हिंसेपासून मुलांना वाचवूया

हिंसेपासून मुलांना वाचवूया

चित्रपट, मालिकांतील हिंसाचाराचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यांच्या वर्तनातही याचे प्रतिबिंब पडताना दिसते, हे वास्तव अस्वस्थ करणारं आहे. आपण जितक्‍या लवकर याविषयी सावध होऊ, तितकं पुढच्या पिढ्यांसाठी ते भल्याचं ठरेल. 

दोन प्रसंग. काही दिवसांच्या अंतराने घडलेले. प्रसंग एक ः उत्पन्नाचे विक्रम मोडणारा ‘बाहुबली’ चित्रपट नुकताच पाहिला. शेजारी एक कुटुंब बसलं होतं. त्यांचा सात- आठ वर्षांचा मुलगा चित्रपटातील हाणामाऱ्या, लढाया, खून सहजपणे पाहत होता. त्याचे आई- वडीलसुद्धा ‘एन्जॉय’ करत होते. चित्रपटातील, कुणाच्या तरी छातीत तलवार खुपसणं, मुंडकं कापणं अशी हिंसात्मक दृश्‍यं पाहताना मीच अस्वस्थ होत होतो. चित्रपटाच्या प्रभावी मांडणीसाठी ती दृश्‍यं आवश्‍यक असतीलही; पण त्या मुलानं आणि प्रेक्षागृहातील इतर मुलांनी तरी ती पाहू नयेत, असा विचार करत होतो.

चित्रपटगृहातून बाहेर पडताना त्या पती- पत्नीचा संवाद सुरू होता - चित्रपटाचा सेट, त्यातील दृश्‍यं, इफेक्‍ट्‌स, इत्यादी... आणि इतक्‍यात मुलाची प्रतिक्रिया उमटली, ‘‘पप्पा, कटप्पानं कशी तलवार खुपसली ना त्याच्या पोटात!’’ 

खरंतर याचं आश्‍चर्य वाटलं. चित्रपट पाहून त्या मुलाच्या लक्षात काय राहिलं, तर कुणीतरी कुणालातरी निर्घृणपणे मारतोय. प्रेक्षकांमध्ये अनेक मुलं होती. सगळ्यांनी चित्रपटातील अशी हिंसात्मक दृश्‍यं पाहिली असणार. त्यातली कुठली कुठली त्यांच्या मनावर कोरली गेली असतील ? 

प्रसंग दोन - चार- पाच मुलं खेळत होती. अचानक एका मुलानं तोंडानं "धड धड धड' आवाज केला. पाठोपाठ ‘ए, सगळे मरा!’ अशी सूचनाही कानावर आली. हातातली काठी बंदुकीसारखी धरून तो गोळ्या झाडत होता. बाकीची मुलं मरून पडल्याचं नाटक करत होती. एका मुलानं तसं केलं नाही. हा मुलगा ओरडला, ‘ए मर.’ असं म्हणून त्यानं पुन्हा गोळ्या चालवल्या. सगळी सात- आठ वर्षांची मुलं. रागावण्यात मतलब नव्हता. त्यांच्याशी बोललो. लक्षात आलं, असा खेळ ते बऱ्याचदा खेळतात. कधी तलवारीची मारामारी, कधी गन घेऊन. हे सगळं त्यांनी कुठं पाहिलं हे शोधण्याचा प्रयत्न केला. चित्रपटांची, संगणकावरील गेमची मला माहीत नसलेली अनेक नावं आणि त्यातले मारामारीचे प्रसंग मुलांकडून समजले. हे केवढं मोठं आव्हान आपल्यासमोर वाढून ठेवलंय ते लक्षात आलं. 

मुलं खेळताना, त्यांच्या गप्पांमध्ये काय बोलत असतात, हे अनेकदा त्यांच्या नकळत मी ऐकतो. लक्षात आलं, की अनेक मुलांच्या गप्पा मारामारीच्याच असतात. त्यात चित्रपटात वा इंटरनेटवर पाहिलेल्या सिरीजमधील पात्रांचे उल्लेख असतात. अनेकदा मुलं काठीची बंदूक करून एकमेकांना ठार मारण्याचा प्रयोग करत असतात. कुणी म्हणेल, मुलंच ती, त्यांना काय कळतंय? जे पाहतात ते करतात. त्यांचा काय दोष? मुद्दा बरोबर असला, तरी सोडून देण्यासारखा नाही. समाजातली संवेदनशीलता हरवतेय ही जबाबदारीने लक्षात घेऊन उपाय करायची बाब आहे. 

मुलांना कुणाला तरी मारावं, ठार करावं, किंवा कुणीतरी कुणावरतरी अत्याचार करतानाचा आनंद घ्यावा असं का वाटतं? हिंसात्मक दृश्‍यांचा मुलांवर, त्यांच्या विचारांवर, मनःस्थितीवर, वर्तनावर काय परिणाम होतो, यावर जगभरात मानसशास्त्राच्या, तसंच मेंदूशास्त्राच्या क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्यातून समोर येणारं वास्तव अस्वस्थ करणारं आहे. आपण जितक्‍या लवकर याविषयी सावध होऊ, तितकं पुढच्या पिढ्यांसाठी ते भल्याचं ठरेल. 

पालकांपैकी अनेकांना मुळात मूल असं काही हिंसात्मक खेळतंय, टीव्ही- संगणकावर काय पाहतंय हे जाणिवेतच नसतं. तर, अनेकांनी मूल हट्ट करतंय म्हणून बंदुका वा तत्सम वस्तू घेऊन दिलेल्या असतात. मुलांना कोणते चित्रपट दाखवायचे यावर फारसा विचारच झालेला नसतो. सॅनेटरी नॅपकिन्सची जाहिरात लागली म्हणून चॅनेल बदलणारी आई त्याच मुलांबरोबर खून, मारामारी, अत्याचाराची दृश्‍यं मात्र पाहते. माध्यम साक्षरता कोणी आपल्याला शिकवलेलीच नाही. हे चित्र सार्वत्रिक आहे. 

हे चित्रपट आणि त्यासारखी अनेक माध्यमं मुलांसमोर काय घेऊन येताहेत हे सर्वांना माहीत आहे. मुलांची (आणि एकूणच समाजाची) संवेदनशीलता हरवतेय हे सातत्याने बोललं जातं. प्रश्न आहे तो या सगळ्यातून बाहेर कसं पडणार याचा. समाजातील दोन घटकांना यात मुख्य भूमिका निभावावी लागणार आहे. घरात पालक व शाळेत शिक्षक. ‘मूल काय करतंय हे माहितीच नाही’ ही भूमिका पालकांना वा शिक्षकांना परवडणारी नाही.

मुलांना काय दाखवायचं व काय नाही याचा विचार पालकांनी करायला हवा. जो चित्रपट आपण पाहायला चाललोय, वा घरात टीव्हीवर जो कार्यक्रम मुलांसोबत पाहतोय, तो नेमका कसा आहे हे नीट माहिती करून घ्यायला हवं आणि आपण कितीही थांबवायचे प्रयत्न केले, तरी कुठून ना कुठून तरी मुलं ते पाहणारच. अशा वेळी मुलांशी पाहिलेल्या घटकांवर चर्चा करणं, त्यातील योग्य- अयोग्य मुलांसमोर आणणं आणि हे सातत्याने करणं हाच मार्ग उरतो. 

एखादा चित्रपट पाहायचा की नाही यावर आणि पाहिलेल्या घटकांवर 
मुलांशी मोकळेपणानं, आपलं म्हणणं न लादता; पण मुलांना पटवून देत चर्चा करायला हवी. शिक्षेतून फार काही साध्य होत नाही. मुळातच आपल्याकडे चित्रपटाला वास्तवाच्या पलीकडे जाऊन अतिरंजित स्वरूप देण्याची पद्धत आहे आणि आपण प्रेक्षकही ते पाहून एन्जॉय करत असतो. मुलांना मात्र हे समजत नाही. ती तेच वास्तव मानून चालतात आणि ‘हिरो असल्याने मला काहीच होणार नाही’ ही भावना त्यांच्या मनात घर करते. इथेच पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांशी संवादातून, त्यात जे दिसतं ते वास्तव नाही, या वास्तवाची जाणीव करून द्यायला हवी. दुसरी बाब आहे ती पर्याय देण्याची.

मुलांना चांगले कार्यक्रम, चित्रपट दाखवायला हवेत. केवळ दाखवून चालणार नाही, त्याविषयी बोलायला हवं. मुद्दा आहे तो त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांचा. पालकांची ती जबाबदारी आहेच; पण शिक्षकांनाही यापासून दूर जाता येणार नाही आणि कदाचित या बाबतीत पालकांना सजग करण्याची जबाबदारीही शिक्षकांनाच उचलावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com