जेव्हा गुप्तहेरांना शांतता हवी असते...!

शेखर गुप्ता
सोमवार, 28 मे 2018

युद्धरेषेवर भारतीय तसेच पाकिस्तानच्या गुप्तहेरांनी सांगितलेल्या कथा नेहमीच चर्चेत असतात. चोरीच्या व्यवसायात एक प्रकारचा सन्मान असल्याचे वचन आहे. असाच सन्मान गुप्तहेरांमध्ये आहे काय? अगदी शीतयुद्धाच्या आणि शांततेच्या काळातही हेरगिरी होत असते, याचे पुरावे उपलब्ध आहेत. कट्टर हाडवैरी परस्परांना भेटतात, चर्चा करतात, त्यांच्यात परस्परांबद्दल आदर निर्माण होतो.

युद्धरेषेवर भारतीय तसेच पाकिस्तानच्या गुप्तहेरांनी सांगितलेल्या कथा नेहमीच चर्चेत असतात. चोरीच्या व्यवसायात एक प्रकारचा सन्मान असल्याचे वचन आहे. असाच सन्मान गुप्तहेरांमध्ये आहे काय? अगदी शीतयुद्धाच्या आणि शांततेच्या काळातही हेरगिरी होत असते, याचे पुरावे उपलब्ध आहेत. कट्टर हाडवैरी परस्परांना भेटतात, चर्चा करतात, त्यांच्यात परस्परांबद्दल आदर निर्माण होतो.

सन १९८७-८८ मध्ये भारत किमान दोनदा पराभवाच्या जवळ आला होता, हे सर्वश्रुत आहे. या वेळी सियाचीनचा वाद जवळपास निकाली निघाला होता. ही बाब अधिकृतपणे मान्य करण्यात आली नसली तरीही ती सर्वांना माहित आहे. यासाठी पडद्याच्या मागील वाटाघाटी आणि काही परस्परसंबंध तेवढेच कारणीभूत होते. यानंतर लढाईची मानसिकता मागे पडून शांततेचे आणि नंतर ‘जैसे थे’ स्थितीचे पर्व अवतरले. वर्मा यांनी झिया यांच्या हत्येमागे पाक लष्कराचा हात असल्याची जी शंका व्यक्त केली त्याच्याशी मी सहमत आहे, कारण भारताबाबत त्यांचे धोरण नरमाईचे असल्याचे लष्कराला वाटत होते. मात्र, गुल हे या कटाचा भाग असावे, असेही मला वाटते. लष्कर अधिकारी असलेल्या हुकूमशहाची हत्या ‘आयएसआय’चे प्रमुख गुल यांच्या देखरेखीत झाली. झिया यांच्या हत्येनंतर वर्षभर या पदावर असलेले गुल यांना बेनझीर भुत्तो यांनी पदावरून हटविले. परंतु, त्यांची गच्छंती करण्यात आली नाही तर मुलतान येथे बदली झाली. यानंतर मात्र ते पूर्ण वेळ जिहादी बनले.

या आठवड्यात हा काहीसा वेगळा विषय हाताळण्याचे कारणही तसेच आहे. भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’चे माजी प्रमुख ए. एस. दुलत आणि पाकच्या ‘आयएसआय’चे माजी बॉस असद दुरानी यांच्या एकत्रितपणे पुढे आलेल्या मतांमुळे भारत आणि पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांना नवे खाद्य मिळाले आहे. पत्रकार आदित्य सिन्हा यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून दोन्ही देशांतील माजी गुप्तचर प्रमुखांचे विश्‍व जगापुढे आले. भारत आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनांचे प्रमुख वा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार थायलंडसारख्या ठिकाणी भेटत असतात, हे उघड गुपित आहे. असद दुरानी यांच्या मुलाला मुंबई पोलिसांनी विमानतळावर पकडल्यानंतर ‘रॉ’ने त्याच्या सुटकेसाठी मदत केल्याचा किस्सा या पुस्तकात आहे.

गुप्तचर संघटनांच्या प्रमुखांमध्ये सेवेत असतानाही सांकेतिक पद्धतीने बातचीत चालते. राजीव गांधी यांच्या कार्यकाळात ‘रॉ’चे प्रमुख असलेले आनंद वर्मा यांनी ‘हिंदू’साठी लिहिलेल्या लेखात याचा उल्लेख केला आहे. ‘आयएसआय’चे तत्कालीन प्रमुख लेफ्ट. जनरल हमीद गुल यांच्याशी परदेशात झालेल्या गुप्त वाटाघाटींचा उल्लेख या लेखात होता. द्विपक्षीय  वाटाघाटींसाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे म्हणून गुल यांनी शीख युनिटच्या चार सैनिकांना भारतात पाठविण्याचा निर्णय घेतला होता. या वाटाघाटींना राजीव गांधी तसेच झिया-उल-हक यांचे समर्थन होते. परंतु, झिया यांच्या हत्येनंतर ही प्रक्रिया थांबली. भारताशी शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे नाराज झालेल्या लष्करातील एका गटाने झिया यांची हत्या घडवून आणली असावी, असा संशय वर्मा यांनी व्यक्त केला आहे. पाक लष्करातील या अस्वस्थतेची कुणकुण लागलेले परराष्ट्र सचिव नियाझ नाईक हे काही दिवसांनी संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळले होते. हा सारा घटनाक्रम कटकारस्थानांच्या चौकटीत फिट्ट बसणारा आहे. सेवेत असताना सावध राहिलेल्या वर्मा यांनी ही घटना सांगण्यासाठी जवळपास तीन दशके वाट बघितली. हा घटनाक्रम मांडताना वर्मा यांनी बहुतांशी सत्य कथन केले असावे, असे मी मानतो.

‘ब’ दर्जात मोडणाऱ्या अशा अनेक बैठकांना मी जातीने हजर राहिलो आहे. ‘बालुसा गट’ असे नामकरण करण्यात आलेल्या गटाची एक बैठक राजपुत्र हसन यांनी ओमानमध्ये घडवून आणली होती. या गटात वायुसेनाप्रमुख एस. के. कौल, त्यांचे बंधू व माजी सचिव पी. के. कौल, लेफ्ट. जनरल सतीश नाम्बियार, पाक लष्कराचे माजी व्हाईस चीफ जनरल के. एम. आरीफ आणि आघाडीचे उद्योजक बाबर अली यांचा समावेश होता.  या गटाचे एक प्रामाणिक सदस्य होते माजी मेजर जनरल महमूद दुरानी. (असद दुरानी यांचे त्यांच्याशी काहीही नाते नाही) एक विचारी, शांतताप्रिय पण सैनिकाप्रमाणे कठोर असलेल्या काही मोजक्‍या अधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना करता येईल. म्हणूनच कदाचित त्यांना ‘जनरल शांती’ म्हणून हिणवले गेले. सन २००८ मध्ये पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असताना त्यांनी कसाब हा पाकिस्तानी नागरिक असल्याचे मान्य करण्याचा सच्चेपणा आणि धैर्य दाखविले होते. 

सियालकोट सेक्‍टरमध्ये टॅंक कमांडर म्हणून त्यांनी भारताशी युद्ध लढले होते. इटलीमधील ‘लेक बेलाजियो’ येथे झालेल्या ‘बालुसा’ गटाच्या एका बैठकीदरम्यान सन १९६५ च्या लढाईचा थरार त्यांनी आम्हाला ऐकविला होता. या लढाईत दोन्ही देशांच्या वरिष्ठ सेनाधिकाऱ्यांनी नेतृत्वाच्या पातळीवर कशा चुका केल्या हेही त्यांनी सांगितले होते.

परिशिष्ट - लेफ्ट. जनरल असद दुरानी यांच्याशी माझी भेट ‘ब’ गटात मोडणाऱ्या भारत-पाक परिषदेदरम्यान झाली. तो १९९८ चा हिवाळा होता आणि वाजपेयी व नवाज शरीफ यांच्या नेतृत्वात भारत आणि पाकिस्तान संबंधांमध्ये शांतता प्रस्थापित झाली होती. भारतातील वाक्‌पटुता कमी का झाली? असा प्रश्‍न त्यांनी मला केला. त्यावर काश्‍मीरमध्ये शांतता निर्माण झाली आहे, असे उत्तर मी दिले. हे ऐकून त्यांनी माझ्याकडे बघितले आणि कपाळावर आठ्या आणत म्हणाले, काश्‍मीरमधील जनजीवनाची दिशा काही क्षणात बदलू शकते. नेमकी याच वेळी पाकने कारगिलमध्ये घुसखोरी केली. मागील १९ वर्षांत दर सहा महिन्यांनी  दोन्ही देशांची सैन्ये परस्परांना भिडली आहेत. मला भेटले तेव्हा ते ‘आयएसआय’मधून निवृत्त होऊन पाच वर्षे झाली होती. परंतु, ‘आयएसआय’चे बॉस असाल तर तुम्हाला केव्हाही घडामोडींची माहिती असते.

(अनुवाद - किशोर जामकर)

Web Title: saptrang article shekhar gupta