दोस्त दोस्त ना रहा...

प्रकाश अकोलकर
गुरुवार, 31 मे 2018

सत्तेची नशा चढलेल्या भाजपने अनेक पक्षांशी असलेला दोस्ताना तोडल्याने शतप्रतिशतची स्वप्ने पाहणाऱ्या या पक्षाला २०१९ मधील निवडणुकीत यश खेचून आणण्यासाठी अधिक शिकस्त करावी लागेल. दुराव्याची दरी जेवढी विस्तारेल तेवढी अधिक किंमत मोजावी लागेल.

सत्तेची नशा चढलेल्या भाजपने अनेक पक्षांशी असलेला दोस्ताना तोडल्याने शतप्रतिशतची स्वप्ने पाहणाऱ्या या पक्षाला २०१९ मधील निवडणुकीत यश खेचून आणण्यासाठी अधिक शिकस्त करावी लागेल. दुराव्याची दरी जेवढी विस्तारेल तेवढी अधिक किंमत मोजावी लागेल.

नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी जनतेला ‘अच्छे दिन’ नावाचं स्वप्न दाखवून दिल्लीचं तख्त एकहाती काबीज केलं. अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी तब्बल साडेसहा वर्षे आपली निष्ठा अर्पण करणाऱ्या एकजात साऱ्या मित्रपक्षांना ‘बुरे दिन’ आले! लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिलं आणि या सुस्पष्ट कौलानं आलेल्या आत्मविश्‍वासाचा पहिला फटका मोदी; तसेच पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी ‘शिवसेने’ला लगावला. त्यानंतरच्या सहा महिन्यांतच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनं शिवसेनेबरोबरची युती तोडली आणि यापुढे ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ची गरज नसल्याचे संकेत दिले. तेव्हापासून पुढच्या साडेतीन-चार वर्षांत भले ईशान्य भारतात केवळ सतेच्या ‘जुमल्या’पोटी भाजपनं नव्या पक्षांशी मैत्री केली, तरीही वाजपेयींच्या काळातील ‘रालोआ’मधील जुने जाणते मित्रपक्ष मात्र ‘दोस्त दोस्त ना रहा...’ हेच गीत गुणगुणत आहेत. कोणी हे गाणं मनातल्या मनात म्हणतंय; तर शिवसेना आणि चंद्राबाबू नायडू यांचा ‘तेलगू देसम’ यांनी त्यासाठी थेट काळी सात पट्टीतील वरचा सूर लावला आहे.

त्यामुळेच लोकसभा निवडणुका शिवसेना तसंच तेलगू देसम यांच्याविना लढण्याची पाळी आलीच, तर त्याचा भाजपला मोठा फटका बसू शकतो. शिवसेनेच्या साथीनं भाजपनं महाराष्ट्रात चार वर्षांपूर्वी लोकसभेच्या ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या. त्यात शिवसेनेचा वाटा १९ जागांचा होता आणि भाजपच्या २३ जागांपैकी अनेक जागांवरचं यश केवळ शिवसेनेची साथ होती, म्हणूनच मिळालं होतं. आंध्रात चौरंगी लढतीत भाजपच्या वाट्याला अवघ्या तीनच जागा आल्या; पण १६ जागा जिंकणारा तेलगू देसम खंबीरपणे भाजपच्या पाठीशी ठाकला. आता हे दोन्ही पक्ष भाजपपासून कोसो मैल दूर आहेत. पंजाबात ‘अकाली दल’ही तीच वाट चोखाळू पाहत आहे. 

असं कसं घडलं? तर याचं उत्तर लोकसभेतील निर्विवाद बहुमत हेच आहे. अवघ्या १६१ जागा पदरी असताना आणि शिवसेना तसंच अकाली दल यांच्याशिवाय कोणीही ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे...’ असं गीत म्हणायला तयार नसतानाही वाजपेयी यांनी १९९६ मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तेव्हाच भाजप आणि संघपरिवारास ‘शतप्रतिशत सत्ते’ची स्वप्नं पडू लागली.

त्याचकाळात महाराष्ट्रात एकदा गोपीनाथ मुंडे यांनी त्या स्वप्नाची जाहीर कबुली दिली आणि परिणामी मुंडे तसंच प्रमोद महाजन यांना पांढऱ्या शेल्यात हात बांधून ‘मातोश्री’वर जाऊन नाकदुऱ्या काढाव्या लागल्या होत्या.
लोकसभेत चार वर्षांपूर्वी भाजपला बहुमत मिळालं आणि मोदी-शहा या दुकलीबरोबरच भाजपच्या थेट पाचव्या आणि सातव्या रांगेत बसणाऱ्या शिलेदारांनाही कमालीची मग्रुरी आली. ‘दोस्ती’त केलेले वायदे वाऱ्यावर सोडून दिले जाऊ लागले आणि परिणामी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देण्याचं चंद्राबाबूंचं स्वप्नही वाऱ्यावर विरलं. अकाली दलाला तेव्हा दिलेली अनेक आश्‍वासनंही सुवर्ण मंदिराच्या प्रांगणातील तलावात बुडाली. इकडे महाराष्ट्रात ग्रामीण भागात भाजपसाठी रान उठवणारे राजू शेट्टीही शेतकऱ्यांबाबतचे मोदी-फडणवीस यांचं वर्तन बघून ‘रालोआ’च्या छावणीबाहेर पडले.

या साऱ्याचा फटका भाजपला निश्‍चितच बसू शकतो. शिवसेनेविना लढल्यास महाराष्ट्रात किती जागा हाती लागतील, त्याचा अंदाज करता येत नाही आणि त्याची कारणं या दोस्तान्यातील दुराव्याच्या दरीपेक्षा वेगळी आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी आज हातातली गोफण घेऊन भाजपविरोधात लढाईसाठी सज्ज आहे, त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची हातमिळवणी निश्‍चित आहे. उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश हे ‘बुआ-भतिजा’ एकत्र आल्यानं गेल्या वेळी अपना दलाच्या साथीनं जिंकलेल्या ८० पैकी ७३ जागांमध्ये मोठी घट अपेक्षित आहे. तीच गत गुजरात-राजस्थानमधील सर्वच्या सर्व म्हणजे २६+२५ अशा ५१ जागा जिंकून देणारा मतदार विरोधात गेल्याची प्रचिती रोजच्या रोज येत आहे. त्यामुळेच कर्नाटकात सत्ता संपादनात आलेल्या अपयशाच्या सावटाखालील भाजप आता स्वत:च ‘यारी है इमान मेरा... यार मेरी जिंदगी’ हे गीत गाऊ लागला तर नवल नाही. त्याची सुरवात गेल्याच महिन्यात भाजप स्थापना दिन सोहळ्यात शिवसेनेला ‘आवतण’ देऊन अमित शहा यांनी केली आहेच!

Web Title: saptrang article prakash akolkar BJP Narendra Modi Politics