कष्ट करणाऱ्या, गुणवान होणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी आदर ठेवतच या गुंत्याकडं पाहावं लागेल. आठवीपासून कॉपीचं प्रशिक्षण देणाऱ्या शाळा आणि संस्था काही कमी नाहीत...कॉपी करून फुगवलेला फुगा थोडा वर जाऊन फुटतो, तेव्हा या पोरांचं काय होत असेल, याचा विचार करायला कुणी तयार नाही. हे घडेपर्यंत अनेक बेलायकीच्या शाळांवर ‘शंभर टक्के निकाल’ असे फलक झळकलेले असतात...शिक्षणातले सगळे घटक टक्केवारीच्या स्पर्धेत घुसतात आणि विवेक हरवून बसतात. आपण उगवत्या पिढीच्या भवितव्याशी खेळतोय, याचं भान कुणाला आहे? ‘देश बदल रहा है’ म्हणणाऱ्यांनाही नाही आणि डोनेशनच्या थैल्या घेऊन जाणाऱ्यांनाही नाही...

भारताला स्वातंत्र्य देताना ब्रिटिशांनी काही सूचना केल्या होत्या. त्यात एक सूचना शिक्षणाविषयीचीही आहे. ‘स्वतंत्र भारतानं नागरिकांचा विकास करणारी शिक्षणपद्धती शोधावी,’ ही ती सूचना. आपण अशी शिक्षणपद्धती शोधली नाही आणि तीऐवजी शिक्षणातला रंग शोधू लागलो. भगवा, हिरवा, पांढरा, काळा वगैरे वगैरे... शिकवण्याची पद्धत, शाळांच्या वेळा, परीक्षापद्धती आदी व्यवस्थांचा सातत्यानं लंबक बनवत आलो. वर्षातून चार वेळा परीक्षा ते परीक्षाच नाही... काय जोरात लंबक चाललाय नाही...? ‘इंडियाज्‌ सेल्फ डिनायल’ नावाचं एक गाजणारं छोटेखानी पुस्तक फ्रान्क्विस गाँटियरनं लिहिलंय. त्यातही असंच काही म्हटलंय...आपल्याला आवडणाऱ्या शाळेत, आपल्याला आवडणाऱ्या विषयात, आपल्याला आवडणाऱ्या वाटेवर आनंद देणाऱ्या व्यवस्थेचं स्वप्नं पाहायचं की नाही...? किती दिवस दप्तरातला गुटखा आणि हुक्का तपासणार...? तो का आणि कुठून येतो, हे पाहायचं कुणी...?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com