पेट्रोल, डिझेलचा भडका अमिताभपर्यंत

पेट्रोल, डिझेलचा भडका अमिताभपर्यंत

बिग बी म्हणजे ‘स्टार ऑफ द मिलेनियम’ अमिताभ बच्चन हे तसं पाहता सोशल मीडियातलं लोकप्रिय, लाडकं, आदरणीय व्यक्‍तिमत्त्व. ट्विटरवर जवळपास तीन कोटी फॉलोअर असणारे अमिताभ नियमितपणे ट्विट करणारे, प्रत्येक ट्विटला क्रमांक देण्यासारखी शिस्त पाळणारे, आतापर्यंत ५९ हजार ट्विट्‌स करणारे, बऱ्यापैकी तोलूनमापून टाकणारे ‘सेलेब्रिटी’ म्हणून ओळखले जातात.

परिणामी, त्यांनी ट्‌विट्‌सद्वारे एखाद्या घटनेची घेतलेली दखल बहुतेक वेळा मुख्य प्रवाहातल्या माध्यमांसाठी बातमीचा विषय असतो. फार कमी वेळा ते सोशल मीडियावर ‘ट्रोल’ होतात. तसा अपवादाचा प्रसंग बच्चन यांच्यावर ओढवला तो इंधन दरवाढीबद्दल देशभर उफाळून आलेल्या असंतोषामुळे. अर्थात, त्या संदर्भातलं ट्विट संशयास्पद आहे. अमिताभ यांच्या नावानं, केंद्रात संयुक्‍त पुरोगामी आघाडीचं, डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातलं सरकार सत्तेवर असताना, २६ मे २०१२ तारखेचं, ‘टी ७५६’ क्रमांकाचं ट्विट गेले तीन दिवस व्हायरल आहे. त्यावरून महानायकाचं जोरदार ‘ट्रोलिंग’ सुरू आहे. तथापि, या क्रमांकाचं अमिताभ बच्चन यांच्या ट्विटर ट्रेलमधलं ट्‌विट वेगळंच आहे. त्यात त्यांनी कृष्ण मेनन यांचा सत्य-असत्याबद्दलचा विचार मांडलाय. तसंही पहाटे पाच वाजण्याच्या सुमारात बिग बी काय ट्विट करतील, हे समजू शकते. व्हायरल ट्विटमध्ये म्हटलंय, ‘‘रामचंद्र कह गए सिया से, ऐसा कलयुग आएगा; गाडी खरीदोगे कॅशसे, और पेट्रोल लोन से आएगा.’’ आता त्यापेक्षाही गंभीर स्थिती आहे. पेट्रोल ८० रुपयांवर पोचलंय. लोक संतापले आहेत. चार-पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारातला कच्च्या तेलाचा दर पंचवीस-तीस टक्‍के इतका घसरलेला असताना भारतीय बाजारातले पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. तेल कंपन्यांच्या आडून सरकारच सर्वसामान्यांच्या खिशातला पैसा काढून घेत असल्याचा आरोप होतोय. 

विरोधी बाकावर असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी इंधनाच्या दरवाढीविरोधात केलेल्या आंदोलनाच्या, भाषणाच्या व्हिडिओ, ऑडिओ क्‍लिप्स व्हायरल केल्या जाताहेत. ‘भाजपच्या जाहिरातीत ‘जनता माफ नहीं करेगी’ असा इशारा देणाऱ्या महिलेला शोधा’, अशा ‘पोस्ट’ पडताहेत. नेत्यांना दरवाढीचं समर्थन करता करता भोवळ येऊ लागलीय. अल्फोन्स कन्नथम नावाच्या नव्या मंत्र्यांनी तर ‘वाहनधारकांची पेट्रोल-डिझेल भरल्यानं उपासमार होते का’ असं विचारून आगीत तेल ओतलंय. ...अन्‌ या वावटळीत अमिताभ बच्चन यांना ओढलं गेलंय. खरं खोटं अमिताभच जाणोत, पण, त्यांचं ‘यूपीए’ काळात व्यक्‍त होणं, ‘एनडीए’च्या सत्ताकाळात गप्प बसणं, पनामा पेपर्स वगैरे सारं काही निघालं. ‘‘सर, सच बताओ ये ट्विट करने से पहले कितनी बार सोचा था और कलेजे पर कितने किलो का पत्थर रखा था’’ असा प्रश्‍न एकानं विचारला, तर दुसऱ्या एकानं ‘‘कौन बनेगा करोडपती में रुपया के बदले पाच, दस, पंधरा, बीस लिटर पेट्रोल दे दो, अच्छा रहेगा,’’ असं सुचवलं.

द ओन्ली डे फॉर इंजिनिअर्स...
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरय्या यांचा जन्मदिन, १५ सप्टेंबर हा भारतात अभियंता दिन म्हणून साजरा होतो. जगात अन्यत्रही हा दिन साजरा होतो. उदाहरणार्थ- ब्राझीलमध्ये ११ डिसेंबरला, इटलीत १५ जूनला वगैरे. आपण म्हणतो, अभियंते हे समाजाचे, देशाचे शिल्पकार असतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्‍त करणारा हा दिवस. पण, अलीकडे अभियंत्यांना ‘अच्छे दिन’ नाहीत. नोकऱ्या दुरापास्त झाल्यात. अभियांत्रिकीचं शिक्षण नोकऱ्या मिळविण्याइतकं दर्जेदार नाही वगैरे बोललं जातं. तसे अहवालही अधूनमधून येत असतात. परिणामी, सोशल मीडियावर ‘इंजिनिअर्स डे’ साजरा होत असतानाही या बिकट परिस्थितीचं प्रतिबिंब उमटतंच, कारुण्यमय विनोद होतात. यंदाचे असे काही विनोद - ‘‘इंजिनिअर होणं अगदी पार्कमध्ये फिरण्याइतकं सोपं असतं म्हणे; इंजिनिअर्सनाच माहितेय की तो ज्युरासिक पार्क असतो.’’ ‘‘स्पेशल मेसेज टू दोज पॅरेंट्‌स हू टोल्ड अस’ अगर ‘इंजिनिअर नही बनोगे तो तुम्हारा कुछ नहीं होगा - बनके भी कुछ नहीं हो रहा है!’’ अन्‌ हा अखेरचा विनोद म्हणजे मास्टरपीस होता- ‘‘द ओन्ली डे व्हेन वर्डस हॅप्पी अँड इंजिनिअर आर सीन टुगेदर!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com