सोशल मीडियावरचं गाजलेलं... (श्रेणिक नरदे)

सोशल मीडियावरचं गाजलेलं... (श्रेणिक नरदे)

शहरात काय मेळ नसतंय!
शहरात काय मेळ नसतंय. उगचंच भरलेला भंपकपणा. मोठ्ठीच्या मोठ्ठी बिल्डिंगं आणि त्यात कोण विचारत नसलेला एक फ्लॅट कुठल्यातर मजल्यावर. सकाळी उठून मॉर्निंग वॉक करून पेपर वाचूपर्यंत दहा वाजतंय. तिथनं गडबडीत शिळं झालेलं माळव्याची भाजी, नहीतर पच्चपाणी असलेल्या आमटीची वाटी आणि तेल सोडा टाकून हवा भरलेल्या चपात्या खाऊन कामावर पळा.
तिथं राबून आलं की परत घरात येऊन काम, आणि रडक्‍या सीरियल बायकूबरोबर बघून पोराचं अभ्यास घेतल्याची नाटकं. मग दमून भागून झोप.
ती गर्दी, सिग्नलला वाट बघत बसणं, कधीकधी वाटतंय- मधल्या मजल्यावर एक फ्लॅट घेऊन पिलरंच पाडून टाकावं.

त्यापेक्षा गावात सकाळी उठा, गैरमसरांचं शेणघाण करा, वैरण आणायचं, आकरी दुधाचा चहा प्यायचा, नाष्ट्यालाच झुणका भाकरी, नहीतर सांजा खायाचं. दुपारला रानातनं आलं, की गार आंघोळ करायचं. जेवलं की कट्ट्यावर, नहीतर आंब्याच्या झाडाखाली जाऊन झोपायचं. झोपून उठलं, की परत चहा प्यायला जायचं. संध्याकाळला कुठंतर बसून गावाची मापं काढायची. कशाला कोण जबाबदार हाय त्यावर चर्चा करायचं. गावातलं मॅटर ऐकत बसायचं. रात्रीला पाणी पाजवायला जायचं. तिथंच रानात झोपायचं.

सकाळी घरातली हुडकत येत्यात. कोणतर मेलं की मयताला जायाचं, लगीन असलं की दोन दिवस अगोदर पडाक बसायचं. असल्या बारा भानगडी गावात असत्यात. कोण बोर मारत असलं, की त्याला पाणी लागलं तर त्याला खूश करायचं, नहीतर पाऊसच नही तर पाणी कुठनं येणार म्हणायचं!
गावात कोणबी बुलट घेतलं, की गावाला कळतंय. फायरिंगवरनं वळखत्यात. मुंबईत धुरळा बसलेल्या पंचर झालेल्या फोरचुनर बघितल्यात.

गावात सगळीकडनं लोकं तुमचा काटा काढायला बसलेली असत्यात. जरा कोणतर गडी हालतोय असं दिसलं, की महिन्याभरात रिंगाण घेत्यात. गावात राहानं म्हणजे पावलंपावलं जपून टाकायला लागत्यात; आणि शहरापेक्षा गावाचाच नादखुळा असतोय...

नंतरनंतर शहराची कौतुक करणारी लोकं म्हातारशी झाल्यावर फार्महाउस बांधत्यात कोकणात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com