इवान्काचं आधार कार्ड... 

Ivanka Trump, Narendra Modi
Ivanka Trump, Narendra Modi

सोशल मीडियावर काहीही खरंखोटं टाकताना तुम्ही, "पेड मीडिया हे तुम्हाला दाखवणार नाही', अशी सुरवात केली की जणू खोटं असलं तरी खरेपणाचं सर्टिफिकेट मिळतं. बहुतके सगळ्या प्रचारकी पोस्टची सुरवात अशीच होते. बहुतेकवेळा ती गंमतच असते; पण, हे चक्क अमेरिकी अध्यक्षांची कन्या इवान्का ट्रम्पबाबतही घडू शकते, यावर कोणाचा विश्‍वास बसणार नाही. अर्थात असं घडलं अन्‌ "इवान्का ट्रम्प प्रत्यक्षात "आधार कार्ड' काढायला भारतात आल्या होत्या', अशी गंमत "व्हायरल' झाली. 

गेला आठवडा जणू इवान्काचाच होता. "ग्लोबल आंत्रप्रिनर्स समिटसाठी हैदराबादला इवान्का आली, तिनं पाह्यलं अन्‌ तिनं जिंकलं', असं तिच्या भारत दौऱ्याबद्दल काही पाश्‍चात्य माध्यमांनीदेखील म्हटलं. इवान्का व तिचा पती जेर्ड कुशनर हे दोघेही व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प यांचे सल्लागार आहेतच. ट्रम्प यांच्या औद्योगिक साम्राज्याचा कारभारही दोघे पाहतात. कुशनर वादातही अडकले आहेत. निवृत्त लेफ्टनंट जनरल मायकेल फ्लीन यांच्या माध्यमातून रशियाशी संबंध जोडण्यात त्यांचा हात असल्याचा आरोप आहे. त्या संबंधांची चौकशी सुरू आहे. 

तर अशी इवान्का अमेरिकेचं तब्बल 360 सदस्यांचं शिष्टमंडळ घेऊन हैदराबादला आली. उद्योग-व्यवसायात महिलांना संधी व त्यांच्या अमर्याद क्षमतांबाबत बोलली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत "ताज फलकनुमा हॉटेल'मध्ये शाही मेजवानीत तिनं भाग घेतला. सुषमा स्वराज, निर्मला सीतारामन या मोदींच्या सहकारी मंत्र्यांसोबत इवान्का वावरली. ताज फलकनुमा हॉटेल कधीकाळी निजामांचा राजप्रासाद होता. तरीही मेजवानीचं निजामांच्या वंशजांना निमंत्रण नव्हतं, म्हणून थोडी कुरकुर झाली. काहींना पंतप्रधान मोदींसमोर बसलेल्या इवान्का ट्रम्प यांनी पाय झाकून घेतल्याचं छायाचित्र पाहून गेल्या जूनमध्ये जर्मनीत बर्लिनमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिनं केलेल्या "औचित्यभंगा'ची आठवण झाली. इवान्कांनी दुसऱ्या दिवशी गोवळकोंडा किल्ला पहिला. पश्‍चिमेकडून आलेल्या कोणत्याही सेलेब्रिटीसाठी जीव ओवाळून टाकण्याच्या भारतीयांच्या दोन-तीनशे वर्षांच्या सवयीनुसार याहीवेळी आपण "इवान्का', "इवान्का' करीत राहिलो. पण, केवळ कौतुक करील तो सोशल मीडिया कसला! 

रेडिओ जॉकी-व्हीडिओ जॉकी जोस कोवॅको याने इवान्का ट्रम्प यांच्या हैदराबादेतल्या हिंडण्याफिरण्याच्या एका व्हीडीओसोबत "ब्रेकिंग एक्‍सक्‍लुझिव्ह - पेड मीडिया विल नॉट शो यू धिस' असं म्हणत इवान्का प्रत्यक्ष इथं "आधार कार्ड" काढायला आलीय, असं ट्विट केलं. गोपनीयता व वैयक्‍तिक हक्‍काच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयानं अजून "आधार कार्ड' अनिवार्य करण्याबाबत सरकारला हिरवं निशाण दाखवलेलं नसताना देशात बॅंका, मोबाईल कंपन्या वगैरे सगळ्या संस्थांनी आधार कार्ड लिंकिंग मोहीम राबवलीय. त्यामुळं हा मुद्दा वेगवेगळ्या स्तरांवर चर्चेत आहे. त्याच्याशी संबंधित हा जोसचा खट्याळपणा सोशल मीडियावर काही वेळेतच "व्हायरल' झाला. ही गंमत असूनही "युनिक आयडिंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया' म्हणजे "यूआयडीएआय' किंवा "आधार'च्या अधिकृत "ट्विटर हॅंडल'ने जोस कोवॅकोच्या ट्‌विटला उत्तर दिलं, की इवान्का भारतीय रहिवाशी नसल्यानं आधारसाठी अर्ज करू शकत नाहीत. त्यावर गंमत गमतीनंच घ्यायची असते, असे सल्ले दिले गेले. तरीही, "भाषा हा निकष नाही, आधारसाठी भारतात रहिवास महत्त्वाचा', असं आणखी एक उत्तर आधार "यूआयडीएआय'नं दिलं. 

चक्‍क गाढवांना तुरुंगवास 
आपला अद्‌भूत देश अन्‌ इथलं तितकच अद्‌भूत प्रशासन नेहमी "ऑफीस-ऑफीस' खेळत असतं. कधी भलत्याच विनोदांना जन्म देतं. मंत्र्यांच्या म्हशीसाठी शोधमोहिमेसारख्या चित्रविचित्र कारभारासाठी सतत चर्चेत असलेल्या उत्तर प्रदेशात विनोद जरा अधिकच घडतात. जालौनच्या अशाच विनोदाची दखल थेट "न्यूयॉर्क टाइम्स'नं घेतली. उरई मध्यवर्ती तुरुंगात आठ गाढवांना चार दिवस राहावे लागले.तुरुंगाचा दरवाजा उघडताच अतीव आनंदानं बाहेर पडलेल्या गाढवांच्या कळपाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. स्वच्छ भारत मोहिमेला प्रतिसाद देताना जालौनचे तुरुंगाधिकारी सीताराम शर्मा व सहकाऱ्यांनी तुरुंग परिसरात लावलेल्या महागड्या रोपांची नासधूस हा गाढवांचा अपराध. संतापलेल्या तुरुंग कर्मचाऱ्यांनी पकडलेली जनावरं कोंडवाड्याऐवजी तुरुंगात टाकली. कमलेश नावाचा माणूस त्या गाढवांचा मालक. आधी त्यानं गाढवांचा शोध घेतला. ती तुरुंगात असल्याचं समजल्यानं अधिकाऱ्यांना भेटला. पण, बगिचाचं नुकसान मोठं असल्यानं त्याचं कुणी ऐकलं नाही. भाजपच्या एका स्थानिक नेत्यानं मध्यस्थी केल्यानंतर शुक्रवार ते सोमवार असा चार दिवसांचा गाढवांचा तुरुंगवास अखेर संपला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com