प्रस्थापितविरोधी नेत्याचे राजकारणात आगमन 

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal

राजधानी दिल्ली ताब्यात आल्यानंतर आणि पंजाब, गोव्यात प्रभाव पडण्याची शक्‍यता असल्याने राजकारण आणि निवडणुका म्हणजे फार्स असल्याचा दावा "आप' आणि अरविंद केजरीवाल करू शकत नाहीत. या पक्षातही दुर्गुण आहेत; पण तरीही हा पक्ष आकर्षक वाटतो. 

राजकारण आणि राजकारण्यांच्या विरोधात सुमारे आठ वर्षांपूर्वी "अण्णा चळवळ' सुरू झाली होती. भारतीय समाज, अर्थव्यवस्था आणि राजकारणातील वाईट बाबींना राजकारण आणि राजकीय नेतेच जबाबदार असल्याचा दोष त्यातून देण्यात आला. "नेता' हा शब्द जणू कुत्सितपणाने वापरण्यासारखा झाला. प्रख्यात लेखक चेतन भगत यांना आता "मेरा नेता चोर है' या वाक्‍याची, भावनालहरीची आठवणही नको असेल. भ्रष्टाचारविरोधी किंवा "गंजलेल्या' राजकीय व्यवस्थेविरोधातील या चळवळीत लवकरच समाजातील मध्यमवर्गीय आणि शहरी व्यावसायिकवर्ग सहभागी झाला. 

या चळवळीत समजातील सर्वच वर्ग सहभागी झाल्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे सहानुभूतीदार, डावे- उदारमतवादी आणि बाबा रामदेवांपासून निवृत्त लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह, माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी किरण बेदींपर्यंत आणि प्रशांत भूषण यांच्यापासून शबाना आझमी, ओम पुरी, आमिर खानपर्यंत सगळ्यांनीच या चळवळीला पाठिंबा दिला. अण्णा हजारे यांच्या "वादळी सैनिकां'नी (स्टॉर्मट्रुपर्स) अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली ती चालविली.

निवडणूक प्रक्रिया भ्रष्टाचाऱ्यांसाठी होती, मद्याची एक बाटली आणि पाचशे रुपयांच्या बदल्यात लोक मत विकतात, संसदेत गुन्हेगार, चोर आले अशी स्थिती असताना आठशे लोकांनी (संसदेच्या दोन्ही सभागृहांत मिळून) देशातील एक अब्ज 25 कोटी नागरिकांचे भवितव्य ठरविण्यासाठी काय केले? सत्तेचा चांगला उपयोग झाला पाहिजे, प्रशासन आणि कायदा तळागाळापर्यंत पोचावयास हवा आणि व्यवस्थेत आमूलाग्र बदल हवा. थोडक्‍यात, क्रांती घडविण्यासाठी कोणत्याही बाबीची कमी नव्हती. 

या सगळ्यात अण्णा हजारे म्हणजे महात्मा गांधीजी असल्याचे भासविले गेले आणि उत्साही कार्यकर्ते, फुटकळ समाजवादी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे टीव्ही अँकर यांनी त्यांचा उदोउदो सुरू केला. अण्णांनी त्यांचे सर्वांत महत्त्वाचे बेमुदत उपोषणाचे अस्त्र गांधीजींकडून जणू उधार घेतले; पण त्यांची प्रतिमानिर्मिती गांधीतत्त्वाला धरून नव्हती. पण, गांधीवादी नसलेल्या भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महाराणा प्रताप यांची मात्र ती प्रतिमा होती. दिल्लीतील रामलीला मैदानावर हात उभारून अण्णांनी अभिनेते दिलीपकुमार यांच्या "कर्मा' चित्रपटातील "दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए' या गाण्याच्या ओळींचा आधार घेतला. किरण बेदींचे तसेच. स्वतःला अटक करवून घेतल्यावर पोलिसांच्या बसमधून त्यांना नेले जात असताना त्यांनी दूरचित्रवाणी वाहिन्यांसमोर "अब तुम्हारे हवाले वतन साथीयों' अशा ओळी उद्‌धृत केल्या. कैफी आझमी यांच्या जुन्या आणि गाजलेल्या "हकीकत' या चित्रपटाचा संदर्भ त्यांच्या या ओळींना होता की नाही, याची मला कल्पना नाही. ते काहीही असो; "व्यवस्था' बदलण्यासाठी क्रांती सुरू आहे, हाच संदेश त्यामागे असावा. सर्व राजकीय पक्षांबाबत नवा कायदा आणावा, असा त्यामागचा संदेश असणार. 

लोकप्रियतेच्या कळसाला पोचलेल्या अण्णा चळवळीची आजची स्थिती काय आहे हे पाहू. स्वतः अण्णा पूर्वी होते तेथे आले आहेत आणि राळेगणसिद्धीतून त्यांच्या काल्पनिक शत्रूंबरोबर झुंजत आहेत. कधी ते पंतप्रधानांच्या विरोधात बोलतात आणि बातम्यांमध्ये येतात. कधी ते "अनेक' अरविंद केजरीवालांवर टीकास्त्र सोडतात. त्यांच्या "कोअर ग्रुप'मधील एकही सदस्य आता त्यांच्यासोबत नाही. किरण बेदी, मनीष सिसोदिया, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण (यांनी स्वतः कोणतीही निवडणूक अद्यापपर्यंत लढविली नाही), गोपाल राय, बहुद्देशीय बॅंकेतील अधिकारी व त्यांच्या कट्टर प्रवक्‍त्या मीरा संन्याल, डाव्या चळवळीच्या मेधा पाटकर हे सगळे निवडणुकीच्या राजकारणात उतरले आहेत. अण्णा चळवळीची भूमिका, कार्यपद्धती आणि उद्दिष्टांवर ज्यांनी आक्षेप घेतले (लेखकही त्यात समाविष्ट), त्यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण प्राथमिक बौद्धिक वादविवाद जिंकल्याचे आम्ही आता जाहीर करू शकतो. व्यवस्था बदलण्यासाठी तुम्हाला त्यात सहभागी व्हावे लागते, त्यासाठी सत्ता मिळवावी लागते. तुम्ही त्याचा उल्लेख कचराकुंडी असा केला तरी ते करावे लागते. मतपेटीतून जनमत मिळवून सत्ता प्राप्त करावी लागते. ही पद्धत नक्कीच चांगली आहे. मतदार सुज्ञ आहेत आणि व्यापक विचार करता, प्रामाणिक आहेत. 

सगळ्यांचा धुव्वा उडवून जिंकलेली दिल्ली, पंजाब आणि गोव्यात दखल घेण्यासारख्या स्थितीची शक्‍यता आणि पुढे गुजरातमध्ये आव्हान देणारा नवा खेळाडू; अशा अवस्थेत आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तसेच त्यांचा "आप' पक्ष आता राजकारण आणि निवडणुका म्हणजे फार्स असल्याचा दावा करू शकत नाही. म्हणजे हे आपल्यातील काहींच्या म्हणण्यासारखेच झाले ना? (जाड कातडीची काही मंडळी सोडून द्या). अण्णा चळवळीच्या काळात राजकारणाविरुद्धच बोलले जात होते. सगळ्यांच्या शंका दूर होण्यासाठी आम्ही काय म्हणतो ते ऐका ः प्रामाणिक व्हा आणि तुम्हाला राजकीय सत्ता हवी आहे हे मान्य करा, किंवा सरळ हिंदीचा आधार घेऊन केजरीवाल त्यांच्या टीकाकारांना काय म्हणतात ते पाहा. ते म्हणतात, अगर राजनीती करनी है, तो खुलकर सामने आ जाओ. पंजाबात "आप' पहिल्या स्थानावर राहतो की दुसऱ्या आणि गोव्यात काय होणार ही बाब अलहिदा; पण त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळतो आहे हे नक्की. हीच स्थिती गुजरातमध्येही दिसते आहे. राजकीय सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नांत "आप'ने आपली प्रस्थापितविरोधी भूमिका कायम ठेवणे ही विशेष उल्लेखनीय बाब ठरली आहे. एरव्ही या पक्षाला विशिष्ट अशी विचासरणी नाही. "आप'चा कट्टर विरोधक असलेल्या भाजपचा राष्ट्रवाद आणि गरिबीसंदर्भात कॉंग्रेसच्या भूमिकेच्या बाजूला ते गेले नाहीत. प्रचाराच्या काळात केजरीवाल क्वचितच एखाद्या राजकीय पक्षावर हल्ला करतात किंवा टीकास्त्र सोडतात.

मात्र, अन्य प्रस्थापित पक्ष आणि त्यांचे नेते मात्र उलट करतात. "ग्रॅंड डिस्रप्टर' हीच केजरीवाल यांची मूळ भूमिका आहे. केजरीवाल आणि त्यांचे निकटचे सर्व सहकारी तरुण आहेत. ते साधारणपणे भ्रष्टाचारमुक्त आहेत असेही म्हणता येईल. त्याचा परिणाम म्हणजे केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुरवातीलाच तरुण मतदारांचा पाठिंबा मिळाला. केजरीवाल यांचे प्रतिस्पर्धी असलेले सुखबीरसिंग बादल किंवा राहुल गांधी हेही वयाने फार मोठे नाहीत; कदाचित तरुणच आहेत. पण ते प्रस्थापितांचे राजकारण करतात, तर केजरीवाल यांनी स्वतःला अक्षरशः घडविले आहे, म्हणजे ते स्वयंपूर्ण आहेत. कोणताही अनुभव नसण्याचाच फायदा ते करून घेत आहेत. त्यांच्या अननुभवी असण्याचा एक फायदा म्हणजे "आम्हाला किमान एक तरी संधी द्या,' या त्यांच्या आवाहनाचा परिणाम तरुण मतदारांवर होतो. केजरीवालांचे आवाहन या मतदारांना भिडते. 

आमच्याकडे पुरेशी माहिती नाही; पण केजरीवालांनी दिल्लीत सगळ्यांचा धुव्वा उडवला ही वस्तुस्थिती आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांनी कॉंग्रेसच्या मतांची पोकळी भरून काढली. पंजाबमध्ये सर्व निवडणूक कलचाचण्यांचे अंदाज पाहता, "आप'ला सर्वाधिक मते अकाली दल- भाजप युतीतून मिळतील. कोणतीही विशिष्ट राजकीय विचारसरणी नसलेल्या एखाद्या पक्षाबाबत असे घडणे फायद्याचेच ठरणारे असेल. कदाचित त्या राज्याच्या राजकीय गरजांची पूर्तता या पक्षाकडून होण्याची शक्‍यताही असावी. ते सगळे असूद्यात; पण सध्याच्या प्रस्थापित राजकीय पक्षांपेक्षा "आप' खरोखरच दूर आहे का? प्रस्थापित पक्षांबाबतच्या आपल्या मोठ्या तक्रारींची यादी करू. भ्रष्टाचार, नेत्यांची वये, त्यांची सत्तेतील कपटी कारकीर्द, पक्षश्रेष्ठी किंवा हायकमांड संस्कृती, प्रसारमाध्यमांकडून होणाऱ्या टीकेबाबत असहनशीलता, असहिष्णुता, सर्वेसर्वाच्या थाटात वावरणारे नेतृत्व- जे प्रश्‍न सहन करत नाहीत वगैरे. या यादीतील कोणती गोष्ट "आप'मध्ये नाही हे तपासा. या पक्षाचा नेता एवढा शक्तिशाली, प्रभावी आणि लोकप्रिय आहे, की ज्या राज्याचा (दिल्ली) कारभार चालविण्यासाठी त्याला निवडून दिले आहे, त्या राज्यापासून तो महिनोन्‌महिने निवडणूक प्रचारासाठी दूर राहतो. नंतर पंधरवडाभर तो आराम करतो. या काळात त्याचा त्याच्या शहराशी फार कमी संपर्क असतो. दुसरीकडे, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी वर्षअखेरीस एक आठवड्याची सुटी घेतात. खरेतर त्यांच्यावर कोणतीही घटनात्मक जबाबदारी नाही किंवा त्यांच्या पक्षाचा विचार केला, तर काही उत्तरदायित्वही नाही. 

अण्णा चळवळीला आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यातून एक भक्कम राजकीय नेतृत्व उदयाला आले आहे आणि ते विचारसणीचा शोध घेत आहे. कदाचित ती विचारसरणी आपल्याला परिचितही नसेल. मात्र, त्यामुळे आपल्या रोजच्या कुंठितावस्थेतील, कंटाळवाण्या राजकारणाला एक नवा आयाम मिळाला आहे. राजकीय बातमीदारांसाठी आणि कलचाचण्यांचे लेखन करणाऱ्यांना त्यातून आनंद मिळू लागला आहे. 

ता. क. ः "भित्तीलेखनाचा पंजाबी संदेश' या माझ्या गेल्या आठवड्यातील लेखात (ता. 5 फेब्रुवारी) मी पंजाबमध्ये "आप'चा बोलबाला होत असल्याचे नमूद केले होते. मात्र, त्या लेखाबाबत मला एक प्रश्‍न विचारण्यात आला. "आप'च्या प्रमुखांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यासंदर्भात वाईट भाषा वापरली असताना मी "आप'ला झुकते माप देणारे लेखन कसे केले, असा तो प्रश्‍न होता. या प्रश्‍नावर माझा प्रतिप्रश्‍न आहे, तो असा ः माझ्याविषयी कोणी वाईट भाषा वापरली म्हणून मी खोटे लेखन करावे का, आणि तसे करून माझ्या वाचकांची फसवणूक करावी का? 
"रॉयटर्स' या वृत्तसंस्थेचा मुख्य संपादक स्टिव्ह ऍडलर याने त्याच्या कर्मचाऱ्यांना पाठविलेले पत्र या संदर्भात उद्‌बोधक ठरावे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासंदर्भात हे पत्र आहे. (http://www.reuters.com/article/rpb-adlertrump-idUSKBN15F276). या पत्रात तो त्याच्या बातमीदारांना सांगतो, की तुम्ही वस्तुस्थितीशी चिकटून राहा, आपणच कथेचा भाग आहोत यावर विश्‍वास ठेवणे बंद करा. तुम्ही ट्रम्प, नरेंद्र मोदी किंवा केजरीवाल यांच्यावर लेख लिहीत असाल, तर हे लक्षात ठेवायलाच हवे. 

(अनुवाद - उदय हर्डीकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com