सच की पाठशाला ...

आपल्याकडे बरेच मोठे विचारवंत, समाजसुधारक, संत होऊन गेले. महाराष्ट्रात तर संतांची परंपराच आहे.
सच की पाठशाला ...
सच की पाठशाला ...sakal

आपल्याकडे बरेच मोठे विचारवंत, समाजसुधारक, संत होऊन गेले. महाराष्ट्रात तर संतांची परंपराच आहे. या सर्वांनी विविध विषयांवर त्यांचे परखड मत मांडले. त्याच्यातील जे मत, विचार हे शिक्षणाच्या संदर्भात होते किंवा त्यांच्या प्रबोधनातील जे विचार आजच्या शिक्षणाला लागू होतात अशा सर्व भारतीय विचारवंतांचा, संतांचा, समाजसुधारकांचा आणि त्यांच्या विचारांचा आपण अभ्यास करणार आहोत.

शिक्षणाबाबत ‘ओशों’चे क्रांतिकारी विचार

शिक्षणाबाबत भारतीय विचारवंतांचे विचार आणि नवं शैक्षणिक धोरण यांच्यातला ताळमेळ अभ्यासताना रजनीश ओशो यांचे शिक्षणविषयक क्रांतिकारी विचार ठळकपणे लक्षात येतात. गुलाब ‘गुलाब’ असतो, मोगरा ‘मोगरा’ असतो. गुलाबाला मोगरा, तर मोगऱ्याला गुलाब करता येत नाही. फुलांची एकमेकांशी तुलनाच होऊ शकत नाही. माळ्याचं काम एवढंच असतं उत्तम खत-पाणी घालणं. मुलांच्या शिक्षणाबाबत पण असंच असतं.’ हा प्रभावी विचार मांडला रजनीश ओशो यांनी.

ओशो हे अशा काही दुर्मिळ तत्त्वज्ञानांपैकी एक असतील, ज्यांनी शिक्षणाचा इतका खोलात जाऊन विचार केला. त्यांनी सांगितलं, की सर्व जगात अनेक प्रकारच्या क्रांती झाल्या; पण मनुष्य आत्तापर्यंत आनंदी होऊ शकला नाही. आता एकच क्रांती व्हायची शिल्लक आहे, ती म्हणजे ‘शिक्षणक्रांती.’ त्यांनी शिक्षण या विषयावर अनेक भाष्य केली, व्याख्यानं दिली. त्यावर ‘शिक्षणक्रांती’ नावाचं त्यांचं पुस्तकदेखील प्रसिद्ध आहे. जे नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आज सांगतं ते रजनीश ओशोंनी चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी मांडलं होतं. त्यांच्या शिक्षणाबाबत विचारामागे फक्त तत्त्वज्ञान नसून बालमानसशास्त्र आहे. जे प्रत्यक्ष अमलात आलं तर प्रत्येक व्यक्ती अद्‌भुत होऊ शकते. ते म्हणतात, ‘पहिल्या पाच-सहा वर्षांत माणसाचं पन्नास टक्के शिक्षण पूर्ण होतं.’ आता हाच त्यांचा विचार व्यक्त करत मज्जामेंदूशास्त्र सांगतं, की पहिल्या आठ वर्षांत माणसाच्या ८० टक्के मेंदूची जडणघडण होते. जितकी मेंदूच्या पेशींना चालना मिळेल तेवढा मेंदू तल्लख होतो. हाच विचार ते तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र यांच्या सहाय्याने लोकांना समजावून देत असत.

ओशो म्हणतात, ‘आत्तापर्यंत शिक्षक यावरच जोर देत आले आहेत, की बांधीव उत्तरंच द्या; कारण तेच बरोबर आहे.’ पुढे ते म्हणतात, ‘भविष्यातील शिक्षकांना उलट जोर यावर द्यावा लागेल, की मेहेरबानी करून बांधीव उत्तर देऊ नका. नवीन उत्तर शोधा.’ आता हेच त्यांचे विचार हा ज्ञानरचनावादाचा पाया आहे. शिक्षणातलं ज्ञानरचनावादाचं महत्त्वाचं सूत्र आहे, की ‘विद्यार्थी त्यांची ज्ञाननिर्मिती स्वतः करतील.’ म्हणजे जे ओशोंनी सांगितलं, की भविष्यातील शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतःचं उत्तर सांगायला प्रोत्साहित करतील.’ ते आजच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.

ओशो त्यांच्या एका भाषणात म्हणतात, की भूतकालीन ज्ञान देणं ही तांत्रिक गोष्ट आहे आणि भविष्यातला नागरिक घडवणं ही सर्जनात्मक प्रक्रिया आहे.’ हे अगदी खरं आहे, की आज सर्व भूतकालीन माहिती-ज्ञान गुगलवरून मिळतं; पण भविष्यातले नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यावर खूप सर्जनात्मक काम करणं अपेक्षित असतं. त्यासाठी ओशो म्हणतात, की मेमरीला-स्मृतीला शिक्षणाच्या केंद्रापासून हटवावं लागेल. याचाच अर्थ घोका आणि ओका ही शिक्षणपद्धती बंद करून संकल्पना समजण्यावर आपल्याला भर द्यावा लागेल. ते म्हणतात, ‘आपल्या साऱ्या परीक्षा या निव्वळ स्मरणशक्तीच्या परीक्षा आहेत. विविध स्तरांवर बुद्धितमत्तेचा कस लागणाऱ्या परीक्षा नाहीत. परीक्षांमधून आम्ही

फक्त याच गोष्टीची माहिती करून घेतो, की कोणती व्यक्ती बरोबरपुनरावृत्ती करू शकते; पण नुसती पुनरावृत्ती करणारा माणूस प्रत्यक्ष जीवनात हरवूनच जाईल. कारण जीवन रोजचं नवे नवे प्रश्न उभे करत असतं.’थोडक्यात, ओशोंना म्हणायचं होतं, की विद्यार्थ्यांना जीवनाच्या प्रश्नांचा थेट सामना करू द्या. ‘२१ अपेक्षित’सारखं जीवन नसतं, हेच नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सांगतं. त्याच्या उद्दिष्टातच म्हटलं आहे, की विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्कील-समस्या सोडविण्याचं कौशल्य-विकसित करणं, हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. हेच तर ओशो सांगतात.

मी जसं सुरवातीला म्हटलं, की ओशोंनी शिक्षणावर खोलात भाष्य केलं याचा अजून एक नमुना म्हणजे ते म्हणतात, ‘या जगात एवढा द्वेष आणि तिरस्कार कुठून आला, तर त्याची सुरवात वर्गात पहिल्या येण्याच्या स्पर्धेने होते.’ ते म्हणतात, ‘आमचं शिक्षण चेहरे दुःखी बनवतं, पराभूत बनवतं; उदास बनवतं.’ वर्गात एका विद्यार्थ्याला सन्मानित करण्यासाठी तीसपैकी एकोणतीस विद्यार्थ्यांना आपण हरणं शिकवतो. ‘तू नाही येऊ शकत पहिला,’ या विचाराने त्याच्यामध्ये हीनतेची भावना निर्माण होते. त्याला अपयशी होणं कंडिशनल केलं जातं. एका विद्यार्थ्याला वर्गात पहिलं आणून इतर विद्यार्थ्यांच्या मनात स्पर्धा निर्माण होते. स्पर्धेमधून कधीही प्रेम निर्माण होत नाही, निर्माण होतो तो फक्त द्वेष. किती खोल शिरून ओशोंनी सगळा विचार केला आहे. मानसशास्त्रीयदृष्ट्या हा विचार अगदी बरोबर आहे, म्हणून बरेच शिक्षणतज्ज्ञ म्हणतात ‘मेरिट लिस्ट काढून टाका.’ ओशोंनी द्रष्टेपणाने शिक्षणाबद्दलचे विचार मांडले म्हणून त्या संदर्भातही ओशो महत्त्वाचे ठरतात.

ओशोंचं खरं नाव चंद्रमोहन जैन होतं. पुढे त्यांचे शिष्य त्यांना ‘रजनीश’ म्हणून संबोधू लागले आणि पुढे जग त्यांना ‘ओशो’ म्हणून ओळखू लागलं. ते एक भारतीय विचारवंत होते. त्यांचं संपूर्ण आयुष्य विवादास्पद राहिलं. त्यांचे विचार अतिशय क्रांतिकारी असल्याने सहजासहजी ते स्वीकारले जात नसत. पुढे त्यांचे विचार मान्य होत गेले, ती एक जगण्याची विचारसरणी बनली. ते एक आध्यात्मिक शिक्षक म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचा जन्म मध्य प्रदेश इथल्या ‘रामसेन’ शहरातल्या ‘कुचवाड’ गावातला. ते तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी होते. त्यांनी सहाशेहून अधिक पुस्तकं लिहिली. पण ‘शिक्षा में क्रांती’ हे त्यांचं पुस्तक शिक्षणक्षेत्रातील पालक-शिक्षक विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभाचं काम करतं. ओशोंनी शिक्षकांसाठी खूप क्रांतिकारी विचार मांडले. त्यांच्या मते शिक्षक हा ‘विद्रोही’ असला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये जो जिज्ञासा जागृत करतो तोच शिक्षक. ज्ञानरचनावादही हेच सांगतो, की शिक्षक हा फॅसिलेटरच्या भूमिकेत हवा. विद्यार्थी त्याचं ज्ञान स्वतः निर्माण करेल; त्या प्रक्रियेत शिक्षकाने सहाय्य करायचं आहे. त्याने विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करायची आहे. जेणेकरून विद्यार्थी स्वतः शिकेल.

ओशो म्हणतात, ‘विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर केला पाहिजे, ही अपेक्षाच चुकीची आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा आदर केला पाहिजे. तसं झालं तर विद्यार्थी शिक्षकांवर प्रेम करेल. शिक्षक हा विद्रोही असला पाहिजे म्हणजे मूल्य विचारांत त्याने क्रांती आणली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. म्हणजे मूल्य कालातीत असली तरीही कालानुरूप त्यांना वळणं लावून ती उपयोगात आणता आली पाहिजेत. ओशो म्हणतात, ‘शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे, की तू तूच हो, कोणासारखा बनू नको. कोणी सांगत रामासारखा हो, कोणी सांगतं कृष्णासारखा हो. आजपर्यंत कोणी कोणासारखा बनला आहे का? राम-कृष्णाच्या काळापासून आजतागायत कोणी राम नाही होऊ शकला ना कोणी कृष्ण. ते म्हणतात, सर्व खटपट नकली माणसं निर्माण करण्याची चालू आहे. कोणी कोणाला कॉपी करू शकत नाही. मी फक्त ‘मीच’ होऊ शकतो. जेव्हा दुसऱ्याला कॉपी करतो तेव्हा माणूस दोन चेहरे निर्माण करतो.

अतिशय खोलात जाऊन त्यांनी हा विचार मांडला आहे. आज गरज आहे तरुणांना सांगायची, की तुमची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही. ‘तुम्ही तुम्हीच बना’ एका ठिकाणी रजनीश असं म्हणतात, की ‘विद्यार्थ्यांना शास्त्र गणित हे विषय गायन-नृत्याच्या माध्यमातून शिकवा.’ आज त्याचे अनेक प्रयोग चालू आहेत. सीबीएससी बोर्डने इंटिग्रेटेड करिक्युलमबाबत सूचना दिल्या आहेत. सांगायचा मुद्दा हा, की ओशोंचे विचार खऱ्या अर्थी अंमलात आणले तर आपले विद्यार्थी इनोव्हेशनमध्ये, नवनिर्मितीमध्ये अग्रस्थानी राहू शकतात.

सचिन जोशी

espaliersachin@gmail.com

(लेखक ज्येष्ठ शिक्षण अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com