सरकारी सेवा एका क्‍लिकवर

sayali kshirsagar technodost article in saptarang
sayali kshirsagar technodost article in saptarang

वेगवेगळी बिलं भरण्यापासून पासपोर्टसाठी अर्ज करण्यापर्यंत अनेक गोष्टी आता विविध ऍप्सद्वारे करता येतात. अनेक सरकारी विभागांनी त्यांच्या सेवा ऍप्सच्या स्वरूपांत उपलब्ध करून दिल्यामुळं अनेक कामं घरबसल्या होऊ शकतात. अनेक गोष्टी सरकार दरबारी पोचवण्याची सोयही या ऍप्समध्ये आहे. अशाच काही उपयुक्त ऍप्सविषयी माहिती.

कोणतंही सरकारी केंद्र, वीजबिल भरणा केंद्र, तक्रारनिवारण केंद्र बघा. अशा केंद्रांच्या दारात नागरिकांची रांग ही नित्याची बाब असायची आणि अजूनही असते. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर पूर्वी या रांगा ओसंडून वाहायच्या; मात्र आता चित्र बदलू लागलं आहे. स्मार्ट फोन आणि इंटरनेट यांच्या मदतीमुळं तुम्ही या सरकारी सेवांशी संबंधित कामं, बिलं भरण्याची कामं घरबसल्या एका क्‍लिकवर करू शकता. पासपोर्ट काढण्यासारखं किचकट कामही आता डिजिटल मदतीमुळं लवकर होऊ शकतं. "डिजिटल इंडिया'च्या पार्श्वभूमीवर कॅशलेस होण्याबरोबरच शासकीय सेवाही डिजिटल व्हाव्यात या प्रयत्नात सरकार आहे. अशाच काही "सरकारी' ऍप्सबद्दल माहिती आपण जाणून घेऊ.

महावितरण (Mahavitaran) :
"वितरण' हे महाराष्ट्र राज्य वीजवितरण कंपनीचं अत्यंत उपयुक्त ऍप आहे. आता तुम्हाला महावितरण केंद्रापर्यंत जायची गरज नाही. या ऍपच्या मदतीनं फक्त एका क्‍लिकवर तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. विजेचं बिल भरणं, रिडींग तपासणं, आधीच्या वीजबिलांची सविस्तर माहिती घेणं, बिल भरल्यानंतर त्याची पावती मिळवणं अशा सर्व गोष्टी एका ऍपवर होतात. याचबरोबर नवीन वीजजोडणी, नाव-पत्ता बदलणं अशा कामांसाठीही हे ऍप उपयुक्त आहे. एकाच ऍपवरून तुम्ही एकापेक्षा अनेक वीजबिलंही भरू शकता. पैसे भरण्याचे विविध पर्याय या ऍपवर उपलब्ध आहेत. या ऍपवर ग्राहकसेवा केंद्र हे 24 तास आणि आठवड्यातले सातही दिवस सुरू असतं. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ऍपवरून वीजपुरवठ्याबाबत कोणतीही तक्रार नोंदवू शकता. ज्येष्ठ नागरिक, नोकरदार वर्ग यांच्यासाठी हे ऍप अत्यंत उपयुक्त आणि सोयीचं आहे. ते वापरायलाही सोपं आहे.

एम्‌-परिवहन (mParivahan) :
"एम्‌-परिवहन' हे सरकारच्या वाहतूक विभागाचं ऍप आहे. राज्यातल्या वाहतुकीसंबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी या ऍपवर उपलब्ध होतात. मोबाईलवरून अगदी सहज कोणतीही माहिती या ऍपद्वारे मिळू शकते. तसंच यावरून नागरिकांना लगेच प्रतिसादही मिळतो. नागरिकांचा प्रवास सहज व्हावा, त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि आलीच तरी ती लगेच दूर व्हावी याकडे या ऍपद्वारे लक्ष दिलं जातं. प्रादेशिक परिवहन मंडळाकडे (आरटीओ) नोंदणी झालेल्या वाहनांची सर्व माहिती या ऍपवर मिळते. गाडीच्या मालकाचं नाव, नोंदणी दिनांक, गाडीचं नाव आणि प्रकार, गाडीचा विमा, गाडीचं वय आदी गोष्टींबद्दलची सविस्तर माहिती या ऍपमध्ये मिळते. पार्किंग केलेल्या, अपघात झालेल्या किंवा चोरी झालेल्या गाडीची माहितीही या ऍपवरून सहज मिळते. या ऍपवरून नागरिक तक्रारही नोंदवू शकतात.

प्रतिसाद [Pratisaad (ASK) ]:
अलीकडच्या काळातले वाढते अत्याचार आणि गुन्हे बघता पोलिसांना त्याची माहिती मिळावी आणि ते त्या ठिकाणी लवकर व सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी "प्रतिसाद' या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांची या ऍपला अधिकृत मान्यता आहे. समाजात घडणाऱ्या गुन्ह्यांना पोलिसांचा त्वरित प्रतिसाद मिळावा या उद्देशानं हे ऍप सुरू करण्यात आलं आहे. दहशतवादी हल्ला, अपघात, दरोडा, महिलांवरील अत्याचार आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खबरदारीसाठी मुख्यतः या ऍपची मदत होते. या ऍपवर एकदा रजिस्टर केल्यानंतर एका कॉलवर किंवा एका क्‍लिकवर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. तातडीच्या वेळी अगदी पटकन्‌ या ऍपवरून नागरिक मदत मागू शकतात. हे ऍप 24 तास नागरिकांच्या मदतीला सज्ज असतं. महिलांसाठी तर हे ऍप अत्यंत महत्त्वाचं आणि उपयोगाचं आहे.

एम्‌-पासपोर्ट सेवा (mPassport Seva) :
परराष्ट्र मंत्रालयाच्या पासपोर्ट आणि व्हिसा विभागाकडून "एम्‌-पासपोर्ट सेवा' हे सेवेस तत्पर असलेलं ऍप उपलब्ध करून देण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी पासपोर्ट काढणं हे अत्यंत वेळकढू आणि किचकट काम होतं. मात्र, आता तंत्रज्ञान बदलत गेलं, तशी सेवा देण्याची प्रक्रियाही बदलत गेली. "एम्‌-पासपोर्ट सेवा' हे ऍप पासपोर्ट काढण्यासाठीशी संबंधित अनेक कामं करायला मदत करतं. अगदी पासपोर्टसाठी अर्ज करण्यापासून ते पासपोर्ट हातात येईपर्यंत सगळी माहिती आपल्याला या ऍपमध्ये कळते. यात पासपोर्टची फी, अपॉइंटमेंट, कागदपत्रांबद्दल माहिती, पासपोर्ट ऍप्लिकेशननंतर त्याचं स्टेटस याबद्दल सविस्तर माहिती ऍपवर मिळते. हे ऍप म्हणजे सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या ऍपमुळं पासपोर्ट आणि व्हिसासाठी लागणारा वेळ वाचू लागला आहे. भविष्यात या ऍपचा नक्कीच मोठा उपयोग होईल.

पुणे कनेक्‍ट (PuneConnect/ PMC CARE) :
"पुणे कनेक्‍ट' हे ऍप पुणे महापालिकेचं आहे. पुण्यातल्या नागरिकांसाठी सर्व सेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. या ऍपला "पीएमसी केअर' या नावानंही ओळखलं जातं. यातला CARE हा शब्द C- Citizens (नागरिक), A- Assistance (साह्य), R- Response (प्रतिसाद) आणि E- Engagement (सहभाग) या चार शब्दांवरून तयार करण्यात आला आहे. या ऍपचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे नागरिक या ऍपद्वारे तक्रारदेखील नोंदवू शकतात. या ऍपमध्ये नागरिक सहभागी होऊन आपल्या कल्पना, विचार मांडू शकतात; तसंच एकत्र येऊन चर्चाही करू शकतात. या ऍपद्वारे घरपट्टी व पाणीपट्टीही भरता येते. तसंच जन्म-मृत्यू दाखल्याची नोंद या ऍपवर नागरिक घेऊ शकतात. या ऍपवर सर्वेक्षणं होतात. त्यातही पुणेकर सहभागी होऊ शकतात. आता हे ऍप पुणेकरांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

इन्क्रेडिबल इंडिया कॅलेंडर (Incredible India Calendar) :
"इन्क्रेडिबल इंडिया कॅलेंडर' हे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचं महत्त्वपूर्ण ऍप आहे. भारतातल्या पर्यटनासाठी मार्गदर्शक म्हणून उपयुक्त असं हे ऍप देशातल्या सर्व पर्यटन ठिकाणांची माहिती देतं. पर्यटनाच्या माहितीबरोबरच हे ऍप कॅलेंडर म्हणूनही वापरता येतं. भारतात कुठंही फिरताना अनेक गोष्टींची इत्थंभूत माहिती असणं आवश्‍यक असतं. अशा वेळी या ऍपचा पुरेपूर उपयोग करता येईल. हे ऍप एक उत्कृष्ट "ट्रॅव्हल प्लॅनर' म्हणून काम करतं. भारतात कोणत्या दिवशी, कुठं, काही विशेष असल्यास हे ऍप आपल्याला त्याबद्दल सर्व माहिती देतं. भारत विविधतेनं नटलेला असल्यानं वर्षात सतत कोणत्या ना कोणत्या राज्यात किंवा अगदी खेडोपाडी पर्यटनाच्या दृष्टीनं विविध उपक्रम सुरू असतात, याबाबतची सविस्तर माहिती आपल्याला या कॅलेंडरमार्फत मिळू शकते. देशातल्या कानाकोपऱ्यात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांची माहितीही या ऍपद्वारे आपल्याला उपलब्ध होईल. बाहेर फिरायला जात असाल, तर हे ऍप नक्कीच एक वाटाड्या म्हणून मदत करेल.

स्वच्छ भारत अभियान (Swachh Bharat Abhiyaan) :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्‍टोबर 2014 रोजी सुरू केलेलं स्वच्छ भारत अभियान देशभर गाजलं. त्यानंतर नागरिकांनी या उपक्रमाला सामाजिक चळवळीचं रूप दिलं. याच उपक्रमाच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या केंद्रीय नागरी विकास मंत्रालयानं "स्वच्छ भारत अभियान' हे ऍप सुरू केलं. या ऍपवरून कोणीही आपल्या परिसरातल्या अस्वच्छतेसंबंधीची तक्रार नोंदवू शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या परिसरातली एखादी कचरापेटी वाहून जात असेल, तर त्याचा फोटो काढून या ऍपवर अपलोड करा. या ऍपवर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था लिंक करण्यात आल्या आहेत. त्यामुळं तुमची तक्रार त्या परिसरातल्या प्रशासनाला मिळेल आणि त्यानुसार पुढची कारवाई होईल. या ऍपवर टाकलेल्या फोटोंमुळं त्या जागेची माहिती मिळू शकते. तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला त्याचे अपडेट्‌स मिळत राहतात आणि तुमची अडचण लवकरच दूर होण्यास मदत होते.

उमंग (UMANG - Unified Mobile Application for New-age Governance) :
केंद्र सरकारच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी विभागानं आणि नॅशनल ई-गव्हर्नन्स विभागानं या "उमंग' ऍपची निर्मिती केली आहे. देशातल्या नागरिकांना ई-गव्हर्नन्सची सवय लागावी आणि कागदपत्रांचे व्यवहार कमी व्हावेत, हा या ऍपचा मुख्य उद्देश आहे. या ऍपवर देशभरातल्या सर्व नागरिकांसाठी "ई-गव्हर्नमेंट सर्व्हिसेस' उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ऍपवर ग्रामपंचायतीपासून ते केंद्र सरकारपर्यंत सर्व सरकारी कार्यालयं, प्रशासकीय कार्यालयं, मंत्रालयं लिंक करण्यात आली आहेत. ऍपवर दोनशेहून अधिक सेवा उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, पासपोर्ट सेवा, महावितरण सेवा, करप्रणाली, तक्रारनिवारण केंद्र, जागांचे व्यवहार आदी अनेक सेवा या ऍपवर उपलब्ध आहेत. हे ऍप कॅशलेस व्यवहारांनाही प्रोत्साहन देतं. ऍपचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सरकारच्या वेगवेगळ्या ऍप्सवर उपलब्ध होणाऱ्या सेवा तुम्हाला केवळ एकट्या "उमंग' ऍपवर मिळू शकतात. यामुळं वेळेबरोबरच पैसेही वाचण्यास मदत होते.

ही आणि या प्रकारची सरकारची अनेक ऍप्स नागरिकांच्या सेवेसाठी कायम तत्पर असतात. "स्वच्छ भारत', "व्हेईकल इन्फो', "ऑनलाइन आरटीआय ऍप', "इंडियन रेल्वे ऍप', "भीम ऍप' अशी ऍप्स खरोखर नागरिकांसाठी गरजेची आणि भविष्याच्या दृष्टीनं महत्त्वाची आहेत. फक्त नागरिकांनी अधिक स्मार्ट बनून याचा पुरेपूर उपयोग करायला हवा..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com