रागा अन्‌ नमोंचा आभास हा छळतो..! 

Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra Modi

सुफान बुरी किंवा फरा नाखोन सी अयुथ्थया ही थायलंडमधली गावं माहिती आहेत का? तिथल्या मंडळींना नरेंद्र मोदींच्या कतार, अमेरिका, स्वित्झर्लंड दौऱ्याशी असं काय देणंघेणं असेल? ओलिंडा ओब्रायन, चेरिलिन झागोरस्कस, चारलोट थॉमसन, एलिन व्यावरबर्ग, लिनेटा क्रॅबट्री वगैरे कथितरीत्या कझाकस्तान, रशिया, इंडोनेशियातल्या पोरींना राहुल गांधींच्या राजकारणात इतका रस असण्याचं कारण काय?

अमेरिकेचे संबंध पाकिस्तान किंवा भारताशी कसे आहेत व कसे असायला हवेत, याची इतकी चिंता त्यांनी ट्‌विटरवर का करावी? इकडं सामान्य भारतीयांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडलीय. अनेकांना हाती न लागणाऱ्या, झालंच तर हातून निघून चाललेल्या नोकऱ्यांमुळं झोप लागेना. हॉस्पिटलमध्ये उपचाराअभावी बालकांचा तडफडून जीव चाललाय अन्‌ दुसरीकडे "रागा' म्हणजे राहुल गांधी व "नमो' म्हणजे नरेंद्र मोदींच्या रूपानं कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षात हे आभासी युद्ध पेटलंय. लढाई सुरू आहे भारतात अन्‌ त्यात पोटार्थी सैन्य असं जगभरातून लढतंय. 

खरंतर ही देशांची नावं वगैरे नुसता आभास आहे. "बॉट' नावाच्या स्वयंचलित संगणकीय प्रणालीचा हा वापर आहे. ही प्रणाली तुमच्या सोशल मीडियाच्या वापराचा, डिजिटल चावडीवरच्या वर्तणुकीचा, शब्दांच्या वापराचा, प्रतिक्रियेच्या शैलीचा, प्रतिसादासाठी लागणाऱ्या वेळेचा बारकाईने अभ्यास करते व "कमांड' दिली, की त्याप्रमाणंच व्यक्‍त व्हायला लागतं. ट्‌विट्‌स लगेच "रिट्‌विट' व्हायला लागतात, "लाइक' दिले जातात. फेसबुकवर "शेअर' व "लाइक'द्वारे प्रतिसाद दिला जातो. "चॅटबॉट' म्हणजे हाच प्रकार. 

सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यांत राहुल गांधी भाजपला, नरेंद्र मोदींना वरचढ ठरत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी एशियन न्यूज इंटरनॅशनल म्हणजे "एएनआय'नं राहुल गांधींकडून "बॉट' यंत्रणा वापरली जात असल्याचा संशय एका बातमीत व्यक्‍त केला. स्मृती इराणी, राजवर्धन राठोड, अमित मालवीय वगैरे भाजपचे नेते गांधींवर तुटून पडले. नवा वाद पेटला. तज्ज्ञ सांगू लागले, की जगभर अशा क्‍लृप्त्या वापरल्या जातात. भारतात त्यांचा पाया भाजपनंच घातला. असे फंडे वापरून नेता किंवा पक्षाची आभासी प्रतिमा उभी करण्यात भाजप यशस्वी झाला. अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षानं तोच फंडा भाजपविरुध्द यशस्वीपणे वापरला. कारण, तेव्हा सोशल मीडिया, त्यातलं ट्विटर, व्हॉट्‌सऍप सारं काही नवं होतं. "स्क्रीन'वर येईल ते खरं मानलं जायचं. आता ती स्क्रीन बरीच स्वच्छ झालीय. सोशल मीडियावरच्या प्रत्येक कृतीचं विश्‍लेषण अन्‌ पृथःकरण व्हायला लागलंय. खऱ्याखोट्याचा फैसला व्हायला लागलाय. मोदी किंवा गांधींच्या टीमकडून "बॉट'चा वापर होत असल्याची चर्चा यासाठी चांगली आहे, किमान आभासी प्रतिमेचे बुरखे तरी फाटतील. 

"ट्विटर फॉलोअर्स'बाबत राहुल गांधी व नरेंद्र मोदी यांची तुलनाच शक्‍य नाही. रविवारी गांधींचे अनुसारक होते 38 लाख 40 हजार, तर मोदींचे तब्बल 3 कोटी 56 लाख, म्हणजे दहापट. बनावट किंवा संशयास्पद "फॉलोअर्स'चा मुद्दा मात्र दोघांनाही लागू आहे. राहुल गांधींचा "ट्‌विटर ऑडिट स्कोअर' आहे 51 टक्‍के. म्हणजे 49 टक्‍के "फॉलोअर्स' संशयास्पद आहेत. मोदींची स्थिती अधिक गंभीर आहे. 2 कोटी 20 लाखांहून अधिक संशयास्पद "फॉलोअर्स'मुळे त्यांचा "ऑडिट स्कोअर' आहे अवघा 36 टक्‍के. स्मृती इराणी यादेखील त्याच रांगेत आहेत. त्यांच्या 47 लाख "फॉलोअर्स'पैकी केवळ 40 टक्‍के "ट्विटर हॅंडल्स'ची ओळख निर्विवाद आहे. साठ टक्‍के "फॉलोअर्स' बनावट असल्याचा संशय आहे. 

दिव्या स्पंदना : राहुल ब्रिगेडची आयटी सेनानी 
नव्या वादामुळं चर्चेत आलीय कन्नड, त्याचप्रमाणं तमीळ, तेलगू सिनेमात नाव असलेली रम्या ऊर्फ दिव्या स्पंदना ही राजकारणात स्थिरावलेली अभिनेत्री. रम्यानं 2012 मध्ये कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढच्या वर्षी कर्नाटकातल्या मंड्या पोटनिवडणुकीत विजयी होऊन लोकसभेत पोचली. 2014 च्या मोदी लाटेत तिचा पराभव झाला. खासदार दीपेंदर हुडा यांच्याकडून कॉंग्रेसच्या आयटी सेलची प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर तिनं जणू कायापालट घडवला. मोदी सरकारवर उपरोधिक, तसंच तिखट हल्ला करणारे ट्विटस्‌, राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यातल्या भाषणांचं "लाइव्ह स्ट्रिमिंग', "फेसबुक लाइव्ह' वगैरेच्या माध्यमातून सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांमध्ये पक्षाची, राहुल गांधींची प्रतिमा सुधारण्यात दिव्या स्पंदना यशस्वी झालीय. राहुल गांधींचं एक "ट्‌विट' सरासरी 3800 वेळा "रिट्‌विट' होतं, तर मोदींची सरासरी आहे तेवीसशे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com