भीतीच्या छायेत भातुकली अन्‌ लाडकी 'टिकी'! 

Syria
Syria

आठ वर्षांपासून यादवीत होरपळणाऱ्या सीरियातल्या लाखो मुलांचं बालपण, भावविश्‍व पूर्ण उद्‌ध्वस्त झालं आहे. आजूबाजूला काय घडतंय ते कळणाऱ्या, पण का घडतंय ते मात्र न समजणाऱ्या या अजाण बालकांच्या वाट्याला आलंय रक्‍ताळलेलं आयुष्य... 

पाच वर्षे वयाची माया. बाहुल्या तिच्या खूप लाडक्‍या, पण सर्वांत लाडकी आहे पेंढा भरलेली लाडकी मांजर "टिकी'. आईला काळजी मायाची, तर मायाला "टिकी'ची. जमिनीवर पालकट मारून प्लॅस्टिकचा डिनरसेट सजवते अन्‌ लटकेच टिकीला खाऊ घालते. भातुकलीच्या खेळासारखं. बॉंबचे धमाके अन्‌ क्षेपणास्त्राच्या ज्वाळांनी संसार वेढला, तेव्हा मायाच्या आईनं छोटा स्टोव्ह, हाताला लागतील तेवढ्या खाण्या-पिण्याच्या चिजा सोबत घेतल्या. तेव्हा माया तिचं बालसुलभ आभाळ आवरत होती. आता एका इमारतीच्या तळघरात असे एकात एक दोन संसार फुललेत खरे. ते दोन्ही कधी उद्‌ध्वस्त होतील कोणास ठाऊक? 

हवा खेळती राहण्यासाठी साधी खिडकीही नसलेल्या अन्य एका तळघरात एकमेकांना खेटून दीडशेहून अधिक लोक राहताहेत. त्यात फक्‍त दोन वाढदिवस झालेला अहमदही आहे. आई-बाबांनी घरातलं सामान सोबत घेताना आपल्या खेळण्यातल्या गाड्या मागे ठेवल्या म्हणून त्यानं रडून आकांत केला होता, तेव्हा जीव धोक्‍यात घालून वडिलांनी त्या आणून दिल्या. अहमदच्या आठ महिन्यांच्या भावाचे, ओमरचे दात येताहेत. त्याचा त्रास होतोय. मुलांना खाऊ घालायला काही नाही. म्हणून नाइलाजानं पाण्यात पीठ-साखर मिसळून त्यांची आई दूध समजून त्यांना पाजते, मुलं जगवायचा प्रयत्न करते. 

हजारो युद्धग्रस्त बालकांमधली छोटी पाहुणी आहे, सहा महिन्यांची यास्मिना. तिची लाल रंगाची मोठी बम्बलबी म्हणजे मधमाशी आता बाहेर उघड्यावरच्या ढिगाऱ्यात पडलीय. तिचे गुंजेसारखे लाल-काळ्या रंगाचे डोळे यास्मिनाला आवडायचे. आता तिचा विसर पडलाय. कारण ती घरातल्या छोट्या मत्स्यालयात, फिशटॅंकमधल्या माशांमध्ये रमलीय. 

या अन्‌ अशा कितीतरी बालकांच्या कहाण्या आहेत, यादवीमुळे बेचिराख झालेल्या सीरियातल्या. राजधानी दमास्कसपासून दहा-बारा किलोमीटरवरच्या पूर्व घुटा भागातल्या. बॉंबवर्षावात उद्‌ध्वस्त इमारतींचे सांगाडे. भुताटकी झाल्यासारखे रस्त्यांवर चिटपाखरू नाही. आकाशात घिरट्या घालणारी अन्‌ थोडासा मानवी हालचालीचा संशय येताच बॉंब फेकणारी लढाऊ विमाने...अन्‌ इमारतींच्या तळघरांमध्ये, झालंच तर संकटकाळासाठी खोदलेल्या भुयारांमध्ये थाटलेले तात्पुरते संसार. त्यातल्या मुलांचं वेगळंच विश्‍व अन्‌ आजूबाजूला काय घडतंय ते कळणाऱ्या; पण का घडतंय ते मात्र न समजणाऱ्या अजाण बालकांच्या वाट्याला आलेलं रक्‍ताळलेलं आयुष्य. यामुळं जग चिंतेत आहे. 

आठ वर्षांपासून यादवीत होरपळणाऱ्या, लाखो बळी व कित्येक लाखांचं विस्थापन भोगलेल्या, रासायनिक शस्त्रांनी लाखोंना आयुष्यभराच्या वेदना दिलेल्या सीरियासाठी 2018 वर्ष उजाडलं तेच मुळी वर्षभराच्या तुलनात्मक शांततेचा भंग करीत. फेब्रुवारीतला रक्‍तपात मानवी इतिहासातला सर्वाधिक भयंकर संहार ठरावा. दोन आठवड्यांत निष्पाप मुलांसह शेकडो निरपराधांचा बळी गेला. इमारतींच्या भिंतींखाली चिणून अनेकांचे जीव गेले. इस्पितळांवरही अमानुष हल्ले झाले. आता मिळेल त्या आडोशाला तात्पुरती सोय करून उपचारांचे प्रयत्न केले जाताहेत. ते आडोसेही सुरक्षित नाहीत. औषधं संपलीत. मुदत उलटून गेलेली औषधे देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. संयुक्‍त राष्ट्रसंघानं घेतलेला शस्त्रसंधीचा निर्णयही फोल ठरला. 

आता सीरियाबाहेरच्या जगाला जे कळतंय ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनच. पंधरा वर्षांचा मुहम्मद नाजीम. पूर्व घुटा भागावरच्या विमानांच्या घिरट्या, बॉंबवर्षाव, उद्‌ध्वस्त इमारती, शाळा-दवाखाने वगैरेची छायाचित्रं, व्हिडिओ त्यानं ट्विटरच्या माध्यमातून जगभर पोचवली. नूर अन्‌ आला या सहा-सात वर्षांच्या दोन बहिणी. त्यांचं ट्विटर हॅंडलही दोघींचं मिळून आहे. नाजीमप्रमाणंच आपल्या अवतीभोवतीच्या रक्‍तपाताची दृश्‍य ट्विट करीत "किमान परमेश्‍वरासाठी तरी आम्हाला वाचवा', असे दोघींनी जगाला आवाहन केलंय. जग अस्वस्थ आहे. जगभरातली माध्यमं या सगळ्यांच्या ट्विटवरून बातम्या करताहेत, पण व्लादिमीर पुतीन व बशर अल असद या जोडीला आळा कसा घालायचा, याचं उत्तर मात्र कोणाकडेच नाही. 

सीरियातल्या यादवीकडे जगाचं लक्ष वेधलं गेलं ते एका चिमुकल्याच्या मृतदेहामुळं. सप्टेंबर 2015 मध्ये भूमध्य समुद्राच्या तुर्कस्तान किनाऱ्यावर वाळूच्या पुळणीवर पालथा पडलेल्या आयलान कुर्दीच्या मृतदेहाच्या छायाचित्रांनी जग हादरलं. त्यानंतर उद्‌ध्वस्त झालेलं अलेप्पो शहर, बेचिराख झालेल्या शाळा-उद्यानांची वर्णन करणारी, नाझींच्या अत्याचारांची वर्णन करणाऱ्या ऍन फ्रॅंकच्या डायरीची आठवण करून देणारी बाना अल आबेदची ट्विटरवर डायरी आली. तिनं तेव्हाचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, "फर्स्ट लेडी' मिशेल यांना साकडं घातलं. बॉंबवर्षावात जमीनदोस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या ओम्रान दाक्‍निशचा रक्‍तबंबाळ चेहरा नंतर जगापुढं आला. पुढे वर्षभराचा कालखंड तुलनेने शांततेचा राहिला. कारण उत्तर सीरियातला अलेप्पो, इदलिब, रोक्‍का, होम्स वगैरे शहरे व लगतचा भाग रशियाच्या मदतीनं बंडखोरांच्या, दहशतवाद्यांच्या ताब्यातून मुक्‍त करण्यात बशर अल असदच्या सैन्याला बऱ्यापैकी यश आलं. आता जैश-ए-इस्लाम व अन्य अतिरेकी संघटनांच्या विरोधातली लढाई अंतिम टप्प्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. घुटा हे अतिरेक्‍यांच्या ताब्यातलं अखेरचं मोठं ठाणं जिंकण्यासाठी रशियन-सीरियन फौजा सर्व शक्तिनिशी तुटून पडल्या आहेत. बॉंब खेळण्यासारखे वापरले जाताहेत. खरी खेळणी निर्जीव असली तरी मुलं ती सांभाळतात. कारण त्यात बालपण दडलेलं असतं. बॉंब मात्र सजीव असूनही नकोसे वाटतात. विशेषत: मुलांना. कारण त्यांच्या वर्षावानं चिमुकल्यांचं बालविश्‍व, भावविश्‍व उद्‌ध्वस्त होतं. यादवीत होरपळणाऱ्या सीरियातल्या लाखो मुलांच्या नशिबी हेच आलंय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com