स्वागत नव्या पुस्तकांचं

new book
new book

दातांची सुरक्षा
दातांबाबत पडणाऱ्या अनेक प्रश्‍नांची उत्तरं देणारं हे पुस्तक डॉ. विजय तारे यांनी लिहिलं आहे. दातांची रचना आणि त्यांचं कार्य, दातांचे-हिरड्यांचे सर्वसाधारण आजार, दातांची दुखणी, दात मोडणं, प्लाक, कृत्रिम दंतपंक्ती, दातांची काळजी कशी घ्यायची अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी सोप्या भाषेत माहिती दिली आहे. योग्य त्या ठिकाणी छायाचित्रांची जोड देण्यात आली आहे.
प्रकाशक : वरदा प्रकाशन, पुणे (020-25655654)/ पृष्ठं : 80 / मूल्य : 80 रुपये

तंजावरची मराठी कीर्तनपरंपरा

कीर्तन हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं अविभाज्य अंग. समर्थ रामदास स्वामी यांनी ही कीर्तनपरंपरा दक्षिणेकडच्या तंजावरला नेली. डॉ. धनंजय होनमाने यांनी या तंजावर भागात रुजलेल्या कीर्तनपरंपरेचा सखोल अभ्यास करून हे पुस्तक सिद्ध केलं आहे.
प्रकाशक : स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे (020-24472549)/ पृष्ठं : 260 / मूल्य : 260 रुपये

रिंगाण

कृष्णात खोत यांनी लिहिलेली ही कादंबरी. विस्थापितांच्या जगण्याचा वेध घेताना बदलत्या परिस्थितीत उत्क्रांतीही काय उत्पात माजवू शकते याचा अतिशय तरल वेध खोत यांनी घेतला आहे. देवाप्पाच्या म्हशी रानटी होतात, त्यांच्या मूळपदावर जातात आणि त्यातून होत जाणारा संघर्ष खोत यांनी चितारला आहे. देवाप्पा आणि म्हैस यांच्या संघर्षाच्या प्रतीकातून खोत अनेक गोष्टींवर भाष्य करत जातात.
प्रकाशक : शब्द पब्लिकेशन, मुंबई (022-28332639)/ पृष्ठं : 164 / मूल्य : 220 रुपये

जाणिवेच्या कळा

ऍड. दत्तात्रय आंधळे यांनी लिहिलेल्या ललितलेखांचा हा संग्रह. आध्यात्मिक, सामाजिक, व्यवहारातल्या विचारांना, जाणिवांना आंधळे यांनी शब्दरूप दिलं आहे. लोकसंस्कृती, पाप, मित्र, दृष्टी, उपकार अशा वेगवेगळ्या विषयांवर आंधळे यांनी लिहिलं आहे. वाचनातून मनात आलेले विचार, एखादं निरीक्षण, मत यांतून त्यांनी लेखनविस्तार केला आहे.
प्रकाशक : मंजुळाई प्रकाशन, चांदूस, ता. खेड, जि. पुणे (9049318656)/ पृष्ठं : 80 / मूल्य : 100 रुपये

जीवन व्यवस्थापनाची गुरुकिल्ली

जे. पी. वासवानी यांच्या "मॅनेजमेंट मोमेंट बाय मोमेंट' या पुस्तकाचा हा अनुवाद जसू पंजवानी यांनी केला आहे. सध्याच्या गुंतागुंतीच्या जीवनशैलीत विचारांचा गुंता कमी कसा करायचा आणि ताणमुक्त जीवन कसं जगायचं हे या पुस्तकात विशद करण्यात आलं आहे. भय, क्रोध, आरोग्य, वेळ, ताण-तणाव यांच्याबरोबर लोकांचं आणि आत्म्याचंही व्यवस्थापन कसं करायचं हे दादा वासवानी यांनी सोप्या शब्दांत सांगितलं आहे. नेहमीच्या व्यवहारातली उदाहरणं देत, सोप्या प्रकारे ते वेगवेगळे विषय समजावून सांगतात.
प्रकाशक : मीरा पब्लिकेशन, पुणे (020-26125679)/ पृष्ठं : 100 / मूल्य : 125 रुपये

सार्थ तुकाराम

संत तुकाराम यांनी अतिशय सहज, सोप्या भाषेत आध्यात्मिक तत्त्वज्ञान मांडलं, प्रबोधन केलं, वेगळा विचार मांडला. तुकाराम महाराजांच्या या विचारसंचितावर श्रीकांत कुलकर्णी यांनी विवेचन केलं आहे. तुकाराम महाराजांनी अभंगांतून मांडलेले विचार आणखी सोप्या पद्धतीनं उलगडून दाखवण्याचं काम कुलकर्णी यांनी केलं आहे.
प्रकाशक : श्रीकांत कुलकर्णी, पुणे (020-24410683)/ पृष्ठं : 186 / मूल्य : 200 रुपये

सेंद्रीय शेती

सेंद्रीय शेती या विषयावर सांगोपांग चर्चा करणारं, माहिती देणारं हे पुस्तक. डॉ. क्‍लॉड अल्वारिस यांनी ते लिहिलं आहे आणि अरुण डिके आणि अरविंद दाभोळकर यांनी अनुवाद केला आहे. भारताच्या अन्नपरंपरा, हरित क्रांती, जनुकीय दहशतवाद, भारतातली सेंद्रीय शेतीची चळवळ, सेंद्रीय शेतीचे सिद्धांत, सेंद्रीय बियाणी, गोमातेचं पुनरागमन, सेंद्रीय शेतीचे कृतिशील पुरस्कर्ते, सेंद्रीय दुकान अशा वेगवेगळ्या गोष्टींबाबत पुस्तकात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सेंद्रीय शेतीशी संबंधित संस्थांची आणि अशी शेती करणाऱ्या व्यक्तींचीही माहिती पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे (020-24473459)/ पृष्ठं : 584 / मूल्य : 800 रुपये

जळो जिणे लाजिरवाणे

वेगवेगळ्या आध्यात्मिक संकल्पना, शंका, विचार, धारणा यांना तर्कानं दिलेलं उत्तर असं स्वरूप असलेलं हे पुस्तक. अरुण गर्ताडकर यांनी ते लिहिलं आहे. "देव आहे का?' इथपासून "सोपस्कार' या विषयापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची स्वत:च्या मनात होणारी द्वंद्वं गर्ताडकर यांनी मांडली आहेत.
प्रकाशक : चेतक बुक्‍स, पुणे (9822280424)/ पृष्ठं : 206 / मूल्य : 350 रुपये

स्वयंसिद्धा

सरोज सोनावणे यांनी लिहिलेली ही लघुकादंबरी. बहिणीच्या मृत्यूनंतर सुवर्णा ही मुलगी कशा प्रकारे संघर्ष करते, ध्येय साकारते याचं चित्रण सोनावणे यांनी या कादंबरीत केलं आहे. पाच छोटेखानी कथांचाही पुस्तकात समावेश आहे.
प्रकाशक : मधुश्री प्रकाशन, पुणे (9764155474)/ पृष्ठं : 100/ मूल्य : 150 रुपये

कॅन्सर : निदान, उपचार व प्रतिबंध

प्रा. डॉ. यशवंत तोरो यांनी कर्करोगाशी संबंधित वैद्यकीय माहिती अगदी सोप्या भाषेत दिली आहे. कर्करोग कसा, कशामुळं होतो; त्याची लक्षणं, त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या चाचण्या, त्याच्या अवस्था, त्याचे प्रकार अशा सगळ्या गोष्टींवर त्यांनी मुद्देसूदपणे माहिती दिली आहे. कर्करोगाबाबत नेहमी पडणारे प्रश्‍न, कर्करोग होऊ नये म्हणून योजायचे उपाय, आहार, कर्करोगाशी संघर्ष, निदान आणि उपचारपद्धती, रुग्णांना मदत करणाऱ्या, माहिती पुरवणाऱ्या संस्था, महत्त्वाची रुग्णालयं आदी गोष्टींबाबतही प्रा. तोरो यांनी नेमक्‍या पद्धतीनं माहिती दिली आहे. कर्करोगाशी संबंधित काही शब्दांचे अर्थही त्यांनी स्वतंत्रपणे दिले आहेत.
प्रकाशक : कॉंटिनेंटल प्रकाशन, पुणे (020-24337982)/ पृष्ठं : 362/ मूल्य : 350 रुपये

आंबेडकरवादापुढील नवी आव्हाने

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची मांडणी डॉ. मिलिंद कसबे यांनी आचरणाच्या भूमिकेतून केली आहे. आंबेडकरी विचार म्हणजे नेमकं काय, त्याचं आचरणात अस्तित्व असणं म्हणजे काय, विचारांचा विधायक परिणाम घडवणं म्हणजे काय आणि सद्य:स्थिती काय या साऱ्यांचा डॉ. कसबे यांनी तटस्थ वृत्तीनं वेध घेतला आहे. आंबेडकरवादाचं आकलन आणि प्रबोधन, आंबेडकरवादापुढची नवी आव्हानं, आंबेडकरवादाचे हितशत्रू आणि आंबेडकरवादी शिक्षणविचार या चार विभागांत त्यांनी विवेचन केलं आहे.
प्रकाशक : सनय प्रकाशन, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे (9860429134)/ पृष्ठं : 120/ मूल्य : 120 रुपये

आठवणी महंमद रफींच्या

आपल्या मधुर आवाजानं जगावर मोहिनी घालणारे गायक महंमद रफी यांचे वेगवेगळे पैलू श्रीधर कुलकर्णी यांनी उलगडून दाखवले आहेत. रफी यांच्याशी संबंधित रंजक किस्से, त्यांचा स्वभाव, त्यांच्या गायनाची वैशिष्ट्यं, सहकलाकार आणि इतरांबरोबरचे त्यांचे अनुभव, काही योगायोग अशा अनेक गोष्टींचा खजिना पुस्तकात आहे. इतर लेखकांनी रफी यांच्यावर लिहिलेल्या काही लेखांचाही कुलकर्णी यांनी पुस्तकात समावेश केला आहे.
प्रकाशक : विद्याश्री प्रकाशन, पुणे (020-24535565)/ पृष्ठं : 208/ मूल्य : 160 रुपये

राजन खान आणि समकालीन कथाकार

मानवी स्वभावाचे, समाजाचे कंगोरे आपल्या कथांमधून उलगडून दाखवणारे राजन खान यांच्या कथांचं विश्‍लेषण प्रा. डॉ. मच्छिंद्रनाथ नागरे यांनी केलं आहे. राजन खान यांच्या कथांचं आशय स्वरूप, त्यांच्या कथांतलं भाषिक अंतरंग, जीवनचित्रण या गोष्टींवर त्यांनी भाष्य केलं आहे. समकालीन कथाकार आणि राजन खान यांचं वेगळेपणही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
प्रकाशक : परिस पब्लिकेशन, सासवड, जि. पुणे (9049657965)/ पृष्ठं : 192/ मूल्य : 200 रुपये

ज्ञानसंरचनावाद परिचय

शिक्षण आनंददायी, परिणामकारक आणि प्रभावी व्हावं या दृष्टीनं डॉ. प. म. आलेगावकर यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी ज्ञानरचनावादाचा परिचय त्यांनी करून दिला आहे. या प्रकारच्या पद्धतीची वैशिष्ट्यं, त्यांच्यामागचं तत्त्वज्ञान, विद्यार्थी-शिक्षकांची भूमिका, प्रत्यक्ष अंमलबजावणी आदी सर्व गोष्टींवर त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केलं आहे.
प्रकाशक : सह्याद्री प्रकाशन, पुणे (020-24321511)/ पृष्ठं : 144/ मूल्य : 150 रुपये

साभार पोच

- शब्दपालवी / 21 कवींच्या प्रातिनिधिक कवितांचा संग्रह / संपादन : डॉ. अरविंद नेरकर / श्रद्धा प्रकाशन, पुणे (9011024184) / पृष्ठं : 136 / मूल्य : 200 रुपये
- डॉ. बावस्कर टेक्‍नॉलॉजी कृषी मार्गदर्शक / कृषिविषयक / संपादन : प्रा. डॉ. विनायक बावसकर / ऍग्रोटेक पब्लिकेशन, पुणे (020-24261494) / पृष्ठं : 200 / मूल्य : 250 रुपये
- कालांतर / कवितासंग्रह / कवी : उत्तम कोळगावकर / मौज प्रकाशन गृह, मुंबई / पृष्ठं : 102 / मूल्य : 125 रुपये
- श्री ज्ञानेश्‍वरी सुलभ निरुपण / आध्यात्मिक / विवेचन : बाळासाहेब भापकर (7796899330)/ वेदांतश्री प्रकाशन, पुणे (020-24478080) / पृष्ठं : 200/ मूल्य : 200 रुपये
- कोंडमारा / कवितासंग्रह / कवयित्री : वंदना हुळबत्ते (0233-2328276)/ चेतक बुक्‍स, पुणे (9822280424) / पृष्ठं : 88 / मूल्य : 130 रुपये
- आरसा / कथासंग्रह / लेखक : साईप्रसाद नाडकर्णी (9820551223)/ मॅजेस्टिक पब्लिकेशन, दादर (पश्‍चिम), मुंबई / पृष्ठं : 176 / मूल्य : 200 रुपये
- माय माझी/ कवितासंग्रह / कवी : बाबू पुजारी / स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे (020-24472549) / पृष्ठं : 120 / मूल्य : 120 रुपये
- इंद्रधनू/ हायकूसंग्रह / कवयित्री : योगिता पाखले / प्रभुरत्नाई प्रकाशन, बुधोडा, ता. औसा, जि. लातूर (9325509450) / पृष्ठं : 94 / मूल्य : 99 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com