उंच लाटाचं दृश्‍य अन्‌ लॉबस्टरची मजा 

Saptrang Sunday Articles Jayprakash Pradhan travelogue
Saptrang Sunday Articles Jayprakash Pradhan travelogue

जगात समुद्रभरतीच्या सर्वांत उंच लाटा कुठं दिसतात आणि व त्या किती फूट उंचीच्या असतात? कॅनडातल्या न्यूब्रुन्स्विक व नोवास्कोशिया या प्रांतांच्या मध्ये असलेल्या "बे ऑफ फंडी' इथं हा अभूतपूर्व चमत्कार पाहायला मिळतो. हो! खरोखरच हा निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हवा. कारण भरतीच्या या लाटा 45 ते 50 फुटांपर्यंत उंच उसळत असतात. "हॉपवेल रॉक्‍स' म्हणून तो परिसर ओळखला जातो. ते दृश्‍य प्रत्यक्ष पाहण्याचा योग, त्या भागाची भटकंती करताना आला. 

चोवीस तासांत इथं दोन वेळा मोठी भरती व दोन वेळा ओहोटी दिवसा होते. भरती आणि ओहोटी यांच्या दरम्यान साधारणतः सहा तास 13 मिनिटांचं अंतर असतं. लाटांचं वेळापत्रक प्रत्येक दिवशी सुमारे एक तासानं पुढं-पुढं जातं. या खाडीच्या निरनिराळ्या भागांत त्यांच्यात थोडाफार फरक राहतो. "बे ऑफ फंडी'मधलं शंभर दशलक्ष टन पाणी दिवसातून दोन वेळा आत-बाहेर, जात-येत असतं! जगातल्या सर्व ताज्या पाण्याच्या नद्यांचे प्रवाह एकत्र केले, तरी ते यापेक्षा कमी होईल, असं सांगण्यात आलं. त्यामुळंच तिथल्या लाटांची उंची 45 ते 50 फुटांपर्यंत असते. अटलांटिक महासागरातल्या ठराविक उंचीच्या लाटांपेक्षा या लाटा पाचपट अधिक उंचीच्या असतात. या लाटा तीन पद्धतींनी पाहता येतात. त्यांचा उभा, आडवा मारा, वेग आणि उंची हे सारं दृश्‍य मोठं अभूतपूर्व असंच असतं. 

आम्ही तिथं सकाळी दहाच्या सुमारास पोचलो. मुख्य इमारतीच्या जवळ उतरलो, तर स्थानिक गाइड धावतच पुढं आला. ""आणखी दहा-पंधरा मिनिटांत भरती सुरू होईल. त्यामुळं सर्वप्रथम हॉपवेल रॉक्‍सच्या पायथ्याशी चला,'' असं त्यानं सांगितलं. आम्ही थोडं अंतर चालत गेलो. मग लोखंडी जिन्याच्या 99 पायऱ्या उतरून पायथ्याशी आलो. वर्षानुवर्षं लाटा आणि इथले दगड यांच्या संघर्षांतून दगडांना फ्लॉवरपॉटसारखे नानाविध आकार प्राप्त झाले आहेत. आता भरतीची वेळ जवळ येत होती. तोपर्यंत या दगडांच्या पायथ्याशी भटकून, भरपूर फोटो काढून घेतले. हळूहळू पाणी चढू लागलं होतं... आम्ही त्याच जिन्यानं वर आलो आणि वरच्या "व्ह्यू पॉइंट'वरून भरतीची मजा अनुभवू लागलो. पाहता-पाहता पाण्याचा जोर वाढू लागला. त्या दिवशीच्या अंदाजाप्रमाणं लाटा 42 फुटांपर्यंत जातील, असं सांगण्यात आलं. दोन-तीन तासांनंतर पुन्हा तिथं गेलो. पाणी अर्ध्यापर्यंत वाढलं होतं आणि जोरदार लाटा त्या दगडांना धडकत होत्या. ग्रीनलॅंडच्या बारा दिवसांच्या क्रूझ सफरीत "इल्युलिसाट' या हिमनगांच्या जागतिक राजधानीकडं जाताना बोटीला उंच-उंच लाटांचे तडाखे बसले होते. त्यावेळी छातीत धडकी भरली होती. मात्र, इथं दिसणारं दृश्‍य त्यापेक्षाही धडकी भरवणारं होतं. फरक एवढाच होता, की यावेळी आम्ही बोटीत नव्हतो, तर उंचावरून या लाटांच्या भराऱ्या पहात होतो. भरती संपेपर्यंत उभे राहून 40-45 फूट उंचीच्या लाटा पाहण्याची इच्छा होती; पण अन्य कार्यक्रमांमुळं ते शक्‍य नव्हतं. 

खडकांना वेगळे आकार 
इथल्या "हॉपवेल रॉक्‍स'ना फ्लॉवरपॉटचे जे आकार प्राप्त झाले आहेत, त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे. सुमारे तीस कोटी वर्षांपूर्वीपासून या कथेला सुरवात झाली. समुद्राच्या पाण्याच्या भरतीच्या लाटा या मऊ रेतीच्या खडकांच्या पायाला घासतात. त्यामुळं खालचा पाया कमजोर होत जातो आणि वरच्या कठीण भागाला आधार राहत नाही. ते खाली पडायला लागतात. त्यातूनच हे खडकांचे फ्लॉवरपॉट्‌स तयार झाले आहेत. त्यांचे आकार निरनिराळे असून विशेष म्हणजे ते बदलत आहेत. वसंत ऋतूत मॉइश्‍चरमुळे फ्लॉवरपॉट्‌सच्या वरच्या भागाचे तुकडे निघतात. तसंच हिवाळ्यात अटलांटिक सागरावरची ही खाडी गोठते. ग्लेशिअर्स, स्नो, लाटा आणि वारा यामुळं या खडकांचा सतत संघर्ष सुरू असतो. त्यात मोठे खडक मात्र हजारो वर्षं टिकू शकतात. "बे ऑफ फंडी'मधले फ्लॉवरपॉट्‌स अजून एक लाख वर्षं टिकू शकतील, असा भूगर्भाशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. 

"लॉबस्टर कूझ' 
"बे ऑफ फंडी'चा चमत्कार पाहण्याआधी "शेडिऍक बे'वरून आलो. तिथं प्रामुख्यानं मच्छिमारांची वस्ती आहे. गावात प्रवेश केला, तेव्हा मध्यवर्ती ठिकाणी "लॉबस्टर'ची (शिवडा) भली मोठी प्रतिकृती उभारण्यात आली होती. हा सारा परिसर लॉबस्टरसाठी प्रसिद्ध आहे. जगात एकूण तीस जातींचे लॉबस्टर आहेत. त्यात इथले "अंटलांटिक लॉबस्टर' फार प्रसिद्ध आणि चविष्ट मानले जातात. लॉबस्टरची नजर स्थिर असते. त्यामुळं लहानसहान हालचालीही तो टिपू शकतो. अटलांटिक लॉबस्टर हे सर्वसाधारणतः ऑलिव्ह रंगांचे असतात; पण प्रामुख्यानं त्यांचं अन्न आणि बाहेरचा प्रकाश यावर त्यांचा रंग अवलंबून असतो. लॉबस्टर हा दोन फुटांपर्यंत लांब व दोन पौंडापेक्षाही अधिक वजनाचा असू शकतो. 

"शेडिऍक बे'च्या बेटीत आम्ही अगदी आगळ्यावेगळ्या "लॉबस्टर क्रूझ'ची मजा अनुभवणार होतो. म्हणजे लॉबस्टर कशा पद्धतीनं पकडण्यात येतात, त्यांच्या विविध जाती कोणत्या आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीनं लॉबस्टर खायचा कसा, यासंबंधीचं प्रशिक्षण या अर्ध्या दिवसाच्या क्रूझमध्ये दिलं जाणार होतं. एका आलिशान; पण छोट्या क्रूझमधून सकाळी अकराच्या सुमारास आमचा प्रवास सुरू झाला. "शेडिऍक बे'चा सारा परिसर कमालीचा निसर्गरम्य. किनाऱ्यावरच्या मच्छिमारांची छोटी, रंगीबेरंगी घरं मागं टाकून आम्ही खाडीच्या चांगल्या मध्यवर्ती ठिकाणी आलो आणि लॉबस्टरसंबंधीची माहिती देणारा आमचा वर्ग सुरू झाला. 

या वर्गात आम्ही साधारणतः वीस पर्यंटक विद्यार्थी- विद्यार्थिनी (अर्थात मी आणि पत्नी वगळता बाकी सर्व गोरे) आणि तीन लॉबस्टर तज्ज्ञांचा समावेश होता. सर्वप्रथम आम्हाला दाखविण्यात आला तो "2 बाय 1' फूट लांबी-रुंदीचा जाळीचा पिंजरा. त्याला म्हणतात "लॉबस्ट्रर ट्रॅप.' पिंजऱ्याच्या बाहेर लॉबस्टरला आकर्षित करणारे फिश लावण्यात येतात. लॉबस्टरला दोन किलोमीटरपर्यंतचा वास येतो. या पिंजऱ्याला दोन कप्पे असतात. पहिला "किचन रूम.' लॉबस्टर पिंजऱ्यात अडकला, की किचन रूममध्ये येतो. मग पुडची लिव्हिंग रूम. या रूममध्ये तो "ट्रॅप' होतो. रोज हे पिंजरे पाण्यातून वर काढून त्यांची पाहणी केली जाते. कधी एक लॉबस्टर दुसऱ्या लॉबस्टरला खातोसुद्धा. न्यूब्रुन्स्विक भागात लॉबस्टर पकडण्याची परवानगी फक्त दोन महिने म्हणजे 9 ऑगस्ट ते 9 ऑक्‍टोबर याच कालावधीत दिली जाते आणि केवळ परवानाधारकांनाच ती मिळते. 

लॉबस्टर टीचर मायकेलनं "ट्रॅप'मध्ये दोन भले मोठे लॉबस्टर बरोबर पकडले होते. नर, मादी, त्यांच्या विविध जाती यांची माहिती तो देत होता. आता खऱ्या किचनमध्ये तयार झालेले लॉबस्टर खाण्याची वेळ आली होती. सर्वप्रथम प्रत्येकाला गळ्यात अडकवण्यासाठी छोटा ऍप्रन देण्यात आला. कारण लॉबस्टर खाताना त्याचा प्रसाद शर्टावर, टी-शर्टवर हमखास मिळतोच. प्रत्येकाच्या पुढं प्लेटमध्ये भला मोठा लॉबस्टर, तो तोडण्यासाठी नटक्रॅकर आणि आतला गर बाहेर काढून खाण्यासाठी दोन टोकं असलेला बारीक चमचा ठेवण्यात आला. 

मायकेलच्या हातातही लॉबस्टर आणि नटक्रॅकर होता. शास्त्रशुद्ध पद्धतीनं लॉबस्टर कसा खायचा याचं प्रात्यक्षिक तो दाखवत होता आणि त्याचं अनुकरण आम्हाला करायचं होते. नटक्रॅकरच्या साह्यानं एक-एक नांगी तोडायची आणि टोकदार चमच्याच्या साह्यानं त्यातला गर बाहेर काढून खायचा. अर्थात हे करताना कितीही काळजी घेतली, तरी त्याचा रस प्लेटभर पसरायचाच. शेजारच्या ताटात तो उडत नव्हता एवढंच नशीब! आयुष्यभर काट्या-चमच्यानं खाणाऱ्या अन्य गोऱ्या सहप्रवाशांचीही चांगलीच तारांबळ उडत होती. त्यामुळं साऱ्या क्रूझवरचं वातावरण हास्यकल्लोळात बुडून गेलं होतं. प्रत्येकाचे हात रश्‍शानं अक्षरशः माखले होते. मायकेल प्रत्येक टेबलावर मधूनमधून येऊन प्लेटमधला लॉबस्टर तोडायला मदतही करत होता. खायला कितीही त्रास पडो; पण अटलांटिक लॉबस्टर खायला एकदम चवदार. तो बनवण्याची त्यांची पद्धतही चांगली वाटली. स्वच्छ प्लेट वगैरे कल्पना मात्र लॉबस्टर खाताना पूर्णतः दूर ठेवावी लागते आणि त्याबद्दल कोणाचंच दुमत नसे. त्याची चव जिभेवर एवढी राहते, की अशा प्लेटकडं अखेरीस कोणाचं लक्षही जात नाही. 

हा संपूर्ण प्रदेश लॉबस्टरसाठी प्रसिद्ध आहे. ठिकठिकाणी केवळ लॉबस्टरचीच रेस्टॉरंट्‌स आहेत. त्याचा आस्वाद घेण्यासाठी दूरवरून खवय्ये येतात. अर्थात लॉबस्टर डिश तशी चांगलीच महाग असते. त्यासाठी प्रत्येकी 25 ते 30 डॉलर्स (दीड ते दोन हजार रुपये) मोजावे लागतात. मात्र, अनेक रेस्टॉरंट्‌समध्ये दुपारी 4 ते 6 या कमी गर्दीच्या वेळेत (हॅपी अवर्स) तुम्ही गेलात, तर 15 ते 20 डॉलरमध्ये लॉबस्टर मिळू शकतात. या संपूर्ण मुक्कामात तीन-चार वेळा लॉबस्टरचा आस्वाद घेतला. आजही त्याची आठवण झाली, की तोंडाला पाणी सुटतं... 

टायटॅनिक आणि हॅलिफॅक्‍स 
टायटॅनिक बोटीच्या दुर्घटनेचा आणि नोव्हास्कोशिया प्रांताची राजधानी हॅलिफॅक्‍सचा निकटचा संबंध असल्याचं वाचनात आलं होतं. हॅलिफॅक्‍सच्या तीन-चार दिवसांच्या मुक्कामात याची चांगली माहिती मिळाली.. एप्रिल 1912 मध्ये 1300 प्रवासी आणि 900 कर्मचाऱ्यांना घेऊन टायटॅनिक बोट मोठ्या दिमाखात न्यूयॉर्कच्या दिशेनं मार्गक्रमण करत होती. प्रत्येक वसंत ऋतूच्या आरंभी अटलांटिकच्या उत्तरेस अतिविशाल हिमनग पाण्यात पसरलेले असतात. त्याची कल्पना टायटॅनिकच्या कप्तानाला वेळोवेळी देण्यात येत होती; पण त्या इशाऱ्याकडं दुर्लक्ष करून टायटॅनिक वेगानं पुढं जातच होती... 

...14 एप्रिल रोजी रात्री 11 वाजून 40 मिनिटं झाली होती आणि एका अतिअजस्त्र हिमनगावर टायटॅनिक आदळली. (हा अजस्त्र हिमनगर मूळचा ग्रीनलॅंडमधल्या इल्युलिसाट इथला. तेथून तो तुटला, सुटला आणि हॅलिफॅक्‍सजवळ पोचला. या इल्युलिसाटला नुकतीच भेट दिली. तिथल्या निदान 100 - 125 मीटर उंचीच्या आणि चार-पाच किलोमीटर लांबीच्या हजारो हिमनगांच्या साम्राज्यात मनसोक्त भटकंती करण्याचा योगही नुकताच जुळून आला.) अवघ्या 2 तास 50 मिनिटांत म्हणजे 15 एप्रिल रोजी पहाटे दोन वाजून 20 मिनिटांनी या भव्य बोटीनं समुद्राचा तळ गाठला...ही दुर्घटना जिथं घडली, त्यापासून हॅलिफॅक्‍स हे बंदर सुमारे 700 मैलांच्या अंतरांवर होतं. ते सर्वांत जवळचं मोठं बंदर. त्यामुळं मदतीच्या सर्व हालचाली तिथूनच सुरू झाल्या. टायटॅनिक बुडत असताना, कनार्ड ही पहिली बोट तेथे पोचली आणि एकूण 700 जणांचे प्राण वाचू शकले. आता शोध घ्यायचा होता तो, मृतदेह मिळविण्याचा. हॅलिफॅक्‍सहून निघालेली पहिली बोट घटनास्थळी 20 एप्रिलला पोचली. सतत चार दिवस, या बोटीतले पाणबुडे समुद्राच्या तळाशी जाऊन मृतदेहांचा शोध घेत होते. जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी पाणबुडे वापरत असलेली उपकरणं किती प्रचंड वजनाची होती, याची कल्पना हॅलिफॅक्‍स इथल्या टायटॅनिक म्युझियममध्ये ठेवलेल्या त्या साहित्यावरून आली. अत्यंत वजनदार शिरस्त्राण, प्राणवायूची नळकांडी, पायातले बूट, कपडे घालून तळ गाठायचा आणि तोही गोठलेल्या बर्फातून... खरोखरच हे मोठं दिव्यकर्मच होतं...तरी 306 मृतदेहांचा त्यांनी शोध लावला; पण त्यापैकी 116 मृतदेह भयानक अवस्थेत होते. त्यामुळे त्यांना परत जलसमाधी देण्यात आली आणि बाकी मृतदेह घेऊन ही बोट हॅलिफॅक्‍सकडं निघाली... दुसऱ्या बोटीतून आणखी 15 मृतदेह आणण्यात आले. हॅलिफॅक्‍सला एक तात्पुरतं शवगार उभारण्यात आलं आणि 1 मे ते 12 जून या कालावधीत हॅलिफॅक्‍समधल्या खास दफनभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आम्ही या दफनभूमीला भेट दिली आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. आजही विविध ठिकाणांहून त्या दुर्दैवी जीवांचे नातेवाईक इथं येतात आणि फुलं ठेवून त्यांना आदरांजली वाहतात. 
म्युझियममध्ये अगदी समोर ठेवलेला बुटाचा लहान जोड आपलं लक्ष वेधून घेतो. "एका अनोळखी बालकाचा...' हे वाक्‍य चटका लावून जातं. तिथंच एक लाकडाची आरामखुर्ची ठेवली होती. टायटॅनिकमध्ये प्रथम वर्गाचे प्रवासी डेकवर बसून हवा खाण्यासाठी तिचा वापर करीत. अशा खुर्च्यांची संख्या मर्यादित असल्यानं ती उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक वेळी कर्मचाऱ्यांना टिप द्यावी लागत असे. या दुर्घटनेनंतर हॅलिफॅक्‍स शहरावरही शोककळा पसरली होती. त्याचं वर्णन करणारी वर्तमानपत्रांची कात्रणंही तिथं पाहायला मिळाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com