‘सुरभि’ का खयाल अच्छा हैं लेकिन...

श्रीमंत माने
मंगळवार, 23 जानेवारी 2018

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आविष्काराचा रोज नवा अनुभव देणाऱ्या एकविसाव्या शतकातली शिकली-सवरलेली माणसं उलट्या दिशेनं, इतिहासाकडं, मध्ययुगाकडं निघाल्याचं आपण पाहतो आहोत. धर्म-जातींचे समूह ऐतिहासिक व्यक्‍ती अन्‌ घटनांना अस्मितेच्या नावाखाली पुन्हा वर्तमानात प्रस्थापित करू पाहताहेत.

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आविष्काराचा रोज नवा अनुभव देणाऱ्या एकविसाव्या शतकातली शिकली-सवरलेली माणसं उलट्या दिशेनं, इतिहासाकडं, मध्ययुगाकडं निघाल्याचं आपण पाहतो आहोत. धर्म-जातींचे समूह ऐतिहासिक व्यक्‍ती अन्‌ घटनांना अस्मितेच्या नावाखाली पुन्हा वर्तमानात प्रस्थापित करू पाहताहेत.

भारतीय दूरचित्रवाणीच्या इतिहासातल्या सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक, गेल्या सहस्रकाच्या अखेरच्या दशकातला ‘सुरभि’ आता पुन्हा छोट्या पडद्यावर आला, तर तितकाच लोकप्रिय होईल काय? सिद्धार्थ काक यांच्याबरोबर ती मालिका सादर करणारी अभिनेत्री रेणुका शहाणे हिनं परवा एका मुलाखतीत या प्रश्‍नाला थोडं नकारार्थी उत्तर दिलं. वर्षभराचा अपवाद वगळला, तर १९९० ते २००१ अशी जवळपास बारा वर्षे दर रविवारी दूरदर्शनवर सिद्धार्थ-रेणुकांच्या ‘सुरभि’ची लोक चातकासारखी वाट पाहायचे.

हवी ती माहिती मिळवायला ‘गुगलबाबा’ अस्तित्वात नव्हता त्या वेळी नृत्य-संगीत, शिल्प, अद्‌भुत माणसं, चालीरीती, रूढी-परंपरा, पर्यटनस्थळं, असं बरंच काही त्यात असायचं. नैसर्गिक, सांस्कृतिक वगैरे सगळ्या प्रकारची विविधता टिपण्यासाठी सुनील शानभाग व त्यांचे सहकारी देशाच्या कानाकोपऱ्यांत फिरायचे, प्रचंड संशोधन करायचे. 

रेणुकांचा युक्‍तिवाद असा, ‘सुरभि’सारखं बरंच काही सध्या ‘यूट्यूब’वर असलं, तरी आपला समाज आता निखळ मनोरंजनाकडं वळलाय. सांस्कृतिक विविधता, वैशिष्ट्यपूर्ण लोक, स्थळं, नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आश्‍चर्य वगैरेंऐवजी सर्वसामान्य माणसांच्या साध्या साध्या गोष्टी, त्यांच्या सुख-दुःखात प्रेक्षक स्वत:ला अनुभवतात अन्‌ महत्त्वाचं म्हणजे परंपरा व इतिहासाशी आता लोकांना फारसं देणं-घेणं नाही. 

गालिबच्या शायरीत सांगायचं तर रेणुका शहाणेंचा हा तर्क ‘दिल बहलाने के लिए अच्छा है’; बाकी वास्तव खूप वेगळं आहे अन्‌ आपण रोज अनुभवतोय. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आविष्काराचा रोज नवा अनुभव देणाऱ्या एकविसाव्या शतकातली शिकली-सवरलेली माणसं उलट्या दिशेनं, इतिहासाकडं, मध्ययुगाकडं निघाल्याचं पाहतो आहोत. धर्म-जातींचे समूह ऐतिहासिक व्यक्‍ती अन्‌ घटनांना अस्मितेच्या नावाखाली पुन्हा वर्तमानात प्रस्थापित करू पाहताहेत. परवाच्या कोरेगाव भीमा इथे उद्‌भवलेला वाद असाच होता किंवा ‘पद्मावत’ सिनेमाचंच उदाहरण पाहा. आपल्या शीलाचं रक्षण करताना जोहारला सामोरं गेलेली चित्तौडगडची इतिहासप्रसिद्ध महाराणी पद्मावतीवर बेतलेला, देशव्यापी वादाचं कारण ठरलेला ‘पद्मावत’ सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होऊ घातलाय. सेन्सॉर बोर्डानं त्याचं नाव ‘पद्मावती’ऐवजी ‘पद्मावत’ केल्यानंतर, अनेक दुरुस्त्या सुचविल्यानंतर व महत्त्वाचं म्हणजे, सर्वोच्च न्यायालयानं प्रदर्शनाला संमती दिल्यानंतरही ‘करणी सेने’सारख्या संघटना मागं हटायला तयार नाहीत. अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा खुळखुळा झालाय. थेट सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देऊ पाहणाऱ्यांना सरकारचा अजिबात धाक नाही. किंबहुना सत्तेतली माणसंच त्यांना बळ देताना दिसताहेत. राजस्थान, हरियाना, मध्य प्रदेशातली राज्य सरकारं चित्रपटावर बंदीसाठी ठाम आहेत. त्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेली आहेत. सेन्सॉर बोर्डानं सुचविलेल्या दुरुस्तीनुसार निर्माता संजय लीला भन्साळी यांनी त्या सिनेमातल्या ‘घूमर’ गाण्यात राजस्थानी नृत्य करणाऱ्या दीपिका पदुकोणची कंबर अन्‌ पोट आता झाकलंय. त्यासाठी व्हिडिओमध्ये हवे ते बदल करू शकणाऱ्या ‘व्हीएफएक्‍स’ तंत्राला धन्यवाद! तरीही ‘बंद’ची हाक, इशारे, धमक्‍या सुरूच आहेत. या सगळ्या इपिसोडवर लेखिका भावना अरोरा यांचं ट्विट मार्मिक आहे. त्यांनी म्हटलंय, ‘‘दीपिकाज मिडरिफ हॅज मोअर 
पोटेन्शिअल टू डिस्ट्रॉय अस दॅन पाकिस्तान्स ॲम्युनिशन ऑन अ होल.’’ 

फक्‍त जातीचे, इतिहासाचे वृथा अभिमान बाळगणारेच भरकटलेत असं नाही. राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी न्यूटनच्या एक हजार वर्षे आधी दुसऱ्या ब्रह्मगुप्ताने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडल्याचा दावा केलाय, तर विज्ञानाची पदवी घेतलेले, वरिष्ठ पोलिस अधिकारी पदावर सेवा केलेले अन्‌ अचानक मुंबईच्या आयुक्‍तपदावरून थेट संसदेत पोचलेले डॉ. सत्यपालसिंह यांनी तर थेट विज्ञानालाच आव्हान दिलंय. केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री असलेल्या सत्यपालांनी चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतिवाद मोडीत काढलाय. भारतीय राज्यघटनेनं सांगितलेल्या विज्ञानवादाच्या पुरस्काराची जबाबदारी सिंह विसरलेत काय? ते औरंगाबादेत म्हणाले, की डार्विनच्या मांडणीनुसार माणसाची उत्क्रांती माकडापासून झाल्याचं कुणी पाहिलेलं नसल्यानं ते अजिबात सत्य नाही, तेव्हा ते शाळा-कॉलेजमध्ये शिकवायची गरज नाही. डॉ. सिंह असं म्हणणारे पहिले नाहीत. त्यांच्या विधानामुळे वैज्ञानिक व विज्ञानवादी मंडळींना संताप येणे स्वाभाविक आहे. कारण परमेश्‍वरानं त्याची लेकरं थेट, कोणत्याही विज्ञानाशिवाय निर्माण केली, असंच सगळी धर्मशास्त्रं सांगतात. हिंदू धर्मशास्त्रात तर ब्रह्माच्या कोणत्या अवयवापासून कोणता वर्ण निर्माण झाला, याची मनोरंजक वर्णनं आहेत.

एकमेकांची डोकी फोडायला कारणीभूत असलेली जातिव्यवस्था त्यातूनच निर्माण झाली. विज्ञानाविरोधातल्या वादाला कोणताही धर्म अपवाद नाही. 
गेल्या सप्टेंबरमध्ये तुर्कस्तान सरकारने डार्विन व त्याच्या उत्क्रांतिवादाचे धडे शालेय शिक्षणातून वगळले. ‘शाळेतली मुलं उत्क्रांतिवाद शिकण्याएवढी मोठी झालेली नाहीत’ असं कारण त्या निर्णयासाठी दिलं गेलं. विशेष म्हणजे, ज्या इंग्लंडमध्ये १८५९मध्ये चार्ल्स डार्विन व आल्फ्रेड रसेल वॅलेस यांनी ‘द ओरिजिन ऑफ स्पेसीज’मध्ये हा उत्क्रांतीचा सिद्धांत समोर आणला, तेव्हाच तिथल्या, तसेच युरोप-अमेरिकेतल्या चर्चना तो मान्य नव्हता. ॲडमच्या पृथ्वीतलावर अवतरण्याच्या ईश्‍वरी कृत्याची मांडणी त्या विरोधात होत होती. त्या सगळ्या धर्मवेत्त्यांना उत्क्रांतिवाद मान्य होण्यासाठी जवळपास शंभर वर्षे जावी लागली. तेवढा कालावधी डॉ. सत्यपालसिंह यांनाही आवश्‍यक आहेच ना! 

Web Title: saptrang article shrimant mane