‘बोचलं म्हणून’ अन्‌ सुचलं म्हणून...! 

‘बोचलं म्हणून’ अन्‌ सुचलं म्हणून...! 

अंकुश आरेकर हा सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्‍यातल्या भांबेवाडीचा. थोड्याबहुत कविता वगैरे करणारा. तो अचानक प्रकाशझोतात आला ते गेल्या १२ सप्टेंबरला पिंपरीतल्या महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या काव्यवाचनातून. अंकुशराव लांडगे सभागृहात त्यानं ‘बोचलं म्हणून’ ही भन्नाट कविता म्हटली. त्याच्या कुणी मित्रानं ती रेकॉर्ड केली. फेसबुकवर टाकली. मग, ती व्हॉट्‌सॲपवर गेली. तिच्या बातम्या झाल्या. कविता कसली; ते भयंकर वास्तवाचे निखारे जणू. सरकारवर, सत्ताधाऱ्यांच्या धोरणावर, शेतकरी-कष्टकऱ्यांच्या वेदनांवर अंकुशनं केलेलं भाष्य तिखट आहे, स्फोटक आहे. अक्षरश: लाखो लोकांपर्यंत ती कविता पोचलीय. नोटाबंदी, जीएसटी वगैरेच्या गोंधळाच्या पृष्ठभूमीवर त्यानं, ‘विकला असेल चहा म्हणून देश विकायचा असतो का’ हा पंतप्रधानांना विचारलेला खडा सवाल प्रचंड ‘व्हायरल’ झालाय. 

महाराष्ट्रात अंकुशची कविता धुमाकूळ घालत असताना शेजारच्या गुजरातमध्ये अवघ्या विशीतल्या सागर सावलिया याचं नाव प्रत्येकाच्या ओठांवर आहे. गुजराती भाषेत, ‘विकास गांडो थयो छे’, इंग्रजीत ‘डेव्हलपमेंट हॅज गॉन क्रेझी’, हिंदीत ‘विकास पगला गया है’, या सोशल मीडियावर ‘व्हायरल हॅशटॅग’चा जनक सागर आहे. पाटीदार नेता हार्दिक पटेलचा कट्टर समर्थक असलेला सागर तिथं ‘बेफामन्यूजलाइव्ह’ नावाचं ‘पोर्टल’ चालवतो. विधानसभा निवडणूक चार-सहा महिन्यांवर असताना ‘गुजरात मॉडेल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विकासकामांवर भाष्य करताना त्यानं सहज तो ‘हॅशटॅग’ वापरला अन्‌ पुन्हा सत्तेवर येऊ पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला धडकी भरावी, इतका तो फक्‍त गुजरात नव्हे तर देशभर ‘व्हायरल’ झाला. अर्थात, त्यात हार्दिकच्या सोशल मीडिया टीमचा व काँग्रेसच्या सेलचा वाटा मोठा आहे. आतापर्यंत या माध्यमांवर प्रचंड पकड असलेल्या भाजपपुढं पहिल्यांदाच आव्हान उभं राहिलंय. अर्थात, हे आव्हान भाजपला खरंच जड जाईल का, हे सांगता येणार नाही. कारण, एखाद्या कवितेनं, हॅशटॅगनं खूप काही बदलत नसतं. 

हे खरं, की तरुणाई बेधडक असते, रोमॅंटिकही असते. तिला क्रांतीची भाषा आवडते. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियानं घडवलेल्या काही क्रांत्यांचे गोडवे गायले जातात. ट्युनिशियात ते पहिल्यांदा घडलं. राजवट उलथवली गेली. इजिप्तमधल्या तरुणांनी ट्युनिशियातनं प्रेरणा घेतली. २५ जानेवारी २०११ ला कैरोच्या तहरीर चौकात क्रांती घडली. अध्यक्ष होस्नी मुबारक पदच्युत झाले. त्यांना अटकही झाली. सोशल मीडियानं घडवलेल्या क्रांतीचं ‘नवं मॉडेल’ म्हणून कौतुक झालं. पण, आता त्या क्रांतीच्या खाणाखुणाही नाहीत. क्रांतिकारी तरुणांचा नेता अहमद माहेर याला चार वर्षे तुरुंगात काढावी लागली. होस्नी मुबारक हेदेखील सहा वर्षे तुरुंगवासानंतर गेल्या मार्चमध्ये निर्दोष सुटले. 

‘अम्ब्रेला रिव्हॉल्यूशन’ म्हणून जगभर गाजलेल्या हाँगकाँगमधल्या लोकशाहीवादी चळवळीचा नेता जोशुआ वाँग हा अवघा २१ वर्षांचा. त्यानं उभं केलेलं आंदोलन आता पूर्णपणे निस्तेज झालंय. गेल्या १७ ऑगस्टला जोशुआ, तसेच नाथन लॉ व ॲलेक्‍स चाऊ या त्याच्या दोन सहकाऱ्यांना कारावासाची शिक्षा अन्‌ सार्वजनिक जीवनावर पाच वर्षांची बंदी घातली गेलीय. अशी क्रांती भारतात शक्‍य नाही.. कारण, आपल्याकडं जे काही होतं ते मतदानातूनच. त्यामुळं जनमत बदलण्यात भलेही अंकुश आरेकर किंवा सागर सावलियाचं योगदान असेल; तथापि, ‘जेएनयू’मधल्या कन्हय्या कुमारची चर्चा ओसरली, गुजरातमधला जिग्नेश मेवानी आठवत नाही, याचं काय करायचं? सोशल मीडियाचा प्रभाव अल्पजीवी आहे का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com