स्वच्छंद विचार अन्‌ बलात्कार..!

स्वच्छंद विचार अन्‌ बलात्कार..!

एखादी तरुणी आपल्या बॉयफ्रेंडबरोबर रात्री उशिरा चित्रपट पाहण्यासाठी का जात असेल? आणि तेही अतिशय घट्ट जिन्स आणि टी-शर्ट घालून. हा स्वैराचार नव्हे काय आणि याबाबत तिने आपल्या पालकांना आणि महाविद्यालयाला काहीही माहिती दिलेली नसते, हे असे का?

चालकासह स्वतःची कार या तरुणीला पुरवू शकतील एवढे तिचे वडील श्रीमंत नसतानाही ती चित्रपट पाहण्यासाठी का जाते? रिक्षा किंवा टॅक्‍सी करण्यासाठी लागेल एवढे अधिकचे पैसे तिच्याकडे किंवा तिच्या बॉयफ्रेंडकडे नसतानाही, एवढ्या रात्री बाहेर जाण्याचा हा अट्टाहास का? रात्रीच्या वेळी दिल्लीतील निर्मनुष्य रस्त्यांवर ती तरुणी आपल्या मित्रांबरोबर का फिरते आणि सहा वाह्यात तरुण असलेल्या बसमधून प्रवास करण्यास का तयार होते? बसच्या आतमध्ये ठिकठिकाणी सामूहिक बलात्काराबाबतची वाक्‍ये लिहिलेली असतानाही हे दोघे एवढा निष्काळजीपणा कसा काय दाखवतात? 

अशी परिस्थिती किती धोकादायक ठरू शकते, हे दोघांपैकी कोणालाही कसे ध्यानात येत नाही? हा कुठल्या प्रकारचे धाडस किंवा निष्काळजीपणा आहे? तुम्ही तुमच्या पालकांना फोन करून मदत किंवा सल्ला का विचारत नाहीत? बसमध्ये असलेले तरुण त्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करतात आणि तिच्या मित्राला मारहाण करतात; पण संबंधित सहा तरुणांना मोह वाटेल अशी परिस्थिती निर्माण करण्यास तुम्हीच कारणीभूत नाहीत का? आणि जेव्हा ते अशा मोहाला बळी पडतात तेव्हा आसाराम बापूने सांगितल्याप्रमाणे त्या तरुणांना तुम्ही माझे भाऊ आहात, असे ती का सांगत नाही किंवा त्यांच्या हातांवर राखी का बांधत नाही?

हे सर्व करूनही जर उपयोग झाला नाही तर मग तुम्ही त्या परिस्थितीला शरण जात तिचा स्वीकार का करत नाहीत? असे केल्यास तुमची मृत्यू किंवा हिंसेपासून सुटका होऊ शकते. अशा परिस्थितीत विरोध न करणे हाच चांगला पर्याय असू शकतो, कारण असा विरोध करणे जीवघेणे ठरू शकते. 

आरोपी असलेल्या तरुणांनी जर तुमचा खून केला नाही तर त्यांना सौम्य स्वरूपाची शिक्षा होऊ शकते. बलात्काराच्या ज्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा करण्यात आलेली नसते, अशा प्रकरणांमध्ये आरोपींना सौम्य शिक्षा दिली जाते. त्यामुळे हे हिंसा नसलेले बलात्काराचे आणखी एक प्रकरण ठरते. असे हिंसा नसलेले बलात्कार कुटुंबीयांकडून, डेटिंगवेळी किंवा मद्याच्या अमलाखाली होतात आणि त्यांचे प्रमाण ८५ टक्के आहे. 

बलात्काराच्या अशा घटनांची शिकार ठरलेल्या तरुणींना अखेर काही दिवसांनी सामान्य आयुष्य जगणे भाग असते. बंगळूरमधील प्रसिद्ध राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मेंदूविज्ञान संस्थेच्या (एनआयएमएचएएनएस) तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञांकडून त्यांना समुपदेशन केले जाते. या समुपदेशनासाठी न्यायालये ही उदार अंतकरणाने ‘एनआयएमएचएएनएस’च्या संचालकांना आदेश देतात आणि त्यावरील कार्यवाहीचा अहवाल आपल्याला सादर करण्यासही सांगतात. 

अशा घटना त्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व आठही जणांसाठी शोकांतिकाच ठरते; तसेच या घटनांमुळे त्यात सहभागी असलेल्यांची कुटुंबेही खोल गर्तेत जातात. एक तरुणाचे आयुष्य उद्‌ध्वस्त होते, एक जण आत्महत्या करतो, एकास शारीरिक व मानसिक जखमांसह जगणे भाग पडते आणि उरलेल्या चौघांना फाशी होणार आहे. हे तरुण स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबीयांनाही अतिशय वाईट परिस्थितीत लोटून देतात, हेही तेवढेच दुर्दैवी असते. पीडित असो की आरोपी, सर्वांच्याच वाट्याला कमी अधिक फरकाने हेच  भोग येतात. 

देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया (ज्योती) सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाच्या संदर्भात जे काही मी वर लिहिले आहे, ते वाचून तुमचे डोके संतापले असलेच. तुमचे डोके फिरावे, हाच माझा या लेखनामागचा उद्देश आहे आणि तो सफल  झाला आहे. 

‘निर्भया’ प्रकरणानंतर दोन वर्षांनी राजधानी दिल्लीपासून जवळच हरियानातील सोनीपत येथे जी घटना घडली त्याचा आपण आता विचार करू. एका खासगी संस्थेतील विद्यार्थिनीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली की तिचा बॉयफ्रेंड (जो त्याच संस्थेत शिकत होता) तिला ब्लॅकमेल करत होता. त्याने आणि त्याच्या मित्रांनी आपल्यावर बलात्कार केला. थोडक्‍यात, सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार विद्यार्थिनीने दिली होती. स्पष्ट सांगायचे तर ही संस्था आहे प्रतिथयश ‘ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी’. या संस्थेतील हे प्रकरण. 

तरुणीचा असा दावा आहे की, तिचा प्रियकर स्वतःची नग्न छायाचित्रे तिला पाठवत होता आणि तिलाही अशीच छायाचित्रे पाठविण्यास भाग पाडत होता. त्यानंतर ब्लॅकमेल करत संबंधित छायाचित्रे कॅम्पसमध्ये सार्वजनिक करण्याची आणि तिच्या पालकांपर्यंत पोचविण्याची धमकी तो देत होता. निर्भया प्रकरणानंतर नव्याने तयार करण्यात आलेल्या कठोर अशा कायद्याच्या अंतर्गत संबंधित तरुणीचा रीतसर जबाब नोंदविण्यात आला आहे, हे येथे ध्यानात घ्यावे लागेल. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तरुणीने दिलेल्या जबाबात आरोपीवर ब्लॅकमेल करणे, बलात्कार करणे आणि बळजबरीने मद्य व अमली पदार्थांचे (गांजा) सेवन करण्यास भाग पाडल्याचे आरोप केले आहेत. एवढेच नाही तर ‘सेक्‍स टॉय’ खरेदी करण्यास भाग पाडणे आणि त्याचा उपयोग करत असताना तिला ‘स्काइप’च्या माध्यमातून पाहण्याचा आनंद उपभोगणे, असे आरोप तरुणीने केले आहेत. 

या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. दोन्हीही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आले. अशा प्रकरणांमध्ये हातखंडा असलेल्या प्रसिद्ध वकिलांची फौज दोन्ही बाजूंनी उतरवली. सुनावणीवेळी न्यायाधीशांनी तरुणीचे आरोप ग्राह्य धरले आणि आरोपी असलेल्या तीन तरुणांना बलात्कार, ब्लॅकमेल करणे, आयटी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली. बलात्कारासाठी २० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.

दोषी ठरविण्यात आलेल्यांनी पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयात अपील करत शिक्षेला आव्हान दिले. आपल्या व्यवस्थेतील परंपरेनुसार हे अपील अद्यापही प्रलंबित आहे. देशभर गाजलेल्या आरुषी खून खटल्यातील दंतवैद्यक असलेल्या पालकांचे अपीलही अशाच प्रकारे २०१३पासून अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 

दरम्यान, मागील आठवड्यात पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाने शिक्षा ठोठविण्यात आलेल्या तीन आरोपींना जामीन मंजूर केला; तसेच त्यांची शिक्षाही स्थगित केली. या प्रकरणात काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्यामुळे न्यायालयाने जामीन मंजूर केला असला, तरी न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, या निर्णयामुळे अपिलावर काहीही परिणाम होणार नाही. अपिलावर निर्णय होण्यास आपल्याकडे प्रचंड वेळ लागतो, तोपर्यंत दोषी ठरविण्यात आलेल्या तरुणांना जामीन देत आपल्या आयुष्यांची पुन्हा एकदा नव्याने बांधणी करण्याची संधी मिळावी, शिक्षण पूर्ण करण्याची; तसेच न्यायालयाच्या संमतीने शिक्षणासाठी विदेशी जाण्याची परवानगी देणे योग्य ठरेल, असे मत न्यायालयाने नोंदविले आहे. या तरुणांचे समुपदेशन करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्लीतील ‘एम्स’च्या संचालकांना दिले आहेत; तसेच पालकांनीही तरुणांना पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करावी, असे आदेशात म्हटले आहे. 

न्यायाधीशांच्या आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा माझा उद्देश नाही. या प्रकरणातील पीडित तरुणीची पार्श्वभूमी, वर्तणूक आणि दोषी ठरलेल्यांशी तिच्या असलेल्या नात्यांचा इतिहास पाहून काही महत्त्वाच्या बाबी न्यायाधीशांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे, हे यातून आपल्याला दिसून येते. त्यावर युक्तिवाद करण्याचे येथे काहीही कारण नाही. त्यामुळे अपिलासंदर्भात अंतिम निकालाची वाट पाहणे येथे योग्य ठरेल. 

या प्रकरणातील न्यायालयाच्या बारा पानांच्या आदेशातील काही परिच्छेद मी पुढे नोंदविले आहेत. त्यासाठी कायद्याचे ज्ञान असलेली माझी सहकारी अपूर्वा विश्वनाथ हिने त्यासाठी मदत केली आहे. पुढील परिच्छेद वाचून माझा युक्तिवाद तुम्हाला पटतो का ते पाहा.

उलटतपासणीच्या वेळी पीडित तरुणीने दिलेल्या माहितीवरून ज्या बाबी समोर आल्या आहेत त्यानुसार एका विशिष्ट काळात तरुणीचे दोषी ठरविण्यात आलेल्या तिघांशीही लैंगिक संबंध होते. यामुळे आपल्याला मानसिक त्रास होत असल्याची कुठलीही तक्रार तिने महाविद्यालयाच्या प्रशासन किंवा पालक किंवा मैत्रिणींकडे केली नव्हती किंवा तशी कल्पना दिली नव्हती, अशी माहिती समोर आली. 

तिच्या वसतिगृहातील खोलीमध्ये वॉर्डनला कंडोम आढळून आले होते. मात्र, त्याबाबत पालकांना काहीही माहिती देण्यात आली नव्हती, असे तरुणीने मान्य केले होते. तिला धूम्रपान करण्याची सवय होती. काही अमली पदार्थांचे सेवन केल्याचेही तिने मान्य केले.

या प्रकरणातून दिसून येते की, बिघडणाऱ्या नातेसंबंधातील तणावापासून दूर जाण्यासाठी अमली पदार्थांचे सेवन, मद्यपान, निष्काळजीपणे केलेली लैंगिक साहसे आदींचा आधार घेण्याची तरुण पिढीची मानसिकता समोर येते. त्यामुळे जी शोकांतिका वाट्याला येते त्यात कुटुंबांसह साऱ्यांचीच आयुष्ये होरपळून निघतात. 

तरुण पिढी स्वतःला आणि आपल्या कुटुंबीयांना अशा प्रकारच्या दुर्दैवी परिस्थितीत लोटते हे अतिशय दुर्दैवी आहे.

यातून पीडित तरुणीचे तिच्या मित्रांशी असलेले नातेसंबंध, धाडसी लैंगिक प्रयोग आणि निष्काळजीपणे आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा अनेक बाबी समोर येतात; तर दुसरीकडे दोषी ठरवण्यात आलेले सर्व जण तरुण असून, या प्रकरणात हिंसा करण्यात आलेली नाही. त्यामुळे दोषींची शिक्षा स्थगित करण्याच्या निष्कर्षापर्यंत न्यायालय  आले आहे. 

यातून मला न्यायालयाच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. मला कोणाचे उदात्तीकरणही करायचे नाही. जोनाथन कॅपलानच्या १९८८मध्ये आलेल्या पारितोषिकप्राप्त ‘द ॲक्‍युजड्‌’ चित्रपटाची कथाही अशीच आहे. या चित्रपटातील अभिनेत्री ज्युडी फॉस्टर ही सामूहिक बलात्काराची शिकार ठरते. तिचे अनेकांबरोबर संबंध होते, मात्र आता ती इतरांना दोष देत आहे, असा युक्तिवाद करण्यात आला होता. १९८८च्या या चित्रपटातही हा युक्तिवाद स्वीकारण्यात आला नव्हता. आजमितीस २०१७ मध्येही ताे स्वीकारला जाऊ नये.

(अनुवाद : अशोक जावळे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com