आभासी दुनियेची मजेदार सफर (शिवानी खोरगडे)

shivani khorgade technodost article in saptarang
shivani khorgade technodost article in saptarang

व्हर्चुअल रिऍलिटी (व्हीआर) हा प्रकारच भन्नाट आहे. तुम्ही आहात त्याच जागी तुम्हाला एका वेगळ्या आभासी जगाची सफर घडवून आणणारं हे तंत्र. हेडसेट लावायचा आणि या दुनियेत प्रवेश करायचा. या तंत्राची वैशिष्ट्यं काय, कशा प्रकारे ही आभासी दुनिया तयार केली जाते, व्हीआरचे इतर कोणते घटक असतात अशा सगळ्या गोष्टींची माहिती.

आज आधुनिक जगात टेक्‍नॉलॉजीचा वाढता वापर आणि संशोधन बघता अनेक नवीन टेक्‍नॉलॉजी रोज आपल्यासमोर येतात. यापैकीच एक म्हणजे व्हर्चुअल रिऍलिटी (व्हीआर). सध्या व्हर्चुअल रिऍलिटीला लोकांची भरपूर पसंती मिळत आहे. आपण आहोत त्या जागीच आपल्यासमोर विविध उपकरणांच्या मदतीनं आभासी जग निर्माण करणं म्हणजे व्हर्चुअल रिऍलिटी. हे आभासी जग अनुभवताना आपल्यासमोर उभी राहतात ती अक्षरशः जिवंत वाटणारी दृश्‍यं. ही व्हर्चुअल रिऍलिटी अनुभवायची असेल, तर विविध उपकरणं उपलब्ध आहेत. या नव्या डिजिटल जगाचे तीन प्रमुख भाग आहेत. या सगळ्या कल्पक, रंजक जगाविषयी आपण जाणून घेऊ या.

व्हर्चुअल रिऍलिटी म्हणजे काय?
व्हर्चुअल रिऍलिटी युजर्सना एखाद्या आभासी; पण प्रत्यक्ष आहे असं भासणाऱ्या घटनेत, हालचालीत किंवा एखाद्या कथेतल्या प्रसंगात घेऊन जाते. व्हर्चुअल रिऍलिटीत बऱ्याच अशा गोष्टीही आपल्यासमोर आणल्या जातात- ज्या प्रत्यक्षात करणं कदाचित शक्‍य नाही. आपल्या कल्पनांना आपण या आभासी जगात अनुभवू शकतो. व्हर्चुअल रिऍलिटी अनुभवण्यासाठी हेडसेट बनवण्यात आलेले असतात- जे डोळ्यांवर लावले जातात. काही हेडसेट्‌सना स्मार्टफोन जोडावा लागतो, तर काही स्मार्टफोनशिवायही आभासी जगाची सफर घडवतात. त्या हेडसेटमध्ये एखादा प्रोग्रॅम सेट केला, तर आपण एका जागी उभे असलो, तरी ते आभासी जग फिरवून आणतं. जणू काही आपण त्या प्रोग्रॅममध्ये चालणाऱ्या जागेचा, घटनांचाच भाग आहोत, असं वाटायला लागतं. उदाहरणार्थ, हेडसेटमध्ये कुलू-मनाली टुरिझमचा प्रोग्रॅम सेट केला, तर त्या भागातली फिरण्याची ठिकाणं, तिथला प्रवास, तिथली निसर्गरम्य ठिकाणं, तिथले लोक, प्राणी, पक्षी असं सगळं काही आपल्याला दिसतं आणि आपण प्रत्यक्षात त्या जागी आहोत असं वाटतं.

खरं तर आपण एकाच जागी असतो; पण या व्हर्चुअल रिऍलिटीमधला व्हिडिओ कंटेंट आणि इतर गोष्टींमुळं आपण संबंधित जागीच उभे आहोत आणि त्या वेगळ्या जगाचा भाग आहोत, असं वाटतं. आपण व्हर्चुअल रिऍलिटीत असतो, तेव्हा आपल्या शरीराच्या हालचालींनुसारीह दृश्‍य बदलतात. आपली मान डावीकडे वळली, तर व्हर्चुअल रिऍलिटीतल्या दुनियेतसुद्धा डावीकडे काय आहे ते दाखवलं जातं. या व्हीआरमध्ये पाऊस पडत असेल, तर आपण प्रत्यक्षात भिजत नाही; पण भिजल्याचा भास होतो. म्हणजे थोडक्‍यात आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांवर एक प्रकारे नियंत्रण ठेवलं जातं, किंवा एकतानता साधली जाते.

ऑक्‍युलेस रिफ्ट, सॅमसंग गॅलॅक्‍सी गिअर व्हीआर, सोनी प्रोजेक्‍ट मॉर्फस, एचटीसी वाइव्ह ही व्हर्चुअल रिऍलिटीची काही हेडसेट डिव्हाइसेस आहेत. या उपकरणांचा वापर करायचा असेल, तर आपले मोबाईल जॅरोस्कोपचे असणं गरजेचं असतं. मोबाईलमध्ये जॅरोस्कोप सेन्सर नसेल, तर आपण व्हर्चुअल रिऍलिटी वापरू शकणार नाही असं नाही; पण केवळ यूट्युबवर असलेले व्हिडिओ एका मोठ्या मल्टिफ्लेक्‍स स्क्रीनवर बघतोय, असं आपल्याला वाटेल. मात्र, जॅरोस्कोप हे सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये असेल, तर हेडसेट घातल्यानंतर तुमच्या हालचालींवर नियंत्रण ठेवून ज्या दिशेला आपण बघू त्या दिशेला असलेल्या गोष्टी दाखवते.

ऑगमेंटेड रिऍलिटी म्हणजे काय?
ऑगमेंटेड रिऍलिटी ही व्हर्चुअल रिऍलिटीची पुढची पायरी. ऑगमेंटेड रिऍलिटी अनुभवण्यासाठी हेडसेटची गरज नसते. गॉगलसारखा एक ग्लास असतो. तो तुम्हाला दुसऱ्या जगात घेऊन जात नाही, तर तुम्ही आहे त्याच जागी एक वेगळा कोपरा तयार करतो.

गॉगलच्या कोपऱ्यात एक छोटासा डिस्प्ले येतो- जो आपल्याला एक जास्तीची माहिती सतत देत असतो. ज्या जागी आपण आहोत तिथं प्रत्यक्षात घडणाऱ्या गोष्टीही आपल्याला कळतात, दिसतात. आपण उभे वा बसले आहोत ती जागाही आपल्याला जशीच्या तशी दिसते; पण त्यात कुठं तरी एखादी गोष्ट निर्माण झालेली असते. उदाहरणार्थ, एखादा खेळ आपण ऑगमेंड रिऍलिटी प्रोग्रॅममध्ये सेट केला असेल आणि आपण बसलो आहोत त्याच्यासमोर भिंत असेल, तर त्या भिंतीतून खेळातली कॅरेक्‍टर्स बाहेर येताना दिसतील. आपण जिथं बसलो आहोत, त्या जागी आजूबाजूला खेळाचं साहित्य दिसेल. गूगल ग्लास, मायक्रोसॉफ्ट हॉलो लेन्स, सोनी मॉजिक लेन्स, मॅजिक लिप लाइटवेअर, इप्सॉन मोवेरिओ ही काही ऑगमेंटेड रिऍलिटीची उपकरणं आहेत.

360 डिग्री व्हिडिओ म्हणजे काय?
कॅमेऱ्याच्या सभोवतालीही असलेल्या गोष्टींना रेकॉर्ड करणं म्हणजे 360 डिग्री व्हिडिओ. म्हणजेच कॅमेराच्या डाव्या-उजव्या बाजूला, पुढच्या-मागच्या बाजूला, वर-खाली असं सगळीकडे जे जे आहे ते ते सगळं 360 डिग्रीच्या एकाच व्हिडिओत येतं.

360 डिग्री व्हिडिओ रेकॉर्ड कसे करतात?
जर आपल्याला कस्टमाइज्ड रेकॉर्डिंग म्हणजे व्हिडिओतल्या गोष्टींचा क्रम आपल्या मर्जीप्रमाणे सेट करायचा असेल, तर 360 डिग्री व्हिडिओसाठी कस्टम रॉकचा (कॅमेरा लावायचा स्टॅंड) वापर करावा लागेल. या डिव्हाइसवर आपल्याला आपले विविध कॅमेरा लावावे लागतील. 4, 6, 12, 24 असे कितीही कॅमेरा लावण्याचं हे उपकरण आपण वापरू शकतो. हे कॅमेरे आपण वेगवेगळ्या दिशेनं लावू शकतो. त्यानंतर प्रत्येक कॅमेऱ्यात आलेली दृश्‍यं व्हिडिओ एडिटिंगद्वारे जोडता येऊ शकतात.

एलजी 360 कॅमेरा, सॅमसंग गिअर 360, रिको थिटा कॅमेरा, रिको थिटा एस, कोडॅक असे 360 डिग्री व्हिडीओसाठीचे खास कॅमेरे बाजारात उपलब्ध आहेत. ज्यात ग्राहकांना काहीही सेटिंग बदलण्याची गरज पडत नाही किंवा एडिटिंग करण्याचीही गरज पडत नाही. अशा कॅमेऱ्यांना दोन अल्ट्रा वाईड लेन्स असतात- ज्या 180 डिग्री म्हणजे त्या जागेचा एक भाग संपूर्ण रेकॉर्ड करून घेतात आणि ते भाग नंतर जोडून 360 डिग्रीचा एक पूर्ण व्हिडिओ मिळतो.

360 डिग्री व्हिडिओ यूट्युबवरही उपलब्ध आहेत. यूट्युबनं "लाइव्ह स्ट्रीमिंग' सुरू केलं आहे. म्हणजे आपण जो 360 डिग्री व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे, तो सगळ्या जगाबरोबर शेअर करू शकतो. व्हर्चुअल रिऍलिटीमध्येही 360 डिग्री व्हिडिओ प्रोग्रॅम्स सेट केले असतात. उदाहरणार्थ, रोलर कोस्टर राइडचा व्हिडिओ बघत असाल, तर सगळ्या दिशांची दृश्‍यं आपल्याला या व्हिडिओत दिसतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com