वाईतलं भीममय आयुष्य

वाईतलं भीममय आयुष्य

कुठल्याही महामानवाचा शब्द न्‌ शब्द वेचत जाणं, संदर्भमूल्याच्या दृष्टिकोनातून त्याचं जतन-संवर्धन करून ठेवणं ही गोष्ट सोपी नाही. आयुष्यभर समर्पणभावनेनं हे केलं तरच ते प्रत्यक्षात उतरू शकतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी भारावून गेलेलं असंच एक समर्पित व्यक्तिमत्त्व आहे सातारा जिल्ह्यातल्या वाईत. डॉ. बाबासाहेबांविषयी प्रसिद्ध झालेला शब्द न्‌ शब्द वेचण्यात, जमा करून ठेवण्यात या व्यक्तिमत्त्वानं जगण्याची कृतार्थता मानली. डॉ. बाबासाहेबांचं एक अनोखं स्मारकच त्यानिमित्तानं कळत-नकळत उभारलं गेलं आहे.

महाबळेश्‍वर या जगप्रसिद्ध पर्यटनक्षेत्राच्या पायथ्याला तर्कतीर्थ (कै) लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली वर्षानुवर्षं ज्ञानयज्ञ सुरू करून विश्‍वकोशाची ऐतिहासिक निर्मिती करणारं वाई... कृष्णेच्या काठावर १०० वर्षांहून अधिक काळ व्याख्यानमालेच्या निमित्तानं ज्ञानाचं गुंजन करणाऱ्या पक्ष्यांना निमंत्रित करणारं वाई...कृष्णेच्या घाटावरच महागणेशाचं मंदिर स्थापन करून ‘बालकांनी भीक मागितल्यास त्यांच्यावर आणि त्यांच्या पालकांवर कठोर कारवाई करू,’ असा इशारा देणारं वाई... ‘एंजल’, ‘चतुर्थी’, ‘व्हेजमंत्रा’, ‘टेम्प्टेशन’, ‘नाज’, ‘२४ कॅरेट’ अशी एकापेक्षा एक काव्यात्म नावं हॉटेलांना देणारं वाई...पर्यटनक्षेत्राची सुखद ऊब घेत प्रचंड महागडं बनलेलं आणि अनेकांसाठी सेकंड होम उपलब्ध करून देणारं वाई...हॉटेलांचं आणि दुकानांचं हब बनवून महाबळेश्‍वरात जाणाऱ्या हजारो पर्यटकांना खुणावणारं वाई... ‘सातारचे छत्रपती क्षत्रीय आहेत’, असा निवाडा देण्यासाठी हजारोंच्या संख्येतल्या ब्रह्मवृंदाला एकत्र करून अनेक दिवस संशोधन करणारं वाई...कुणी काही म्हणो; पण अजूनही एका मोठ्या गल्लीला ‘ब्राह्मणशाही’ असं नाव देणारं वाई... त्यापाठोपाठ मराठेशाही, मराठा, मर्द मराठा, कुलीन वगैरे विशेषणांनी गच्च भरलेलं वाई... आपल्यापासून हाकेच्या अंतरावर भोजनाच्या एका थाळीला ‘जत्रा’ असं नाव देणारं वाई... हळदीचं पीक घेत पिवळंधमक होणारं वाई आणि गरगरीत गोड ऊस पिकवत अनेक मधुमेहतज्ज्ञांना आपल्या अंगा-खांद्यावर थारा देणारं वाई... ‘झिंगाट’ या गाण्यासाठी ‘सैराट’ चित्रपटाला जवळपास तीन महिने चिकटून राहिलेलं वाई...शेवटी अजून एक सांगायचं तर, ‘सातारा परिसरातलं पुणं’ म्हणजे वाई...! दिवस उगवला की पुणं वाईच्या वाटेवर आणि वाई पुण्याच्या वाटेवर...

नऊ जुलैच्या सायंकाळी वाईत प्रवेश केला आणि सर्वप्रथम गेले बरेच दिवस माझ्या हाताला चिकटलेली ‘स्नो’ ही नोबेल पुरस्कारविजेते ओरहान पामुकची जवळपास ५०० पानांची महाकादंबरी बाजूला ठेवली. ‘ही कादंबरी अवश्‍य वाचा’, असा आग्रह करून डॉ. रावसाहेब कसबे यांनी ती मला वाचण्यापुरतीच दिलीय. घाईत वाचू नये आणि वाचून विसरू नये, अशी ही कादंबरी आहे. आज आपल्या भोवती म्हणजे एकूणच जगाभोवती जे काही अस्वस्थ, असुरक्षित आणि भयग्रस्त पर्यावरण उभं आहे, त्याची बरीच पाळंमुळं या कादंबरीत पाहायला मिळतात, जशी ती ‘जिहाद अँड मॅक्‍डॉन’ (बेंजामिन आर. बार्बर) किंवा ‘द क्‍लॅश ऑफ सिव्हिलायझेशन अँड द रिमेकिंग ऑफ न्यू वर्ल्ड ऑर्डर’ (सॅम्युएल हटिंग्टन) या पुस्तकांमध्येही पाहायला मिळत होती. हातातलं पुस्तक बाजूला ठेवताना बरं वाटत नव्हतं; पण गाडी तोपर्यंत बसस्थानकाजवळ पोचली होती. आम्हाला घ्यायला लहूराज पांढरे थांबला होता... पाऊस झेलतच त्यानं नमस्कार केला... गाडीत बसला. आता हा लहू म्हणजे कोण, असा प्रश्‍न निर्माण होईल...

...खरं म्हणजे मीही त्याला प्रथमच भेटत होतो. चैतन्यानं सळसळणारा...डोळ्यांत स्वप्नांची गर्दी घेऊन अतिशय नम्र वागणारा, उच्चविद्याविभूषित असा हा लहूराज पांढरे पुणे, फलटण अशी करत वाई जिंकण्यासाठी म्हणजे एका अर्थानं एक अवघड कामगिरी करण्यासाठी आला होता. फोनवर त्याच्याशी बोलतानाही तो असा कुणीतरी जिद्दीच तरुण असेल असं वाटायचं. भेटीत हा अंदाज खरा ठरला. ...तर हा संतांची समृद्धी आणि विकासाचा दुष्काळ घेऊन जगणाऱ्या मंगळवेढ्याजवळच्या मारोळी या दीड-दोन हजार लोकवस्ती जगवणाऱ्या गावातला मुलगा. त्याच्या कुटुंबातला हा पहिलाच शिकलेला म्हणजे ‘फर्स्ट लर्नर’ म्हणावा असा...वडील रोजगार हमीवर जायचे आणि आई शेतमजूर... सांगायला शेत भरपूर; पण त्यात हिरवी काडी कधी दिसायची नाही... पावसाची वाट पाहता पाहता तोंड उघडण्याच्या प्रयत्नात असलेल्या जमिनीवर पडलेल्या भेगाच भेगा... ‘सटवीनंच गाव सोडायला सांगितलं,’ या अंधश्रद्धेतून अनेक कुटुंबं ‘विठ्ठल, विठ्ठल’ याप्रमाणे भाकरीचा गजर करत गावशीव सोडून बाहेर पडलेली...अतिशय हुशार असलेला लहूराजही शिक्षणासाठी विद्यानगरी पुण्यात आला. तो इथं भरपूर शिकला. विज्ञानात पदव्युत्तर झाला. बीएड झाला. अतिशय तुफानी वक्तृत्व, सुंदर व्यक्तिमत्त्व आणि भरपूर पदव्या असूनही विद्यानगरीत त्याला नोकरी मिळाली नाही किंवा ती मिळवण्याऐवजी स्वतःकडची ऊर्जा वापरून काही वेगळं करण्याच्या प्रयत्नात तो होता. हा प्रयत्न त्याला खासगी शिकवणीपर्यंत घेऊन आला. पुणं ही नुसतीच विद्यानगरी नाहीय, तर ती ट्यूशननगरीही झालीय. कोणतीही गोष्ट असो, इथं ट्यूशन उपलब्ध असते. नऊवारी साडी नेसण्यापासून ते ब्यूटीपार्लरमध्ये रंग-रंगोटी करण्यापर्यंत आणि कलेक्‍टरसारखे बडे बाबू बनवण्यापासून ते कॉन्स्टेबलची परीक्षा यशस्वी पास कशी व्हायची, कविता कशी लिहायची आणि विद्वान कसं बनायचं या गोष्टीपर्यंत... प्रत्येक गोष्टीची ट्यूशन इथं मिळते. जिथं ट्यूशन कमी पडते, तिथं रस्त्यावरच्या, दुकानावरच्या पाट्या जणू काही मास्तरकी करतात. पुण्याच्या भाषेत ‘ज्ञानदान’ म्हणतात याला... तर लहूराजनं सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ट्यूशन घ्यायचं ठरवलं आणि जीव तोडून शिकवायचं ठरवलं... एवढ्या गर्दीत, एवढ्या स्पर्धेत आपलं काय होणार, याचा विचार त्यानं कधी केला नाही. त्याला वाचनाचा प्रचंड नाद आहे आणि या वाचनानंच त्याला एक सिद्धान्त सांगितला होता आणि तो म्हणजे चांगल्या, वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींसाठी नेहमी कुठं ना कुठं जागा असतेच. अगदी पुण्यातसुद्धा..! मग त्यानं सुरू केली शिकवणी...अगदी अल्पावधीत ती विश्‍वासार्ह ठरली... हाच विश्‍वासाचा धागा पकडून तो पुण्यातून बाहेर पडला आणि पुण्यासह अनेक ठिकाणी शाखा उघडल्या. तो स्वतःही मस्त जगतोय आणि अनेकांना त्यानं जगण्याचं साधन उपलब्ध करून दिलंय... त्याच्याबरोबरच (भ्रमणध्वनी ः ७७७४०८२६४०) हॉटेलवर पोचलो. या हॉटेलाचं नाव ‘सनई.’ दिसायला खूपच देखणं; पण सेवा काही देखणी नव्हती...असो...

पावसातच वाई फिरायचं ठरवलं...पहिल्यांदा लहूराजचं आधुनिक ऑफिस...बाहेर पाऊस आणि आत नम्रतेचा, नव्या स्वप्नांचा, नव्या कल्पनांचा पाऊस... वाईत गेल्यानंतर एका वास्तूकडं मी हमखास वळतो. ती म्हणजे विश्‍वकोश...(कै) रा. ग. जाधव इथं असेपर्यंत आणि त्याअगोदर तर्कतीर्थांच्या संपूर्ण कारकीर्दीत अनेकदा इथून मी ऊर्जा घेऊन गेलो होतो...तर्कतीर्थांच्या पायांजवळ बसून वेद, संस्कृती, तत्त्वज्ञान, इतिहास समजून घेताना किती आनंद व्हायचा! रा. ना. चव्हाण इथं बरीच वर्षं संशोधनात गुंतलेले...राज्यभरातल्या अभ्यासकांना वाई म्हणजे जणू एक पंढरीच... इथले लोक वारीसाठी पंढरीला आणि बाहेरचे लोक ज्ञानाच्या वारीसाठी वाईला... मस्त होतं...‘गेले ते दिन गेले’ असंच म्हणावं लागेल. तेव्हा तपस्वी होते, आता नेमणूक केलेली समिती असते, ऑफिस बेअरर असतात आणि लोकशाहीचं एक बरं असतं ते म्हणजे, ती कुणाला आणि कुठंही पाठवू शकते... जय हो जनतंत्र की...

हे आहेत वाई इथले सतीश कुलकर्णी. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयीचं चालतं-बोलतं संदर्भालय’ असं त्यांचं वर्णन केलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

वाईत ज्ञानतपश्‍चर्येला बसलेले डोंगर कमी कमी होत गेले आणि काळाच्या ओघात तसं घडतंही... काही डोंगर निसर्गनियमानुसार नाहीसे होतात. काही डोंगर अर्थमूव्हरमुळं नाहीसे होतात... ...तर वाईला गेल्यावर सतीश कुलकर्णी यांच्या घरी गेलो नाही, असं कधी घडलं नाही. लहूराज म्हणाला ः ‘फोन करून अपॉइंटमेंट घेऊ या’. मी म्हणालो ः ‘नको. अजून तरी आपल्या घरी जाण्यासाठी असं काही करावं लागत नाहीय...’ आम्ही चालत निघालो आणि गुदगुल्या करणारा खोडकर पाऊस, कविता जाग्या करणारा रोमांचकारी पाऊस झेलत झेलतच त्यांच्या घरी गेलो. कुलकर्णी यांच्या पत्नी कुणीही आपल्या घरी आलं, की त्याला विचारून किंवा न विचारता एक-दोन पदार्थ देणार... ते खाण्याचा आग्रह धरणार... मग नंतर चहा आणि त्यानंतर कुलकर्णी यांनी सहा दशकं कष्ट करून जमवलेलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संदर्भसाम्राज्य पाहायचं... वयाच्या दहाव्या वर्षी बेडकीहाळ या कर्नाटकातल्या छोट्याशा गावी रत्नाप्पा सूर्यवंशी या कार्यकर्त्यामुळं डॉ. बाबासाहेबांच्या पायावर डोकं टेकवण्याची संधी कुलकर्णी आणि त्यांच्या आईला मिळाली. मुळातच हे कुटुंब भीमभक्त होतं आणि निपाणीहून परत जाताना त्यांचा देवच चक्क बेडकीहाळमध्ये आला होता. बेडकीहाळ आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, डाँकी क्‍लबसाठी! म्हणजे गाढवांच्या क्‍लबसाठी. या क्‍लबचा सुवर्णमहोत्सव माझ्या हस्ते झाला होता. अर्थात, खरोखरच्या गाढवांचा हा क्‍लब नव्हता, तर पत्त्यांच्या डावात गाढव बनलेल्यांचा हा क्‍लब होता. गाढवांच्या नावानं चालणारा हा क्‍लब पाहून ‘कुणी तरी गाढवांना न्याय देणारं आहे’, अशी माझी तेव्हा धारणा झाली होती. कुलकर्णी (दूरध्वनी ः ०२१६-७२२०६२६) याच गावचे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत नोकरीसाठी जे आले ते इथंच स्थायिक झाले. डॉ. बाबासाहेबांच्या बाबतीत त्यांनी वेगवेगळ्या संदर्भांचा प्रचंड संग्रह करून ठेवलाय. तो आता त्यांच्या न्यायाधीश मुलाच्या हाती आहे. डॉ. बाबासाहेबांविषयी वर्तमानपत्रांत, मासिकांत, ग्रंथांत जिथं कुठं जे काही छापून आलं, त्याचा संग्रह कुलकर्णी यांनी केला आहे. आयुष्यभर ते फक्त आणि फक्त हेच काम करत आले. ‘मी भीमभक्त आहे’, हे मोठ्या अभिमानानं ते सांगतात. विशेष म्हणजे, ‘बन्सीधरा,आता कुठे रे तू जाशील?’ या साहित्यकृतीसह बरंच लेखन करणाऱ्या माटे मास्तरांना त्यांचा समाज ‘मांग माटे’ म्हणायचा. कारण, ते या समाजात काम करायचे. वि. रा. शिंदे यांना त्यांचा समाज ‘महार मराठा’ म्हणायचा.

कारण, ते या समाजात काम करायचे. कुलकर्णी यांच्या वाट्याला असं काही आलं नाही. डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेला, बाबासाहेबांनी उच्चारलेला, बाबासाहेबांना युद्धात भेटलेला शब्द न्‌ शब्द आपल्याकडं असावा, समाजाला त्याचा उपयोग व्हावा एवढंच एक कुलकर्णी यांचं मिशन आहे. आयुष्यभर ते मोठ्या निष्ठेनं आणि भक्तीनं चालवत आहेत. आ. ह. साळुंखे, रावसाहेब कसबे, प्रकाश आंबेडकर, एन. एम. कांबळे आदी अनेकांनी हे मिशन अनुभवलं आहे. अनेक संशोधक विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना तर याचा लाभ झालाच, शिवाय कार्यकर्त्यांनाही खूप काही शिकता आलं. एका अजाणत्या वयात डॉ. बाबासाहेबांच्या भेटीचा कुलकर्णी यांच्यावर इतका खोलवर परिणाम झाला, की त्यांनी पुढं आपलं आयुष्यच भीममय करून टाकलं. विशेष म्हणजे, त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्यांची साथ त्यांना मिळाली. मिळवलेला बहुतेक पैसा ग्रंथांवर, संदर्भांवर खर्च होऊ लागला. थोडी थोडी करत ग्रंथांनी आणि संदर्भांनी घरातली सगळी जागा बळकावली. पहाटे पाचला उठून डॉ. बाबासाहेब वाचायला, समजून घ्यायला ते सुरवात करतात. दिवसभर त्यातच ते रमून जातात. अनेक वर्षांपासून त्यांनी डॉ. बाबासाहेब वाचण्यासाठीच आपलं आयुष्य खर्ची घातलंय. या महापुरुषाच्या जीवनातले अनेक संदर्भ त्यांच्या ओठांवर सहजपणे खेळत असतात. आपल्याला नवं काही गवसलं की ते लगेच ते चारचौघांना सांगतात... घरी बोलावून ते वाचायला देतात...

अनेकदा मी स्वतः हे संदर्भालय पाहिलंय. किती संदर्भ असतील याची मोजदाद करताना अनेकदा माझं गणित चुकलंय. जेव्हा केव्हा या घरात जाल, तेव्हा नव्यानं काहीतरी आलेलं असतं. जुनं गणित कालबाह्य ठरतं, नवं जुळवावं लागतं. मला नेहमीच वाटत आलंय, की कुलकर्णी जे काही करत आहेत, तेच तर डॉ. बाबासाहेबांचं सर्वश्रेष्ठ स्मारक असावं...

नाशिकला परत आल्यावर कुलकर्णी यांच्याशी पुन्हा फोनवर बोललो. आपलं आयुष्य सार्थकी लागल्याची त्यांची भावना आहे. ‘तुम्ही जेव्हा केव्हा परत इथं याल, तेव्हा डॉ.बाबासाहेबांसंदर्भात आणखी काही तरी नवं पाहायला मिळेल,’ हे मोठ्या आत्मविश्‍वासानं त्यांनी सांगितलं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com