#InnovativeMinds ‘आउट ऑफ बॉक्‍स’ विचार करा

Abhay-Jere
Abhay-Jere

‘जुगाड’चे संदर्भ परिस्थितीनुसार बदलतात. त्याचा उपयोग काही स्थळांपुरता, काही काळासाठी आणि विशिष्ट परिस्थितीपुरता मर्यादित आहे. त्याचे योग्य मोजमाप होत नाही व त्यातून कधीही तंत्रज्ञानविषयक मोठी क्रांती होऊ शकत नाही.

‘जुगाड’प्रमाणेच मला ‘स्वस्तातील इनोव्हेशन’ही (फ्रूगल इनोव्हेशन) फार आवडत नाहीत. दोन्हीही शब्द बऱ्याचदा परस्परपूरक म्हणून वापरले जातात. ‘फ्रूगल’चा अर्थच गोष्टी स्वस्तात पूर्ण करणे असा असून, ते भारतीय उद्योजकांना खूपच भावते. बहुतांश वेळा प्रक्रिया करताना निकृष्ट कच्चा माल वापरून किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. असे करण्याचा सल्ला देणे चुकीचे आहे, कारण त्यातून निकृष्ट दर्जाच्या, तकलादू व असुरक्षित वस्तूंचीच निर्मिती होते. उदाहरणार्थ, काही भारतीय औषधनिर्मिती कंपन्या (सर्वच कंपन्या नव्हे.) निकृष्ट कच्चा माल वापरून जेनेरिक औषधांची निर्मिती करतात. (पुन्हा एकदा सर्वच जेनेरिक औषधे नव्हे.) त्यांच्या स्वस्तातील निर्मितीमुळे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरक्षा किंवा उपयुक्तता या निकषांवर नापास ठरतात. 

मला मनापासून वाटते, की आपण अस्सल इनोव्हेशनचे स्वागत केले पाहिजे व त्यांनाच पुरस्कारही दिले पाहिजेत. दुर्दैवाने, पश्‍चिमेकडील जग आपल्या अस्सल इनोव्हेशनचेही चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन करून त्याला दुय्यम दर्जा देते. याचे सर्वांत चांगले उदाहरण आपले ‘मंगळयान’ आहे. ‘इस्रो’ने अतिशय सुयोग्य पद्धतीने आखलेला हा प्रकल्प आहे. ‘इस्रो’ने किंमत कमी करण्यासाठी दर्जामध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही. त्यामुळे ‘मंगळयान’ हे खूप यशस्वी ठरले व भारत पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यान पाठविणारा एकमेव देश ठरला. या मंगळ मोहिमेचा एकूण खर्च केवळ सात कोटी डॉलर किंवा सुमारे ४७३.३ कोटी रुपये झाला. (हा खर्च ‘ग्रॅव्हिटी’ या हॉलिवूडपटाच्या निर्मिती खर्चापेक्षाही कमी आहे!)

भारतातील सध्याची सुमारे ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे. तरुणांच्या मेंदूमध्ये ‘आउट ऑफ बॉक्‍स’ विचार करण्याची आणि भन्नाट कल्पना सुचण्याची क्षमता असते. त्यांची संख्या आपल्याकडे मोठी आहे. आपल्याकडे इंग्रजी भाषा समजणाऱ्यांची व देशाचे यश आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याची क्षमता असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आपल्या समाजाने ‘जुगाड’ या शब्दावरील प्रेम कमी करून ‘एक्‍सलन्स’चा आग्रह धरल्यास, त्याप्रमाणे स्वस्तातील गोष्टी स्वीकारणे बंद केल्यास आपण जगाला तंत्रज्ञानविषयक सर्वोत्तम पर्याय अत्यंत कमी खर्चात देण्यात सक्षम आहोत, असा विश्‍वास मला आहे.

(लेखक  भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयात चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com