पाकचा धडा... (श्रीराम पवार)

shriram pawar write pakistan article in saptarang
shriram pawar write pakistan article in saptarang

धर्माचं अधिष्ठान देण्याच्या नावाखाली मध्ययुगीन मानसिकतेत जगणाऱ्यांना राज्यकारभारात लुडबूड करू दिली की काय होऊ शकतं याचं उदाहरण पाकिस्तानच्या वाटचालीनं घालून दिलं आहे. पाकिस्तान टोकाच्या धर्मवादी विचारांनी किती घेरला आहे, याचं दर्शन इस्लामाबादचे रस्ते अडवून बसलेल्या धर्ममार्तंडांच्या आदोलनापुढं ज्या रीतीनं तिथल्या सरकारला संपूर्ण शरणागती पत्करावी लागली त्यातून स्पष्ट होतं. दोन-तीन हजारांचा एक जमाव रस्ते अडवतो, मुख्य मागणी मान्य करून अंमलबजावणी केली तरी सरकारला वेठीला धरतो आणि सरकार फरफटत जातं, तेव्हा लष्कर दोन्ही बाजूंनी सामंजस्यानं प्रश्‍न सोडवावा अशी विरक्त भूमिका घेतं, असं का घडलं यावर पाकिस्तानातले शहाणे खल करताहेत. सरकार नावाची व्यवस्था किती पोकळ झाली आहे, याचं दर्शन त्या आंदोलनानं पाकमध्ये घडवलं. हे दीर्घकाळच्या भरकटलेल्या प्रवासाला आलेलं फळ आहे.

पाकिस्तानात मागच्या काही काळात घडलेल्या दोन बाबींनी या देशाच्या वाटचालीची दिशा समोर येते. धर्माला राजकारणात आणि सार्वजनिक संस्थांत नको तितकं महत्त्व देण्याचे परिणाम तिथं दिसायला लागले आङेत. पाकिस्ताननं भारतविरोधासाठी पोसलेला हाफीज सईदसारखा दहशतवाद्यांचा म्होरक्‍या आधी दहशतवादी संघटना, नंतर निदान दाखवण्यापुरती स्वयंसेवी संघटना चालवता चालवता देशाच्या राजकारणात सक्रिय व्हायचे इरादे बोलून दाखवू लागला आहे. दहशतवादालाच राजकरणाच्या मध्यवर्ती प्रवाहात आणण्याची ही सुरवात असू शकते. दुसरीकडं पाकिस्तानच्या निवडणूक कायद्यातील बदलांवरून संतापलेल्या, बरेलवी गटाच्या आंदोलकांनी ज्या रीतीनं सरकारचं नाक दाबून अक्षरशः गुडघे टेकायला लावले, त्यावरून कट्टरपंथीयांना आवरणं सरकारच्या आवाक्‍याबाहेरचं बनल्याचं स्पष्ट होतं आहे. धर्माचं अधिष्ठान देण्याच्या नावाखाली मध्ययुगीन मानसिकतेत जगणाऱ्यांना राज्यकारभारात लुडबूड करू दिली की काय होऊ शकतं याचं उदाहरण पाकच्या वाटचालीनं घालून दिलं आहे. धर्मांध आणि लष्कराच्या युतीनं पाकिस्तानला झाकोळलं आहे. जे इतिहासक्रमात पेरलं ते तरारून उगवलं आहे. आता त्यापासून सहजी सुटका नाही, अशा टप्प्यावर देश म्हणून पाकिस्तान आला आहे. परिघावर कडव्यांना पाळून आपल्या राजकीय पोळ्या भाजता येतील, हा भ्रम असल्याचा स्पष्ट संदेश यातून मिळतो.

पाकिस्तान टोकाच्या धर्मवादी विचारांनी किती घेरला आहे, याचं दर्शन इस्लामाबादचे रस्ते अडवून बसलेल्या धर्ममार्तंडाच्या आदोलनापुढं ज्या रीतीनं तिथल्या सरकारला संपूर्ण शरणागती पत्करावी लागली त्यातून स्पष्ट होतं. दोन-तीन हजारांचा एक जमाव रस्ते अडवतो, मुख्य मागणी मान्य करून अंमलबजावणी केली तरी सरकारला वेठीला धरतो आणि सरकार फरफटत जातं, तेव्हा लष्कर दोन्ही बाजूंनी सामंजस्यानं प्रश्‍न सोडवावा अशी विरक्त भूमिका घेतं, असं का घडलं यावर पाकिस्तानातले शहाणे खल करताहेत. सरकार नावाची व्यवस्था किती पोकळ झाली आहे, याचं दर्शन त्या आंदोलनानं पाकमध्ये घडवलं. हे दीर्घकाळच्या भरकटलेल्या प्रवासाला आलेलं फळ आहे. राजकीय स्वार्थासाठी कडव्या गटांना वापरण्याच्या मोहातून पाकिस्तान अधिकाधिक कट्टरपंथी बनत गेला आणि आता एकेकाळी सर्वसमावेशक राष्ट्राचं स्वप्न पाहणाऱ्या देशात कट्टर इस्लामवादानं कब्जा केला. ज्याचा वापर करायचा प्रयत्न पाकिस्तानातल्या राजकारण्यांच्या पिढ्या करत आल्या, तेच परिघावरचे घटक केंद्रस्थानी येऊन व्यवस्थेला नाचवायला लागले आहेत.

पाकिस्तानातल्या अराजकाचं लक्षण असलेल्या या घटनेच्या केंद्रस्थानी होती, ‘तहरिक ए लाबैक या रसूल अल्लाह’ ही संघटना. पाकिस्तानात निवडणुकीसाठी उमेदवारानं घ्यायच्या शपथेच्या मसुद्याबाबत या संघटनेचा आक्षेप होता. वाद सुरू होताच सरकारनं शपथेचा मूळ तर्जुमा कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला; मात्र इस्लामाबादचे रस्ते अडवणाऱ्या गटांना या निमित्तानं आपलं सामर्थ्य दाखवून द्यायचं होतं. त्यांनी यासाठी कायदामंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही बाब प्रतिष्ठेची बनवली आणि राजीनाम्यानंतरच तडजोड होऊ शकली. इतकंच नाही तर आंदोलकांनाच नुकसानभरपाई देण्यापर्यंतच्या मागण्या सरकराला मान्य कराव्या लागल्या. लाऊडस्पीकरवरून द्वेष पसरवणाऱ्यांवर नियंत्रणासाठी घातलेले निर्बंध मागे घ्यावेत आणि शालेय पुस्तकात अभ्यासक्रम इस्लामशी सुसंगत बनवण्यासाठी आंदोलकांच्या दोन प्रतिनिधींना सामावून घ्यावं, यासारख्या मागण्यांवरही सरकार शरणागती पत्करतं आहे. खरंतर आंदोलकांनी अडवलेला रस्ता पाकची राजधानी इस्लामाबाद आणि लष्करी मुख्यालय रावळपिंडी यांना जोडणारा आहे. लष्करानं दटावणी जरी केली असती, तरी जमाव पांगवता आला असता. मात्र, लष्कारनं या संपूर्ण संघर्षात बघ्याची भूमिका निभावली. सरकारचं नाक कापलं गेलं, त्याचा शांतपणे आनंदच घेतला. सरकार आणि जमावातल्या संघर्षात लष्करानं मध्यस्थ बनावं- सरकारी यंत्रणा नव्हे, हे मुळातच लोकशाहीशी विसंगत आहे; मात्र पाकमध्ये याच प्रकारची व्यवस्था पोसली गेली आहे.  या संघर्षाला पाकमधील अहमदिया पंथीयांच्या विरोधात जाणीवपूर्वक सुरू असलेल्या मोहिमेचाही संदर्भ होता. पाकिस्तानच्या जन्मापासूनच कडवे इस्लामी गट अहमदियांना मुस्लिम म्हणवून घेण्यासही विरोध करत आले आहेत. अहमदिया पंथीय सातत्यानं निवडणुकांपासून दूर राहत आले आहेत. याचं एक प्रमुख कारण त्याचा समावेश अन्य अल्पसंख्याकांमध्ये केला जातो. १९७४ च्या घटनादुरुस्तीनं अहमदियांवर अनेक निर्बंध आणले आहेत. त्यांच्या मुस्लिम असण्यावरच आक्षेप आहेत. त्यांच्या प्रार्थानास्थळांना मशीद म्हणू द्यायचीही पाकमध्ये तयारी नाही. असं करू पाहणारे धर्मनिंदेच्या कायद्याखाली कारवाईस पात्र ठरतात. दुसरीकडे कडवे गट त्याचं जिणं मुश्‍कील करून टाकतात. तांत्रिकदृष्ट्या अहमदिया मतदान करू शकतात आणि निवडणूकही लढवू शकतात; मात्र मुस्लिमेतर अल्पसंख्याकांच्या गटातूनच त्यांना हे शक्‍य आहे. पाकच्या निवडणूक कायद्यातील वादग्रस्त ठरलेल्या बदलानं या पंथाच्या सदस्यांना मुस्लिमांच्या यादीत स्थान मिळण्याची शक्‍यता पाकमधील कट्टरपंथीयांना खटकणारीच होती.

भारतापासून वेगळ्या झालेल्या पाकिस्तानची अशी एकारलेली अवस्था अचानक झालेली नाही. दीर्घकालीन प्रक्रियेचं ते फलित आहे. राजकारणात धर्माचं स्तोम माजवण्यातून तात्पुरते लाभ उठवण्याची खेळी तिथल्या राजकीय नेत्यांच्या पिढ्यानपिढ्यांनी केली, त्यानं झालेलं नुकसान कायमचं आहे. देशाचं अस्तित्व, अस्मिता आधुनिक राष्ट्र-राज्याच्या कल्पनेशी, प्रगतीच्या आकांक्षांशी जोडण्यापेक्षा द्वेषावर आधारलेल्या मध्ययुगीन कल्पनांशी जोडण्याचा करंटेपणा पाकमध्ये झाला. सार्वजनिक जीवनातला कट्टरतावाद, इतरांचं अस्तित्वच नाकारणारं एकारलेपण आणि फोफावलेले जिहादी गट ही पाकिस्तानी वैशिष्ट्यं बनली आहेत. पाकिस्तानाची मागणी मुस्लिमांसाठीचं स्वतंत्र राष्ट्र म्हणूनच महंमद अली जीना यांनी केली होती. पाकिस्तानला आधी इस्लामी कट्टरपंथीयांच्या दिशेनं आणि नंतर अनिवार्यपणे जिहादी दहशतवादाच्या दिशेनं नेणाऱ्या धोरणांसाठी प्रामुख्यानं जनरल झिया उल हक यांना जबबादार धरलं जातं. त्यात तत्थ्यही आहे; मात्र ज्या जीना आणि झुल्फिकार अली भुट्टो यांना साधारणतः आधुनिक मानलं जातं, त्यांनीही धर्मांधांना चुचकारण्याचं राजकारण केलंच. जीना काही धार्मिक गृहस्थ म्हणून परिचित नव्हते, त्यांची जीवनशैली कट्टरपंथीयांसाठी खटकणारीच होती. मात्र, जीना यांनी धर्माचा वापर राजकारणासाठी अत्यंत धूर्तपणे केला. यातून वेगळा देश उभा करण्यात त्यांना यश आलं, तरी ज्या मार्गानं देश चालावा असं त्यांना वाटत होतं त्या मार्गानं तो कधीच चालू शकणार नाही याचीही निश्‍चिती झाली. जीना यांना आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी धर्माचा आधार घेणं आणि धर्मांधांना मोकळीक देणं ही सोय वाटली. एकदा वेगळं राष्ट्र झालं, की ते आधुनिक मार्गानं नेता येईल हा त्यांचा भ्रम होता. भुट्टो यांनी अफगाणिस्तानात वर्चस्व ठेवण्यासाठी ज्या शक्तींशी हातमिळवणी केली, ती दहशतवादाला बळ देणारीच होती. ‘जमात’ला चुचकारणं असो, की अफगाणिस्तानातल्या ‘वॉरलॉर्ड’ म्हणून गणल्या गेलेल्या गुलबुद्दीन हिकमतियार किंवा बुरहानुद्दीन रब्बानी यांना उभं करणं असो- या भुट्टो यांच्याच करामती होत्या. झिया यांनी तर उघडपणेच देशातल्या अनेक यंत्रणांत उघडपणे कडव्यांना नियंत्रण मिळवू दिलं. लष्करात, शिक्षणात धर्माचा थेट समावेश त्यांच्याच काळात सुरू झाला. ज्या इतिहासाच्या फेरलेखनानं कट्टरतावादाला बळ दिलं, तीही झिया यांचीच देणगी. पाकिस्तानाच्या संपूर्ण वाटचालीत धार्मिक कट्टरतावादाला चुचकारून राजकीय लाभ उठवण्याच्या प्रत्येक प्रयत्नात धर्ममार्तंड अधिकाधिक बलिष्ठ होत गेले. त्यांचा सार्वजनिक जीवनातला वावर तर वाढलाच; पण देशातल्या जगण्यावर मध्ययुगीन पगडा बसवण्याची धडपडही वाढत गेली. धर्मांधतेचा भस्मासुर एकदा धुमाकूळ घालायला लागल्यानंतर त्याला आवर घालणं ना कोणा राजकारण्याला साधलं आहे, ना पाकमध्ये सर्वशक्तिमान समजल्या जाणाऱ्या लष्कराला. धर्ममार्तंडांना चुचकारताना पाकनं दहशतावादी गटांनाही जन्म दिला. त्याचा वापर देशाच्या परराष्ट्र धोरणातलं हत्यार म्हणून करायचा प्रयत्न केला. अफगाणिस्तानात आपलं वर्चस्व राहावं ंयासाठी या धोरणाचा वापर झाला, तसाच भारताशी थेट रणमैदानातला संघर्ष जिंकणं शक्‍य नाही, याची जाणीव झाल्यानंतर दहशतवाद्यांचा वापर छुप्या युद्धासाठी सुरू करणं हा पाकच्या रणनीतीचा भाग बनला. पाकच्या या धोरणांचा अफगाणिस्तान आणि भारताला नेहमीच उपद्रव होत आला आहे; मात्र कट्टरतावाद्यांना मोकाट सोडण्याच्या या नीतीचा पाकमधली व्यवस्था कायमचा बळी ठरते आहे. आपणच उभे केलेले दहशतवादी उलटल्यानंतर त्यांच्याशी पाकिस्तानी लष्कराला युद्ध करावं लागतं आहे आणि त्यातून फार काही हाती लागत नाही, हे पाकच्या आयएसआयच्या कर्तृत्वाचंच फळ आहे.

‘तहरिक ए लाबैक या रसूल अल्लाह’च्या आंदोलनानं देशात वाढलेल्या कडव्या गटाच्या वर्चस्वाचं दर्शन झालं, तसंच पाकिस्तानानं पोसलेला दहशतवादी हाफीज सईद यानं राजकीय पक्षाद्वारे सक्रिय राजकारणात उतरण्याचे मनसुबे जाहीर करण्यातूनही पाकिस्तानची वाटचाल दिसू लागली आहे. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी पोसलेल्या शक्ती त्यांच्यावर उलटू लागल्या आहेत, हा यातील संदेश आहे. तसाच मुलकी नेतृत्वाची विश्‍वासार्हता संपवण्यासाठी पाकमध्ये लष्कर या प्रवृत्तींना बळ देताना दिसतं आहे. संपूर्ण आंदोलनाच्या काळात लष्करानं केवळ बघ्याची भूमिका घेतली, इतकंच नाही तर आंदोलकांना हवी तशी तडजोड सरकारला करावी लागेल, अशी व्यवस्थाही केली. हाफीज सईदच्या राजकीय महत्वाकांक्षांमागंही लष्करी हात असेल हे उघड आहे. पाकिस्तानातील या अंतर्गत संघर्षात हा देश अधिकधिक कडवेपणाकडे जाण्याचाच धोका आहे. असं घडणं पाकला खड्डयात घालणारं असेलच; पण त्यातून तयार होणारी समीकरणं भारताची डोकेदुखी वाढवणारीही असतील. हाफीजसारख्या घटकांचं मुख्य राजकीय प्रवाहात पावन होणं भारतविरोधी कारवायांना बळ देणारंच ठरेल. नवाज शरीफ यांच्या गच्छंतीनंतर तिथं मुलकी शासन कमालीचं केविलवाणं दिसू लागलं आहे. राजकीय पक्षांची विश्‍वासार्हता रसातळाला जाण्याचा परिणाम देश अतिरेकी धर्मवाद्यांच्या तावडीत जाण्यात होऊ शकतो. मुशर्रफ यांच्यासारखे संधीची वाट पाहत असलेले घटक आगीत तेल ओतायचं काम करत आहेतच. सर्वसमावेशकतेला सोडचिठ्ठी देत झालेली पाकची वाटचाल आधी हिंदू, ख्रिश्‍चन, नंतर अहमदिया, पुढं शिया याचं अस्तित्व नाकारत किंवा दुय्यम स्थान देत एकारलेली होत गेली आहे. ताज्या बरेलवींच्या आंदोलनानंतर आधीपासून पाकमधील व्यवस्थेवर प्रभाव ठेवून असलेले देवबंदी, वहाबी आणि बरेलवी यांच्यात वर्चस्वाच्या संघर्षाचा कोन जोडला जाऊ शकतो. ही वाटचाल आणखी गोंधळाकडं जाणारी आहे. याची सुरवात वर्चस्वासाठी धर्मवाद्यांना चुचकारण्यातून, इतिहासाच्या सोयीच्या फेरलेखनातून, अभ्यासक्रमाच्या मोडतोडीतून झाली होती. जगासाठी पाकच्या वाटचालीचा हाच धडा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com