भयराज्याच्या अंताचा आरंभ... (श्रीराम पवार)

इसिसबरोबरच्या संघर्षाची तयारी करताना इराकी सैनिक.
इसिसबरोबरच्या संघर्षाची तयारी करताना इराकी सैनिक.

‘दहशतवादाचा आतापर्यंतचा सगळ्यात क्रूर चेहरा’ अशी ओळख असणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेच्या बीमोडाला सुरवात झाली आहे. इसिसची कोंडी करण्याचे प्रयत्न या वर्षीच्या म्हणजे सन २०१६ च्या सुरवातीपासूनच होत होते. आता हे वर्ष अस्ताकडं जात असताना इसिसचा जोर कमी होऊन त्याविरुद्ध लढणाऱ्यांचा जोर वाढतो आहे, हे सुचिन्हच. इसिसचा पराभव अटळ असला, तरी तिच्या पाडावानंतरही या संघटनेचे टोकाचे दहशतवादी स्वस्थ बसणार नाहीत. ते भूमिगत होतील आणि अन्य दहशतवादी संघटनांप्रमाणं जगभरात कारवाया करून लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतील. मात्र, भूमी आणि नेता गमावल्यास इसिसचा प्रभाव लक्षणीयरीत्या संपेल.

पाश्‍चिमात्य देशांच्या हवाई पाठबळावर इराकी फौजांनी अन्य लढाऊ गटांसमवेत इसिसच्या दहशतवादी राज्यावर निर्णायक हल्ल्याला सुरवात केली आहे. या कारवाईला येत असलेलं यश पाहता इसिसच्या भयराज्याच्या शेवटाचा आरंभ झाल्याचं दिसतं. स्वतःला खलिफा घोषित करणाऱ्या अल्‌ बगदादीच्या कथित खिलाफतीचा मोसूल हा बालेकिल्ला आहे. आतापर्यंत इसिसचा मुकाबला कसा करावा आणि त्यात कुणाचा किती सहभाग असावा, यावरून असलेल्या इसिसविरुद्धच्या जगभरातल्या शक्तींमधल्या मतभेदांचा पुरता लाभ घेत बगदादीचं राज्य सुरू आहे. दहशतवादाचा अत्यंत क्रूर चेहरा दाखवलेल्या इसिसचा बीमोड कधीतरी होणार हे उघडच आहे. यात अमेरिका निर्णायक हल्ल्याची तयारी कधी करणार याला महत्त्व होतं. आता अमेरिकी हवाई संरक्षणाखाली इराकी फौजा, शियापंथीय आणि कुर्दांच्या फौजा एकत्रितपणे मोसूलवर चालून गेल्या आहेत. मोसूलमध्ये या संयुक्त सैन्याला इसिसचे दहशतवादी सर्वांत कडवा प्रतिकार करतील, यात शंका नाही. सुमारे दोन आठवडे चाललेल्या चकमकींनंतर मोसूललगत पाऊल ठेवणं या सैन्याला शक्‍य झालं आहे. ही लढाई शहरातल्या रस्त्यारस्तांवर लढली जाईलच. बगदादीला संपवणं हा आता इसिसविरुद्ध लढणाऱ्यांचा समान अजेंडा बनला आहे. बगदादीचा शेवट हा इसिसवरचा कुठाराघात असेल. मात्र आतापर्यंतच्या दहशतवादी संघटनांविरुद्धच्या लढ्यांचा अनुभव पाहता मोसूल पडलं किंवा बगदादी संपला तरी दहशतवाद संपण्याची चिन्हं नाहीत. अल्‌ कायदाप्रमाणं इसिसचा बंदोबस्त ही तातडीची गरज आहे. मात्र दीर्घ काळात प्रत्येक वेळी नवं रूप, नवा म्होरक्‍या घेऊन येणाऱ्या इस्लामी दहशतवादाचा मुकाबला लष्करी कारवाईपलीकडं अनेक पातळ्यांवर करावा लागेल.

इसिस नावाचं जगासमोर उभं राहिलेलं मध्ययुगीन मानसिकतेत जगला ढकलू पाहणारं अतिशय खतरनाक असं प्रकरण २०१४ मध्ये सातत्यानं यश मिळवत होतं. याचा मुकाबला कसा करावा, हे जगातल्या धुरिणांना पडलेलं कोडं होतं. २०१५ मध्ये इसिसच्या कारवायांत खंड नव्हता आणि यंदाही त्या कमी झालेल्या नाहीत. किंबहुना, दहशतवाद्यांच्या परिचित असा हल्ला करून लक्ष्य वेधण्याच्या कार्यपद्धतीपेक्षा एका भागात आपलं राज्यच स्थापन करणाऱ्या इसिसनं, फार विस्तार शक्‍य नाही, असं दिसू लागताच प्रत्येक मोठ्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्याची चाल सुरू केली. अर्थात, इसिसच्या नावानं हल्ले करणाऱ्या अशा एकांड्या दहशतवाद्यापेक्षा कुणी मान्यता दिली नसली, तरी एका भूभागावरचं राज्य हीच इसिसची ताकद आणि ओळख आहे. इसिसचं वैशिष्ट्य असलेलं तथाकथित खिलाफतीचं प्रत्यक्ष भूभागावरचं राज्य हाच आता गळफास ठरू लागला आहे. यात नवलही काही नाही. इसिस किंवा जिहादी सामर्थ्याचा, त्यातल्या कथित धार्मिक अपिलाचा कितीही आव आणला तरी असा दहशतवाद हेच अस्तित्वाचं कारण असलेलं राज्य एकविसाव्या शतकात कायम नांदणं अशक्‍यप्राय बाब आहे. साहजिकच इसिसच्या कारवायांचा बोलबाला वाढत राहिला आणि ‘आता इसिस अमक्‍या तमक्‍या देशाच्या उंबरठ्यावर’ अशा सनसनाटी हेडलाइन सजत असल्या, तरी जगाला खिलाफत बनवायचं स्वप्न पाहणाऱ्या बगदादीच्या अंताची सुरवात झाली आहे. त्यासोबत इसिस नावाच्या राज्याच्या अंताचीही ती सुरवात असेल. इराक आणि सीरियातला इसिसनं जिंकलेला बराचसा भाग आता या दहशतावाद्यांच्या तावडीतून मुक्त होऊ लागला आहे. एका अंदाजानुसार, ताज्या संयुक्त कारवाईपूर्वीच इराकमधला ४० टक्के, तर सीरियामधला २० टक्के भाग इसिसकडून खेचून घेण्यात तिथं लढणाऱ्या फौजांना यश आलं आहे. इसिसचं आव्हान पेलायचं कसं, याविषयीचा जागतिक गोंधळ अजून पुरता संपलेला नाही. प्रत्येक देशाचे वेगळे हितसंबंध लक्षात घेता तो तसा संपायची चिन्हंही नाहीत. रशियाच्या कारवाईला अमेरिका आणि सौदीचा विरोध आहे. अमेरिकेला थेट आपलं सैन्य इसिसव्याप्त प्रदेशात धाडायची इच्छा नाही. अफगाणिस्तानातल्या ओसामा बिन लादेनला आश्रय देणारी तालिबानी राजवट उलथून टाकताना अमेरिकेनं सर्वंकष युद्धाचा मार्ग निवडला, तसा तो सीरियात वापरण्याची या देशाची अजून तरी तयारी नाही. सौदी आणि इराणकडून होणाऱ्या प्रयत्नांमधली विसंगती जगजाहीर आहे. अशा स्थितीत इसिसचा मुकाबला एकजिनसीपणे केला जाणं संभवत नाही. तरीही हा राक्षस गाडला पाहिजे, यावर सर्वांचं एकमत आहे. तो गाडताना आपले जागतिक पातळीवरचे व्यूहात्मक हितसंबंध राखले जातील, याची काळजी घेण्याच्या प्रयत्नात सारे आहेत.

ही स्थिती इसिसच्या पथ्यावर पडणारी असली तरी इसिस आणि आतापर्यंतच्या दहशतवादी संघटनांच्या कर्यपद्धतीतला एक प्रमुख फरक इसिससाठी आता अडचणीचा ठरू पाहतो आहे. इसिसची स्थापना जिहादी उद्दिष्ट समोर ठेवून झाली आहे. यात इसिसच्या कल्पनेतल्या इस्लामला न मानणारा कुणीही शत्रू; त्यातही ‘सलाफी विचारसरणीचे तेवढेच राज्य करायला लायक; बाकी सारे नापाक’ असला भोंगळ मामला आहे. जिहादी ब्रॅंडच्या दहशतवादात सर्वाधिक झगमगाट पाहिला तो अल्‌ कायदानं. लादेनसारख्या थंड डोक्‍याच्या सौदी उद्योजकाच्या नेतृत्वाखाली चालवली गेलेली ही संघटना अमेरिकेवरच्या हल्ल्यानं जगाच्या नजरेत भरली. दहशतवाद नावाचं काहीतरी मानवजातीला ग्रासणारं प्रकरण अस्तित्वात आहे, याची जाणीव अमेरिका आणि पाश्‍चात्त्य जगाला त्या हल्ल्यानंतर झाली. दहशतवाद खासकरून इस्लामी दहशतवाद हा आपला प्रश्‍नच नाही, असा आविर्भाव असणाऱ्या पाश्‍चात्त्यांना किंवा दहशतवादी कारवायांच्या वेळी भारतासारख्या देशांना सबुरीचे सल्ले देणाऱ्यांना आणि त्याकडं केवळ कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा म्हणून पाहणाऱ्यांना हा दहशतवाद जगाच्या शांततेला आणि स्थैर्याला गिळायला निघाला आहे, याची जाणीव झाली होती. ती करून देणाऱ्या अल्‌ कायदाचं दहशतीचं मॉडेल हे, जगभरात अनुयायांची साखळी तयार करून त्यामार्फत घातपात घडवायचे, असंच होतं. अफगाणिस्तानातल्या बजबजपुरीनं लादेनला आश्रय दिला आणि पाकिस्तानसारखा दुटप्पी देश एका बाजूला अमेरिकेचं युद्ध लढतानाच दुसरीकडं लादेनलाही सांभाळत होता. मात्र लादेनचं दहशतीचं तंत्र हे राज्य तयार करण्याचं नव्हतं. आर्थिक गणितही प्रामुख्यानं टोकाच्या धर्मांधांकडून आणि ज्यांना याच मार्गानं जगात इस्लामी सत्ता तयार होईल, असा आशावाद वाटतो, अशा दहशतवाद्यांच्या सहानुभूतिदारांकडून मिळणाऱ्या देणग्यांवर आधारलेलं होतं. बगदादीच्या नेतृत्वाखालच्या इसिस किंवा इसिल किंवा दहेश अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या मॉडेलचं आर्थिक गणित यापेक्षा वेगळं आहे. ते दहशतवादाच्या पाठीराख्यांच्या देणग्यांवर अवलंबून आहेच. मात्र त्याशिवाय थेटपणे एखाद्या भूभागात सत्ता स्थापन करून तिथं करवसुलीपासून तिथल्या नैसर्गिक स्रोतांच्या वापरापर्यंत आणि खंडणीखोरीसारख्या मार्गांपर्यंत अनेकपदरी आहे. इसिसचं वेगळेपण स्वतंत्र राज्य स्थापन करण्यात आहे. बगदादीनं कथित खिलाफत तयार करून स्वतःला खलिफा ठरवलं. जगभरात या भयराज्याच्या अशाच कथित विलायती आणि अमिराती कशा असतील, याचे नकाशेही बनवले. इसिसच्या या दहशती राज्याला जगातल्या कोणत्याही देशानं किंवा संयुक्त राष्ट्रांसारख्या संघटनांनी मान्यता दिलेली नाही, देण्याची शक्‍यताही नाही. दुसरीकडं, असलं दहशती राज्य सभ्य-सुसंस्कृत समाजाच्या मान्यतेची फिकीर करत नाही. मध्ययुगीन कालबाह्य कल्पनांना न मानणाऱ्यांना संपवणं आणि त्यासाठी अखंड युद्ध करत राहण्याची जबाबदारी खलिफावर टाकणाऱ्या या विचारसरणीसाठी आधुनिक राष्ट्र-राज्य आणि त्यांच्यातला परस्परसंबंध यांना तसाही काही अर्थ नाही. मात्र साधारणतः इंग्लंडच्या आकाराच्या भूभागावर इसिसनं कब्जा केला होता. दहशतवाद्यांनी चालवलेलं राज्य अस्तित्वात आलं आणि या खिलाफतीनं तेलाचं उत्पादन, त्याची बेकायदा विक्री, करवसुली आदी माध्यमांतून पैसा गोळा करायला सुरवात केली होती. एका बाजूला अल्‌ कायदाचा ऱ्हास होत असताना जिहादच्या कल्पनेनं पेटलेल्या धर्मांधांसाठी खिलाफत हा नवा आशेचा किरण बनला. साहजिकच देणग्यांचा ओघही इसिसकडं सुरू झाला. मध्ययुगीन मानसिकतेत वावरणाऱ्या या संघटनेनं जगाची आपल्या कल्पनेनुसार रचना करायचं ठरवलं आहे. त्यात जिहादी इस्लामखेरीज अन्य कोणत्याही प्रवाहाला स्थान नाही; ‘टोकाच्या हिंसेचा विचार न मानणाऱ्या मुस्लिमांनाही नाही,’ हे या संघटनेचं सूत्र आहे. २०१६ च्या सुरवातीपासूनच इसिसची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमधील परस्परांच्या विरोधातले हितसंबंध जमेला धरूनही या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे.

इसिसविरुद्धच्या कारवाईच्या मर्यादा या अमेरिकेची थेट हस्तक्षेपाची अनिच्छा आणि कारवाई करणाऱ्यांमधले मतभेद, वंशभेद यातून आल्या आहेत. मात्र २०१६ हे वर्ष अस्ताकडं जात असताना इसिसचा जोर कमी होऊन त्याविरुद्ध लढणाऱ्यांचा जोर वाढतो आहे, हे सुचिन्हच. इराक आणि अफगाणिस्तानातल्या अमेरिकी कारवाईचं नेतृत्व करणाऱ्या जनरल डेव्हिड पेट्रॉस यांच्या मते, २०१७ मध्ये इसिसचा जमिनीवर पराभव होऊ शकतो. हे कधी घडेल, यावर मतांतरं असू शकतात; पण इसिसचा पराभव अटळ आहे, यात शंका नाही. मुद्दा ‘त्यानंतर काय’ हा आहे आणि ज्या कारणांसाठी इसिसविरुद्धची निर्णायक लढाई लांबत चालली आहे, तीच कारणं ‘पुढं काय’ हे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. इसिसच्या तावडीतून इराक आणि सीरियाचा भाग मुक्त केल्यानंतर त्यावर वर्चस्व कुणाचं, यावरून होणाऱ्या हाणामाऱ्या हा ‘पुढं काय’ या प्रश्‍नाचा एक पैलू आहे. असा पराभव झाल्यानंतरही इसिस पूर्णतः संपेल असं कुणी मानत नाही. या संघटनेचं पुढचं स्वरूप कसं असेल आणि दहशतवादाविरुद्धच्या व्यापक लढाईचा हा शेवट असेल की केवळ एक तात्पुरता विराम, हा तितकाच महत्त्वाचा दुसरा पैलू आहे.

ज्या सीरियात इसिसनं राज्य तयार केलं, तो भाग शिया इराण आणि सुन्नी सौदी यांच्यातल्या वर्चस्वसंघर्षासाठीची ‘सुपीक जमीन’ आहे. अमेरिका आणि साथीदारांना इसिसच्या पराभवाइतकाच रस सीरियातली बशर अल्‌ असद यांची राजवट संपवण्यात आहे. तुर्कस्तानलाही तेच हवं आहे. मात्र रशियाचा असद यांच्या राजवटीला पाठिंबा आहे. असद यांची राजवट कमजोर झाली की इसिससारख्या कडव्या संघटनांना जोर येतो, हे दिसत असलं, तरी ‘असद नको’ ही भूमिका इसिसविरुद्धच्या निर्णायक कारवाईत नेहमीच मुद्दा बनून येत राहिली. इसिसच्या पराभवानंतरही तो संपलेला नसेल. इतरांसोबत लढणाऱ्या कुर्दांचं स्वतंत्र राज्याचं स्वप्न आहेच. त्याला तुर्कस्तानचा विरोध असेल. असद असोत की इराकचे सत्ताधारी, इसिसशी लढत असल्याच्या नावाखाली त्यांनी आपापल्या देशातल्या तितक्‍याच प्रखर विरोधाला नियंत्रणात ठेवलं आहे. एकदा इसिसचा पाडाव झाला की हे आतले विरोधक पुढं येतील. म्हणजेच इसिसच्या पाडावानं या भागात शांतता नांदेल, ही शक्‍यता कमीच.

इसिसच्या पाडावानंतरही या संघटनेचे टोकाचे दहशतवादी स्वस्थ बसणार नाहीत. ते भूमिगत होतील आणि अन्य दहशतवादी संघटनांप्रमाणं जगभरात कारवाया करून लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतीलच. इस्तंबूल, ढाका, बगदाद अशा ठिकाणी अलीकडं झालेल्या कारवायांमधून ही चाल दिसायला लागलीच आहे. मात्र भूमी आणि नेता गमावल्यास इसिसचा प्रभाव लक्षणीयरीत्या संपेल. त्यापुढचा मुद्दा आहे, तो हा की जिहादी मानसिकतेतून दहशतवादी गट तयार होणं या पराभवानं तरी संपेल काय? याचं उत्तर कुणी सकारात्मक देत नाही. दहशतवादाला बळ मिळण्याचं कारण बड्या जागतिक शक्तींच्या राजकारणातही आहे. दहशतवादाविषयीच्या त्यांच्या दुटप्पी भूमिकेत आहे. दहशतवादी टिपून दहशतवाद संपत नाही, हा अनुभव आहे. रूप बदलून तो दुसरीकडं कुठंतरी डोकं वर काढतो. त्याची मुळं अर्थकारणात, राजकारणात, आणि धर्मांधतेतून जीव द्यायाला तयार करणारं ब्रेन वॉशिंग करण्यात आहे. मुद्दा त्यावरच्या इलाजाचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com