वो भूली दास्ताँ... 

music
music

संगीत हा माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग. सप्तसुरांनी माणसाचे जगणे समृद्ध केले. स्वतःचे भान हरपून डोळे मिटून गाणी ऐकताना अनेकांनी आपले भावविश्‍व फुलविले. भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा इतिहास आहे.

अनेक चित्रपट लोकांनी डोक्‍यावर घेतले. विशेषतः हिंदी सिनेमांनी अनेकांना वेड लावले. त्यात संगीताचा वाटा सर्वात मोठा असावा. हिंदी चित्रपटातील गाणी ऐकणे आणि स्वतः गाण्यातील शब्दांत हरवून जाणे यातला आनंद केवळ अवर्णनीयच. आताचा जमाना टीव्हीचा. काही वर्षांपूर्वी रेडिओ हेच माध्यम प्रभावी होते. आकाशवाणीच्या ठराविक केंद्रांवरील गाणी ऐकण्यासाठी धडपड करणाऱ्या अनेक पिढ्या होत्या. या गाण्यांनी भावनांची समज दिली, आनंद दिला, प्रेरणा दिली, इतरांची दुःखे जाणली. कारण भावपूर्ण आणि अर्थपूर्ण अशा आशयघन शब्दांनी ही गाणी समृद्ध होती. आता संगीताच्या गोंगाटात गाण्यातील शब्द कुठे हरवून जातात, हे लक्षातही येत नाही. शब्दांची जादू आणि सुरांची अवीट आर्तता बांधत संगीतातून जागणारी भावना माणसाच्या हृदयाला भिडते. त्यामुळेच संगीत कानावर पडताच त्या तालावर त्याची पावले थिरकायला लागतात आणि सुरांमुळे तो बेभान होऊन जातो. 

जसा आज टीव्हीचा काळ आहे तसाच एक रेडिओचा काळ होता. तो आजही आहे. आता स्थानिक पातळीवर एफएम केंद्रेही आहेत. टीव्हीवरही संगीत- गाण्यांसाठी खास वाहिन्याही आहेत. मात्र टीव्हीवरून गाणी पाहिली जातात. रेडिओवरून ती ऐकली जातात. हा फरक खूप मोठा आहे. ऐकताना ती काळजाला भिडतात. पूर्वी रेडिओवरून गाण्यांचे कार्यक्रम, नभोनाटय, कथाकथन, विनोदी प्रसंगाचे कथन, माहिती देणारे कार्यक्रम असायचे. ते कार्यक्रम लोकप्रिय होत असत. टीव्हीवर विविध चॅनल्स आहेत. आकाशवाणीची केंद्रे असायची. केंद्रांची संख्या मोठी नव्हती. ऑल इंडिया रेडिओ, विविध भारती, पुणे आकाशवाणी केंद्र, मुंबई आकाशवाणी केंद्र, सांगली केंद्र अशा भारतीय केंद्रांबरोबर बी.बी.सी. केंद्र बातम्यांसाठी लोकप्रिय होते. रेडिओ सिलोन केंद्राने भारतात प्रचंड लोकप्रियता मिळविली होती. सिलोन केंद्रावर अत्यंत लोकप्रिय असा बिनाका गीतमालाचा कार्यक्रम सादर होत असे.

रेडिओ आणि टीव्ही ही मनोरंजनाची दोन प्रमुख साधने. टीव्हीवर वेगवेगळे कार्यक्रम 24 तास पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षात काही मालिकांनी तसेच काही वेगळ्या कार्यक्रमांनी लोकप्रियता मिळवली. हिंदी चित्रपटातील विविध प्रकारची गीते सादर केल्याने गाण्याच्या रसिकांना श्रीलंका रेडिओ केंद्र अजूनही आठवत असेल. विविध भारतीवरूनही विविध चित्रपटगीते ऐकायला मिळतात. रेडिओ सिलोनच्या हिंदी चित्रपटविषयक "बिनाका' गीतमालाने मात्र सातत्याने लोकप्रियता मिळविली होती. आठवडयातून एकदाच दर बुधवारी रात्री आठ ते नऊ या ठराविक वेळेला बिनाका गीतमाला प्रसारित होत असे आणि श्रोते त्या गाण्यांची आठवडाभर चातकासारखी वाट बघत असत. बहुसंख्येने तयार होणारी हिंदी चित्रपटगीते आणि त्यांची लोकप्रियता त्यामुळे हा कार्यक्रम एका विशिष्ट उंचीवर पोहचला. अमीन सायानी या निवेदकांच्या आवाजाने अनेकांना वेड लावले होते. "बिनाका'मधून त्या त्या वर्षातील लोकप्रिय गीते रसिकांना ऐकवली जात होती. 

हिंदी चित्रसृष्टीला कलाकारांची एक मोठी परंपरा लाभली. एकापेक्षा एक सरस असे गायक, संगीतकार, आणि गीतकार निर्माण झाले, असा तो काळ होता. या सर्व कलावंतांनी आपल्या कलेतील उत्कृष्ट कलाकृती लोकांसमोर आणल्या. संगीतकारांमध्ये नौशाद, शंकर जयकिशन, अनिल विश्वास, ओ.पी नय्यर, एस.डी.बर्मन, रवी, मदन मोहन, सी.रामचंद्र, वसंत देसाई, हेमंतकुमार, राजेश रोशन, कल्याणजी-आनंदजी, एन. दत्ता, एस. एन. त्रिपाठी, चित्रगुप्त, सलील चौधरी, गुलाम मोहम्मद असे संगीतकार होते. अशा संगीतकारांनी स्मरणीय संगीत गाण्यांना दिले. त्यांच्या संगीताला अर्थपूर्ण शब्द दिले गीतकारांनी आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने गायक-गायिकांनी ही गाणी अजरामर केली. अर्थपूर्ण, आशयसंपन्न व भावनांना प्राधान्य देणाऱ्या शब्द रचनांनी रसिकांना गुंतवून ठेवले. शैलेंद्र, शकील, हसरत, मजरूह, साहिर, प्रदीप, भरत व्यास, कमर जलालाबादी, एस. एच. बिरारी, प्रेमधवन, पी.एल.संतोषी, राजेंद्र कृष्ण, फारूक कैसर, जॉं निसार अख्तर, कैफी आजमी अशा कितीतरी गीतकारांच्या शब्दांनी गाणी सजली. मुकेश, महमद रुफी, किशोर कुमार, मन्ना डे, हेमंतकुमार, तलत अझिझ, महेंद्र कपूर तसेच लता आणि आशा, गीता दत्त, शमशाद बेगम, सुमन कल्याणपूर, सुरैय्या यांनी आपल्या आवाजांच्या जादूने गाणी रसिकांपर्यंत पोचवली. प्रदीपकुमारचा जुना "नागिन' चित्रपट फक्त गाण्यासाठी अनेकांनी अनेकदा पाहयला असेल. "मन डोले, तन डोले'ने अनेकांना डोलायला लावले होते. 

मुहब्बत जिंदा रहती है (चंगेजखान), दुखी मन मेरे (फंटूश), सूर ना सजे (बसंत बहार), कौन आया मेरे मनकेद्वारे (देख कबीरा रोया), जाने वो कैसे लोग (प्यासा), जागो मोहन प्यारे (जागते रहो), रेशमी सलवार कुरता जाली का (नया दौर), ये रात भिगी भिगी (चोरी चोरी) उडे जब जब जुल्फे तेरी (नया दौर), मॉंग के साथ तुम्हार (नया दौर), ईना मीना डीका (आशा), माना जनाबने पुकारा नही (पेईंग गेस्ट), छोड दो ऑचल जमाना (पेईंग गेस्ट), ऑखो मे क्‍या जी ( नौ दो ग्यारह), पंछी बनू उडती फिरू (चोरी-चोरी), सर जो तेरा चकराए (प्यासा), जरा सामने तो आओ छलिए...(जनम जनम के फेरे), एक वो भी दिवाली थी (नजराना), वो भूली दास्तॉं (संजोग), छोडो कलकी बाते (हम हिंदूस्थानी), ओ बंसती पवन पागल (जिस देश मे गंगा बहती है), हमे काश तुमसे मुहब्बत (मुगल-ए-आझम), दो हंसो का जोडा (गंगा-जमुना), दो सितारों का जमींपर (कोहिनूर), तस्वीर तेरी दिलमें (माया), मधुबन में राधिका नाचे रे (कोहिनूर), होटोपें सच्चाई रहती है (जिस देश मे गंगा बहती है), हुस्नवाले तेरा जबाब नही (घराना) सांरगा तेरी यादमें (सारंगा), कोई हमदम न रहा (झुमरू), दिल मेरा एक आस का पंछी (आस का पंछी), अभी ना जाओ छोडकर (हम दोनो) अशी एक ना दोन असंख्य गाणी अनेकांच्या मनाची तार छेडत होती. दर्दभरी मुकेश, मोहमद रफीचा पहाडी आवाज, किशोरकुमारचा खट्याळपणा, लता मंगेशकर यांचा भिडणारा स्वर, आशा भोसले यांचा दिलखेचक सूर या सगळ्यांनी रसिकांना श्रीमंत केले. संगीतप्रधान चित्रपटांची यादी मोठी आहे. गाणी तर असंख्य. शब्दांनी अर्थ आणि अर्थातून आपल्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोहचवणारी. म्हणूनच ती आजही साद घालतात.

नव्याने येणाऱ्या चित्रपटांतील गीतांचा काही काळ असतो. ती तेवढ्यापुरती गुणगुणली जातात. नंतर ती आठवतही नाहीत. जुन्या गाण्यांचे तसे नाही. ती आजच्या पिढीलाही भारावून टाकतात. ही पिढीही त्या गाण्यांशी समरसून जाते. मनामनात जीवनाची आस निर्माण करते. हीच गाण्याची ताकद आयुष्याची सुंदरता वाढवते. "जाने कहा गये वो दिन' चा मुकेशचा आवाज आजही खुणावतो. "ओ दुनिया के रखवाले सुन दर्दभरे मेरे नाले' हा मोहमद रफीचा पहाडी आवाज रक्त तापवून जातो. "जिंदगी का सफर, है ये कैसा सफर' हा किशोरकुमारचा आवाज माणसाच्या प्रवासाला वळण देतो. "ए मेरे वतन के लोगो'च्या स्वरांनी डोळ्यात पाणी उभे राहते. "आजा आजा'चा सूर कुठूनही ऐकू आला की धावत जावेसे वाटते. ही या गाण्यांची जादू पृथ्वीच्या अंतापर्यंत माणसाला भावत राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com